Friday 10 August 2012

गोष्ट जिद्दी ष्वांगच्या पराक्रमाची!

युआन ष्वांगबद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का? ष्वांग हा खूप हुशार बौद्ध धर्मगुरू होता. इ. स. 630 म्हणजे म्हणजे 1383 वर्षापूर्वी या जिद्दी धर्मगुरूनं भारताचा प्रवास करायचा ठरवला. त्या काळी आत्ताच्यासारखी काही प्रवासाची साधनं नव्हती. विमानाचा शोध ही तर खूपच अलीकडची गोष्ट आहे. त्यामुळे सारा प्रवास व्हायचा तो पायी किंवा घोडय़ावरून. शिवाय चीनमधून भारतात येण्यासाठीही सरळ असा रस्ता नव्हता. त्यासाठी अनेक डोंगरं, दऱ्या आणि वाळवंटांचा आडवातिडवा प्रवास करावा लागे. वाटेत लुटारूंच्या टोळ्या असत. त्या प्रवाशांना लुटून त्यांच्याकडील सगळ्या मौल्यवान वस्तू, पैसे हिसकावून घेत. कधी कधी प्रवाशांना ठारही मारत. नद्या ओलांडणं आणि बर्फातून प्रवास करणं हेही तेव्हा वाटतं तितकं सोपं नव्हतं.
 
अशा काळात ष्वांगनं भारतात येऊन इथल्या बौद्ध धर्मग्रंथांचा अभ्यास करायचा ठरवलं. ष्वांग निश्चयाचा पक्का होता. एकदा ठरवलं की, ती गोष्ट तो पूर्ण करत असे. मग वाटेत कितीही संकटं येवोत अगर काही होवो. ष्वांग काही डगमगणारा गडी नव्हता. त्याला भारतातील विद्वान पंडितांकडून बौद्ध धर्मशास्त्रांचा अभ्यास करायचा होता आणि ते धर्मग्रंथ चीनला घेऊन जायचे होते.
 त्या काळात भारतात बौद्ध धर्माचा खूप प्रभाव होता. आणि बौद्ध धर्माविषयीचं खूप साहित्यही भारतात होतं. ते पाहण्यासाठी आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी भारतात येणं गरजेचं होतं. पण त्या काळी चीनमध्ये देश सोडून जाण्याला परवानगी नव्हती. पण ष्वांग खूप लोकप्रिय आणि विद्वान धर्मगुरू होता. त्यामुळे त्याच्यावर प्रेम करणारे लोकही खूप होते. त्यांच्या मदतीनं ष्वांगनं भारतात येण्याची योजना आखली. पण हा सारा प्रवास त्यायला चोरीछुपे करावा लागणार होता. पकडलं गेलं तर शिक्षा होण्याचीही भीती होती. पण ष्वांगनं काहीही झालं तरी भारतात जायचंच, असा चंगच बांधला होता. मग त्यानं दोन वाटाडय़ांना सोबत घेऊन चीनमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्न केला. चीनच्या सीमेपर्यंत आल्यावर ते ष्वांगचे दोन्ही वाटाडे गुप्तहेरांच्या ससेमि-याला घाबरले. त्यामुळे ष्वांगने त्यांना तिथेच सोडून एकटय़ानंच सीमा ओलांडायचं ठरवलं. पण तेही काही सोपं नव्हतं. सीमेवर काही मैलांच्या अंतरावर उंच मनो-यावर सशस्त्र पहारेकरी पहारा देत असत.
ष्वांग त्यांच्या तावडीतून सुटतो. पण त्याला भारताकडे जाणारा रस्ताही धड माहीत नसतो. पण म्हणतात ना तुमचा निश्चय पक्का असेल आणि त्यासाठी भरपूर मेहनत घ्यायची तुमची तयारी असेल तर तुम्हाला काहीही शक्य होतं. ष्वांग अगदी तसाच गडी होता. भारतात पोहचेपर्यंत त्याच्या मार्गात अनेक संकटं आली, अनेकदा त्याच्या जिवावर बेतलं, जो जिथे जिथे थांबला तेथील सरदार-राजांनी त्याला त्यांच्याकडेच राहण्याचा आग्रह केला. त्याबदल्यात भरपूर संपत्ती देण्याचं आमिष दाखवलं. पण ष्वांग कशालाही बधला नाही.
 अखेर ष्वांग काश्मीरमध्ये पोहोचतो. येथील निसर्गसौंदर्य पाहून तो खूप खुश होतो. त्या वेळच्या काश्मीरमधील लोकांविषयी त्यानं लिहून ठेवलं आहे की, ‘पुरुष कापडाची एक लांबलचक पट्टी कमरेभोवती गुंडाळून बगलेपर्यंत घेतात व उजवा खांदा उघडाच ठेवतात. स्त्रिया दोन्ही खांदे झाडून टाकणारा असा लांब पायघोळ झगा घालतात..’ काश्मीरमध्ये ष्वांग दोन वर्षे राहतो. मग जालंधर आणि कुलूची तीर्थयात्रा करतो. नंतर मथुरेला येतो. वाराणसी, कपिलवस्तू, बोधगया असा प्रवास करतो. त्या वेळी गयामधील नालंदा हे विद्यापीठ खूप प्रख्यात होतं. नालंदामध्ये ष्वांग अनेक बौद्ध धर्माच्या आणि हिंदू धर्माच्या ग्रंथांचा अभ्यास करतो.
 ष्वांग भारतात यायला निघतो तेव्हा ते अवघा 28 वर्षाचा तरुण असतो. सुमारे तेरा वर्षे भारतात विविध ठिकाणी प्रवास करून, अनेक ग्रंथांच्या प्रती नकलून तो स्वत:बरोबर घेतो. इ. स. 645 मध्ये ष्वांग चीनला परत जातो. चीनचा सम्राट त्याचं खूप भव्यदिव्य स्वागत करतो. ष्वांगनं भारतातून आपल्यासोबत 657 ग्रंथ आणलेले असतात. पुढच्या काळात त्यांचं चिनी भाषेत भाषांतर, संपादन आणि लेखन करण्यात तो आपलं आयुष्य घालवतो.
 ष्वांग हे एका जिद्दीचं नाव आहे. ष्वांगचं हे पुस्तक का वाचायचं? तर या त्याच्या पुस्तकातून ष्वांगची आपल्या कामावरची निष्ठा काय होती? त्यासाठी त्यानं किती आणि कसे कष्ट घेतले? कोणकोणत्या संकटांचा सामना केला? भारतात तेरा वर्षे राहून त्यानं कसा अभ्यास केला? आणि भारतातून सोबत नेलेल्या ग्रंथांचं चिनी भाषेत कसं भाषांतर केलं? हे सगळं जाणून घेता येतं. शिवाय ष्वांगनं आपल्या या चीन ते भारत आणि भारत ते चीन प्रवासाची हकिगत लिहून ठेवली आहे. त्यातून त्या वेळचा भारत कसा होता? इथे कोणकोणते राजे होते? ते चांगले होते की वाईट होते? त्या वेळचे लोक कसे होते? ते कसे राहत? अशा अनेक गोष्टी समजतात.
पुस्तक वाचून हजार वर्षापूर्वी आणि त्याही आधीचे लोक कसे होते हे समजावून घेता येतं. थोडक्यात ष्वांगच्या पुस्तकातून हजार वर्षापूर्वीचा भारतच समजून घेता येतो. म्हणून हे वाचायचं.
 
  • युआन ष्वांगची भारत यात्रा : बेलिंदर आणि हरिंदर धनोआ, मराठी अनुवाद निर्मला चंद्रकांत
  • नॅशनल बुक ट्रस्ट, विभागीय ऑफिस, प्रभादेवी, मुंबई
  • पाने : 62, किंमत : 11 रुपये