Sunday, 27 November 2011

‘टापुर टूपुर’ कविता

रवींद्रनाथ टागोर यांचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. त्यांच्या कथा-गोष्टी, विशेषत: काबुलीवालाही गोष्ट तर तुम्ही ऐकली असेलच. टागोरांनी जशा कथा-गोष्टी लिहिल्या आहेत, तशीच त्यांनी तुमच्यासाठी कविताही लिहिल्या आहेत. प्रत्येक मोठय़ा लेखकाला मुलांसाठी लिहावंच लागतं. मग ते हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध गीतकार गुलजार असोत की, मराठीतले आचार्य अत्रे, विंदा करंदीकर, शांता शेळके असोत. पण तुम्हा मुलांना समजेल आणि मुख्य म्हणजे आवडेल असं लिहिणं अवघड असतं. पण टागोरांनी चांगलं लेखन केलं आहे. गंमत म्हणजे त्यांनी या कविता लिहिल्या त्याला आता शंभरहून अधिक र्वष झाली आहेत. पण त्या आजही वाचताना तेवढय़ाच मजेशीर वाटतात. नुकताच टागोरांच्या या कवितांचा मराठी अनुवाद पद्मिनी बिनीवाले यांनी केला आहे. त्यामुळे या कविता आता तुम्हालाही वाचता येतील.
 
टागोरांच्या या कविता कशा आहेत? याचं एका शब्दात उत्तर सांगायचं तर त्या टापुर टूपुरकविता आहेत. कळलं का म्हणजे काय ते? ‘टापुर टूपुरहा मूळ बंगाली शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे, पावसाची रिमझिम. पाऊस सतत पडत राहिला की, आपण आनंदून जातो. नाचतो, खेळतो..ज्याम ज्याम मजा करतो. या कविता वाचताना पाऊस काही पडणार नाही, पण पाऊस पडताना तुम्हाला होतो, तसाच आनंद या कविता वाचताना होईल.
 
मुळाक्षरेया कवितेमध्ये अक्षरांची गमतीशीरपणे ओळख करून दिली आहे.
 -हस्व दीर्घ
दोघे आवळेजावळे भाऊ
 
किंवा
 मिळून सारे च छ ज झ
जातात घेऊन मोठं ओझं
 टागोरांनी किती कमी शब्दात अक्षरांच्या प्रकृतीची तब्येतीत ओळख करून दिली आहे!
असंच एका कवितेत रानाचंही वर्णन आहे-
 रानामध्ये मोठा वाघ 
अंगावर काळे डाग 
झाडावर कित्ती पक्षी
पंखांवर छान नक्षी
 
लपाछपीया कवितेत तर धमालच आहे.
 मी फूल सुगंधी चाफ्याचे होऊनफांदीवर
आई, पानाआड दडेन 
 तू बाळा म्हणुनी देशील हाक 
जरीही मी हसेन दुरुनी;
बोलणार परि नाही 
 तू केस मोकळे पाठीवर सोडून 
चाफ्याच्या खाली येशील
स्नान करून 
मग देवपूजेस्तव जाशील घाईघाई
म्हणशील, ‘कोठुनी गंध येतसे बाई!
 
आहे की नाही जम्माडीगंमत. तुम्ही चाफ्याचे फूल झालात, तर कित्ती मज्जा येईल!
 
रविवार हा तुम्हा सर्वाचा खास आवडता. कारण रविवारी शाळेला सुट्टी असते. पण रविवार सगळा आठवडा संपल्यावर येतो. नेमकी हीच गंमत टागोरांनी या कवितेत सांगीतलीय. ते लिहितात-
 सोम, मंगळ नि बुध येती घडी घडी 
असेल का त्यांच्या घरी मस्त हवागाडी 
आई उशीर का करी रविवार 
भारी हळूहळू मागे मागे मागे
रेंगाळते स्वारी 
त्याचे घर आकाशात आहे
का ग दूर?
रविवार वाटतसे गरिबाचे पोर
 
रोज रोज शाळेत अभ्यास, घरी आल्यावर गृहपाठ यामुळे तुम्हाला कधी कधी फार वैताग येतो. अशा वेळी तुम्हाला
 
आई माझ्या अभ्यासाला
दे ना आता सुट्टीसकाळीच केली आहे
 किती घोकंपट्टीजर मला खेळायला 
सोडलंस नाही गप्प बसेन मी, धडा
वाचणार नाही
 असेच म्हणावेसे वाटते की नाही? कधीतरी म्हणून पहा. आईलाही शब्दात पकडण्याची संधी कशाला सोडता? यातल्या अनेक कविता अशा मन रंगवून टाकणा-या आहेत. त्या तुम्ही जरूर वाचा.  
रवींद्रनाथ टागोरांच्या कविता : अनुवाद पद्मिनी बिनीवाले 
 साकेत प्रकाशन, औरंगाबाद
 पाने : 47, किंमत : 40 रुपये

परिकथांच्या जगात..

गोष्टी ऐकायला कुणाला आवडत नाहीत? आजी-आजोबांकडून ऐकलेल्या, आई-बाबांकडून ऐकलेल्या, वर्गातल्या बाईंकडून ऐकलेल्या, पुस्तकात वाचलेल्या, टीव्हीवर पाहिलेल्या कितीतरी गोष्टी सगळ्या लहान मुलांना माहीत असतात. प्रत्येक भाषेमध्ये अशा कितीतरी गोष्टी मुलांना त्यांच्या त्यांच्या आई-बाबांनी, आजी-आजोबांनी सांगितलेल्या असतात. त्या खरंतर इतक्या जुन्या असतात की त्या कुणी लिहिल्या? की नुसत्याच एकमेकांना सांगितल्या याचा काहीच पत्ता नसतो. जगभरात गाजलेल्या अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्यांची भाषांतरं जगातल्या सगळ्या भाषांमध्ये झालेली आहेत. अगदी आपल्या मराठी भाषेतसुद्धा. पण या गोष्टी इतक्या छान आहेत की त्या पुन्हा पुन्हा सांगाव्याशा वाटतात. ऐकाव्याशा वाटतात. जगप्रसिद्ध परिकथानावाच्या पुस्तकामध्येही अशाच जगभर गाजलेल्या परिकथा नव्याने सांगितल्या आहेत.
 
यातली पहिलीच गोष्ट हॅन्स अँडरसनची कुरुप पिलाची गोष्ट आहे. बदकांच्या पिलांमध्ये वाढणा-या राजहंसाची ही गोष्ट. आपण इतर पिलांसारखं दिसत नाही म्हणून स्वत:शीच दु:खी होणा-या या पिलाला आपण खरं कोण आहोत ते कळल्यावर किती आनंद झाला असेल ते यात वाचायला हवं.
 
झोपलेल्या राजकन्येची गोष्टही तुमच्या आवडीची. दुष्ट प-यांच्या शापाने शंभर वर्ष झोपून गेलेली राजकन्या अरौर हिची ही छानशी गोष्टही या पुस्तकात आहे. या सगळ्या राजकन्यांच्या जगामध्ये चांगल्या आणि वाईट प-या, चेटकिणी नेहमीच काही ना काही घडवून आणत असतात. त्यांची ओळख सिंड्रेला आणि हिमगौरी, स्नो व्हाईट या दोन्ही गोष्टीत होते.
 
लाल टोपडेवाली मुलगीहे द रेड रायडिंग हूडया अतिशय गाजलेल्या परिकथेचं भाषांतर आहे. छोटय़ा मुलीला मटकावून टाकणा-या दुष्ट लांडग्याची शिकारी कशी फटफजिती करतो आणि मुलीची सुटका कशी करतो याची ही गोष्ट भीतीही वाटायला लावते आणि मजाही आणते.
 
लांब केसांची राजकन्या आणि तिला उंच वाडय़ामध्ये डांबून ठेवणारी दुष्ट चेटकिण यांच्या गोष्टीवरचं तर एक छान मराठी नाटक खूप वर्षापूर्वी खूप गाजलं होतं. आता तुम्हाला ते पाहायला मिळणार नाही. पण या पुस्तकातली रेपंझलनावाची या राजकुमारीची गोष्ट तुम्हाला नक्की आवडेल.
 याशिवाय अ‍ॅलिस इन वंडरलँड’(अ‍ॅलिसची अद्भूत कथा’), ‘द पिएड पायपर’(अनोखा बासरीवाला), थंबलीना(इटुकली) या गोष्टींचे अनुवादही या पुस्तकात आहेत. या सगळ्या गोष्टी कार्टून फिल्म्समधून तुम्ही पाहिल्या असतील. रेपंझल वरची गोष्ट तर डिस्नेच्या टँगल्डनावाच्या चित्रपटात नुकतीच दाखवली होती. पण तुम्हाला माहीत आहे नुसतेच चित्रपट पाहण्यापेक्षाही खूप खूप मजा गोष्टी वाचण्यात असते. कारण कार्टून फिल्ममधली चित्रं कार्टूनिस्ट मंडळींनी बनवलेली असतात. पण गोष्टी वाचून तुम्ही तिचं जे चित्रं डोळ्यांसमोर उभं करता ते तुमच्या कल्पनाशक्तीमधून तयार झालेलं असतं. म्हणून खूप खूप गोष्टी वाचल्या की खूप खूप कल्पना सुचायला लागतात. जगप्रसिद्ध परिकथासारख्या पुस्तकातून तुम्हाला या छान छान गोष्टींची ओळख होईलच पण आणखी गोष्टी जमवण्याचा छंदही लागेल.   
जगप्रसिद्ध परीकथा : अनुवाद- लीला शिंदे
 
साकेत प्रकाशन, औरंगाबाद
 पाने - 56किंमत - 40 रुपये

धमाल गोष्टी, बहारदार मजा

भारतीय पातळीवर प्रेमचंद यांच्या कथा-कादंब-यांची मोठी वाहव्वा केली जाते. कारण प्रेमचंद यांना समाजाची अचूक नस सापडली होती. म्हणजे त्यांना समाज पूर्णपणे कळला होता. त्याचबराबेर त्यांनी दांभिकता आणि अन्यायाविरुद्धही आपल्या लेखनातून आवाज उठवला होता. प्रेमचंद यांनी तसं खूप लेखन केलं आहे. ते सर्व हिंदीमध्ये आहे. त्यांच्या काही कथा-कादंब-यांवर चित्रपटही आले. त्यातल्या खास तुमच्यासाठी लिहिलेल्या काही गोष्टींचा अनुवाद या पुस्तकात केला आहे. यात एकंदर सहा गोष्टी आहेत.
फुग्यावर बसला चित्ताया पहिल्याच गोष्टीत बलदेव हा मुलगा सर्कस पाहायला जातो. पण तिथे गंमत होते आणि सर्कशीतून पळून आलेला चित्ता आणि बलदेव दोघेही एका मोठय़ाच्या मोठय़ा फुग्यावर जाऊन बसतात. आधी त्यांना त्याची कल्पना नसते, पण चित्ता पाहून फुग्यावाला तो सोडून पळून जातो. दोरी सुटल्यामुळे फुगा हवेत वरवर जाऊ लागतो. त्याबराबेर चित्ता आणि बलदेवही वर जायला लागतात. चित्त्याला आणि बलदेवला खूपच भीती वाटते. चित्ता घाबरून खाली उडी मारून मरतो पण बलदेव मात्र हुशारीने वाचतो. या पुस्तकातल्या सगळ्याच गोष्टी एकदम धमाल आहेत.
दुसरी गोष्ट आहे एका कुत्र्याची. तो कुत्रा स्वत:च आपली गोष्ट सांगतो. राजा-राणीच्या, प-यांच्या, भुताखेतांच्या खूप गोष्टी आपण ऐकलेल्या असतात पण कुत्र्याची गोष्ट आपल्याला माहीत नसते. खरं तो आपला मित्र, आपल्या घराची राखण करणारा, त्यामुळे त्याची गोष्ट आपल्याला माहीत असायलाच पाहिजे.
तिस-या गोष्टीचा बहादूर हिरो आहे मुरली हा मुलगा. तो एका वेडय़ा आणि पिसाळलेल्या हत्तीला वठणीवर आणतो. त्याची कथा या गोष्टीत आहे.
शेवटच्या दोन्ही गोष्टी सिंहाच्या आहेत आणि एका मुलाच्याही. म्हणजे आधीच्या गोष्टीत मुलगा सिंहाची शिकार करायला जातो. आधी त्याने सिंहिणीची शिकार केलेली असते. तिची पिल्लं त्याने पाळलेली असतात. एके दिवशी त्या मुलावर सिंहाची शिकार करायची वेळ येते..पण अंधारात त्याच्या हातून सिंहिणीचं त्याच्यासोबत असलेलं पिल्लूच मरतं.
शेवटची गोष्ट मात्र खरोखरच धमाल आहे. सिंहामुळे एका मुलाची कशी फट्फजिती होते, याची मजा प्रेमचंदांनी या गोष्टीत सांगितली आहे.
थोडक्यात या पुस्तकातल्या सर्वच गोष्टी धमाल धमाल आणि बहारदार आहेत.
  
प्रेमचंद यांच्या श्रेष्ठ बालकथा : अनुवाद- विशाल तायडे
 
साकेत प्रकाशन, औरंगाबाद
 पाने : 39, किंमत : 30 रुपये

हरवलेल्या खेळण्यांच्या राज्यात

आई-बाबा, आजी-आजोबा, काका-मावशी, दादा-ताई, मामा-मावशी असे सर्वजण तुमच्यासाठी नवीनवी खेळणी आणत असतात. तुमच्या वाढदिवसाला तर तुमच्या मित्र-मैत्रिणींकडूनही अनेक प्रकारची खेळणी भेट मिळतात. पण ही सगळी खेळणी तुम्हाला आवडतात. त्यांच्याबरोबर तुम्ही भरपूर खेळता. रात्री त्यांच्याबरोबर झोपता, सकाळी त्यांच्याबरोबर चहा-नाष्टा, जेवण घेता..एकंदर नव्या खेळण्याबरोबरचे तुमचे सुरुवातीचे दिवस मोठे मजेत जातात. पण मग हळूहळू तुम्ही त्या खेळण्यांना विसरायला लागता. त्यांना आडगळीत टाकून देता.
 
पण ही सगळी खेळणी एकत्र आली तर ती तुमच्याबद्दल काय काय बोलतील? तुमचं प्रेम त्यांना एकेकाळी मिळालेलं असतं, पण आता ते कुठेतरी कोपऱ्यात धूळ खात पडलेले असतात. तेव्हा ते तुमच्याबद्दल नक्कीच तक्रारी करतील. हो की नाही? हे पुस्तक अशा हरवलेल्या खेळण्यांचंच आहे. तुमच्यासारखीच विनी नावाची एक मुलगी असते. तिच्या वाढदिवसाला तिला घोडा, बंदूकधारी सैनिक आणि सोनसाखळी ही बाहुली अशी खूप खूप खेळणी तिचे आजी-आजोबा, आई-बाबा आणि मित्र-मैत्रिणी देतात. त्यातले विनीला फक्त घोडा आणि सोनसाखळी फक्त आवडतात. ती त्यांच्याबरोबर रोज खेळते. सोनसाखळी तर विनीबरोबर जेवते, खेळते, बोलते आणि झोपतेही. विनी जाईल तिथं ती तिच्यासोबत असते. सोनसाखळी विनीची जिवाभावाची मैत्रीण असते. घोडय़ाच्या पाठीवर बसून विनी रोज आत्या, मामा आणि मावशीच्या गावाला जाऊन येते. अशी सगळी विनीची चंगळ चंगळ चाललेली असते. पण काही दिवसांनी विनी सोनसाखळीला बागेतच पेरूच्या झाडाखाली विसरते. घोडाही एका कोप-यात धूळ खात पडतो. मग रात्र झाल्यावर एक अस्वल येतं आणि विनीच्या सोनसाखळीला घेऊन जातं. तेव्हा सोनसाखळी विनीला ‘विनी धाव, मला वाचव’ अशा हाका मारते. विनी तिच्या हाका ऐकून धावतेही पण तोपर्यंत ते भुरं अस्वल सोनसाखळीला घेऊन पळून जातं.  विनीला खूप वाईट वाटतं. विनी रडायला लागते. मग घोडा तिला सांगतो, ‘विनी रडू नको. माझ्या पाठीवर बस. सोबत आपले सैनिक घे. आपण सोनसाखळीला परत आणू.’ मग विनी, घोडा आणि सैनिक सोनसाखळीला शोधायला अस्वलाच्या पाठीमागे जातात. शेवटी ते ‘हरवलेल्या खेळण्यांच्या राज्या’त पोचतात. तिथं खूप म्हणजे खूप खेळणी असतात. ती सर्व खेळणी अशीच तुमच्यासारख्या मुलांनी टाकून दिलेली असतात. म्हणून ती आच्छुजी हा राजा इथं घेऊन येतो. इथं तो त्यांची खूप काळजी घेतो, त्यांचे भरपूर लाड करतो. सर्वजण मजेत असतात. पण विनीला तिची सोनसाखळी हवी असते. ती आच्छुजीकडून जाऊन त्याला सोनसाखळीला परत पाठवायला सांगते. आच्छुजी मोठा गंमतीशीर राजा असतो. त्याला सारख्या शिंका येत असतात. तो विनीला सांगतो, ‘सोनसाखळीला तुझ्याबरोबर यायचं असेल तरच मी पाठवीन.’ सोनसाखळीही विनीला पाहताच तिच्या गळ्यात पडते. मग आच्छुजी सोनसाखळीला विनीबरोबर पाठवायला तयार होतो.
 
तेव्हा विनी तिथल्या सगळ्याच खेळण्यांनाही त्यांच्या त्यांच्या मूळ मित्रांकडे पाठवायला आच्छुजीला सांगते. कारण या राज्यात सर्व खेळणी मजेत असली तरी इथं त्यांच्यावर प्रेम करणारं कुणीच नसतं. त्यामुळे सगळी खेळणी मनातून दु:खी असतात. त्यांना विनीसारखी त्यांच्यावर खूप खूप माया करणारी, लाड करणारी मैत्रीण हवी असते. मग विनी आच्छुजीला एक मोठी योजना सांगते. ती योजना काय असते, ज्यामुळे सगळी खेळणी पुन्हा आनंदी होतात? ही सगळी खेळणी पुन्हा आपापल्या घरी जातात का? यासाठी तुम्हाला हे पुस्तक वाचायला हवं.
 त्याचबराबेर हेही लक्षात ठेवायला हवं की, विनीसारखं आपल्या खेळण्यांवर प्रेम, माया करायला हवी. नाहीतर तुमची खेळणीही एके दिवशी आच्छुजीची भुरी अस्वलं पळवून घेऊन जातील. मग तुम्हालाही विनीसारखं रडू कोसळेल. तसं होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे पुस्तक वाचायला हवं. म्हणजे समजा एखाद वेळी तुमच्याकडून चुकून तुमचं खेळणं हरवलं तर त्याला शोधायचं कसं आणि कुठं हेही तुम्हाला माहीत असेल. या पुस्तकातला आच्छुजी तसा वाईट राजा नाही. तो तुमची खेळणी जबरदस्तीने पळवून नेत नाही. तुम्ही टाकून दिलेली खेळणीच तो आपल्या राज्यात घेऊन जातो. तेव्हा या आच्छुजीची ओळख करून घ्या. म्हणजे तुमची हरवलेली खेळणी तुम्हाला परत मिळतील.

गोष्टी चांगुलपणाच्या !

मागच्या शुक्रवारी साने गुरुजींच्या गोड गोष्टीया दहा पुस्तकांच्या मालेतील पहिल्या पाच पुस्तकांचा परिचय करून दिला होता. आता उरलेल्या पाच पुस्तकांचा परिचय करून देत आहोत. नावाप्रमाणेच या गोड गोष्टी आहेत. यात देश-विदेशातील कथा-लोककथा आणि कादंब-यातील गोष्टी आहेत. पण त्या साने गुरुजींनी स्वत:च्या भाषेत लिहून काढल्या आहेत. त्यांनी खास तुम्हाला आवडेल असे मराठी रूपांतरही केले. परंतु यातल्या काही गोष्टी खूप वर्षापूर्वीच्या असल्याने त्या तुम्हाला थोडय़ाशा बाळबोध वाटण्याची शक्यता आहे. मात्र तरीही प्रत्येक गोष्ट तुम्ही नेटाने शेवटपर्यंत वाचली तरी ती तुम्हाला नक्कीच आवडेल.
 
सोराब नि रुस्तुमया सहाव्या पुस्तकात एकंदर चार गोष्टी आहेत. पहिली गोष्ट वामन भटजींची गायही सत्यकथा आहे, असे साने गुरुजींनी म्हटले आहे. गाई-गुरंही माणसांसारखीच असतात, फक्त त्यांना बोलता येत नाही एवढेच. आपल्यासारख्याच त्यांनाही भावभावना असतात, तीही प्रेम करतात. याचे उदाहरण म्हणजे या गोष्टीतली वामन भटजींची सावळीही गाय आणि प्रेमळ वामन भटजी ही जोडी आहे. पाखराची गोष्टही या पुस्तकातली सर्वात सुंदर गोष्ट आहे. ही मूळ गोष्ट आहे खंडय़ा या शेतकऱ्याची आणि त्याच्या एका मित्राची. हा मित्र एक पक्षी असतो. तो खंडूच्या घरी राहून माणसासाररखं बोलायला शिकतो. खंडू त्याला एक दिवस रानात सोडून देतो. पण त्याची फार आठवण आली की, त्याला भेटायला जातो. तो पक्षी, त्याची बायको आणि मुलं खंडूचं स्वागत करतात, त्याला गोड गोड फळं खायला देतात. सोराब आणि रुस्तुमहा या पुस्तकातली शेवटची गोष्ट रुस्तुम या शूरवीर योद्धयाची आणि त्याच्या तेवढय़ाच शूर सोराब या मुलाची. सोराब आणि रुस्तुम दोघेही एकमेकांशी लढाई करतात, त्याचे रोमांचक वर्णन या गोष्टीत आहे.
 बेबी सरोजाही मूळ तमिळ भाषेतली कादंबरी आहे. साने गुरुजींच्या सोबत एक तमिळ माणूस तुरुंगात होता. त्याने गुरुजींना अनेक गोष्टी सांगितल्या. बेबी सरोजाही तमिळ भाषेतली प्रसिद्ध कादंबरी आहे. तिच्यावर चित्रपटही निघालेला आहे. प्रेमा या धाडसी आणि कर्तृत्वावान मुलीची ही गोष्ट आहे. प्रेमाचे गोरगरिबांवर प्रेम असते. ती लोकांची सेवा करते. त्याचेच हे पुस्तक आहे.
करुणादेवीही गोष्ट एका जपानी नाटकातली आहे. मूळ गोष्ट संक्षिप्तपणे दोन-तीन पानांत होती. साने गुरुजींनी त्या आधारे ५२ पानांची ही गोष्ट लिहिली. शिरीष या गुणवान प्रधानाची आणि हेमा आणि करुणा या त्याच्या दोन पत्नींची ही कहाणी आहे. नावाप्रमाणेच करुणा असलेली शिरीषची ही पहिली पत्नी आपल्या प्रेमाच्या आणि करुणेच्या जोरावर आपल्या पतीला परत मिळवते, तर समान्य शेतकऱ्याच्या मुलगा असलेला शिरीष आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर राजाचा मुख्य प्रधान होतो. हेमा ही गुणी आणि सालस मुलगी त्याची दुसरी पत्नी होते. हेमा आणि करुणा सख्ख्या बहिणींप्रमाणे राहतात. ही गोष्ट जुन्या वळणाची असली तरी ती वाचनीय नक्कीच आहे.
 यती की पतीचार्ल्स रीड यांच्या क्लोस्टर अँड हेअर्थया कादंबरीवरून ही गोष्ट साने गुरुजींनी लिहिली आहे. पंधराव्या शतकातली ही ऐतिहासिक कादंबरी मानली जाते. या कादंबरीला साने गुरुजींना खास महाराष्ट्रीय टच दिला आहे. यातल्या नायकाचे नाव आहे विजय आणि त्याच्या पत्नीचे नाव आहे मुक्ता. नावाप्रमाणेच ही विजयाची, सद्गुणांची आणि परोपकाराची जोडी आहे. आपल्या वागण्या-बोलण्याने आणि गुणांनी शत्रूला जिंकून घेण्याचे त्यांचे कसब खरोखरच प्रेरणा देणारे आहे.
चित्रा नि चारूहे या दहा पुस्तकांच्या मालेतील शेवटचे पुस्तक. यात तमिळ भाषेतील कथा आहेत. खूप छान स्वभावाच्या माणसांची जगातल्या काही दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांमुळे कशी फरफट होते आणि चांगल्या स्वभावाच्या माणसांमुळे चांगल्या गोष्टी कशा घडून येतात याचीच ही गोष्ट आहे. चित्रा आणि चारू या पतीपत्नींच्या या गोष्टीमध्ये परधर्मसहिष्णूतेचा धडाही दिला आहे. ही गोष्टही गुरुजींनी त्यांच्या एका तमिळ मित्राकडून धुळ्याच्या तुरुंगात ऐकली होती. नंतर त्यांच्या भाषेत लिहून काढली.
 या गोष्टींतून साने गुरुजींनी चांगल्या वागणुकीची शिकवण. स्वार्थी आणि अप्पलपोटय़ा जगामध्ये चांगुलपणाने, मानाने, गोड स्वभावाने कसे जगावे याबद्दल फार छान त-हेने सांगितले आहे. म्हणूनच या गोड गोड गोष्टी वाचायला हव्यात.

गोष्टींचं कडबोळं

साने गुरुजींनी मुलांसाठी गोड गोष्टींचे दहा भाग लिहिले आहेत. या गोष्टींना साने गुरुजींनी गोड गोष्टीअसे नाव दिले आहे. ते लिहितात, ‘‘गोड गोष्टींच्या अनेक भागांतून अनेक प्रकारच्या गोष्टी येतील. गंमतीच्या येतील, गंभीर येतील, हसवणा-या येतील, रडवणा-या येतील, विनोदी येतील, बोधपर येतील, ऐतिहासिक येतील, काल्पनिक येतील. त्या मुलाबाळांना गोड लागोत.’’ या गोष्टी या खरे तर देशोदेशीच्या लोककथा आहेत. आपण दोन भागात या पुस्तकांची ओळख करून घेणार आहोत. पहिल्या एक ते पाच पुस्तकांची नावे खरा मित्र, घामाची फुले, मनुबाबा, फुलाचा प्रयोग आणि दु:खी अशी आहेत. खरा मित्रया पहिल्या पुस्तकात एकंदर सहा गोष्टी आहेत. त्या बंगालमधील लोककथा आहेत.
 
घामाची फुलेया पुस्तकात नऊ गोष्टी आहेत. पहिली गोष्ट साने गुरुजींनी ट्रेझर चेस्टमध्ये वाचली होती. ती त्यांनी इथे त्यांना आठवेल तशी त्यांच्या पद्धतीने लिहिली आहे. दुसरी गोष्ट इंग्रजीतल्या डोराया प्रसिद्ध कवितेवरून लिहिली आहे. तिसरी गोष्ट बंगालमधल्या शिशुसाथी या बालमासिकातून घेतली. चौथी गोष्ट एका हिंदी मासिकामधून घेतली. पाचवी गोष्ट स्वामी विवेकानंद यांची आहे. थोडक्यात साने गुरुजींनी कुठून कुठून मिळवून त्यांना आवडलेल्या गोष्टी या पुस्तकात एकत्र दिल्या आहेत.
 
मनुबाबामध्ये इंग्रजीतल्या जॉर्ज इलियट या कादंबरीकाराच्या सिलास मार्नरया कादंबरीतली गोष्ट आहे. पण ती साने गुरुजींना जशीच्या तशी घेतलेली नाही. ती त्यांनी त्यांच्या पद्धतीने आणि थोडक्यात लिहिली आहे. ही मनुबाबा या सुंदर वीणकराची गोष्ट आहे. आपलं काम भलं अन आपण भले अशा वृत्तीच्या मनुला रोज रात्री आपली सोन्याची नाणी मोजून पाहण्याचा छंद असतो. पण ती एकदा चोरीला जातात. काही दिवसांनी एक छोटी मुलगी त्याच्या दाराशी येते आणि मनुबाबाच्या आयुष्यात क्रांती होते. त्या क्रांतीची ही गोष्ट आहे.
 
फुलाचा प्रयोगया पुस्तकात दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट जगप्रसिद्ध फ्रेंच कादंबरीकार अलेक्झांडर डय़ूमा यांच्या ब्लॅक टय़ूलिपया कादंबरीवरून घेतली आहे. मूळ गोष्टीत नावाप्रमाणेच टय़ूलिप हे फूल आहे, पण ते आपल्याकडे पाहायलाही मिळत नाही म्हणून साने गुरुजींनी त्याऐवजी कृष्णकमळ असा बदल केला आहे. ही गोष्ट फुला या तरुणाची आणि कळी या त्याच्या बायकोची आहे. यातली दुसरी गोष्ट जर्मन कवी गटे यांच्या फाऊस्टया महाकाव्यावरून लिहिली आहे.
 
दु:खीहे पाचवं पुस्तक. हे पुस्तक म्हणजे फ्रेंच कादंबरीकार व्हिक्टर ह्यूगो यांच्या ला मिझराब्लया कादंबरीची गोष्ट आहे. वालजी या म्हाता-याची ही गोष्ट आहे तशीच ती लिली आणि दिलीप यांचीही आहे.
 
थोडक्यात साने गुरुजींनी या पुस्तकांमध्ये देशोदेशीच्या गोष्टी दिल्या आहेत. त्या देताना त्यांना खास मराठी साज चढवला आहे. आपल्याकडे अठरा धान्यांचं मिळून कडबोळं हा पदार्थ केला जातो. तसंच अनेक डाळी एकत्र करून त्यांचे सांडगे केले जातात. हे सांडगे भाजून खा, त्यांची भाजी करा, ते इतर भाजीत टाका..त्यांचा कसाही वापर केला तरी ते चांगलेच लागतात. ते चविष्ट असतात, तसेच पौष्टिकही असतात. गुरुजींच्या या गोड गोष्टीही या सांडग्यांसारख्याच आहेत. यातलं कुठलंही पुस्तक कधीही हातात घ्यावं आणि त्यातली कुठलीही गोष्ट वाचायला सुरुवात करावी. तुम्ही त्यात रंगून जाल. कारण प्रत्येक गोष्ट अदभुत म्हणावी इतकी रोचक आहे आणि खिळवून ठेवेल इतकी रोमांचक आहे. या गोष्टी कधी तुम्हाला हसायला लावतील, कधी रडवतीलही. कधी शौर्य-पराक्रमाच्या कथा सांगून तुमची हिंमत वाढवतील तर कधी प्रेम-आपुलकीमुळे जग कसं जिंकता येतं हेही सांगतील.
गोड गोष्टी : साने गुरुजी
  • भाग १ ते ३
  • किंमत प्रत्येकी ६० रुपये
  • भाग ४ आणि ५
  • किंमत प्रत्येकी ८० रुपये
  • प्रकाशक : वरदा प्रकाशन, पुणे

हावरट मांजरीची फजिती

 हे मूळ पुस्तक मल्याळम भाषेतील आहे. त्या भाषेतील ही एक लोककथा आहे. मल्याळम भाषेत ईचा म्हणजे माशी आणि पूचा म्हणजे मांजर. आता तुमच्या लक्षात आलं असेल की, ही एका माशीची आणि मांजरीची गोष्ट आहे. या प्रामाणिक माशी आणि जन्मजात लबाड मांजर यांची मैत्री होते. एके दिवशी त्या दोघी तांदळाची चविष्ट कणेरी बनवतात. दोघी मिळून लाकडं, भांडं, तांदूळ आणतात. मांजर विस्तव पेटवून, लाकडं वगैरे सरकवण्याचे काम करते तर माशी कणेरीमध्ये तिखट, मीठ, जिरे आणि फोडणी घालण्याचं काम करते. कणेरी तयार होते. पण ती खायची कशी? कारण दोघीही चमचा अणायला विसरल्या होत्या. मग ईचा फणसाचं पान आणायला जाते आणि पूचा कणेरीजवळ राखण करायला बसते. पण हावरट पूचाला काही भूक आवरत नाही ती लपक् लपक् करत सगळी कणेरी संपवून टाकते, ईचासाठी काहीच ठेवत नाही. पण सगळी कणेरी खाल्ल्यानं तिचं पोट टम्म फुगतं की, तिला धड चालताही येत नाही आणि बसताही येत नाही. पूचाची जामच पंचाईत होते. तिला काय करावं ते कळत नाही. ती आपल्या एवढय़ा मोठय़ा पोटाचा नगारा सांभाळत गायीकडे, गुराख्याकडे, काडीकडे, झाडाकडे, पक्ष्याकडे, पारध्याकडे जाते. पण तिला कुणीच मदत करत नाही. मग ती सुरीकडे जाते..पण पुढे पूचाचं कायं होतं, ते तुम्ही थेट पुस्तकातच वाचा. कारण या पुस्तकात मजकूर तसा कमी आहे आणि चित्रंच जास्त आहेत. बरीचशी गोष्ट चित्रांमधूनच सांगितली आहे. त्यामुळे पुस्तकच वाचायला हवं. 
ईचा पूचा : कला शशीकुमार,
मराठी अनुवाद - स्नेहलता दातार,
ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे
पाने : 24, किंमत : 30 रुपये  
 
पराक्रमाच्या गोष्टी
 
लिओ टॉलस्टॉय हे रशियन भाषेतील खूप मोठे लेखक होते. त्यांनी मोठय़ा माणसांसाठी खूप पुस्तकं लिहिली. कथा, कादंब-या लिहिल्या. त्यांच्या कादंब-या तर जगभरातल्या अनेक भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. थोडक्यात जगभरातल्या हजारो वाचकांनी टॉलस्टॉयची पुस्तकं वाचलेली आहेत. पण टॉलस्टॉयने मुलांसाठीही काही गोष्टी लिहिल्या आहेत. हे असंच त्यांच्या काही गोष्टींचं पुस्तक आहे.
 या पुस्तकात एकंदर तेरा गोष्टी आहेत. त्यातली एक गोष्ट तुम्हाला माहीत असेलच. एक मेंढपाळ मुलगा ‘लांडगा आला रे लांडगा आला’ म्हणून तो गावक-यांना फसवतो, पण एके दिवसीच त्याचीच फसवणूक होते. पण अशी लबाड मुलं इतर गोष्टीमध्ये फारशी नाहीत. उलट ती फार हुशार आणि धाडसी आहेत, अगदी तुमच्यासारखीच. ‘मांजरीचं पिलू’ या पहिल्याच गोष्टीचे नायक आहेत, कात्या आणि वास्या हे बहीण-भाऊ. त्यांच्या मांजरीला पिल्लं होतात. त्यातलं एक काळकबरं पिल्लू त्यांना फार आवडायचं. ते त्याला एकदा शेतात नेतात. तिथे दोन शिकारी कुत्रे त्याच्या अंगावर धावून येतात. तेव्हा एवढुसा वास्या आपला जीव धोक्यात घालून त्या पिल्लाला वाचवतो. ‘आळंब्या आणि मुली’, ‘अलुबुखारच्या बिया’, ‘चिमणं पाखरू’, ‘दोन मित्र’, ‘हंस’ अशा या पुस्तकातल्या सर्व गोष्टी तशा छोटय़ा छोटय़ा आहेत. पण तरीही त्या तुम्हाला आवडतील अशा आहेत. ‘आळंब्या आणि मुली’ या गोष्टीतल्या धाकटीच्या अळंब्या रेल्वे रुळांवर सांडतात. त्या वेचत असतानाच रेल्वेगाडी येते. ती अगदी जवळ आल्यावर धाकटी अतिशय हुशारीनं स्वत:ला वाचवते. थोडक्यात सांगायचं तर या गोष्टींमध्ये राजा-राणी-प-या-जादू असं काहीही नाही. या साधासुध्या आणि आपल्या आयुष्यात घडणा-याच गोष्टी आहेत. त्यामुळे या गोष्टी वाचताना तुम्हाला असं वाटेल की, ‘अरे, असंच घडलं होतं काल आमच्या शेजारी’,  ‘अरे, असंच घडलं होतं आमच्या शाळेत’. म्हणजे काय तर या तुमच्या गोष्टी आहेत. यातले हिरो तुम्ही आणि तुमचे मित्रच आहेत. तेव्हा स्वत:चे आणि मित्रांचे पराक्रम जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचा. 
       
लांडगा आला रे आला आणि इतर गोष्टी : लिओ टॉलस्टॉय
मराठी अनुवाद - श्रीनिवास पंडितऊर्जा प्रकाशन, पुणेपाने : 40, किंमत : 30 रुपये 

तुम्ही, आम्ही, आपण सगळेच

आठवीच्या वर्गातली मुला-मुलींची गडबड चाललेली असते. तेवढय़ात माळी सर वर्गात येतात. सारे चिडीचूप बसतात. पण माळी सर त्यांचे आवडते शिक्षक असतात. ते मुलांना विचारतात, आज कोणता दिवस आहे? मुलांना काही ते सांगता येत नाही. मग माळी सर सांगतात, आज संविधान दिन आहे. पण राहुल, तन्वी, सचिन, दिनेश, आनंद, प्रिया, केतन, विद्याधर कुणालाच या दिवसाबद्दल काही माहीत नसतं. मग माळी सर या दिवसाची आणि संविधान म्हणजे काय याची गोष्ट मुलांना सांगतात. त्या गोष्टीचं हे पुस्तक आहे. म्हणजे हे पुस्तक गोष्टी सारखंच आहे. म्हणून ते वाचताना कुठेही कंटाळा येत नाही. शिवाय पुस्तक वाचताना आपणही तन्वी, केदार, राहुलच्या वर्गात आहोत की काय असंच वाटायला लागतं.  म्हणजे हे गोष्टीचं पुस्तक नाही, पण त्यात एक गोष्टच सांगितली आहे. हे कवितेचंही पुस्तक नाही, पण कवितेसारखी मजा यात आहे.  
.. तर हे पुस्तक तुमचं, आमचं, आपल्या सगळ्यांचं  आहे. म्हणजे तुम्ही शाळेत जाता, शाळेतले शिक्षक तुम्हाला शिकवतात. पण तुमच्यामध्ये ते कधी भेदभाव करत नाहीत. अमूक मुलगा वा मुलगी श्रीमंत आहे वा अमूक गरीब आहेत म्हणून त्यांना वेगवेगळं शिकवलं जात नाही.  सर्वाना एकाच न्यायानं शिक्षणाचा लाभ दिला जातो. असं का होतं बरं? असा काही कायदा आहे का आपल्या देशात? याच्या राहुल, तन्वी, सचिन, दिनेश, आनंद, प्रिया, केतन, विद्याधर यांनी माळी सरांशी मारलेल्या गप्पा या पुस्तकात आहेत.
 काय काय आहे या पुस्तकात?15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला, हे आपल्या सर्वाना माहीत असतं. दरवर्षी हा दिवस आपण शाळेत साजराही करतो. त्या दिवशी दुपारनंतर आपल्याला सुट्टी असते, संध्याकाळी आई घरी गोड गोड पदार्थ करते. म्हणजे हा दिवस आपण राष्ट्रीय सणासारखा साजरा करतो. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे नक्की काय झालं? तर आपण स्वतंत्र झालो. पण मग देशाची घडी बसवण्याचं, त्याला शिस्त लावण्याचं काम त्या वेळच्या लोकांवर येऊन पडलं. त्यासाठी पं. नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्रप्रसाद अशा मोठमोठय़ा नेत्यांनी एकत्र येऊन भारताची राज्यघटना म्हणजे संविधान तयार करण्याचं काम हाती घेतलं. त्यासाठी त्यांनी अनेक देशांच्या घटनांचा अभ्सास तर केलाच पण आपल्या देशताले वेगवेगळे धर्म, जाती, वेगवेगळ्या प्रदेशात राहणारे लोक, त्यांचं त्यांचं वेगळेपण, शिक्षणाचं प्रमाण अशा अनेक गोष्टींचा विचार केला.  सर्व देशातल्या मुलांना शिक्षण घेता येईल अशी योजना तयार केली. आपला भारत लोकशाही देश असल्यानं त्यात लोकांना आपले प्रतिनिधी संसदेमध्ये निवडून देण्यासाठी मतदानाची पद्धत सुरू केली. देशातल्या लोकांना त्यांच्यातील भांडणामध्ये न्याय मिळावा यासाठी न्यायव्यवस्था तयार केली. म्हणजे थोडक्यात असं की, आपला देश हे एक मोठं कुटुंब आहे. त्यात कुणी काय करायचं, कुणी कुठली कामं करायची, याची जबाबदारी प्रत्येकाला नेमून दिलेली आहे. त्यानुसार प्रत्येक जण आपापली काम करतो. त्यामुळे या देश नावाच्या कुटुंबाचा एवढा मोठा कारभार अगदी बिनबोभाटपणे व्यवस्थित चालतो. या सगळ्या कारभाराचे नियम आपल्या घटनेमध्ये म्हणजेच संविधानामध्ये सविस्तर दिलेले आहेत. ही घटना 22 भागात लिहिलेली असून त्यात 395 कलमे आहेत. तर त्याला १२ पुरवणी कलमांची जोड दिलेली आहे. या घटनेमध्ये अनेक छोटय़ामोठय़ा गोष्टींचा विचार केला गेला आहे. म्हणजे असं की, राज्यपालपदी निवडणूक करायची असेल तर त्यासाठीच्या सर्व अटी, नियम दिलेले आहेत.  या घटनेमध्ये जसे आपल्याला अनेक अधिकार दिलेले आहेत, वेगवेगळी स्वातंत्र्यं दिलेली आहेत, तसंच आपण करायची कर्तव्ये आणि आपल्याकडून असलेल्या अपेक्षाही दिलेल्या आहेत.  न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही आपल्या घटनेची चार मुख्य मूल्ये आहेत. न्याय म्हणजे कोणावरही अन्याय होऊ नये यासाठीची यंत्रणा म्हणजे न्यायव्यवस्था. वैयक्तिक, सामाजिक, सार्वजनिक, राजकीय कुठल्याही प्रकारचा कुणावरही अन्याय होऊ नये यासाठी न्याययंत्रणा आहे. ज्यांच्यावर अन्याय होतो, त्यांना न्यायालयात दाद मागता येते. तेव्हा न्यायव्यवस्था सर्व साक्षी-पुराव्यांचा बारकाईने विचार करून निर्दोष व्यक्तीला मुक्त करते, तर जो गुन्हेगार असेल त्याला त्याच्या गुन्ह्याच्या स्वरूपानुसार शिक्षा केली जाते. हे आणखी सोपं करून सांगायचं तर तुम्हा मुलामुलांमध्ये शाळेत भांडणं झाली तर शिक्षक त्याची नीट चौकशी करून ती सोडवतात आणि ज्याची चूक असेल त्याला छडीचा प्रसाद दिला जातो, कान करून कोप-यात उभं केलं जातं किंवा उठाबश्या काढायला सांगितल्या जातात. न्यायव्यवस्थाही असंच काम करते.  
स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला जे हवं ते आपण करू शकतो. त्यात कुणीही आडकाठी आणू शकत नाही. पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. कारण आपल्याला बोलायचं स्वातंत्र्य घटनेनं दिलं असलं तरी आपण कुणालाही वाटेल तसं बोलू शकत नाही. आपल्या बोलण्यातून इतरांवर अन्याय होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागते.
 तिसरं मूल्य आहे समता. याचा अर्थ असा की, आपल्या घटनेनं सर्वाना समान हक्क दिला आहे. गरीब-क्षीमंत, काळा-गोरा, स्त्री-पुरुष असा कोणताही भेद आपला देश मानत नाही. म्हणूनच आपण एका शाळेत, एका वर्गात बसून शिकतो. त्यात कुठलाही भेदभाव केला जात नाहीत. आता शेवटचं मूल्य. ते आहे बंधुता. तुम्ही शाळेत रोज जी प्रार्थना म्हणता, त्यात कोणते शब्द आहेत? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत.. ही आपली प्रार्थना आपल्याला बंधूभावाचंच दर्शन घडवते. या संस्कारातून हा आपल्या सर्वाचा देश आहे, तो तुमचा, आमचा, आपल्या सगळ्यांचा देश आहे ही भावना रुजवली जाते. म्हणूनच मी आधी म्हणालो होतो की, हे गोष्टीचं पुस्तक नाही, पण यात यात आपल्या देशाची गोष्ट सांगितली आहे. ती वाचायला तुम्हाला नक्की मजा येईल. राहुल, तन्वी, सचिन, दिनेश, आनंद, प्रिया, केतन, विद्याधर यांच्याशी आणि माळी सरांशीही तुमची दोस्ती होईल.

पुस्तक वाचायचं? नाही, पाहायचं!

-महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत?
 
-महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो?
 
-अजिंठा-वेरूळची लेणी कुठल्या शहराजवळ आहे?
 
-शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ला कुठल्या जिल्ह्यात आहे?
 
-कुठल्या गावांना समुद्रकिनारा आहे?
 
-संत्री कुठे पिकतात?
 - या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहीत आहेत का?
-नाही आठवत पटकन?
 
ठीक आहे, तुम्ही विचार करून सांगा. पण त्या आधी या आणि अशाच काही प्रश्नांची उत्तरं भूगोलाच्या पुस्तकात मिळतात हे तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल. ‘भूगोल’ हा तुमचा आवडता विषय आहे का?
 
शाळेतला तुमचा सर्वात आवडता विषय कोणता, याचं उत्तर कदाचित तुम्ही ‘इतिहास’ असं द्याल. कारण त्यात राजे-महाराजे, मोठय़ा मोठय़ा लढाया, हत्ती, घोडे, उंट यांच्या सवा-या असं काय काय असतं. ‘विज्ञान’ हा विषयही तुम्हाला आवडत असेल. कारण त्यात वेगवेगळे ‘जादूचे’, नाही नाही विज्ञानाचे, प्रयोग करता येतात. हे प्रयोग करताना खूपच मजा येते. असेच आणखी दोन विषय गंमतीशीर आणि मजेशीर आहेत. ते म्हणजे गणित आणि भूगोल. पण हे विषय सहसा तुमच्या आवडीचे नसतात. ‘भूगोल’ तर अजिबातच आवडत नाही तुम्हाला, हो की नाही?
 
पण तुम्ही भूगोलाचं पुस्तक नीट पाहिलं, मी पाहिलं म्हणतोय, लक्षात घ्या. भूगोलाचं पुस्तक वाचण्यापेक्षाही जास्त पाहण्यासाठी असतं! कारण त्यात वेगवेगळे नकाशे असतात. आणि त्या नकाशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती असते. तुमच्या भूगोलाच्या पुस्तकात तुमच्या जिल्ह्याचा आणि मग महाराष्ट्राचा नकाशा असतो. तुमच्या जिल्ह्याच्या नकाशामध्ये तुम्ही तुमचं गाव नेमकं कुठं आहे, त्याच्या शेजारी कुठली नदी आहे, आजूबाजूला कुठली गावं आहेत, जवळचं प्रसिद्ध गाव कुठलं आहे, तालुक्याचं गाव कुठे आहे असं काय काय पाहू शकता. तसंच तुमचं गाव महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागात आहे, त्या भागाचं वैशिष्टय़ काय आहे, भागात कुठली पिकं येतात, कुठली फळं येतात अशी खूप सारी माहिती असते.
 
‘मुलांचा चित्रमय महाराष्ट्र’ या पुस्तकात महाराष्ट्राविषयीची अशी खूप माहिती आहे. म्हणजे लेखी माहिती खूपच कमी आहे. चित्रं आणि नकाशेच जास्त आहेत. म्हणजे पान 13 वर महाराष्ट्रात भीमा, गोदावरी, दुधना, प्रवरा, पूर्णा, वैनगंगा अशा पंधरा-वीस नद्या कुठे उगम पावतात, कशाकशा वाटा-वळणांनी जात शेवटी समुद्राला मिळतात याचा नकाशा दिला आहे. पान 16 वरच्या नकाशामध्ये महाराष्ट्रात कुठे कुठे कोळसा, चुनखडक, बॉक्साइट, बेसाल्ट यांच्या खाणी आहेत हे दाखवले आहे. असेच गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, ऊस, कापूस ही पिकं कुठे येतात यांचेही नकाशे आहेत.
 
तुम्ही उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाता. एस.टी.ने जाता किंवा रेल्वेने. समजा एस.टी.ने गेला तर तुमची बस कशी कशी जाते किंवा रेल्वेने गेलात तर ती कशी कशी जाते, हा रस्ता नेमका कसा आहे, याचेही स्वतंत्र नकाशे आहेत. त्यावरून तुम्हाला महाराष्ट्रात कुठे कुठे एस.टी. जाते आणि कुठे कुठे रेल्वे जाते याची माहिती मिळते.
 
या पुस्तकामध्ये तुम्ही स्वत: भरण्यासाठीही काही नकाशे दिले आहेत. पान 34 वरच्या नकाशामध्ये संत्री, टरबूज, सीताफळ, केळी, काजू, डाळिंब, द्राक्षे हे नकाशात दाखवले आहेत. त्यावरून तुम्हाला ही फळं कुठल्या भागात येतात त्यांचे जिल्हे सांगायचे आहेत. तर पान 44 वर नकाशाचंच शब्द-कोडं आहे! या पानावर येईपर्यंत तुम्हाला बरीच माहिती झालेली असणार त्यामुळे हे कोडं तुम्ही चुटकीसरशी भरू शकाल.
 त्यामुळे हे पुस्तक पाहताना तुम्हाला खूप माहिती मिळेल, तुमचं मनोरंजन होईल आणि आपोआप तुमचा अभ्यासही होऊन जाईल. त्यामुळे सध्याच्या सुट्टीत हे पुस्तक तुम्ही वाचायला, नाही नाही, पाहायला हरकत नाही. कारण हे पुस्तक पाहायचंच पुस्तक आहे.  
  • मुलांचा चित्रमय महाराष्ट्र-  विद्याधर अमृते
  • पाने- 48 किंमत- 100 रुपये
  • मनन प्रकाशन, मुंबई

दोस्त जिवाभावाचे!

उद्या 23 एप्रिल. म्हणजे जागतिक पुस्तक दिन. हाच दिवस शेक्सपिअर या जगप्रसिद्ध नाटककाराचाही जन्मदिवस आहे. युनेस्को या जागतिक संस्थेनं 1995 साली 23 हा एप्रिल हा दिवस ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून जाहीर केला. तेव्हापासून गेली पंधरा वर्ष तो जगभर साजरा केला जातो.
 
आता तर तुमच्या परीक्षा झाल्या आहेत, शाळेला सुट्टय़ा आहेत. तेव्हा आता तुम्ही भरपूर पुस्तकं वाचू शकता आणि दंगामस्तीही करू शकता. तुम्हाला माहीत असेल की, खेळताना जेवढी मजा येते, दंगामस्ती करताना जेवढा आनंद मिळतो आणि आरडाओरड करताना जेवढं बरं वाटतं, तेवढीच मौज पुस्तकं वाचतानाही येते. शिवाय त्यातून माहिती-ज्ञानही मिळतं. पुस्तक वाचण्याचे असे अनेक फायदे असतात. वेगवेगळी पुस्तकं सतत वाचत राहिल्यानं आपली बुद्धी तरतरीत आणि कार्यक्षम होते. अनेक गोष्टी आठवणीत ठेवण्याची आपल्या मेंदूची शक्ती वाढते. तर मग चला, वाचायला लागा म्हणजे पोहचायला लागाल हव्या त्या ठिकाणी. या सुट्टीत तुम्ही कुठली पुस्तकं वाचू शकता याची यादी पुढे दिली आहे. त्यातली जी पुस्तकं मिळतील तेवढय़ांचा फडशा पाडा.
 
पहिलीसाठी
 
  • चित्रवाचन - माधुरी पुरंदरे, ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे
  • चिमुकली इसापनीती - रामकृष्ण चौधरी, ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे
  • पाखरांची शाळा- ग. ह. पाटील, गमभन प्रकाशन, पुणे
  • राधाचं घर- माधुरी पुरंदरे, ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे
  • टंगळ मंगळ - अनंत भावे, राजहंस प्रकाशन, पुणे
  • टमू ठमू ढमू, कासव चाले हळूहळू - अनंत भावे, रोहन प्रकाशन, पुणे
  • अक्षरबाग- कुसुमाग्रज, नवनीत प्रकाशन, मुंबई
  • शेपटीचा साप- सई परांजपे, मौज प्रकाशन गृह, मुंबई
  • झाली काय गंमत- सई परांजपे, मौज प्रकाशन गृह, मुंबई
  • पळा, पळा वाघ आला - जगदीश जोशी,  नॅशनल बुक ट्रस्ट, मुंबई
 दुसरीसाठी
 
  • रंगीत अक्षरे - गो. वि. नामजोशी, ढवळे प्रकाशन, मुंबई
  • पंचतंत्रातील गोष्टी - ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे
  • अक्कू बक्कू - शकुंतला मुळ्ये, मायबोली प्रकाशन, मुंबई
  • चांदोमामा - मंगेश पाडगावकर, मौज प्रकाशन गृह, मुंबई
  • अफाटराव - मंगेश पाडगावकर, मौज प्रकाशन गृह, मुंबई
  • चांदोमामा - मंगेश पाडगावकर, मौज प्रकाशन गृह, मुंबई
  • अडमतडम - विंदा करंदीकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
  • परी ग परी - विंदा करंदीकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
  • राणीची बाग - विंदा करंदीकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
  • सिंदबादच्या सफरी - अ. वा. ढवळे, ढवळे प्रकाशन, मुंबई
तिसरी-चौथीसाठी
 
  • वाचू आनंदे (बालगट): भाग 1 व 2 - माधुरी पुरंदरे, ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे
  • वर्तुळ पूर्ण करा - बद्रीनारायण, नॅशनल बुक ट्रस्ट, मुंबई
  • शेरू आणि मिठ्ठू - सुषमा सोनक, नॅशनल बुक ट्रस्ट, मुंबई
  • अलबत्या गलबत्या - रत्नाकर मतकरी, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई 
  • अचाट गावची अफाट मावशी - रत्नाकर मतकरी, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
  • रानझरा - दुर्गा भागवत, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
  • झाडं लावणारा माणूस - माधुरी पुरंदरे, राजहंस प्रकाशन, मुंबई
  • वाचा शिवाय रंगवा - ल. म. कडू, गमभन प्रकाशन, पुणे
  • पंचतंत्रातील मनोरंजक गोष्टी - अनिल किणीकर,  मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
  • सोपी चित्रकला - वि. द. देशपांडे, इंद्रायणी साहित्य, पुणे
पाचवी ते सातवीसाठी
 
  • चित्ररूप श्यामची आई- श्यामची आई,  गमभन प्रकाशन, पुणे
  • गणितातल्या गमतीजमती - जयंत नारळीकर, मनोविकास प्रकाशन, पुणे
  • वाचू आनंदे - माधुरी पुरंदरे, ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे
  • पक्ष्यांच्या गोष्टी - मिलिंद वाटवे,  ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे
  • कलागढच्या अभयारण्यात - रणजित लाल,    ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे
  • परीच्या राज्यात - वसंत बापट, साधना प्रकाशन, पुणे
  • मांजरांचा गाव - शांता शेळके, गमभन प्रकाशन, पुणे
  • कावळ्यांची शाळा - प्र. के. अत्रे,  परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
  • गोड गोड गोष्टी (भाग एक ते दहा)- साने गुरुजी,   ढवळे प्रकाशन, मुंबई
  • तोत्तोचान- चेतना सरदेशमुख-गोसावी, नॅशनल बुक ट्रस्ट, मुंबई
  • रॉबिनहुड - भा. रा. भागवत, ढवळे प्रकाशन, मुंबई
  • फास्टर फेणे (संपूर्ण संच) - भा. रा. भागवत
  • कष्टाळू मुंग्या - पुलक विश्वास,  नॅशनल बुक ट्रस्ट, मुंबई
  • अमर पुस्तके - मनोज दास, अनुवाद : श्यामला शिरोळकर, नॅशनल बुक ट्रस्ट, मुंबई
  • अजबग्रहाची दंतकथा- ताजिमा शिन्जी, अनुवाद: सुलभा कोरे, साहित्य अकादमी, मुंबई