Sunday 27 November 2011

अखेर नईमाची मोहीम फत्ते!

ही बंगालमधल्या एका छोटय़ा मुलीची, नईमाची गोष्ट आहे. नईमाला बंगालमध्ये काढतात, ती अल्पना चित्रं खूप सुरेख काढता येत. तिच्या गावातली ती उत्कृष्ट अल्पना चित्रकार होती. तिच्या चित्रांना दरवर्षी बक्षीस मिळत असे. शिवाय नईमा खूप हुशार मुलगी होती. तिला घरच्या गरिबीमुळे शाळा लवकर सोडावी लागली, पण तिच्या हुशारीवर तिचे आई-बाबा खूश होते. त्यांचा आपल्या मुलीवर खूप जीव होता. नईमाची छोटी बहीण शाळेत जात होती. पण तिलाही लवकरच शाळा सोडावी लागणार होती. कारण तिच्या परीक्षेची फी घरच्यांना परवडणारी नव्हती. नईमाचे अब्बाजान म्हणजे वडील सायकल रिक्षा चालवत. रात्रंदिवस रिक्षा चालवूनही त्यांना फार पैसे मिळत नसत. त्यामुळे ते भरदुपारी उन्हातान्हातही आराम न करता रिक्षा चालवत. त्याचं नईमाला फार वाईट वाटत असे.
 
नईमा आईला घरकामात खूप मदत करत असे. ती सतत कामात असे. पण तिच्या डोक्यात सतत पैसे कमवून वडलांना मदत करण्याच्या नवनव्या आयडियाच्या कल्पना येत.  तिच्या वर्गातला आणि तिचा एकमेव मित्र सलीमही रिक्षा चालवून आपल्या वडलांना मदत करत असे. पण तो मुलगा होता आणि नईमा मुलगी. मुलींना घराबाहेर जाऊन कोणतीच कामं करता येत नसत. छोटय़ाशा खेडेगावात अशीच पद्धत असते. मुलींनी घरकामात आईला मदत करावी आणि मुलांनी वडलांना त्यांच्या कामात मदत करावी, असा रिवाजच असतो खेडेगावात. पण नईमाला मात्र वडलांना मदत करायची खूप इच्छा होत असे. त्यासाठी तिला वेगवेगळ्या कल्पना सुचत असत. त्या ती सलीमला सांगत असे. सलीम तिचा चांगला मित्र होता.
 
एकदा नईमाला एक आयडियाची कल्पना सुचली की, संध्याकाळच्या वेळात आपणच रिक्षा चालवायची. मुलगी रिक्षा चालवतेय हे गावातल्या लोकांना चालणार नाही. तेव्हा मुलाचे कपडे घालायचे आणि मुलाच्या आवाजात बोलायचं. तसा पुरुषासारखा आवाज तिनं सलीमला काढूनही दाखवला. सलीम त्यावर म्हणाला, ‘अरे बापरे! तुझा आवाज तर माझ्या आवाजापेक्षाही पुरुषी वाटतो.’ पण ही कल्पना काही सलीमला तितकीशी आवडली नव्हती. पण नईमा मात्र झपाटून गेली होती. मग तिनं दुपारी वडील झोपलेले असताना त्यांची रिक्षा चालवून पाहण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण रिक्षा वळवता न आल्यानं ती टेकडीवरून खाली गेल्यावर झाडीत जाऊन धडकणार होती. ते पाहून नईमानं पटकन रिक्षातून खाली उडी मारली. त्यामुळे तिला काही लागलं नाही, पण नव्या को-या रिक्षाचं बरंच नुकसान झालं.
 
यामुळे नईमाला खूप वाईट वाटलं. कारण आता वडलांना मदत करणं तर सोडाच पण उलट रिक्षाच्या दुरुस्तीसाठी पैसे लागणार होते. ते कुठून आणणार अब्बाजान? शेवटी आईनं तिच्या हातातल्या एकुलत्या दोन सोन्याच्या बांगडय़ांपैकी एक बांगडी विकायला सांगून त्यातून रिक्षा दुरुस्तीचा खर्च करायला सांगितला. वडलांनाही बांगडी विकताना खूपच वाईट वाटत होतं. आणि नईमाला तर बांगडी विकण्याच्या नुसत्या कल्पनेनंच खूप दु:ख झालं. कारण त्यांच्या घरात तिच्या आईच्या हातातल्या त्या दोन बांगडय़ांचाच तेवढा मंजुळ आवाज ऐकू येत असे. त्यामुळे नईमानं ठरवलं की, काहीतरी करून आपण अब्बाजानला रिक्षा दुरुस्तीच्या कामात मदत करायची. तिनं सलीमला आपली ही आयडिया सांगितली. सलीमला नईमाच्या हुशारीचं खूपच कौतुक वाटलं आणि अभिमानही. त्यानं तिला शेजारच्या गावात गुपचूप जाण्यासाठी स्वत:चे कपडे आणून दिले. एक कुडता, लुंगी आणि टोपी असा सलीमसारखाच वेष करून नईमा तिच्या नव्या मोहिमेवर निघाली. तिची ही मोहीम यशस्वी झाली का, का त्यात मागच्यासारखंच नईमाला अपयश आलं? की नईमानं वडलांना रिक्षा दुरुस्तीच्या कामात मदत केली? हे सगळे प्रश्न तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही थेट पुस्तकच वाचलेलं बरं! पण नईमा ही खूप हुशार आणि बहादूर मुलगी आहे हे पण लक्षात ठेवा.
  • रिक्षावाली मुलगी : मिताली पर्किन्स, अनुवाद - सुनंदा अमरापूरकर,
    ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे,
    पाने :80, किंमत : 40 रुपये

गोष्टी इरावतीच्या, फजिती माकडूची

मित्रांनो, तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात. पण रोज रोज नव्यानव्या गोष्टी ऐकायला आवडतात. शिवाय त्या गोष्टीत प-या, ससे, वाघ-सिंह, माकडं, फुलपाखरं, राक्षस, चेटकिणी, हत्ती, भुतं असे लोकही हवे असतात. हो, हे सगळे लोकच म्हणायचंय मला. माझ्याकडून काही चूक नाही झालेली. कारण हे सगळे प्राणी, पक्षी तुमच्यासारखंच बोलतात. तुम्ही बोलता ती भाषा त्यांना पण येते. म्हणजे तुम्ही मराठीमध्ये बोलता, त्यामुळे ते पण मराठीत बोलतात. अमेरिकेत हेच लोक इंग्रजीमध्ये बोलतात. कारण तिथे ते मराठीमध्ये बोलले तर तिथल्या मुलांना ते कळणार नाही आणि इथे ते तुमच्या गोष्टीत इंग्रजीमध्ये बोलले तर तुम्हाला कळणार नाही. बरोबर की नाही?शिवाय त्यांना तुमची आणि तुम्हाला त्यांची भाषा कळली नाही, तर तुमची मैत्री कशी होणार? त्यामुळे गोष्टीत का होईना हे सगळे लोक तुमच्यासारख्या भाषेत बोलतात. त्यांचे आई-बाबा असतात, ते तुमच्या आई-बाबांसारखे बोलतात, तर त्यांची छोटी छोटी तुमच्यासारखी मुलं तुमच्यासारखंच तोतरं तोतरं बोलतात. त्यामुळे इरावती आणि तिचा भाऊ ईशान यांना अशा गोष्टी फार आवडायच्या. रोज रात्री झोपण्यापूर्वी इरावतीला एक नवी गोष्ट सांगावीच लागायची. इरावती होती चार वर्षाची आणि ईशान होता नऊ वर्षाचा. त्यामुळे ईशान इरावतीसारखा हट्ट करत नसायचा, पण त्यालाही इरावतीसारखीच गोष्ट आवडायची. पण इरावती फार म्हणजे फारच हुशार मुलगी होती. तिला गोष्टीत तिचे सगळे मित्र हवे असायचे. शिवाय गोष्ट तिच्या मनासारखी हवी असायची. समजा आईनं मध्येच गोष्ट पटपट सांगायला सुरुवात केली की, इरावती तिला थांबवून म्हणायची, ‘ये, आई असं नाही नां. नीट गोष्ट सांग. मध्ये मध्ये तू विसरून जातेस.’ मग इरावतीच मधली मधली काही वाक्यं सांगून गोष्ट पुढे न्यायची.पण रोज रोज नवी गोष्ट आणणार कुठून? त्यात आईला दिवसभर पुस्तकं वाचायला वेळच मिळायचा नाही. तशी त्यांच्या घरात खूप पुस्तकं होती. बाबा आणि आई दोघंही खूप पुस्तकं वाचायचे. छोटा ईशानही गोष्टींचा पुस्तकं हळूहळू वाचायला लागला होता. पण तो वाचायला लागला की, इरावतीलाही तेच पुस्तक हवं असायचं. मग त्यांच्यामध्ये भांडाभांडी व्हायची. पण इरावती हुशार मुलगी होती एकदम. तिला ईशानची अभ्यासाची पुस्तकं-वह्या खूप आवडायच्या. त्यातल्या अनेक गोष्टी, कविता तिला तोंडपाठ झाल्या होत्या. मग तिने एकदा आई-बाबाचीही पुस्तकं वाचून पाहिली, पण तिला त्यातलं काहीच कळलं नाही. त्यामुळे तिला ती पुस्तकं अजिबात आवडली नाहीत. एवढी अगडबंब आणि चित्रं नसलेली पुस्तकं आई-बाबा कशाला वाचतात, असा तिला प्रश्न पडला.पण हे सगळं चालायचं दिवसा. रात्र झाली आणि जेवण झालं की, इरावतीला ‘गोस्त’ सांगावी लागायची. पण तिला रोज रोज गोष्टी सांगून सांगून आई कंटाळून गेली. मग तिने वैतागून ‘आजपासून बाबाच तुला गोष्ट सांगेल’ असं सांगू टाकलं. रडणाऱ्या इरावतीला तोतनाची गोष्ट (म्हणजे कोकणाची) गोष्ट हवी होती. बाबानं ती कशीबशी सांगितली. दुस-या दिवशी त्यानं माकडूची (म्हणजे माकडाच्या छोटय़ा पिल्लाची) गोष्ट सांगायला सुरुवात केली.या माकडूच्या गोष्टीतल्या मुलीचं नाव इरावती होतं आणि तिच्या भावाचं ईशान. शिवाय त्यात त्यांचे आई-बाबा, त्यांना भेटलेले इतर लोक, त्यांच्या सहली या सगळ्यांनाही आणलं. रोज रात्री बाबा त्याला सुचेल तशी गोष्ट रंगवून रंगवून सांगायचा. त्यामुळे त्यात रोज नव्यानव्या गमतीजमती घडत. माकडू तसा इरावतीसारखाच हट्टी होता. त्यानं त्यांच्याशेजारच्या झाडावर राहणाऱ्या वटवाघळांबरोबर दोस्ती केली. त्या वटवाघळांनी माकडू आणि त्याच्या मित्रांना आपल्या सोबत रात्री फिरायला न्यायचं कबूल केलं. वटवाघळं रात्री कशी फिरतात, हे तुम्हाला माहीत असेल. तुम्ही त्यांना पाहिलंही असेल फिरताना. पण वटवाघळांसोबत रात्री आकाशात उडण्याची कल्पना तुम्ही केलीय का? माकडू आणि त्याच्या सोबत्यांनी तर प्रत्यक्षात त्यांच्याबरोबर उडण्याचा प्रयोग करून पाहिला. तो यशस्वी झाला का? त्यांना वटवाघळांसोबत उडता आलं की नाही? माकडूच्या गोष्टीत पुढे काय झालं? इरावतीला माकडूची ही गोष्ट आवडली की नाही? ‘मग? पुढे काय झालं? थांबलास का? पुढे सांग ना?’ असंच इरावती बाबाला म्हणत राहिली? काय गंमत आहे की, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पुस्तकात मिळणारच आहेत. त्यामुळे हे प्रश्न घेऊन तुम्ही थेट पुस्तकच का वाचत नाही? कारण मग तुमची इरावती आणि ईशान यांच्याशी पण मैत्री होईल. दोन नवे दोस्त तुम्हाला मिळून जातील राव!

इरावतीच्या गोष्टी : श्रीनिवास पंडित 
ऊर्जा प्रकाशन, पुणे 
 पाने :40, किंमत :45 रुपये

बिन भिंतींची शाळा

मित्रांनो, तुम्ही मोठय़ा, खूप यश मिळवलेल्या लोकांच्या गोष्टी आई-बाबा, आजी-आजोबा यांच्याकडून आणि शाळेतल्या शिक्षकांकडूनही ऐकल्या असतील. राजा-राणीच्या, दुष्ट चेटकिणीच्या आणि राजकुमाराच्या पराक्रमाच्या गोष्टी तुम्हाला खूप आवडतातही. आपणही मोठं झाल्यावर असंच बहादूर व्हायचं, असं तुम्हाला वाटत असतं. तुम्ही ‘तू मोठेपणी काय होणार?’ असं कुणी विचारल्यावर मारे ऐटीत ‘सैनिक होणार, डॉक्टर होणार, हिरो नाहीतर हिरॉईन होणार’ अशी काय काय उत्तरं देत असता.
 
असं काहीतरी होण्यासाठी तुम्ही मग शाळेत जाता, अभ्यास करता, आई-बाबांचं ऐकता, काका-मामांचं ऐकता. ते करतात तशा गोष्टी करून पाहता. त्यात कधी कधी तुमची फजितीही होते. म्हणजे तुम्ही बाबा ऑफिसला गेल्यावर त्याचा टाय गळ्यात अडकवून आणि त्याचे शूज घालून त्याच्यासारखं ऐटीत चालायला लागता, पण मध्येच धडपडता. मात्र असं एक-दोन वेळा पडल्यावर नेमकी काय गडबड होते, हे तुमच्या लक्षात येतं आणि ती चूक तुम्ही पुढच्या वेळी टाळण्याचा प्रयत्न करता. आणि एक वेळ अशी येते की, तुम्हाला बाबाचा टाय आणि शूज घालून त्याच्यासारखं व्यवस्थित चालायला येतं. तसं तुम्ही आईला चालून दाखवून भाव खाता.
 
म्हणजे जे तुम्हाला येत नाही, ते तुम्ही चार-दोनदा प्रयत्न करून शिकता. आणि काही दिवसांनी ते तुम्हाला व्यवस्थित यायला लागतं. असं सगळ्याच गोष्टींबाबत होतं. शाळेच्या अभ्यासाचंही असंच असतं. एखादी कविता पुन्हा पुन्हा वाचली की, ती आपल्या लक्षात राहते, तोंडपाठ होते. इंग्रजी शब्दांचे स्पेलिंगही पुन्हा पुन्हा घोकून पाठ होतं. नीट लक्ष देऊन वाचलं की लक्षात राहतं, रोज रोज मैदानावर खेळायला गेलं की, काही दिवसांनी तो खेळ चांगला खेळता येतो.
 
तुमच्या अवतीभवती कितीतरी आणि काय काय घडत असतं. ते पाहून तुम्हाला अनेक प्रश्न पडतात. खरं तर तुमच्या सारखे सारखे प्रश्न विचारण्याने आई-बाबा आणि शाळेतले शिक्षकही ब-याचदा हैराण होतात. कारण तुम्ही सतत काही ना काही विचारत असता. तुम्ही असा कधी विचार केलाय का, की मोठय़ा माणसांना का बरं असे प्रश्न पडत नाहीत? ते कुणाला विचारतात? त्यांनाही तुमच्याइतके नसले तरी कधी कधी प्रश्न पडतातच. ते त्यांच्या आई-बाबांना म्हणजे आजी-आजोबांना, इतर मोठय़ा माणसांना विचारतात. ज्यांना पुस्तकाची आवड असते, ते आई-बाबा लोक त्या त्या विषयावरची पुस्तकं आणून वाचतात. त्यातून त्यांचं समाधान होतं. काही लोक कॉम्प्युटरवर बसून आपल्याला हवी ती माहिती मिळवतात.
 
घरी येणारा पेपरसुद्धा रोज काहीतरी नवीन सांगत असतोच. म्हणूनच आपण तो वाचतो. समजा त्यानं रोज रोज त्याच त्याच बातम्या, माहिती सांगितली तर आई-बाबा आणि इतर मोठी माणसं तो पेपर वाचतील का? नाही वाचणार!
  कुठलाच माणूस जन्मत:च काही सगळ्या गोष्टी शिकलेला नसतो. जगातले सगळेच लोक जन्मतात तेव्हा अडाणीच असतात. मग ते आईकडून, बाबाकडून, आजी-आजोबाकडून, शाळेतल्या शिक्षकांकडून, मित्र-मैत्रिणींकडून, इतर मोठय़ा माणसांकडून रोज काही ना काही शिकतात, त्यांच्यासारखं वागून पाहतात, करून पाहतात. म्हणजे कुठल्याही लहान मुलाला मोठं झाल्यावर डॉक्टर, वकील, इंजिनिअर, चित्रपटातला अभिनेता होण्यासाठी अनेक गोष्टी रोजच्या रोज शिकाव्या लागतात. त्याचं हे शिक्षण फक्त शाळेतच चालू असतं असं नाही, तर ते घरी, खेळाच्या मैदानात, सिनेमा पाहताना, पेपर वाचताना, प्रवास करताना, गप्पा मारताना चालूच असतं.
जग हीच सर्वात मोठी शाळा असते आणि आई हीच पहिली शिक्षक असं म्हणतात, ते यामुळेच. पण तरीही आपण काही गोष्टींचं रितसर शिक्षण घेण्यासाठी शाळेत जातोच. कारण तिथलं शिक्षणही महत्त्वाचं असतं. आपण जसजसे मोठे होत जातो, तसतशी आपल्या शिक्षणाची भूक वाढत जाते, आपण भराभर नवनव्या गोष्टी शिकायला लागतो.
 
तुम्ही मजा म्हणून, गंमत म्हणून, वेळ घालवण्यासाठी गोष्टींची पुस्तकं वाचता. पण ती सुद्धा नकळत तुमच्या मनावर चांगले संस्कार करत असतात, नव्या गोष्टी तुम्हाला शिकवत असतात. गोष्टी वाचून वाईट काय आहे, चांगलं काय आहे, यातला फरक आपल्याला कळायला लागतो. काहीतरी पराक्रम करायची, बक्षीस मिळवायची इच्छा निर्माण होते.
 
म्हणजे गोष्टींची पुस्तकंही आपल्याला काही ना काही शिकवतच असतात. आज तुमच्यासाठी मी ‘उत्तम संस्कार कथा’ हे पुस्तक निवडलं ते याचसाठी की, या पुस्तकातल्या कथा अशाच खूप चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगतील, शिकवतील. या गोष्टी वाचताना तुम्हाला कधी कधी हसायला येईल, कधी कधी फार आनंद होईल, तर कधी कधी तुम्हाला वाईटही वाटेल. पण एखादा सिनेमा पाहताना किंवा मग नाटक पाहताना, नाहीतर तर एखादी तुमच्या आवडीची कार्टून मालिका पाहताना जेवढा तुम्हाला आनंद होतो, मजा येते, तेवढाच आनंद हे पुस्तक वाचतानाही होईल. कारण ‘उत्तम संस्कार कथा’ असं नाव असलं तरी हे मुळात गोष्टींचं पुस्तक आहे. शिवाय या गोष्टी मराठीबरोबरच गुजराती, उर्दू, तेलुगु, हिंदी, सिंधी आणि इंग्रजी अशा वेगवेगळ्या भाषेतल्या आहेत. या पुस्तकाचे वेगवेगळ्या वयोगटांसाठी तीन भाग आहेत.
 उत्तम संस्कार कथा (इयत्ता दुसरी ते चौथी) : संपादन : माधव राजगुरू,  
बालभारती पाठय़पुस्तक मंडळ, पुणे
,पाने : 56, किंमत : 20 रुपये

सुट्टीतला खाऊ!

मित्रांनो, दिवाळीची सुट्टी तुम्ही मजेत घालवत असाल. शाळा नाही, अभ्यास नाही. अभ्यास नसल्यामुळे गृहपाठही नसणार. पण तुम्हाला गोष्टी, गाणी, कविता वाचायला नक्कीच आवडणार. हे लक्षात घेऊन मोठय़ांच्या दिवाळी अंकांबरोबर तुमच्यासाठीही काही दिवाळी अंक बाजारात आले आहेत. तसे ते दरवर्षी येतातच म्हणा. यावर्षी ‘गंमतजमत’, ‘किशोर’, ‘बाल मैफल’, ‘साधना बालकुमार दिवाळी अंक’, ‘टॉनिक’, असे बरेच दिवाळी अंक नवनव्या गोष्टी, कथा, गाणी, कविता घेऊन तुमच्यासाठी बाजारात दाखल झाले आहेत.
 
‘साधना बालकुमार दिवाळी अंका’ची काही दिवसांपूर्वीच इथेच ओळख करून दिली होती. या वेळेस तुम्ही आवर्जून वाचलेच पाहिजेत अशा दिवाळी अंकांमध्ये मानकरकाकांचा ‘टॉनिक’, ‘किशोर’ आणि ‘बालमैफल’ या तीन दिवाळी अंकांची ओळख करून देत आहोत.
 
‘किशोर’चा मासिकाच्या आकारातला संपूर्ण रंगीत अंक नेहमीच चांगला असतो. तीच परंपरा यावर्षीही त्यांनी जपली आहे. मुखपृष्ठावर भाऊबीजेच्या निमित्ताने दोन बहिणींचं सुंदर छायाचित्र छापलं आहे.  या अंकाचे किशोर आणि बाल असे दोन विभाग आहेत. म्हणजे तुमचा विभाग वाचून झाला की तुम्ही तो ‘बालविभाग’ वाचायला छोटय़ा भावाला किंवा बहिणीला द्यायचा, म्हणून ही सोय केली आहे. कविता, कथा, नाटिका, संगीतिका, कोडी, कार्टून मालिका, विनोद आणि भरपूर रंगीत चित्रं असा मजकुराने हा अंक नटला आहे.  
 
स्वेन हेडिन हा स्वीडिश संशोधकाने तिबेट, चीन आणि मध्य आशियात चार वेगवेगळ्या मोहिमा काढल्या. त्या मोहिमांची रोमहर्षक माहिती लक्ष्मण लोंढे यांनी करून दिली आहे. ‘गाढवाचा बाप’ ही गाढवाच्या प्रामाणिकपणाची आणि इमानदारीची गोष्ट आहे. ‘आय म्या सोन्या न्हाई गं!’ या गोष्टीत मन्या हरवतो. तो कसा हरवतो? सापडतो की नाही? त्याला शोधण्यात पोतराज कसा मदत करतो, याची कहाणी आहे. ‘मंकूची गोष्ट’ ही एका माकडाची अतिशय वेगळी गोष्ट आहे.
 
पीक डोलती शेतात, पीक बोलती शेतात
 
थेंब कष्टाच्या घामाचे, पीक झेलती शेतात
 अशा चांगल्या कविताही आहेत.
‘बालविभागा’ची सुरुवातच 
‘भुई.. भुई’ मोतल फिलवून दाखवू का?
 
कुतल्यासारखं ‘भो.. भो’ भुंकून दाखवू का?
 ‘थयथय’ मोल होऊन नाचून दाखवू का?
‘कुकुचकू’ कोंबला आलवून दाखवू का?
या बोलगाण्याने होते.  मग अनुस्वार हरवल्यावर काय होतं, याची गंमत सागंणारी एक कविता आहे, अशोक पाटील यांची.
 आबाचा केला आंबा
भांडय़ाचा केला भाडय़ा
पांडाचा पाडा करणे
चुका नसे या थोडय़ा
दंग्याऐवजी दगा जाला
खंडूचा झाला खडू
चिंता म्हणता रचली चिता
आता हसू की रडू?
करंजी आणि भाकरीची, शाळेत हुशार असलेल्या राजूची अशा गोष्टी आहेत. चिडणाऱ्या शास्त्रीबुवाची फटफजिती सांगणारी कार्टूनमालिका आहे.
  • किशोर : संपादक एम. आर. कदम
  • किंमत : 45 रुपये
  मानकरकाकांच्या ‘टॉनिक’चा अंक संपूर्ण रंगीत आहेच, शिवाय तो पुस्तकासारखा छोटय़ा आकाराचा आणि पुठ्ठा बांधणी असल्यामुळे मजबुत झाला आहे. त्यात मुलांनी काढलेली खूप चित्रं छापली आहेत. चंद्रकांत खोत यांची ‘लाल, बाल आणि पाल’ ही मुंगी, झुरळ आणि पालीची धमाल मजेशीर गोष्टही या अंकात आहे. आतापर्यंत तुम्ही कधी मुंगीला बोलताना पाहिलंय का? बहुधा नसेल, कारण गोष्टीत मुंग्या असल्यातरी त्या माणसासारखं बोलत नसतात. पण ही मुलगी चक्क माणसासारखं बोलते. नव्हे, ती चक्क बडबड करते. म्हणजे खूप खूप बोलते. ‘नीताचा निश्चय’ ही नीता आणि शलाका या दोन बहिणांची गोष्टही वाचण्यासारखी आहे. क्रिकेटपटू सुनील गावस्कर तुम्हाला माहीत असणारच. त्याचे मामा माधव मंत्री यांनी गावस्करांच्या लहाणपणाची गोष्ट सांगितली आहे. अशा खूप चांगल्या गोष्टी, कविता आणि चित्रं या अंकात आहेत. त्या सगळ्यांबद्दल इथं तुम्हाला सांगणार नाही. त्यासाठी तुम्ही ‘टॉनिक’चा दिवाळी अंकच वाचायला हवा. कारण तो वाचून तुमच्यामध्येही ‘टॉनिक’ येईल, म्हणजे तुम्ही ताजेतवाने व्हाल.
  • टॉनिक : संपादक मानकरकाका
  • किंमत : 60 रुपये
 ‘बालमैफल’चा दिवाळी अंक मराठी, िहदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये आहे. आणि तिन्ही भाषांमध्ये गोष्टी, कविता आणि कोडी आहेत. गिरिजा कीर, वसुधा पाटील, श्याम कुरळे, अरविंद देशपांडे, दर्शना पवार, गणेश रसाळ, सुवर्णा मेस्त्री यांनी लेख-गोष्टी लिहिल्या आहेत, तर निर्मला देशपांडे, सुधाकर देशपांडे, सुमन नवलकर यांच्या आणि इतरांच्या कविता आहेत. ‘हिंदी’ विभाग मराठीपेक्षा थोडासा छोटा आहे. त्यात ‘आगरा उधर है’, ‘चल , जल्दी’, ‘कैसी बनी सायकिल’ हे लेख-गोष्टी तुम्ही वाचल्याच पाहिजेत. सायकलचा जन्म कसा झाला हे वाचायला तर तुम्हाला आवडणारच. नाही का? ‘इंग्रजी’ विभागात वाघ, विवेकानंद, सौर ऊर्जा, बार्बी, वेगवेगळ्या देशांची माहिती आहे.
  • बालमैफल : संपादक कुमार कदम
  • किंमत : 40 रुपये

अंगठ्याला नो ठेंगा


मित्रांनो, अरविंद गुप्ता हा खूप कलंदर आणि गमत्या माणूस आहे. त्याने तुमच्यासाठी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. ‘अंगठय़ाची चित्रं’ हे त्यांचं पुस्तक तर खूपच मस्त आहे. तुम्ही तुमच्या मित्राला, मोठय़ा बहिणीला चिडवायला ‘अंगठा’ दाखवता. त्याला ठेंगा दाखवणे असंही म्हणतात आणि निरक्षर माणसाला अंगठे बहाद्दर असंही म्हणतात. एकंदरच अंगठय़ाविषयी काही आपलं बरं मत नाही. पण हे तुम्हाला माहीत असेलच की, अंगठा हे हाताच्या पंजातलं एक महत्त्वाचं बोट आहे. बरीचशी काम करताना त्याचा उपयोग होत नाही. म्हणजे लिहिताना, वस्तू उचलताना, भांडाभांडी करताना आपण अंगठय़ाचा वापर करतो का? खरं तर करतो. कारण अंगठा हा इतर चार बोटांचा कॅप्टन असतो. सचिन तेंडुलकर नाही का भारतीय क्रिकेट टीममध्ये सगळ्यात महत्वाचा, तसाच अंगठा हा हातांच्या बोटांचा कॅप्टन आहे. त्यामुळे आपण जे जे करतो, हाताची बोटं जशी जशी कामाला लावतो, त्या प्रत्येक वेळी अंगठा त्या बोटांच्या पाठीशी असतो. त्यांना आधार देण्याचं काम करतो. हाताला अंगठा नसेल तर इतर बोटांना आपलं काम चांगल्या प्रकारे करता येणार नाही. त्यामुळे अंगठय़ाची कॅप्टनची भूमिका महत्त्वाची असते.
 
पण त्या बिचा-याला एवढा महत्त्वाचा रोल करत असूनही काही लोक बदनाम करतात. म्हणजे इतरांना वेडावण्यासाठी त्याला अंगठा दाखवतात. पण काही लोक विजय साजरा करण्यासाठी ‘चिअर्स’ करताना अंगठा उंचावतात. तेव्हा अंगठय़ाची मानही अभिमानाने उंचावत असेल. तेवढी एकच चांगली कामगिरी त्याच्या वाटय़ाला येते ना!
 
पण आज मी ज्या पुस्तकाची तुम्हाला ओळख करून देणार आहे, ते अंगठय़ाबद्दलचंच आहे. पण ते काही अंगठय़ाचं रामायण सांगणारं पुस्तक नाही, तर हे अंगठय़ाचं महाभारत सांगणारं पुस्तक आहे. म्हणजे तुम्हाला माहीत नसलेल्या अंगठय़ाच्या करामती या पुस्तकात सांगितल्या आहेत. आणि या सा-या करामती अंगठा एकटा, एकट्याच्या जोरावर करतो. पण शेवटी शेवटी त्याला थोडी इतर बोटांची मदत लागतेच. पण त्यातून जे तयार होतं ते मजेशीर असतं.
 
आता तुमच्या लक्षात आलं असेलच की, हे अंगठय़ापासून कोणकोणती चित्रं काढता येतात, याच्या करामती सांगणारं पुस्तक आहे. अंगठा तसा करामती आहेच. कारण त्याच्यापासून खूप चित्रं बनवता येतात, आणि खूप खूप चांगली चांगली चित्रं बनवता येतात. अनेक माणसांचे चेहरे, आकार, प्राण्यांचे चेहरे, आकार आणि इतर काही प्राणी, वस्तूही अंगठय़ापासून तयार करता येतात. आणि त्या फार लवकर आणि चटकन बनवता येतात. ‘उंगली दबाके अंगुठा बना दूँगी टंक टंक’ हे गाणं तुम्ही कधी ऐकलं का? तसं पाहिलं तर हे गाणं थोडं भीती दाखवणारं आहे खरं, पण ती अंगठय़ाची करामत आहे हेही खरं. कारण इतर बोटं वापरूनही ही करामत करता येते पण अंगठय़ाच्या अंगी मात्र ही कला जरा जास्तच आहे.
 तर मग या पुस्तकाला अंगठा न दाखवता, अंगठा उचलून त्याला ‘चिअर्स’ म्हणा. आणि त्याला कामाला जुंपून भरपूर चित्रं काढा.

देणारं झाड...

देणा-याने देत जावे
 
घेणा-याने घेत जावे
 
घेता घेता देणा-याचे हातच घ्यावे
 
अशी विंदा करंदीकर यांची सुंदर कविता आहे. पुस्तकं लिहिणारे लोकही असेच ‘देणारे’ असतात, आणि वाचणारे ‘घेणारे’ असतात. असाच मुलांसाठी सतत नवीन आणि चांगली चांगली पुस्तक ‘देणारा’ अमेरिकेत एक लेखक होता.  शेल सिल्व्हरस्टाइन. त्याला आपण शेल अंकल म्हणू.
 
शेल अंकलनं मुलांसाठी खूप पुस्तकं लिहिली, कविता लिहिल्या आहेत. तो संगीतकार होता, गाणीही लिहायचा. चित्रंसुद्धा काढायचा. त्याच्या पुस्तकांचा वीसेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे आणि त्यांच्या जवळपास दोन कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत. शेल अंकलला मुलांसाठी लिहायला खूप आवडायचं.
 
शेल अंकलने ‘अंकल शेल्बी एबीझेड बुक’, ‘अ गिव्हिंग ट्री’, ‘अ जिराफ अँड अ हाफ’, ‘द लायन हू शॉट बॅक’, अशी अनेक पुस्तकं मुलांसाठी लिहिली आहेत. आणि ती सर्वच्या सर्व उत्तम म्हणावी अशी आहेत.
 
‘अ गिव्हिंग ट्री’ हे शेल अंकलचं छोटंसं पुस्तक आहे. त्यात त्यानं ‘देणा-या’ झाडाची गोष्ट सांगितली आहे. झाडाचा एक मोठा गुणधर्म असतो. ते आपल्याला सतत देत असतात. काय काय देतात झाडं आपल्याला? पानं, फळं, फुलं, फांद्या, लाकडं, बुंधा, सावली, ऑक्सिजन, सगळं काही देतात. आपण वाहनं चालवून, काय काय जाळून धूर करतो. झाडं तो शोषून घेतात आणि आपल्याला शुद्ध ऑक्सिजन देतात.
 
इतकंच नाही तर मेल्यावरही आपल्याला उपयोगी पडतात. झाडं स्वत:साठी काहीही राखून ठेवत नाहीत. शिवाय देताना ‘त्या बदल्यात तू मला काय देशील?’ असंही कधी म्हणत नाहीत. त्यांना फक्त देणं माहीत असतं. त्यासाठी त्यांच्या कुठल्याच अटी-नियम नसतात. इच्छा-अपेक्षाही नसतात.
 
झाडांना त्यांच्यावर केलेली माया कळते. आणि त्या मायेची परतफेड ते अशा पद्धतीने करतात, की विचारू सोय नाही. कारण झाडं निस्वार्थी असतात, परोपकारी असतात.
 
अशाच एका झाडाची गोष्ट शेल अंकलनं या पुस्तकात सांगितली आहे. या झाडाला एक छोटा मुलगा फार आवडायचा. तो मुलगा रोज त्या झाडाजवळ यायचा, त्याची पानं गोळा करायचा, त्याची फुलं गोळा करायचा. त्याच्या फांद्यावर चढायचा. फांद्यांना धरून झोके घ्यायचा. झाडाची फळं खायचा. झाडाबरोबर लपाछपी खेळायचा. खेळून खेळून दमला की, त्याच्या गार गार सावलीत झोपायचा. झाडाला त्या मुलाच्या या सगळ्या वागण्यामुळे फार आनंद व्हायचा. मुलगा त्याच्यासोबत असला की, ते खूप खूश असायचं.
 
असे खूप दिवस, महिने, वर्षे जातात. तो मुलगा मोठा होतो. मग तो झाडाकडे येईनासा होतो. झाडाला फार वाइट वाटतं. त्याला मुलाची फार आठवण येते. ते त्याची वाट पाहात राहतं.
 
एक दिवस तो मोठा झालेला मुलगा त्या झाडाकडे येतो. त्याला पाहून झाडाला फार आनंद होतो. झाड त्याला म्हणतं, ‘ये बेटा, माझ्या फांद्यावर चढ, झोके घे, माझी फळं खा. माझ्या सावलीत मजेत बस.’ पण मुलाला आता वेळ नसतो. मुलगा म्हणतो, ‘मी आता मोठा झालो. आता मला आणखी मजा, वेगळी मजा करायची आहे. तू मला पैसे देऊ शकतोस का?’ झाडाजवळ काही पैसे नसतात. मग ते मुलाला आपली सारी फळं देतं. ती फळं तो मुलगा बाजारात नेऊन विकतो. त्याचे त्याला पैसे मिळतात. झाडाला फार आनंद होतो.
 
काही दिवसांनी तो मुलगा झाडाकडे परत येतो. आता त्याला घर बांधायचं असतं, लग्न करायचं असतं. मग झाड त्याला आपल्या फांद्या देतं. त्या विकून मुलगा घर बांधतो,  लग्न करतो. झाडाला फार आनंद होतो. पण परत तो मुलगा खूप दिवस झाडाकडे येत नाही.
 
पण एके दिवशी तो परत झाडाकडे येतो. आता झाडाचं फक्त खोड शिल्लक असतं. मुलाला पाहून त्याला आनंद होतो. मुलगा म्हणतो, ‘मला परदेशी जायचं आहे. मला एक होडी हवीय.’ झाड त्याला होडी करायला आपलं खोड देऊन टाकतं. तो घेऊन मुलगा जातो. त्याची होडी बनवून तो साता समुद्रापार जातो. त्याला आनंद होतो. झाडालाही मुलाला आपण मदत केली याचा आनंद होतो. 
 
अशीच खूप वर्षे जातात. तो मुलगा आता म्हातारा झालेला असतो. तो काठी टेकत टेकत त्या झाडाकडे येतो. झाडाचा आता केवळ छोटासा बुंधा शिल्लक असतो. झाडाला त्या मुलाला पाहून फार आनंद होतो. पण ते मुलाला म्हणतं, ‘बेटा, मला माफ कर. आता मी तुला काहीच देऊ शकत नाही.’ तो म्हातारा मुलगा म्हणतो, ‘मला आता काहीच नको आहे. मी आता म्हातारा झालो आहे. माझे दात दुखतात, मला फळं खाता येत नाहीत.  फांद्यांना लटकून झोके घेता येत नाहीत. मी आता फार थकलो आहे. एका जागी शांतपणे बसून राहावंसं वाटतं.’
 
झाड आपला छोटासा बुंधा सरळ आणि स्वच्छ करतं. आणि त्या म्हाता-या मुलाला म्हणतं, ‘ ये, माझ्या बुंध्यावर बस आणि आराम कर.’ म्हातारा मुलगा बुंध्यावर स्वस्थपणे बसतो. त्या झाडाला फार फार आनंद होतो. आणि म्हाता-या मुलालाही!
 
अशी ही गोष्ट आहे देणा-या झाडाची! शेल अंकल अतिशय साध्या सोप्या भाषेत, अगदी गप्पा माराव्यात अशा पद्धतीने लिहितात. छोटी छोटी वाक्यं, नेमके शब्द, आणि मोजकीच पण सुंदर चित्रं असं शेल अंकलच्या प्रत्येक पुस्तकाचं वर्णन करता येईल. तुम्हाला हे पुस्तक वाचायला आवडेल. ते वाचून झाल्यावर तुमचीही या ‘देणा-या’ झाडाशी आणि शेल अंकलशी दोस्ती होऊन जाईल. शेल अंकलबद्दल पुन्हा कधीतरी आणखी माहिती देईन.
  
देणारं झाड :  शेल सिल्व्हरस्टाइन,

 मराठी अनुवाद शोभा भागवत

कजा कजा मरू प्रकाशन, गरवारे बालभवन, पुणे
दूरध्वनी 020 - 2444 2109 पाने 26, किंमत : 10 रुपये

‘का?’ची उत्तरं

मित्रांनो,
 
तुम्हाला गणित आवडतं का गणित? यावर तुम्ही म्हणणार ‘तू वेडा की खुळा? गणित हा काय आवडण्याचा विषय असतो का राव? त्यात काय गोष्टी, कविता, गाणी असतात? सारी आकडेमोड, बेरीज-वजाबाकी, गुणाकार-भागाकार..एक ना दोन..ज्याम ताप होतो डोस्कं लढवून लढवून.’ पण तरीही मी सांगेन की गणितासारखा (आणि विज्ञानासारखा) मनोरंजक आणि रंगतदार दुसरा विषय नाही. गणितात आकडेमोड असते हे खरे, त्यात कविता-गाणी नसतात हेही खरे पण तरीही त्यात खूप गमतीजमती असतात. मुख्य म्हणजे गणित आपली करमणूक करत नाही तर आपल्या बुद्धीला चालना देतं, आपल्याला प्रश्न विचारायला भाग पाडतं, आणि त्या प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची, त्यासाठी कुठली पद्धत वापरायची हेही शिकवते. त्यामुळे गणित हा विषय खूप महत्त्वाचा आणि मनोरंजक होतो.
 
आता हेच पहा ना, गणित म्हणजे ‘का’? हे असेच गमतीशीर पुस्तक आहे. हे असंच का, ते तसंच का असे प्रश्न विचारण्यातून काय होतं? तर तुम्ही मोठेपणी वैज्ञानिक, संशोधक, अभियंता होण्याची शक्यता असते. तसं व्हायचं असेल तर आतापासूनच तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत आणि त्यांची उत्तरं शोधण्याचीही धडपड तुम्ही केली पाहिजे. शिवाय गणितात आणि विज्ञानात प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं. प्रश्नांच्या उत्तराशिवाय हे दोन्ही विषय पूर्णच होऊ शकत नाहीत. किंबहुना प्रश्नांचा उलगडा करणं हेच या दोन्ही विषयांचं काम आहे. पण म्हणजे केवळ युक्त्या शोधणं म्हणजे गणित नव्हे, हेही लक्षात घ्या. तर त्या प्रत्येक युक्तीमागची कारणं जाणून घेणं महत्त्वाचं असतं. गणितातला हाच सिद्धांत तुम्हाला इतरही विषयाबाबत लावता येईल. लावलाच पाहिजे.
 तर मग, आपल्या प्रत्येक प्रश्नाचं, शंकेचं समाधान करणारा, योग्य उत्तर देणारा विषय हा तुमचा आवडता असायला हवा की नको? नक्कीच असायला हवा.
अशा पद्धतीने इतरही काही संख्यांचे वर्ग काढण्याची युक्ती या पुस्तकात सांगितली आहे. याशिवाय वजाबाकी, बेरीज, विभाज्यतेच्या कसोटय़ा, यांची साध्या, सोप्या भाषेत माहिती दिली आहे. गणितामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची असते. गणित सोडवायची रीत कोणतीही असो, तिच्यामागील गणिताचं सूत्र कोणतं हे समजावून घेतल्याशिवाय त्याला शरण जायचं नाही. कारण गणितामध्ये ‘का?’ या प्रश्नाला खूप महत्त्व असतं. त्याचं उत्तरं शोधणं म्हणजेच गणित.
 
  • गणित म्हणजे ‘का’? :
  •  मनोहर रामचंद्र राईलकर
  • वाई तालुका गणित अध्यापक मंडळ, वाई
  • दूरध्वनी : 02167-220766
  • पाने : 10, किंमत : 20 रुपये

खांद्यावर घेतला की बंदूक, हातात घेतला की चिमटा


मित्रांनो, प्रेमचंद हे हिंदीतले मोठे लेखक तुम्हाला माहीत आहेत? पण माहीत नसलं तरी फारसं काही बिघडत नाही म्हणा. हे पुस्तक वाचून ते तुम्हाला नक्की माहीत होतील. त्यांनी तुम्हा मुलांसाठी थोडंच लिहिलं आहे, पण खूप चांगलं लिहिलं आहे.
 
‘ईदगाह’ हे त्यांचं असंच छोटंसं पुस्तक. रमजानच्या महिन्यात तीस दिवस मुस्लिम समाजातले लोक उपवास करतात. या महिन्यानंतर ईदचा सण येतो. हा सण साजरा करण्यासाठी सर्व लोक मशिदमध्ये जमतात. त्या मशिदीला ‘ईदगाह’ म्हणतात. लहान मुलं काही उपासतपास करत नाहीत. कारण त्यांना तेवढा धीर निघत नाही. म्हणजे भूक लागली की, दम धरवत नाही. शिजूपर्यंत दम निघतो पण निवेपर्यंत निधत नाही, असं म्हणतात ना! तरी पण काही मुलं एक दिवसाचा, दोन दिवसाचा रोज ठेवतात. कारण त्यांना येणा-या ईदचा आनंद लुटायचा असतो.
 
अखेर ईदचा दिवस उजाडतो. महमूद, मोहसीन, सम्मी, नुरे आणि हमीद ही छोटी मुलं गावाबाहेरच्या ईदगाहमध्ये जायला निघतात. सर्वाना त्यांच्या अब्बाजान आणि अम्मीजानने खाऊ-खेळणी घेण्यासाठी पैसे दिलेले असतात. मेहमूदजवळ बारा पैसे असतात, मोहसीनजवळ पंधरा पैसे असतात, पण हमीदजवळ फक्त तीनच पैसे असतात. हमीद चार-पाच वर्षाचा छोटा मुलगा असतो. मागच्याच वर्षी त्याचे आई-बाबा देवाघरी गेलेले असतात. त्यामुळे हमीद त्याच्या अमीना आजीजवळ राहत असतो. अमीना आजी लहानग्या हमीदला खोटं खोटंच सांगते की, त्याचे बाबा खूप खूप पैसे कमवायला बाहेरगावी गेले आहेत, तर आई अल्लाच्या घरून खूप खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आणायला गेली आहे. त्यामुळे हमीद आनंदात असतो. त्यात आज तो मित्रांबरोबर ईदगाहमध्ये जायला निघतो.
 
अमीना आजीला आपण हमीदला आज एक पैसाही देऊ शकत नाही याचं वाईट वाटतं पण हमीदजवळ तीन पैसे असतात. तो आनंदात असतो. मित्रांबरोबर मजा करत तो ईदगाहला जायला निघतो. रमतगमत, गप्पा मारत, रस्तातल्या गमतीजमती पाहत सारी मुलं ईदगाहमध्ये पोचतात. नमाज होतो. त्यानंतर सर्व लोक एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा देतात. मग सारे खेळण्यांच्या आणि मिठाईच्या दुकानांवर तुटून पडतात. महमूद, मोहसीन, नूर आणि सम्मी जत्रेतल्या चक्रातल्या हत्ती, घोडा, उंट यावर बसतात. पण हमीद काही बसत नाही. मग सारे जण खेळण्यांच्या दुकानात जातात. महमूद शिपाई घेतो, खाकी पोशाख, लाल पगडी, खांद्यावर बंदूक असलेला. मोहसीन कंबरेत वाकलेला, पण त्या वाकलेल्या कमरेवर पखाल ठेवलेला भिस्ती घेतो. तो भिस्ती पखालीतून पाणी उडवण्याच्या तयारीत असतो. नूर काळ्या कोटाचा, पांढरी विजार असलेला, सोनेरी साखळी असलेलं घडय़ाळ आणि हातात कायद्याचं जाडजूड पुस्तक असलेला वकील घेते. ही सगळी खेळणी दोन दोन पैशांची असतात. हमीदकडेही तीन पैसे असतात. पण हमीद काहीही घेत नाही.
 
मोहसीन म्हणतो - माझा भिस्ती रोज सकाळ-संध्याकाळ पाणी देऊन जाईन.
 
नूर म्हणते -माझा वकील जोरदार खटले लढवील.
 
सम्मी म्हणते - माझा धोबी रोज कपडे धुईल.
 
पण हमीद मनात म्हणतो, ही खेळणी काय कामाची हातातून खाली पडली की फुटून जातील. पण तरी त्याला वाटतं, ती खेळणी  हातात घेऊन पहावीत. पण त्याचे मित्र काही त्याला हात लावू देत नाहीत. मग ते सारे मिठाईच्या दुकानात जातात. सगळी मुलं रेवडय़ा, गुलाबजाम घेतात. हमीदलाही काहीतरी घ्यायचा आग्रह करतात. कारण हमीदजवळ तीन पैसे तर तसेच असतात. पण हमीद काहीच घेत नाही. मुलं पुढं निघतात. आता लोखंडाच्या सामानांची दुकानं लागतात. हमीद एका दुकानदाराजवळ जातो. त्या दुकानदाराकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे चिमटे असतात. हमीद ते पाहतो आणि अचानक त्याला आठवतं, तव्यावर पोळ्या भाजताना आजीचे हात पोळतात. आपण तिच्यासाठी यातला एखादा चिमटा घेतला तर तिचे हात मुळीच भाजणार नाहीत आणि पोळ्या भाजायचं तिचं कामही लवकर होईल.
 हमीदचे मित्र सरबत प्यायला लागतात. हमीद चिमटेवाल्या- जवळ रेंगाळतो. त्याला विचारतो, ‘हा चिमटा, कितीला देणार?’
दुकानदार म्हणतो, ‘बाळा, हे काही खेळणं नाही.’
 
हमीद मोठा हुशार आणि चुणचुणीत मुलगा असतो. तो म्हणतो, ‘विक्रीसाठी नाहीय का?’ दुकानदार म्हणतो, ‘आहे, पण सहा पैशाला आहे.’ हमीदकडे तीनच पैसे असतात. तो म्हणतो, ‘तीन पैशाला द्याल?’ दुकानदार आधी तयार नसतो, पण मग देतो. हमीद चिमटा घेऊन मित्रांकडे जातो. सगळे त्याला हसतात. म्हणतात, ‘अरे वेडय़ा हा चिमटा कशाला घेतलास? हे काय खेळणं आहे का?’ हमीद त्यांना सांगतो, ‘का नाही? खांद्यावर घेतला की झाली बंदूक. हातात घेतला की झाला फकिराचा चिमटा. एकदा असा फिरवला तर तुमच्या खेळण्यांचा चक्काचूर होईल. माझा चिमटा शूरवीर सिंह आहे.’
 
सगळ्या मुलांना त्याचं म्हणणं पटतं. ते त्याचा चिमटा पाहायला मागतात. हमीद त्यांना देतो. मित्र त्यांची खेळणी हमीदला पाहायला देतात. सगळी मुलं घरी निघातात. रस्त्यात त्यांना भूक लागते. महमूदकडे केळी असतात. ती तो हमीदलाही देतो. हा त्याच्या चिमटय़ाचाच पराक्रम म्हणायला हवा. कारण त्याने आधी मिठाई काही हमीदला दिली नव्हती.
 
सगळे आपापल्या घरी जातात. हमीदही जातो. अमीना आजी त्यानं जत्रेतून काय आणलं ते पाहते. हमीदच्या हातात चिमटा असतो. तिला खूप राग येतो. एवढासा पोर सकाळपासून काही खाल्लं नाही, प्यायला नाही, एवढा लांब गेला आणि आला. आणि जत्रेतून काय आणलं तर चिमटा! हमीद अपराधी आवाजात म्हणाला, ‘तुझे हात तव्यानं भाजतात नं म्हणून आणलाय मी चिमटा!’ ते ऐकून अमीना आजी हमीदला छातीशी धरून रडू लागते. खरं तर लहान होता हमीद, अमीना आजी तर म्हातारीच होती. पण हे काही दु:खाचे अश्रू नव्हते, तर ते आनंदाचे अश्रू होते, आनंदाचे! हमीदच्या हुशारीला, त्याच्या शहाणपणाला अमीना आजीने केलेला तो सलाम होता!!
 
  • ईदगाह : प्रेमचंद, मराठी अनुवाद - संजीवनी खेर
  • नॅशनल बुक ट्रस्ट, प्रभादेवी, मुंबई
  • पाने : 34, किंमत : 11 रुपये

चटकदार गोष्टी बहारदार अंक

मित्रांनो, यंदाच्या दिवाळीत काय काय करायचं ठरवलंय तुम्ही? नसेल तर आतापासूनच करा. दिवाळी जवळ आलीय. लवकरच तुम्हाला सुट्टी मिळेल. मग काय तुमची मज्जाच मज्जा!
 
दिवाळीमध्ये अभ्यास-गृहपाठ यांना बुट्टी असते. नवे कपडे, फटाके, फराळ आणि खास तुमच्यासाठीचे दिवाळी अंक यांची गम्माडीजम्मत असते. तुमच्यासाठी या वर्षीचा सर्वात पहिला दिवाळी अंक बाजारात आलाय, तो साधना साप्ताहिकाचा. संपूर्ण रंगीत छपाई, अतिशय सुंदर सुंदर चित्रे आणि तितक्याच चांगल्या गोष्टी अशी सारी भट्टी या अंकात जमून आलीय. त्यामुळे तो तुम्ही वाचायलाच हवा. या अंकात मोजून सात गोष्टी आहेत. त्या प्रसिद्ध गीतकार गुलजार, कवी-नाटकाकर दासू वैद्य, लेखिका अरुणा  ढेरे, कादंबरीकार राजन गवस, ललित लेखक अनिल अवचट, मालदीवमधील भारतीय उच्चायुक्त ज्ञानेश्वर मुळे आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी लिहिल्या आहेत.  त्या अशा-घगू आणि जामिनी’, ‘पिल्लू’, ‘माळावरचा कुरणोजीबुवा’, ‘मोर्चा’, ‘डोंगरातली शाळा’, ‘नो रिवर्स गिअरआणि आईला आठवताना’.
 
घगू आणि जामिनीही गुलजार यांची गोष्ट आहे. ती आहे घगू या पक्ष्याविषयी आणि जामिनी या पतंगाविषयी. सुरूंच्या झाडाच्या दाट फांद्यांमध्ये घगू बसलेला असताना त्याला आकाशात उडणारी पिवळ्या आणि जांभळ्या रंगाची पतंगी दिसते. तिचे रंग घगूला फार आवडतात. घगू तिचं नाव ठेवतो जामिनी. तो रोज तिची वाट बघत सुरूच्या झाडावर बसून असे. जामिनी आल्यावर तिच्या अवतीभवती फिरून तिच्याशी बोलायचा प्रयत्न करे. पण जामिनी काही घगूशी बोलत नसे. मग घगू म्हणे, ‘अशी तो-यात वागतेस ना, तेव्हा तू खूप खूप छान दिसतेस!घगू जामिनीच्या प्रेमातच पडला. एके दिवशी आकाशात खूप ढग दाटून येतात, तेव्हा घगूला स्वत:पेक्षा जामिनीचीच अधिक काळजी वाटते. तो उडत उडत जामिनीला जाऊन सांगतो, ‘जामिनी खूप वादळ आणि पाऊस येणार आहे. लवकर घरी जा.पण तेवढय़ात जोराचं वादळ येतंच. मग पुढे काय होतं ते  थेट गोष्टीतच वाचा बुवा. नाहीतर त्यातली गंमत निघून जाईल ना!
 
पिल्लूया गोष्टीत तुमच्यासारख्या शाळकरी मुलांची सहल शिकारघाटला जाते. तिथे मुलं खूप गमतीजमती करतात. कोणी पाण्यात पोहतं, कोणी मासोळ्या पकडतं तर कोणाला कासवाचं छोटंसं पिल्लू सापडतं. पण ते बसमध्ये हरवतं. तो खूप दु:खी कष्टी होतो. पण आल्यावर त्याची आजी त्याला कासव देते. ते कासवच असतं, पण वेगळं.
 
अरुणा ढेरे यांची गोष्ट माळ्यावरच्या कुरणोजीबुवाविषयी आहे. गुरं साभाळणा-या किशा आणि त्याच्या मित्रांसोबत राम हा मुलगा एके दिवशी त्यांच्याबरोबर जातो. गुरं सांभाळणारी त्याची मित्रमंडळी त्याला कुरणोजीबुवाची मजेशीर गोष्ट सांगतात. चिंचेच्या झाडाखाली हा कुरणोजीबुवा राहत असतो. तुम्हाला भेटायचंय का त्या कुरणोजीबुवाला? बुवा तसा वाईट नाही, पण गमतीशीर आहे.
 
मोर्चाही राजन गवस यांची गोष्ट भटक्या समाजातल्या बंदुक्या आणि पोलिश्या या मुलांची आहे. ज्ञानेश्वर मुळे हे एक सेकंडहँड गाडी विकत घेतात. त्या गाडीला रिवर्स गिअर नसतात. त्यामुळे होणा-या अनेक गमतीजमती या गोष्टीत आहेत. धक्का स्टार्ट गाडीची फट्फजिती या गोष्टीत आहे. रघुनाथ माशेलकरांनी लहाणपणी मुंबईतल्या गिरगावात शिकत असतानाच्या आणि आपल्या आईच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. तर अनिल अवचटांनी डोंगरातल्या शाळेची गोष्ट सांगितली आहे.
 या अंकातल्या सातही गोष्टी तुम्हाला आवडतील अशा आहेत.  यातल्या काही गोष्टींमध्ये धमाल मजा आहे तर काही गोष्टी वाचताना तुम्ही खळखळून हसाल.
  • साधना बालकुमार दिवाळी अंक,
  • संपादक : नरेंद्र दाभोळकर, 
  • पाने : 32, किंमत : 24 रुपये

जादूच्या गोष्टी

महावीर जोंधळे यांनी तुम्हा मुलांसाठी पुष्कळ लेखन केलं आहे. विशेष म्हणजे किशोर कादंब-याही लिहिल्या आहेत. मात्र प्रस्तुत पुस्तकात त्यांचं स्वतंत्र लेखन नाही. तर या पुस्तकात त्यांनी जपान, श्रीलंका, चीन, फिलिपाइन्सच्या या देशातील लोकप्रिय लोककथांचे स्वैर रूपांतर केलं आहे. यात एकंदर सहा लोककथा आहे, पण त्यापैकी कुठल्या कथा, कुठल्या भाषेतल्या आहेत, याचा त्यांनी उल्लेख केलेला नाही. तो केला असता तर बरं झालं असतं.
 
या पुस्तकातली पहिली कथा सातूचं पीठतर मजेशीर आहे. चीनमधली एक म्हातारी खाणावळ चालवत असे. तिची ही खाणावळ फार प्रसिद्ध होती. त्यामुळे प्रवासी हमखास तिच्या खाणावळीत येत. तिचा पाहुणचार घेत. शिवाय म्हातारी खेचरंही विकत असे. असाच एकदा या म्हातारीच्या खाणावळीत एक हुशार व्यापारी येतो. सतत त्याच्या हाताशी तलवार असे. हा व्यापारी खाणावळीत जेवतो पण नंतर म्हातारीने दिलेला सातूचा वाडगा मात्र खात नाही. मध्यरात्री तो कसल्याशा आवाजाने जागा होतो. पाहतो तर काय खालच्या खोलीत म्हातारी जादूच्या नांगर-बैलाने गव्हाचे पीक घेत असते. त्या गव्हाचे नंतर दळून पीठ तयार करते. व्यापारी हे सारं गुपचूप पाहतो आणि नंतर आपल्या खोलीत येऊन झोपतो. सकाळी उठून पाहतो तर काय? त्याच्याबरोबरचे इतर प्रवासी गायब असतात आणि त्यांच्या जागी खेचरं खोलीत फिरत असतात. व्यापा-याच्या लक्षात सारा प्रकार येतो. तो त्या म्हातारीकडून निघताना प्रवासात खायला म्हणून सातूचं पीठ बांधून घेतो. हा व्यापारी शूर आणि हुशारही असतो. तो म्हातारीला धडा शिकवायचा असं ठरवतो. काही दिवसांनी परत म्हातारीच्या खाणावळीत जाऊन तिला आपण परदेशातून आणलेलं सातूचं पीठ  खायला देतो. ते खरं म्हणजे म्हातारीच्याच सातूचं पीठ असतं. त्यामुळे ते खाताच त्या म्हातारीचंही खेचरामध्ये रूपांतर होतं.
 
राजा बुस्किदही दुसरी गोष्ट काही जादूची नाही. तर ती कष्टाचं महत्त्व सांगणारी आहे. बुस्किद हा एका तंबाखू पिकवणाऱ्या प्रदेशाचा राजा असतो. जनतेचं त्याच्यावर फार प्रेम असतं. तो जनतेला अधिकाधिक तंबाखूचं पीक कसं घ्यावं ते सांगे. जनता त्यानुसार पीक घेई. असं खूप वर्षे चालतं. एकदा राजा लांबच्या प्रवासाला जातो. इकडे प्रजा त्याची वाट पाहत पाहत तंबाखू पिकवत राहते. कालांतराने त्यांच्याकडे खूप पैसा येतो, मग ते उधळमाधळ करायला लागतात. ते शेतीकडे लक्ष देत नाहीत. अनेक वर्षे जमीन पडीक राहिल्याने ती नापिक होते. राजा गावी येतो, तेव्हा सारी जनता व्यसनांमध्ये बुडालेली पाहून त्याला फार वाईट वाटतं. राजा रागारागाने एका शिखरावर तंबाखूने भगदाड पाडून त्यात शिरून गुप्त होतो. तेव्हापासून सारे लोक पुन्हा कष्ट करायला लागतात. 
 
तिस-या गोष्टीचं नाव पंख तुटलेला पक्षीअसं आहे, पण खरं तर ते सोन्याची नाणी देणारे कोहळेअसं पाहिजे होतं. कारण या गोष्टीतला इलचुंग एका जखमी पक्ष्याला मदत करतो. दुस-या दिवशी तो पक्षी इलचुंगला एक कोहळ्याची बी देतो. इलचुंग ती घराशेजारी लावतो. रात्रीतून त्याला भरपूर कोहळे उगवतात. कोहळा कापला की, त्यातून बदाबदा सोन्याची नाणी बाहेर पडतात. बाकी गोष्ट मात्र तुम्ही थेट पुस्तकातच वाचा.
 
चौथी गोष्ट एका पक्ष्याची आणि एका शेतकरी मुलाची आहे. हा सारस पक्षी तरुणीचं रूप घेऊन या मुलाच्या घरात येतो आणि त्याला सूतापासून सुंदर कापड विणून देतो. ते कापड बाजारात नेऊन विकल्यावर त्याची मोठी किंमत येते. पण एके दिवशी ही तरुणी नसून हा तर तोच सारस पक्षी आहे, ज्याला आपण शिका-यापासून वाचवलं होतं, हे त्या मुलाच्या लक्षात येतं. तेव्हा तो सारस उडून जातो. त्याने आपल्या उपकाराची परतफेड केलेली असते.
 
लंगड्या उंटाची गोष्टआणि राजा चंदापाजोताया शेवटच्या दोन्ही गोष्टीही चांगल्या आहेत.
 थोडक्यात या पुस्तकातल्या गोष्टींमधून जादू, गमतीजमती, हुशारी, दयाळूपणा, काम करण्याची तयारी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.  
  • सातूचं पीठ : महावीर जोंधळे
  • लोकवाङ्मय गृह, मुंबई
  • पाने : 32, किंमत : 40 रुपये

सात शेपटय़ांचा उंदीर

तुम्हाला गिजुभाई बधेका हे नाव माहीत आहे का? त्यांनी तुमच्यासारख्या मुलांसाठी गुजरातमध्ये खूप काम केलं आहे, करत आहेत. त्याचबरोबर तुमच्यासाठी अनेक सुंदर सुंदर गोष्टीही लिहिल्या आहेत. बधेका यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यातील हे एक गोष्टींचं पुस्तक. या पुस्तकात एकंदर आठ गोष्टी आहेत. या मूळ गुजराती पुस्तकाचा हिंदी अनुवाद आबिद सुरती यांनी केला असून त्यांनीच पुस्तकातली रंगीत चित्रंही काढली आहेत. पहिलीच गोष्ट आहे सात रंगीत शेपटय़ा असलेल्या उंदराची. त्याच नाव असतं चूंचूं. त्याची आई त्याला शाळेत पाठवते, पण शाळेतली इतर मुलं त्याला ‘सात शेपटींचा उंदीर’ म्हणून चिडवतात. मग चूंचूं एकेक शेपटी कापत जातो, पण तसा तो सहा, पाच, चार, तीन, दोन, एक आणि शून्य शेपटीचा उंदीर होतो..पण खरी मजा त्यानंतरच होते. दुसरी गोष्ट तर फारच धमाल. दोन पंडे असतात. ती काका-पुतण्याची जोडी असते. ते एकदा एका गावी जातात. तिथे ते पाच लाडू बनवतात. पण मग प्रश्न निर्माण होतो, कुणी किती लाडू खायचे? दोघेही माघार घ्यायला तयार नसतात. ते ठरवतात की, आपण मौन पाळायचं, जो आधी बोलेल त्याला दोन लाडू मिळतील. पण त्यामुळे दोघांवर मोठं संकट ओढवतं. फूफू बाबा, चिरौटा चार सौ बीस, सौ के साठ या गोष्टीही अशाच धमाल आहेत.
चुहा सात पूंछो वाला : गिजुभाई बधेका, नॅशनल बुक ट्रस्ट, मुंबई, पाने :34, किंमत : 35 रुपये

पुन्हा एकदा अकबर-बिरबल

अकबर-बिरबलाच्या अनेक गोष्टी आजपर्यंत तुम्ही ऐकल्या असतील. त्यातल्या काही तुम्हाला तोंडपाठही झाल्या असतील. पण अकबर-बिरबलाच्या काळाला आता पुष्कळ वर्षे लोटली. दरम्यानच्या काळात काही चतुर लोकांनी स्वत:च्या गोष्टीही अकबर-बिरबलाच्या नावावर खपवल्या आहेत. म्हणजे हे सरदार संता-बंताच्या जोकसारखं आहे. कुठल्याही गोष्टीतल्या पात्रांना अकबर-बिरबल अशी नावे दिली की झाली अकबर-बिरबलाची गोष्ट! रवींद्र कोल्हे यांनी या दोन पुस्तकात अकबर-बिरबलाच्या  काही गोष्टी संकलित केल्या आहेत. त्या करताना त्यांनी पुरेशी शहानिशा केली की नाही, याचा खुलासा केलेला नाही. पण तो भाग बाजूला ठेवून या गोष्टी वाचल्या तर काय लक्षात येतं? कितीतरी वर्षापासून अकबर-बिरबलाच्या गोष्टी तुमच्यासारख्या कित्येक मुलांचं मनोरंजन करत आल्या आहेत. शिवाय या गोष्टी इतक्या सदाबहार आहेत, की कधीही वाचल्या तरी त्या शिळ्या वाटत नाहीत. म्हणजे उद्या तुम्ही मोठे झाल्यावरही वाचल्या तरी तुम्हाला त्या आवडतीलच. कुठल्याही चांगल्या पुस्तकाची हीच व्याख्या असते की, ते सर्वाना सर्वकाळी आवडत असतं. त्यात अकबर-बिरबलाच्या गोष्टींमध्ये तर तुमच्या बुद्धीला चालना देणाऱ्या, युक्त्या-प्रयुक्त्या सुचवणाऱ्या, खळखळून हसवणा-या प्रसंगाचे, आलेल्या संकटावर मात धैर्याने आणि चातुर्याने करण्याचे एवढे धडे दिलेले आहेत की, बस्स! बिरबलाचं चातुर्य, त्याची हुशारी, प्रसंग पाहून बोलण्याचं कसब आणि ब-याचदा बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून दिलेलं उत्तर हा मोठा मजेशीर प्रकार असतो. बिरबलाच्या जोडीला असतो न्यायप्रिय राजा अकबर. आपल्या माणसांचं मोठेपण पुरेपूर जाणून असणा-या कुठल्याही राजासारखा अकबर होताच पण त्याचा स्वत:पेक्षाही जास्त भरवसा बिरबलाच्या अक्कलहुशारीवर होता. त्यामुळेच तो सदैव बिरबलाच्या पाठीशी असे. या परस्परपूरक गुणांमुळे अकबर-बिरबलाची ही जोडी कित्येक मुलांच्या मनात घर करून आहे. तुमच्याही मनात तिने घर केलंच असेल, नसेल तर ही दोन पुस्तकं वाचा, ते घर तयार होईल. या अकबर-बिरबलाच्या गोष्टींत फक्त हसीमज्जाकच आहे की आणखी काही? म्हटलं तर आहे आणि म्हटलं तर नाही! म्हणजे असं की, जेव्हा तुम्हाला हसीमज्जाकच हवी असेल तेव्हा या गोष्टी तेच देतील, पण जेव्हा तुम्हाला ज्ञान हवं असेल तेव्हा ते ही देतील. तुम्हाला हवं ते देणा-या या गोष्टी अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्यासारख्याच आहेत. 
 
अकबर-बिरबरलाच्या छान छान गोष्टी : रवींद्र कोल्हे (भाग 1 व 2)
 
साकेत प्रकाशन, औरंगाबाद, पाने : 64 व 72,
 किंमत : 50 रुपये प्रत्येकी

थोरांच्या ‘पोर’पणाचे किस्से!

जगातल्या थोर म्हणवल्या जाणा-या पुरुषांच्या जीवनातील काही प्रसंग मोठे गमतीचे आणि मजेशीर असतात. शाळेतल्या पाठय़पुस्तकांमध्ये यातल्या काही पुरुषांची तुम्हाला एव्हाना ओळख झालेली असेल, शिक्षकांनी त्यांच्या काही गोष्टी सांगितल्या असतील. आजी-आजोबांकडूनही तुम्ही त्यातले काही किस्से ऐकले असतील. या पुस्तकात असेच काही किस्से आहेत.
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन, महर्षी रमण, सरोजिनी नायडू, बंगाली साहित्यिक शरच्चंद्र चटोपाध्याय, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, रशियन साहित्यसम्राट टॉलस्टॉय, राजपुत्र सिद्धार्थ, स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यातील प्रसंग दिले आहेत. त्यातून विनोदबुद्धी, सौंदर्यदृष्टी, साहस, पराक्रम आणि धैर्य असे विविध गुण दिसून येतात. त्यातून हे लोक कसे निभावून गेले याचा धडा मिळतो, आणि कुठल्याही प्रसंगाकडे कसं पाहायचे असते याची शिकवणही मिळते. एका अर्थाने या बोधकथाच आहेत.
 
हे पुस्तक तुम्ही आताच वाचले पाहिजे असे नाही. पण जेव्हा केव्हा तुम्हाला मोठय़ा माणसांबद्दल जाणून घ्यावेसे वाटेल तेव्हा हे पुस्तक तुम्ही वाचायला हरकत नाही.
 
या पुस्तकाचे लेखक हे स्वत: एक शिक्षक आहेत. 30 वर्षे त्यांनी इतिहासाचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. शिवाय अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. या गोष्टीचा त्यांना फारच अभिमान असावा असे वाटते. त्यामुळे या पुस्तकाच्या पाठीमागे त्यांनी आपला बायोडाटा छापला आहे. मुलांसाठीच्या पुस्तकात अशा फुशारक्या मारून काही उपयोग नसतो, याचेही भान या प्राध्यापक महाशयांना नसावे असे वाटते. कारण मुलांना त्याचा काही उपयोग होत नाही. मुलं असा बायोडाटा वाचून पुस्तक विकत घेत नाहीत. दुसरे म्हणजे पुस्तक पूर्णपणे इतरांच्या लेखनावर आधारित असेल तर त्यात अशा गोष्टी अजिबात करू नयेत. कारण ती तुमची स्वतंत्र निर्मिती नसते. पण हा नियम या लेखकाने पाळला नाही. ही या पुस्तकातली एक गफलत आहे. पण ती टाळून तुम्हाला हे पुस्तक वाचता येईलच. कारण मूळ पुस्तकातल्या व्यक्ती खरोखरच थोर आहेत! आणि त्यांचे किस्से वाचण्यासारखे तर नक्कीच आहेत.
 
थोरांची पाहता जीवने : जी. बी. शहा
 
सुमेरू प्रकाशन, डोंबिवली
 पाने : 28, किंमत : रुपये

आवडीच्या बोधकथा

बालगोष्टींची सुरुवात कधी झाली माहीत आहे? तब्बल दोन हजार वर्षापूर्वी. तेव्हा पंचतंत्रातल्या प्राणीकथा लिहिल्या गेल्या. इथूनच बालसाहित्याला सुरुवात झाली असं मानलं जातं. तेव्हापासून आजवर मुलांच्या गोष्टींमध्ये प्राणी-पक्षी असतात, ते माणसांसारखं बोलतात, वागतात आणि म्हणून तुम्हाला आवडतात. म्हणजे बघा, इतकी वर्षे या गोष्टी आणि त्यातले प्राणी तुम्हाला आनंद देतात, तुमचं मनोरंजन करतात आणि त्यासोबत ज्ञानही देतात.
 
पंचतंत्रानंतर इसापनीतीचं नाव घेतलं जातं. कुरूप असलेल्या इसापने माणसांनी कसं वागावं, कसं बोलावं आणि कसं जगावं, याचा वस्तुपाठ आपल्या गोष्टींमध्ये सांगितला आहे. त्यामुळे त्या आजच नाही तर केव्हाही वाचल्या तरी चांगल्या वाटतात. आवडतात. चांगल्या पुस्तकांची हीच व्याख्या असते की, ती केव्हाही वाचली तरी ‘आपली’ वाटतात.
 
पंचतंत्र, इसापनीतीनंतर बोधकथांचा नंबर लागतो. बोधकथा या पंचतंत्र आणि इसापीनीतीचं काहीसं मिश्रण असतं. म्हणजे नावाप्रमाणे त्यात बोध असतो आणि प्राणी-पक्षीही असतात. बोधकथांमध्ये एक छोटीशी गोष्ट सांगितली जाते आणि त्यावरून काय बोध घ्यायचा वा घ्यायचा नाही, हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. या पुस्तकात एकंदर पंधरा कथा आहेत. त्या सर्व दोन-तीन पानांच्या आहेत. शिवाय या कथांचा टाइप तुम्हाला वाचता येईल असा ब-यापैकी मोठा आहे, प्रत्येक कथेत चित्रे आहेत. यातल्या काही कथा तुम्ही यापूर्वी वाचल्या असतील वा शिक्षक, आई-बाबा, मित्र-मैत्रिणी यांच्याकडून ऐकल्याही असतील. पण यातल्या काही कथा तुम्ही पहिल्यांदाच वाचत असाल. या नव्या कथांसाठी हे पुस्तक वाचा.  
   
मुलांच्या आवडीच्या निवडक बोधकथा : रवींद्र कोल्हे
 
साकेत प्रकाशन, औरंगाबाद
 पाने : 46, किंमत : 40 रुपये

सुंदर पुस्तकं, अप्रतिम चित्रं



नुकतीच ज्योत्स्ना प्रकाशनाने ‘नीना आणि मांजर’, ‘गोड भेट’, ‘छोटा पक्षी’ आणि ‘आपला जॉन’ अशी मूळ फ्रेंच भाषेतली चार पुस्तकं मराठीमध्ये अनुवादित केली आहेत. मासिकापेक्षाही थोडय़ा मोठय़ा आकारातली ही पुस्तकं रंगीत आहेत. त्यातली  चित्रं इतकी सुंदर आहेत की, त्यांच्यासाठी ‘अप्रतिम’ हाच शब्द  योग्य ठरेल. मूळ पुस्तकातली चित्रं जशीच्या तशी घेतल्याने पुस्तकांची खुमारी वाढली आहे.
 
‘नीना आणि मांजर’, ‘छोटा पक्षी’ आणि ‘आपला जॉन’ या तिन्ही गोष्टी जंगलातल्या पक्षी-प्राण्यांविषयीच्या आहेत. हे प्राणी वेगळे आहेत. त्यांना जे जमतं आणि इतर प्राण्यांच्या मदतीने ते जेवढं शिकू शकतात, तेवढंच लेखकांनी त्यांना करायला लावलं आहे. हे प्राणी आपल्या गोष्टीत आहेत म्हणून त्यांच्याकडून भलतंच आणि उगाचंच अचाट वाटेल असं काहीतरी करायला लावलेलं नाही. ते प्राणी-पक्षी आहेत, त्यामुळे ते प्रत्यक्षात जंगलात जसं एकोप्याने राहतात, वागतात आणि खेळतात, तसेच ते या गोष्टीमध्ये आहेत.
 
पण मग तुम्ही म्हणाल की, यात काय मज्जा? तर तसं नाही, या गोष्टींमध्ये खूप मजा आहे. ती पुस्तक हातात घेतल्यापासूनच सुरू होते. कारण मुखपृष्ठापासूनच या पुस्तकातली चित्रं आपली पकड घेतात, ती पाहण्यात आपण रंगून जातो. या चित्रांमधूनच गोष्ट पुढे सरकत जाते.
 
‘नीना आणि मांजर’ या पुस्तकातलं नीना हे हत्तीचं पिलू एका मांजरीबरोबर राहतं. त्यामुळे त्याला मांजरीसारखं झाडावर चढता येतं, उंदीर पकडता येतो. पण मांजरीसारखंच ते पाण्याला घाबरतं, स्वत:चंच अंग चाटतं. त्यामुळे निनाचे आई-बाबा अस्वस्थ होतात. पण एके रात्री त्यांच्या घरात उंदराचं पिलू शिरतं, तेव्हा नीनाचे आई-बाबा घाबरतात. नीना मात्र अजिबात घाबरत नाही. ती त्या उंदराला सोंडेत पकडून बाहेर फेकून देते. तेव्हा आपलं पिलू मांजरीकडून काही चांगल्या गोष्टीही शिकलं आहे, हे त्यांच्या लक्षात येतं.
 
‘छोटा पक्षी’ या पुस्तकात नुसतंच घरटय़ात बसून बसून कंटाळलेल्या एका छोटय़ा पक्ष्याला जग बघायची उत्सुकता लागते. मग तो बाहेर पडतो. पण त्याला कसं उडायचं हे माहीत नसतं. तो चालतो. आधी उंदराच्या बिळात जातो. मग बदकाबरोबर त्याच्या तळ्यातल्या घरी जातो. शेवटी कुत्र्याच्या घरी जातो. पण कुत्रा आणि मांजरीच्या भांडणात तो त्यांच्यापासून लांब पळतो, तेव्हा तो अचानक आकाशात भरारी घेतो. आणि मग त्याला जमिनीवर भेटलेले, उंदीर, बदक, कुत्रा आणि मांजर, झाडं, त्यांच्यावर राहणारे छोटे छोटे पक्षी..सारंच जग दिसायला लागतं.
 
‘आपला जॉन’ ही पक्ष्यांची गोष्ट आहे. यातल्या बदकाला वाटेत एक अंडं सापडतं. ती गंमत पाहायला ते कोंबडीला बोलावतं. अंडय़ातून बाहेर येणारं पिलू आपलंच असणार आणि ते आपल्यासारखंच असणार यावरून त्यांच्यामध्ये वादावादी होते. मग तिथे करकोचा, घुबड, नाइटिंगेल, अल्बेट्रॉस, हमिंग बर्ड, शहामृग येतात. ते सगळेच आपल्यासारखंच पिलू यातून बाहेर येईल असं म्हणतात. मग त्यांच्यामध्ये भांडणाला सुरुवात होते. तेवढय़ात त्या अंडय़ातून मगरीचं पिलू बाहेर येतं. पण त्यांच्या जवळपास एकही मगर नसल्यानेच तेच त्याचे पालक व्हायचं ठरवतात. त्याचं नाव जॉन ठेवतात. सगळे त्याची रोज शिकवणी घेतात. ‘‘मी अभ्यास करायला शिकवेन’’, ‘‘मी पळायला..’’, ‘‘मी मासे पकडायला’’, ‘‘मी अंडी घालायला’’, ‘‘मी गायला’’, ‘‘मी फुलातला मध चाखायला’’, ‘‘मी उंच उडायला’’ असे सगळे आपापले विषय ठरवून जॉनची शिकवणी घेतात. पण करकोच्याची मासे पकडण्याच्या आणि बदकाची पोहण्याच्या या दोनच विषयात जॉन पास होतो. कारण काही झालं तरी मगर ती मगरच, ती आकाशात कशी काय उडणार? या पुस्तकातल्या सगळ्याच पक्ष्यांनी आपले कपडे नव्या शिंप्याकडून शिवून घेतलेले असावेत. कारण त्यांचे रंग आणि आकार त्यांना अगदी खुलून दिसतात. करकोच्याच्या गळ्यात कायम माशांचा छोटा डब्बा असतो, तर घुबड गुरुजींच्या हातात कायम पुस्तक असतं. तेच जॉनला गणित शिकवतात.
 
‘गोड भेट’ हे असंच आणखी एक गोड पुस्तक. यातला ससूला बाजारात जाताना एक  मुलगी दिसते. ती त्याला आवडते. दुस-या दिवशी तो तिला भेटायला निघतो. सोबत दहा हिरवीगार आणि रसरशीत कलिंगडांची करंडी घेतो. पण चालून चालून थकतो. मग चार कलिंगडं देऊन गाय विकत घेतो, तिच्या पाठीवर बसून निघतो. पण वाटेत गाय बसते तेव्हा ससू आणखी चार कलिंगडं देऊन एक उंट घेतो. त्याच्या पाठीवर गाय ठेवतो, त्या गायीच्या पाठीवर बसून उरलेली कलिंगडं डोक्यावर घेतो. पण शहरातल्या रस्त्यावरून चालताना तो उंटही थकतो. मग ससू एक म्हातारा हत्ती एक कलिंगड देऊन विकत घेतो. आता त्याच्याजवळ मैत्रिणीला द्यायला एकच कलिंगड उरलेलं असतं. मग तो हत्तीच्या पाठीवर गाय, उंट यांना ठेवतो आणि स्वत:ही कलिंगड घेऊन बसतो. पण म्हातारा हत्तीही एवढय़ा ओझ्याने थकून जातो. मग ससू हत्ती, उंट, गाय आणि कलिंगड यांना डोक्यावर घेऊन निघतो. पण एवढं ओझं त्यानं कधीच डोक्यावर घेतलेलं नसतं. त्यामुळे त्याला तहान लागते, त्याचा घसा कोरडा पडतो. मग तो डोक्यावरचं ओझं खाली ठेवून उरलेलं कलिंगड खातो. आता मैत्रिणीला काय भेट देणार? हत्ती, उंट आणि गाय यांना आपण केलेली मेहनत फुकट गेली असंच वाटायला लागतं. पण ससू मैत्रिणीच्या घरी जाऊन तिला एक सुंदर भेट देतो. ती तिला खूप आवडते. ती भेट कोणती? त्यासाठी तुम्हाला मूळ पुस्तक वाचायला हवं.
 
 या पुस्तकाली चित्रं पाहण्यात खरी मजा आहे. ती पाहताना तुमची हसून हसून पुरेवाट होईल. मुलांची पुस्तकं म्हणजे मोठय़ा अक्षरात छापलेली आणि काहीतरी बोध देणारी असा अनेकांचा गैरसमज असतो. तो आई-बाबा, लेखक लोक आणि प्रकाशक अशा साऱ्याच मोठय़ा माणसांचा असतो. पण ही पुस्तकं तशी नाहीत. तुमची गट्टी कुणाबरोबर होते? तर जो तुमच्याशी खूप गप्पा मारतो आणि आपण मोठे आहोत, हे विसरून तुमच्याशी खेळतो. हो की नाही? ही पुस्तकं अगदी तशीच आहेत!

खुसखुशीत आणि खमंग पुस्तक

‘द हिंदू’ हा दक्षिण भारतातील एक महत्त्वाचा वृत्तपत्र समूह आहे. हिंदूमधील मॅगजिन, यंग वर्ल्ड, लिटररी रिव्ह्यू या पुरवण्या विशेष वाचनीय असतात. ‘प्रहार’ची जशी तुम्हा मुलांसाठी ‘किलबिल’ पुरवणी आहे, अगदी तशीच ‘हिंदू’ची तुमच्यासाठी ‘यंग वर्ल्ड’ ही चार पानी पुरवणी दर बुधवारी प्रकाशित होते. या पुरवणीमध्ये विविध गोष्टी, कोडी, कॉमिक्स, चित्रे रंगवा, फरक ओळखा आणि मुलांनी पाठवलेली चित्रं असतात. (म्हणजे ‘किलबिल’सारखंच!)
 
एव्हाना तुमच्या लक्षात आलं असले की, ही पुरवणी इंग्रजीमधून प्रकाशित होते. मात्र तुम्हाला इंग्रजी लिहिता-वाचता येत असल्याने ही पुरवणी वाचायला तुम्हाला काहीच अडचण नाही. शिवाय तुमचं इंग्रजी सुधारण्यासाठी ही पुरवणी वाचायला हवी. हो की नाही? गेली वीस वर्षे ही पुरवणी प्रकाशित होत आहे. ती तुम्ही वाचता की नाही? पण आजवर तुम्ही ही पुरवणी पाहिली-वाचली नसेल तरी हरकत नाही. नुकतेच या पुरवणीमधील गेल्या वीस वर्षातील निवडक लेखांचं ‘फॉरएव्हर यंग’ या नावानं सुंदर पुस्तक प्रकाशित झालं आहे. काय काय आहे या पुस्तकात?
 
पहिली गोष्ट म्हणजे मासिकाच्या आकारातले हे पुस्तक संपूर्ण रंगीत आहे. आर्टपेपरवर त्याची छपाई केलेली आहे. शिवाय भरपूर चित्रे-कॉमिक्स आहेत आणि अनेक गोष्टीही आहेत. या पुस्तकात रस्किन बाँड, रणजित लाल, माधव गाडगीळ, पद्मा श्रीनाथ, अनीता बदामी या इंग्रजीतल्या मोठय़ा लेखक लोकांच्या गोष्टी आहेत. याशिवाय वेगवेगळ्या भाषेतल्या आणि देशातल्या लोककथा आहेत. ‘बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी’ ही मराठीतील प्रसिद्ध लोककथाही या पुस्तकात आहे. ती इंग्रजीमधून वाचताना मजा येते.
 
यातला कॉमिक्स विभागही चांगला आहे. त्याचे विषयानुसार तीन भाग केले आहेत. पहिला विभाग आहे, द स्टोरी ऑफ मद्रास. दुस-या भागाचे नाव आहे, डिस्कव्हर युवरसेल्फ. म्हणजे शोध स्वत:चा. यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तिस-या भागाचे नाव आहे ‘यंग सायन्स’. यातही सालिंदर, ससा असे प्राणी आहेतच. मात्र एकच अडचण आहे, ती म्हणजे या कॉमिक्समधला मजकूर फारच लहान आकारात छापला असल्याने तो सुस्पष्टपणे वाचता येत नाही. पण चित्रे मात्र तुम्हाला समजू शकतील. ती पाहण्यातसुद्धा मज्जा आहे. ‘पॉपकॉर्न’ हा विभाग आहे विनोदांचा. तुम्हाला विनोद वाचायला आवडतात, कारण त्यातून इतरांची फजिती होते आणि त्यामुळे आपल्याला हसू येतं. हे ‘पॉपकॉर्न’ विनोद वाचतानाही तुम्हाला असंच हसू येईल. पण ते नावाप्रमाणेच पॉपकॉर्न आहेत हे लक्षात असू द्या. म्हणजे ते वाचायचे, त्यांची मजा लुटायची आणि मग ते विसरून जायचे. 
 
‘जी फॉर गांधी’ या विभागात महात्मा गांधी यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे प्रसंग आणि किस्से आहेत, तर ‘फन टू डू’मध्ये गणितातील काही गमतीजमती आहेत. तुमचं इंग्रजीची शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी ‘इझी पिझी इंग्लिश’मध्ये अनेक  ओळखण्यसाठीचे शब्द दिले आहेत. ‘फाइंड आऊटर्स फीस्ट’ हा विभाग तुम्हाला सर्वात आवडेल. कारण त्यात तुम्हाला स्वत:ला करून पाहता येतील असे अनेक प्रयोग दिले आहेत. हा विभाग तुम्हाला घटकाभरासाठी का होईना पण थेट शास्त्रज्ञ बनवेल.
 
‘गुड टू रीड’ हा शेवटचा विभाग मात्र माहिती-ज्ञान-मनोरंजनाचा आहे. त्यात गोष्टी आहेत, इतिहास आहे आणि विविध गमतीजमतीही आहेत. आपण गोष्टीची पुस्तकं वाचतो, पेपर वातो, वहीमध्ये गृहपाठ करतो. या सर्व ठिकाणी कागदाचा वापर केला जातो, पण आपल्याला माहीत नसतं की, कागदाचा शोध कसा लागला? कुणी लावला? कागद झाडापासून करतात एवढंच आपल्याला माहीत असतं. पान 16 वर कागदाच्या निर्मितीचा थोडक्यात इतिहास दिला आहे.
 पण या पुस्तकातल्या गोष्टीही चांगल्या आहेत. इंग्रजी भाषेची एक गंमत तुम्हाला माहीत असेल. त्यात कमी शब्दात मोठा आशय सांगता येतो. त्यामुळे या गोष्टी छोटय़ा असल्या तरी त्या खुसखुशीत आणि खमंग आहेत. जवळपास सव्वीस गोष्टी आहेत. त्यामुळे कुठली गोष्ट कशाविषयी आहे, हे इथं सांगता येणार नाही. कारण त्याला खूप जागा लागेल आणि दुसरं म्हणजे प्रत्येक गोष्टीतली गंमत आधीच सांगितली तर त्यातली गंमतही निघून जाईल. त्यामुळे त्या तुम्ही थेट पुस्तकातच वाचलेल्या ब-या.
फॉरएव्हर यंग : संपादन - निवेदिता सुब्रमण्यम
 द हिंदू प्रकाशन, चेन्नई
पाने- 176, किंमत- 150 रुपये