Monday, 23 January 2012

नवाचा पाढा गप्पा झाडा!

भीम आणि घटोत्कचहा पहिलीच गोष्ट महाभारतातला भीम आणि त्याचा मुलगा घटोत्कच यांची आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच. घटोत्कच त्याच्या आईबरोबर, हिडिंबाबरोबर राहत असतो. तो खूपच ताकदवान असतो. कुस्तीत, मारामारीत आणि गदायुद्धात तो सगळ्यांना हरवत असे. त्यामुळे त्याचं त्याच्या मित्रांमध्ये खूप कौतुक होत असे. पण हा घटोत्कच खूप खात असे आणि व्यायामही करत असे. पण तो सकाळी लवकर उठत नसे. त्यामुळे त्याची एकदा ज्याम फजिती होते.
 
सापाचं स्वातंत्र्यही गोष्ट विशेषत: ज्या दोस्तांना दूध प्यायला आवडत नाही, त्यांना खूप आवडेल. कारण या गोष्टीत बोलका साप आहे. या सापाला दूध प्यायला खूप आवडायचं. त्यामुळे तो एका शाळेत जाणा-या मुलाशी मैत्री करतो. ते दोघं रोज खूप गप्पा मारतात, एकत्र दूध पितात. पण लक्षात ठेवा या सापाला दूध न पिणारी मुलं अजिबात आवडत नाहीत. आणि त्यांच्याशी तो मैत्रीही करत नाही.
 
ये ये पावसाही पावसाची गोष्ट आहे. सध्या काही पावसाचे दिवस नाहीत. कसे असणार दोस्तांनो? रोज रोज थंडी पडायला लागल्यावर पाऊस कुठून पडणार? पण पाऊस कसा पडतो, त्यासाठी हिमालय, वारा, सूर्य आणि पृथ्वी यांची कशी मैत्री व्हावी लागते, याची गोष्ट या गोष्टीत आहे. म्हणजे ही गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट आहे.
 
तुम्ही शाळेतल्या पुस्तकात किंवा शिक्षकांकडून शेखचिल्लीची गोष्ट ऐकली असेल. एक शेखचिल्ली ज्या फांदीवर बसलेला असतो, तीच फांदी तो तोडत असतो. शेवटी फांदी तुटल्याबरोबर तो फांदीसह जमिनीवर आपटतो. शेखचिल्लीची गायया गोष्टीतला शेखचिल्ली तितका काही वेडा नाही. आणि तो लाकूडतोडय़ाही नाही. तर तो आहे राखणदार. तो एका बागेचं राखण करत असतो. पेरूच्या झाडाखाली मऊ मऊ कापसाची गंजी असते. त्यावर बसून तो रोज बागेत चरायला येणा-या एका गायीच्या शेपटीला धरून स्वर्गात जातो. तिथे खूप मजा करतो आणि परत येतो. कारण स्वर्गात राहणारी ही गाय रोज खाली उतरून शेखचिल्लीच्या बागेत चरायला येते आणि जाताना त्याला आपल्यासोबत घेऊन जाते. पण एके दिवशी तो बागेच्या मालकालाही आपल्यासोबत स्वर्गात जाऊन येण्याचा आग्रह करतो आणि गडबड होते. कारण राखणदार असला तरी हा शेखचिल्लीही आधीच्यासारखाच थोडासा वेडपट असतो. 
 
बोलक्या शंखाची गोष्टही अशीच गंमतीशीर आहे. पण खरी गंमत आहे ती नवाचा पाढाया कवितेत. ही कविता तुम्ही पाठ केली तर तुमचा नवाचा पाढाही तोंडपाठ होऊन जाईल. तर मग करा सुरुवात म्हणायला-
 
नवाच्या पाढय़ाची गंमतजमत, बेरजा सा-यांच्या नऊ
 
जरा विचार करून गणित करा रे, सगळेच नऊच नऊ
 
नऊ दुणे अठरा, एक आणि आठ झाले नऊ
 
जरा विचार करून गणित करा रे, सगळे नऊच नऊ
 
आहे की नाही गंमतजंमत? तेव्हा नवाचा पाढा तोंडपाठ म्हणण्यासाठी आणि बोलक्या सापाशी गप्पा मारण्यासाठी हे पुस्तक वाचा.
 
ये ये पावसा : लीना मेहेंदळे
 
परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
 पाने : 50, किंमत : 40 रुपये

Sunday, 8 January 2012

मारा गप्पा करा मज्जा!

मुंग्या चिडून
आल्या काठावर
एक बसली 
त्याच्या पाठीवर
बाकीच्या मुंग्या
म्हणाल्या तिला 
हसतोय कसा बघ
बुडव त्याला 
कवितेतल्या या मुंग्या कुणाला बुडव म्हणतात ठाऊकाय? हत्तीला! कारण मुंग्या पाण्यात मजेत पोहत असताना तिथं हत्ती आला आणि त्यानं त्यांची खोड काढली. म्हणून त्यांच्यातली एक चिडून त्याच्या पाठीवर बसली, त्याला बुडवायला.
 
आता गणुचा पराक्रम पहा-
वर्गातला गणू
भलताच हुशार 
बुद्धीला बसतो
 लावीत धार..
मराठी, हिंदी
शुद्ध बोले 
व्याकरण त्याचे
सरळे चाले
भूगोलाचा चढे
अवघड घाट 
इतिहास त्याचा
साराच पाठ 
या गणूसारखे तुम्हीही हुशार असालच. आणि समजा नसलात तर त्याच्यासारखा अभ्यास करा. आहे काय त्यात एवढं?
 आता सशाची फजिती कशी होते ते पाहू. समजा तुमच्या वर्गावर तुमचे शिक्षक वा बाईंऐवजी ससाच तुमचा मास्तर म्हणून आला तर काय होईल? तो म्हणेल,
आजपासून मी
तुमचा सर 
खबरदार गोंगाट
केलात तर 
चला शिकवतो
अंक दहा
अंकाचा हा 
तक्ता पाहा
आहे की नाही मज्जा?
मज्जाच मज्जाया पुस्तकात असा मज्जेमज्जेच्या खूप कविता आहेत. त्यात पोपटाची गोष्ट आहे तसा सर्कशीतला विदूषक आहे. उंदराचं घाबरट पिलू आहे तसंच बोलणारं कणीस आहे. एका कवितेत लबाड लांडग्याची ज्याम फजिती होते. सिंह त्याला चांगलाच दम देतो. त्यावर लांडगा आणखीनच घाबरतो. तर दुस-या एका कवितेत जंगलाचा राजा  सिंह चक्क भित्रा आहे. तर एका कवितेतला पाऊस चक्क हट्टी आहे. पावसाळ्यातली गंमत तुम्हाला माहीत असेलच की, ज्या दिवशी आपण छत्री विसरतो, रेनकोट विसरतो त्या दिवशी नेमका हटकून पाऊस येतो. हा पाऊसही तसाच आहे.
 
एकदा एक जादूगार एका मुलाला जादू करून गुडघ्याएवढा बुटका करून टाकतो. मग त्याला वाटेत शाळेतली मुलं भेटतात. मग काय होत?
 
रस्त्यात भेटली
शाळेतली मुलं 
म्हणाली बघा
 आलंय खुळं 
खो-खो सारखी
हसत सुटली 
म्हणाली याची
 पाटी फुटली 
घरी आलो
रडत रडत 
कडी वाजवली
 उडय़ा मारत
आई म्हणाली
काय झालं?
तिलाही पटकन 
रडूच आलं
तिनं घेतलं  
मला जवळ
जादूने लगेच काढला पळ अशा गमतीजमती तर खूपच आहेत. शिवाय एरवी राणीच्या बागेत दिसणारे पण तुमच्याशी न बोलणारे वाघ, सिंह, लांडगे, ससे असे प्राणीही या पुस्तकात तुमच्याशी बोलतील. मग तुम्ही येणार या प्राण्यांशी गप्पा मारायला? पुस्तक वाचायला लागा, म्हणजे त्यांच्याशी गप्पाही मारायला लागाल.  
मज्जाच मज्जा : एकनाथ आव्हाड, अखिल भारतीय साने गुरुजी कथामला, डोंबिवली. 

पाने : 40, किंमत :30 रुपये

Thursday, 8 December 2011

झुंबाऽऽ हो झुंबाऽऽ हो

एक आठ-दा वरषाचं पोर वागास्नी पकडील का? शिका-यास्नी अद्दल घडवील काय? आणि चंदन चोरणा-या लोकांना हिसका दावील काय? पोर तसं लई मोठं नाय बघा. असंल आठदा वरषाचं. खर्र वाटत नाय ना? मग गडय़ांनो तुमाला हे पुस्ताक वाचायला पायजेल. या पुस्ताकाचा हिरू हाय चिन्ना. हा चिन्ना या सगल्या करामती करून दावतो बघा.
 
पण म्या आदी तुमास्नी त्याचा परेचय करून देवतो बघा. तर त्याचं आस्सं हाय की, चिन्ना हा बोरडी गावचा. तुमी इचाराल की ते कुठं आलं? तर ते हाय कोसबाड तालुक्यात. आन हा तालुका हाय ठाणे जिल्ह्यात. बोरडी गाव तसं लई ल्हान हाय. मंजी तिथं आदिवासींच्या पन्चीस-तीस झोपडय़ा हायती. त्यातल्या एका झोपडीत भिल्ल्या आणि मोगी हे नवरा-बायकू रातात. चिन्ना हे त्यांचं एकुलतं पोर. दोगंबी चिन्नाचे लई लाड करत्यात. चिन्ना हायच तसा हुशार पोर. आवं चिन्नाचं डोळं पिंगट. त्या पिंगटय़ा डोळ्यात लई कुतूहल भरलेलं. सारखं आय-बापास्नी हे काय? ते काय? हे असं काय? ते तसं का?’ असले सवाल इचारून इचारून चिन्ना भंडाऊन सोडायचं बघा. बापुसाला भंडून टाकायचं. पण चिन्नाचा बापुस त्याला माइत असंल तेवढं सांगायचा. पोराचा चुणचुणीतपणा पाऊन मोगीचं काळीज तर सुपासुपाएवढं व्हायचं.
 
दिस जाऊ लागलं, तसा चिन्ना मोठ्ठा होऊ लागला. तसतशा त्याच्या खोडय़ाबी वाडू लागल्या. भिल्ल्या आणि मोगी कंटाळून गेले बघा, चिन्नाला आवरून आवरून. पण चिन्ना काय शांत बसायचं नाव घेईना. त्याचा बापुस सक्काली सक्काली कामाला जायचा. मायच घरी असायची. ती चिन्नाच्या खोडय़ानं आंबट होऊन गेल्ती. मग भिल्लानं त्याच्या शेजारच्या इठूचा इचार घेतला. इठू त्या गावातला लई हुशार माणूस. इठू मन्ला, ‘काय नाय चिन्नाला आसरम शाळंत पाठीव की!भिल्लाला बी तेचा इचार पटला. आसरम शाळा तसी लई लांब नवती, जवळच हुती. त्या शाळंतला मास्तर बी हुशार हुता. तो समद्या पोरास्नी लई बेस शिकवायचा. पोरांना बी लिहाय-वाचाय शिकायला मजा यायाची. चिन्ना दिसभर या शाळंत जाऊ लागला. पर ते बी फार दिस चाल्ललं नाय. मंजी झालं आस्सं की, ती शाळा तिसरीपत्तोरच हुती.
 
चिन्नाची शाळा सुटली आन मग दिसभर त्याला उनाडक्या करायला मोकळं रान घाऊ लागलं. आता तर त्यो शाळंत जाऊन जाऊन लई हुशार बी झाल्ता. त्यामुळं त्याच्या खोडय़ा लईच वाढल्या हुत्या. मोगी त्याच्या खोडय़ांनी रंजीस येऊ लागली. पण पोरगं काय थांबायचं नाव घेत नवतं. एक दिस काय झालं की, मोगीनं सांच्यासाठी झिंग्याची भाजी करायची ठरिवली. पण चिन्ना ते टोपलंच घिऊन पळाला. माय त्याच्या मागं, त्यो पुढं, माय त्याच्या मागं, त्यो पुढं. पण चिन्ना कसला घावतोय मायला? तो धूम पळाला. एकमद चिंगाट. चिन्ना एका उंच झाडाच्या शेंडय़ावं जाऊन बसला. पण त्याला आता वाईट वाटत हुतं. सांच्याला बापुस आला की, माय त्याला सांगणार. मग बापुस आपल्याला बडवणार, रागं भरणार. तो इच्यार करू लागला, काय करावं गडय़ा, मंजी बापुसाकडून मार बसणार नाय? मग त्यानं धना आणि केरूला ते झिंगे दिले आन त्यांच्याकडून त्यांचे मासे पकडायचे गळ घेतले. चिन्नानं मग नदीवर जाऊन रात होईतो बक्कळ मासे पकडले आणि इजई इराच्या ताठय़ात त्यो घरी आला. बापुस त्याला मारणार, तोच त्यानं चिन्नाकडचे बक्कळ मासे पायले. मग कशाला मारतोय बापुस? माय बी खुश झाली मासं पाऊन.

एक दिस काय झालं की, चिन्ना रानात गेल्ता. एका झाडाखाली झोपला हुता. त्याच्या अवतीभवतीच्या झाडावर लई माकडं हुती. त्यांची बारकी बारकी पिल्लं बी हुती. चिन्नाला वाटलं एक पिल्लू आपल्या घरी न्यावं. ते त्याला लई आवडलं हुतं. तो जवळ आलेलं एक पिल्लू घेऊन झोपडीकडं धावत सुटला. पिल्लू ची चीकरून ओरडायला लागलं. तशी माकडं त्याच्या मागं पळू लागली. चिन्ना पुढं पळतोय, माकडं त्याच्या मागं पळतायत. चिन्ना लई घाबरला बगा, इतक्या माकडांनी तेच्या मागं लागल्यावर. पण त्यानं काइ पिल्लू सोडलं नाय. तो झोपडीकडं धूम पळत हुता, पण माकडं बी काय कमी नवती. ती त्याच्याहुन चिंगाट पळत, त्याच्या मागं लागली हुती. काहींनी त्याला गाठून त्याच्या पायाला, अंगाला ओरखाडे काढले हुते. चिन्ना रक्तबंबाळ झाला. तसाच झोपडीजवळ आला. पण त्याची आय काठी घेऊन धावत आल्यावर बी माकडं मागं हटायला तयार नवती. मग चिन्नानं पिल्लाला सोडून दिलं. माकडं पळून गेली. पण चिन्ना आठदा दिस आजारी पडला. त्याच्या अंगावर- खांद्यावर माकडांनी लई ओरबाडे काढले हुते. त्याला उठता येत नवतं की बसता येत नवतं.
या दिसापास्नं चिन्नानं शाण्या माणसांसारखं वागायचं ठरिवलं.
 
चिन्ना एवढुसा पोर. पोर तसं लई मोठं नाय बघा. पण त्यानं मोठय़ा माणसांना जमायची नाय ती काम करून दावली? चोरटय़ा शिकाऱ्यांना पकडलं. चंदनाची झाडं तोडणा-या ठेकेदाराच्या माण्सांना अद्दल घडविली. चोरून बंदुका इकाणा-यास्नी पकडून दिलं. चिन्ना एकदा वागाला घाबरून पळाला. चिंगाट धावत आपल्या झोपडीकडं धावला. वाग बी त्याच्या मागं हुता. चिन्नानं आरडाओरडा केल्यानं शेजारपाजारचे लोक जमले. त्यास्नी पाहून वाग आल्यापावली पसार झाला. पण एरवी चिन्नाचं कवतुक करणा-या गावक-यांनी त्याला पळपुटाम्हणून चिडवलं. चिन्नाला लई राग आला. त्यानं ठरिवलं या वागाला पकडून दावतो. चिन्ना लई जिगरबाज पोर. त्यानं शेवटी वागाला पकरलंच.
 
..आरारा, म्या एवढं समदं तुमास्नी सांगून टाकलं पर चिन्नानं शिकाऱ्यास्नी, चोरास्नी आन वागास्नी कसं पकरलं ते सांगलंच नाय. गडय़ानो, तुमी आसं करता का, हे पुस्ताकच वाचा ना दोस्तांनो. तुमास्नी समदं ठावं होईल. चिन्ना बी आन त्याचे पराक्रम बी. मग तुमी चिन्नासारखं मणाल, झुंबा ऽऽ हो झुंबा ऽऽ हो’. 
 चिन्ना : मंजुश्री गोखले,
ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे, 
 पाने : 70, किंमत : 30 रुपये

Saturday, 3 December 2011

बहुरूपी गांधी

बहुरूप गांधीहे मूळ बंगाली भाषेत लिहिलेलं पुस्तक. ते अनु बंदोपाध्याय यांनी 1949 साली लिहिलं. म्हणजे गांधीजींच्या निधनानंतर लगेच दोन वर्षानी.
त्याचा हा शोभा भागवत यांनी केलेला मराठी अनुवाद आहे.
 
अनेक लोकांना काम करण्याचा कंटाळा असतो. तुम्हा मुलांनाही आईनं सांगितलेली कामं करण्याचा कंटाळा येतो. शारिरीक कष्टाची कामं आई वा बाबांनीच किंवा त्यांच्यासारख्या मोठय़ा माणसांनीच करायची असतात, असं तुम्हाला वाटत असतं. पण बरीचशी मोठी माणसंही अशी कामं करायचा कंटाळा करतात. पण असा कंटाळा गांधीजींनी कधीच केला नाही. त्यांनी सगळी कामं आनंदानं केली. मग ते स्वत:चे कपडे स्वत: शिवणं असो, हातात खराटा घेऊन झाडू मारणं असो, आश्रमातली बाळं रात्रभर सांभाळणं असो, ताटात गहू घेऊन ते निवडणं असो, जात्यावर गहू दळणं असो, संडास साफ करणं असो, चरख्यावर सूत कातणं असो, स्वयंपाक करणं असो, स्वत:च्या चपला शिवणं असो..बापरे किती कामं करायचे गांधीजी! आणि ती सगळी आनंदानं करायचे. कारण स्वत:ची काम स्वत: करण्यात लाज बाळगायचं काहीच कारण नसतं. गांधीजी ती कधी बाळगतही नसत. या पुस्तकात गांधीजींच्या अशा 27 प्रकारच्या कामांची माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगितली आहे.
 
बॅरिस्टर, शिंपी, धोबी, भंगी, चांभार, नोकर, स्वयंपाकी, डॉक्टर, परिचारक, शिक्षक, विणकर, सूत काढणारे अशा जवळपास 27 भूमिका गांधीजी करायचे. त्यामुळे या पुस्तकाला खरं तर बहुरूपी गांधीअसंच नाव द्यायला हवं होतं.
बहुरूप गांधी : अनु बंदोपाध्याय, 
मराठी अनुवाद : शोभा भागवत, 
कजा कजा मरू प्रकाशन, पुणे,
पाने : 70  किंमत : 80 रुपये

Sunday, 27 November 2011

अखेर नईमाची मोहीम फत्ते!

ही बंगालमधल्या एका छोटय़ा मुलीची, नईमाची गोष्ट आहे. नईमाला बंगालमध्ये काढतात, ती अल्पना चित्रं खूप सुरेख काढता येत. तिच्या गावातली ती उत्कृष्ट अल्पना चित्रकार होती. तिच्या चित्रांना दरवर्षी बक्षीस मिळत असे. शिवाय नईमा खूप हुशार मुलगी होती. तिला घरच्या गरिबीमुळे शाळा लवकर सोडावी लागली, पण तिच्या हुशारीवर तिचे आई-बाबा खूश होते. त्यांचा आपल्या मुलीवर खूप जीव होता. नईमाची छोटी बहीण शाळेत जात होती. पण तिलाही लवकरच शाळा सोडावी लागणार होती. कारण तिच्या परीक्षेची फी घरच्यांना परवडणारी नव्हती. नईमाचे अब्बाजान म्हणजे वडील सायकल रिक्षा चालवत. रात्रंदिवस रिक्षा चालवूनही त्यांना फार पैसे मिळत नसत. त्यामुळे ते भरदुपारी उन्हातान्हातही आराम न करता रिक्षा चालवत. त्याचं नईमाला फार वाईट वाटत असे.
 
नईमा आईला घरकामात खूप मदत करत असे. ती सतत कामात असे. पण तिच्या डोक्यात सतत पैसे कमवून वडलांना मदत करण्याच्या नवनव्या आयडियाच्या कल्पना येत.  तिच्या वर्गातला आणि तिचा एकमेव मित्र सलीमही रिक्षा चालवून आपल्या वडलांना मदत करत असे. पण तो मुलगा होता आणि नईमा मुलगी. मुलींना घराबाहेर जाऊन कोणतीच कामं करता येत नसत. छोटय़ाशा खेडेगावात अशीच पद्धत असते. मुलींनी घरकामात आईला मदत करावी आणि मुलांनी वडलांना त्यांच्या कामात मदत करावी, असा रिवाजच असतो खेडेगावात. पण नईमाला मात्र वडलांना मदत करायची खूप इच्छा होत असे. त्यासाठी तिला वेगवेगळ्या कल्पना सुचत असत. त्या ती सलीमला सांगत असे. सलीम तिचा चांगला मित्र होता.
 
एकदा नईमाला एक आयडियाची कल्पना सुचली की, संध्याकाळच्या वेळात आपणच रिक्षा चालवायची. मुलगी रिक्षा चालवतेय हे गावातल्या लोकांना चालणार नाही. तेव्हा मुलाचे कपडे घालायचे आणि मुलाच्या आवाजात बोलायचं. तसा पुरुषासारखा आवाज तिनं सलीमला काढूनही दाखवला. सलीम त्यावर म्हणाला, ‘अरे बापरे! तुझा आवाज तर माझ्या आवाजापेक्षाही पुरुषी वाटतो.’ पण ही कल्पना काही सलीमला तितकीशी आवडली नव्हती. पण नईमा मात्र झपाटून गेली होती. मग तिनं दुपारी वडील झोपलेले असताना त्यांची रिक्षा चालवून पाहण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण रिक्षा वळवता न आल्यानं ती टेकडीवरून खाली गेल्यावर झाडीत जाऊन धडकणार होती. ते पाहून नईमानं पटकन रिक्षातून खाली उडी मारली. त्यामुळे तिला काही लागलं नाही, पण नव्या को-या रिक्षाचं बरंच नुकसान झालं.
 
यामुळे नईमाला खूप वाईट वाटलं. कारण आता वडलांना मदत करणं तर सोडाच पण उलट रिक्षाच्या दुरुस्तीसाठी पैसे लागणार होते. ते कुठून आणणार अब्बाजान? शेवटी आईनं तिच्या हातातल्या एकुलत्या दोन सोन्याच्या बांगडय़ांपैकी एक बांगडी विकायला सांगून त्यातून रिक्षा दुरुस्तीचा खर्च करायला सांगितला. वडलांनाही बांगडी विकताना खूपच वाईट वाटत होतं. आणि नईमाला तर बांगडी विकण्याच्या नुसत्या कल्पनेनंच खूप दु:ख झालं. कारण त्यांच्या घरात तिच्या आईच्या हातातल्या त्या दोन बांगडय़ांचाच तेवढा मंजुळ आवाज ऐकू येत असे. त्यामुळे नईमानं ठरवलं की, काहीतरी करून आपण अब्बाजानला रिक्षा दुरुस्तीच्या कामात मदत करायची. तिनं सलीमला आपली ही आयडिया सांगितली. सलीमला नईमाच्या हुशारीचं खूपच कौतुक वाटलं आणि अभिमानही. त्यानं तिला शेजारच्या गावात गुपचूप जाण्यासाठी स्वत:चे कपडे आणून दिले. एक कुडता, लुंगी आणि टोपी असा सलीमसारखाच वेष करून नईमा तिच्या नव्या मोहिमेवर निघाली. तिची ही मोहीम यशस्वी झाली का, का त्यात मागच्यासारखंच नईमाला अपयश आलं? की नईमानं वडलांना रिक्षा दुरुस्तीच्या कामात मदत केली? हे सगळे प्रश्न तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही थेट पुस्तकच वाचलेलं बरं! पण नईमा ही खूप हुशार आणि बहादूर मुलगी आहे हे पण लक्षात ठेवा.
  • रिक्षावाली मुलगी : मिताली पर्किन्स, अनुवाद - सुनंदा अमरापूरकर,
    ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे,
    पाने :80, किंमत : 40 रुपये

गोष्टी इरावतीच्या, फजिती माकडूची

मित्रांनो, तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात. पण रोज रोज नव्यानव्या गोष्टी ऐकायला आवडतात. शिवाय त्या गोष्टीत प-या, ससे, वाघ-सिंह, माकडं, फुलपाखरं, राक्षस, चेटकिणी, हत्ती, भुतं असे लोकही हवे असतात. हो, हे सगळे लोकच म्हणायचंय मला. माझ्याकडून काही चूक नाही झालेली. कारण हे सगळे प्राणी, पक्षी तुमच्यासारखंच बोलतात. तुम्ही बोलता ती भाषा त्यांना पण येते. म्हणजे तुम्ही मराठीमध्ये बोलता, त्यामुळे ते पण मराठीत बोलतात. अमेरिकेत हेच लोक इंग्रजीमध्ये बोलतात. कारण तिथे ते मराठीमध्ये बोलले तर तिथल्या मुलांना ते कळणार नाही आणि इथे ते तुमच्या गोष्टीत इंग्रजीमध्ये बोलले तर तुम्हाला कळणार नाही. बरोबर की नाही?शिवाय त्यांना तुमची आणि तुम्हाला त्यांची भाषा कळली नाही, तर तुमची मैत्री कशी होणार? त्यामुळे गोष्टीत का होईना हे सगळे लोक तुमच्यासारख्या भाषेत बोलतात. त्यांचे आई-बाबा असतात, ते तुमच्या आई-बाबांसारखे बोलतात, तर त्यांची छोटी छोटी तुमच्यासारखी मुलं तुमच्यासारखंच तोतरं तोतरं बोलतात. त्यामुळे इरावती आणि तिचा भाऊ ईशान यांना अशा गोष्टी फार आवडायच्या. रोज रात्री झोपण्यापूर्वी इरावतीला एक नवी गोष्ट सांगावीच लागायची. इरावती होती चार वर्षाची आणि ईशान होता नऊ वर्षाचा. त्यामुळे ईशान इरावतीसारखा हट्ट करत नसायचा, पण त्यालाही इरावतीसारखीच गोष्ट आवडायची. पण इरावती फार म्हणजे फारच हुशार मुलगी होती. तिला गोष्टीत तिचे सगळे मित्र हवे असायचे. शिवाय गोष्ट तिच्या मनासारखी हवी असायची. समजा आईनं मध्येच गोष्ट पटपट सांगायला सुरुवात केली की, इरावती तिला थांबवून म्हणायची, ‘ये, आई असं नाही नां. नीट गोष्ट सांग. मध्ये मध्ये तू विसरून जातेस.’ मग इरावतीच मधली मधली काही वाक्यं सांगून गोष्ट पुढे न्यायची.पण रोज रोज नवी गोष्ट आणणार कुठून? त्यात आईला दिवसभर पुस्तकं वाचायला वेळच मिळायचा नाही. तशी त्यांच्या घरात खूप पुस्तकं होती. बाबा आणि आई दोघंही खूप पुस्तकं वाचायचे. छोटा ईशानही गोष्टींचा पुस्तकं हळूहळू वाचायला लागला होता. पण तो वाचायला लागला की, इरावतीलाही तेच पुस्तक हवं असायचं. मग त्यांच्यामध्ये भांडाभांडी व्हायची. पण इरावती हुशार मुलगी होती एकदम. तिला ईशानची अभ्यासाची पुस्तकं-वह्या खूप आवडायच्या. त्यातल्या अनेक गोष्टी, कविता तिला तोंडपाठ झाल्या होत्या. मग तिने एकदा आई-बाबाचीही पुस्तकं वाचून पाहिली, पण तिला त्यातलं काहीच कळलं नाही. त्यामुळे तिला ती पुस्तकं अजिबात आवडली नाहीत. एवढी अगडबंब आणि चित्रं नसलेली पुस्तकं आई-बाबा कशाला वाचतात, असा तिला प्रश्न पडला.पण हे सगळं चालायचं दिवसा. रात्र झाली आणि जेवण झालं की, इरावतीला ‘गोस्त’ सांगावी लागायची. पण तिला रोज रोज गोष्टी सांगून सांगून आई कंटाळून गेली. मग तिने वैतागून ‘आजपासून बाबाच तुला गोष्ट सांगेल’ असं सांगू टाकलं. रडणाऱ्या इरावतीला तोतनाची गोष्ट (म्हणजे कोकणाची) गोष्ट हवी होती. बाबानं ती कशीबशी सांगितली. दुस-या दिवशी त्यानं माकडूची (म्हणजे माकडाच्या छोटय़ा पिल्लाची) गोष्ट सांगायला सुरुवात केली.या माकडूच्या गोष्टीतल्या मुलीचं नाव इरावती होतं आणि तिच्या भावाचं ईशान. शिवाय त्यात त्यांचे आई-बाबा, त्यांना भेटलेले इतर लोक, त्यांच्या सहली या सगळ्यांनाही आणलं. रोज रात्री बाबा त्याला सुचेल तशी गोष्ट रंगवून रंगवून सांगायचा. त्यामुळे त्यात रोज नव्यानव्या गमतीजमती घडत. माकडू तसा इरावतीसारखाच हट्टी होता. त्यानं त्यांच्याशेजारच्या झाडावर राहणाऱ्या वटवाघळांबरोबर दोस्ती केली. त्या वटवाघळांनी माकडू आणि त्याच्या मित्रांना आपल्या सोबत रात्री फिरायला न्यायचं कबूल केलं. वटवाघळं रात्री कशी फिरतात, हे तुम्हाला माहीत असेल. तुम्ही त्यांना पाहिलंही असेल फिरताना. पण वटवाघळांसोबत रात्री आकाशात उडण्याची कल्पना तुम्ही केलीय का? माकडू आणि त्याच्या सोबत्यांनी तर प्रत्यक्षात त्यांच्याबरोबर उडण्याचा प्रयोग करून पाहिला. तो यशस्वी झाला का? त्यांना वटवाघळांसोबत उडता आलं की नाही? माकडूच्या गोष्टीत पुढे काय झालं? इरावतीला माकडूची ही गोष्ट आवडली की नाही? ‘मग? पुढे काय झालं? थांबलास का? पुढे सांग ना?’ असंच इरावती बाबाला म्हणत राहिली? काय गंमत आहे की, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पुस्तकात मिळणारच आहेत. त्यामुळे हे प्रश्न घेऊन तुम्ही थेट पुस्तकच का वाचत नाही? कारण मग तुमची इरावती आणि ईशान यांच्याशी पण मैत्री होईल. दोन नवे दोस्त तुम्हाला मिळून जातील राव!

इरावतीच्या गोष्टी : श्रीनिवास पंडित 
ऊर्जा प्रकाशन, पुणे 
 पाने :40, किंमत :45 रुपये

बिन भिंतींची शाळा

मित्रांनो, तुम्ही मोठय़ा, खूप यश मिळवलेल्या लोकांच्या गोष्टी आई-बाबा, आजी-आजोबा यांच्याकडून आणि शाळेतल्या शिक्षकांकडूनही ऐकल्या असतील. राजा-राणीच्या, दुष्ट चेटकिणीच्या आणि राजकुमाराच्या पराक्रमाच्या गोष्टी तुम्हाला खूप आवडतातही. आपणही मोठं झाल्यावर असंच बहादूर व्हायचं, असं तुम्हाला वाटत असतं. तुम्ही ‘तू मोठेपणी काय होणार?’ असं कुणी विचारल्यावर मारे ऐटीत ‘सैनिक होणार, डॉक्टर होणार, हिरो नाहीतर हिरॉईन होणार’ अशी काय काय उत्तरं देत असता.
 
असं काहीतरी होण्यासाठी तुम्ही मग शाळेत जाता, अभ्यास करता, आई-बाबांचं ऐकता, काका-मामांचं ऐकता. ते करतात तशा गोष्टी करून पाहता. त्यात कधी कधी तुमची फजितीही होते. म्हणजे तुम्ही बाबा ऑफिसला गेल्यावर त्याचा टाय गळ्यात अडकवून आणि त्याचे शूज घालून त्याच्यासारखं ऐटीत चालायला लागता, पण मध्येच धडपडता. मात्र असं एक-दोन वेळा पडल्यावर नेमकी काय गडबड होते, हे तुमच्या लक्षात येतं आणि ती चूक तुम्ही पुढच्या वेळी टाळण्याचा प्रयत्न करता. आणि एक वेळ अशी येते की, तुम्हाला बाबाचा टाय आणि शूज घालून त्याच्यासारखं व्यवस्थित चालायला येतं. तसं तुम्ही आईला चालून दाखवून भाव खाता.
 
म्हणजे जे तुम्हाला येत नाही, ते तुम्ही चार-दोनदा प्रयत्न करून शिकता. आणि काही दिवसांनी ते तुम्हाला व्यवस्थित यायला लागतं. असं सगळ्याच गोष्टींबाबत होतं. शाळेच्या अभ्यासाचंही असंच असतं. एखादी कविता पुन्हा पुन्हा वाचली की, ती आपल्या लक्षात राहते, तोंडपाठ होते. इंग्रजी शब्दांचे स्पेलिंगही पुन्हा पुन्हा घोकून पाठ होतं. नीट लक्ष देऊन वाचलं की लक्षात राहतं, रोज रोज मैदानावर खेळायला गेलं की, काही दिवसांनी तो खेळ चांगला खेळता येतो.
 
तुमच्या अवतीभवती कितीतरी आणि काय काय घडत असतं. ते पाहून तुम्हाला अनेक प्रश्न पडतात. खरं तर तुमच्या सारखे सारखे प्रश्न विचारण्याने आई-बाबा आणि शाळेतले शिक्षकही ब-याचदा हैराण होतात. कारण तुम्ही सतत काही ना काही विचारत असता. तुम्ही असा कधी विचार केलाय का, की मोठय़ा माणसांना का बरं असे प्रश्न पडत नाहीत? ते कुणाला विचारतात? त्यांनाही तुमच्याइतके नसले तरी कधी कधी प्रश्न पडतातच. ते त्यांच्या आई-बाबांना म्हणजे आजी-आजोबांना, इतर मोठय़ा माणसांना विचारतात. ज्यांना पुस्तकाची आवड असते, ते आई-बाबा लोक त्या त्या विषयावरची पुस्तकं आणून वाचतात. त्यातून त्यांचं समाधान होतं. काही लोक कॉम्प्युटरवर बसून आपल्याला हवी ती माहिती मिळवतात.
 
घरी येणारा पेपरसुद्धा रोज काहीतरी नवीन सांगत असतोच. म्हणूनच आपण तो वाचतो. समजा त्यानं रोज रोज त्याच त्याच बातम्या, माहिती सांगितली तर आई-बाबा आणि इतर मोठी माणसं तो पेपर वाचतील का? नाही वाचणार!
  कुठलाच माणूस जन्मत:च काही सगळ्या गोष्टी शिकलेला नसतो. जगातले सगळेच लोक जन्मतात तेव्हा अडाणीच असतात. मग ते आईकडून, बाबाकडून, आजी-आजोबाकडून, शाळेतल्या शिक्षकांकडून, मित्र-मैत्रिणींकडून, इतर मोठय़ा माणसांकडून रोज काही ना काही शिकतात, त्यांच्यासारखं वागून पाहतात, करून पाहतात. म्हणजे कुठल्याही लहान मुलाला मोठं झाल्यावर डॉक्टर, वकील, इंजिनिअर, चित्रपटातला अभिनेता होण्यासाठी अनेक गोष्टी रोजच्या रोज शिकाव्या लागतात. त्याचं हे शिक्षण फक्त शाळेतच चालू असतं असं नाही, तर ते घरी, खेळाच्या मैदानात, सिनेमा पाहताना, पेपर वाचताना, प्रवास करताना, गप्पा मारताना चालूच असतं.
जग हीच सर्वात मोठी शाळा असते आणि आई हीच पहिली शिक्षक असं म्हणतात, ते यामुळेच. पण तरीही आपण काही गोष्टींचं रितसर शिक्षण घेण्यासाठी शाळेत जातोच. कारण तिथलं शिक्षणही महत्त्वाचं असतं. आपण जसजसे मोठे होत जातो, तसतशी आपल्या शिक्षणाची भूक वाढत जाते, आपण भराभर नवनव्या गोष्टी शिकायला लागतो.
 
तुम्ही मजा म्हणून, गंमत म्हणून, वेळ घालवण्यासाठी गोष्टींची पुस्तकं वाचता. पण ती सुद्धा नकळत तुमच्या मनावर चांगले संस्कार करत असतात, नव्या गोष्टी तुम्हाला शिकवत असतात. गोष्टी वाचून वाईट काय आहे, चांगलं काय आहे, यातला फरक आपल्याला कळायला लागतो. काहीतरी पराक्रम करायची, बक्षीस मिळवायची इच्छा निर्माण होते.
 
म्हणजे गोष्टींची पुस्तकंही आपल्याला काही ना काही शिकवतच असतात. आज तुमच्यासाठी मी ‘उत्तम संस्कार कथा’ हे पुस्तक निवडलं ते याचसाठी की, या पुस्तकातल्या कथा अशाच खूप चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगतील, शिकवतील. या गोष्टी वाचताना तुम्हाला कधी कधी हसायला येईल, कधी कधी फार आनंद होईल, तर कधी कधी तुम्हाला वाईटही वाटेल. पण एखादा सिनेमा पाहताना किंवा मग नाटक पाहताना, नाहीतर तर एखादी तुमच्या आवडीची कार्टून मालिका पाहताना जेवढा तुम्हाला आनंद होतो, मजा येते, तेवढाच आनंद हे पुस्तक वाचतानाही होईल. कारण ‘उत्तम संस्कार कथा’ असं नाव असलं तरी हे मुळात गोष्टींचं पुस्तक आहे. शिवाय या गोष्टी मराठीबरोबरच गुजराती, उर्दू, तेलुगु, हिंदी, सिंधी आणि इंग्रजी अशा वेगवेगळ्या भाषेतल्या आहेत. या पुस्तकाचे वेगवेगळ्या वयोगटांसाठी तीन भाग आहेत.
 उत्तम संस्कार कथा (इयत्ता दुसरी ते चौथी) : संपादन : माधव राजगुरू,  
बालभारती पाठय़पुस्तक मंडळ, पुणे
,पाने : 56, किंमत : 20 रुपये

सुट्टीतला खाऊ!

मित्रांनो, दिवाळीची सुट्टी तुम्ही मजेत घालवत असाल. शाळा नाही, अभ्यास नाही. अभ्यास नसल्यामुळे गृहपाठही नसणार. पण तुम्हाला गोष्टी, गाणी, कविता वाचायला नक्कीच आवडणार. हे लक्षात घेऊन मोठय़ांच्या दिवाळी अंकांबरोबर तुमच्यासाठीही काही दिवाळी अंक बाजारात आले आहेत. तसे ते दरवर्षी येतातच म्हणा. यावर्षी ‘गंमतजमत’, ‘किशोर’, ‘बाल मैफल’, ‘साधना बालकुमार दिवाळी अंक’, ‘टॉनिक’, असे बरेच दिवाळी अंक नवनव्या गोष्टी, कथा, गाणी, कविता घेऊन तुमच्यासाठी बाजारात दाखल झाले आहेत.
 
‘साधना बालकुमार दिवाळी अंका’ची काही दिवसांपूर्वीच इथेच ओळख करून दिली होती. या वेळेस तुम्ही आवर्जून वाचलेच पाहिजेत अशा दिवाळी अंकांमध्ये मानकरकाकांचा ‘टॉनिक’, ‘किशोर’ आणि ‘बालमैफल’ या तीन दिवाळी अंकांची ओळख करून देत आहोत.
 
‘किशोर’चा मासिकाच्या आकारातला संपूर्ण रंगीत अंक नेहमीच चांगला असतो. तीच परंपरा यावर्षीही त्यांनी जपली आहे. मुखपृष्ठावर भाऊबीजेच्या निमित्ताने दोन बहिणींचं सुंदर छायाचित्र छापलं आहे.  या अंकाचे किशोर आणि बाल असे दोन विभाग आहेत. म्हणजे तुमचा विभाग वाचून झाला की तुम्ही तो ‘बालविभाग’ वाचायला छोटय़ा भावाला किंवा बहिणीला द्यायचा, म्हणून ही सोय केली आहे. कविता, कथा, नाटिका, संगीतिका, कोडी, कार्टून मालिका, विनोद आणि भरपूर रंगीत चित्रं असा मजकुराने हा अंक नटला आहे.  
 
स्वेन हेडिन हा स्वीडिश संशोधकाने तिबेट, चीन आणि मध्य आशियात चार वेगवेगळ्या मोहिमा काढल्या. त्या मोहिमांची रोमहर्षक माहिती लक्ष्मण लोंढे यांनी करून दिली आहे. ‘गाढवाचा बाप’ ही गाढवाच्या प्रामाणिकपणाची आणि इमानदारीची गोष्ट आहे. ‘आय म्या सोन्या न्हाई गं!’ या गोष्टीत मन्या हरवतो. तो कसा हरवतो? सापडतो की नाही? त्याला शोधण्यात पोतराज कसा मदत करतो, याची कहाणी आहे. ‘मंकूची गोष्ट’ ही एका माकडाची अतिशय वेगळी गोष्ट आहे.
 
पीक डोलती शेतात, पीक बोलती शेतात
 
थेंब कष्टाच्या घामाचे, पीक झेलती शेतात
 अशा चांगल्या कविताही आहेत.
‘बालविभागा’ची सुरुवातच 
‘भुई.. भुई’ मोतल फिलवून दाखवू का?
 
कुतल्यासारखं ‘भो.. भो’ भुंकून दाखवू का?
 ‘थयथय’ मोल होऊन नाचून दाखवू का?
‘कुकुचकू’ कोंबला आलवून दाखवू का?
या बोलगाण्याने होते.  मग अनुस्वार हरवल्यावर काय होतं, याची गंमत सागंणारी एक कविता आहे, अशोक पाटील यांची.
 आबाचा केला आंबा
भांडय़ाचा केला भाडय़ा
पांडाचा पाडा करणे
चुका नसे या थोडय़ा
दंग्याऐवजी दगा जाला
खंडूचा झाला खडू
चिंता म्हणता रचली चिता
आता हसू की रडू?
करंजी आणि भाकरीची, शाळेत हुशार असलेल्या राजूची अशा गोष्टी आहेत. चिडणाऱ्या शास्त्रीबुवाची फटफजिती सांगणारी कार्टूनमालिका आहे.
  • किशोर : संपादक एम. आर. कदम
  • किंमत : 45 रुपये
  मानकरकाकांच्या ‘टॉनिक’चा अंक संपूर्ण रंगीत आहेच, शिवाय तो पुस्तकासारखा छोटय़ा आकाराचा आणि पुठ्ठा बांधणी असल्यामुळे मजबुत झाला आहे. त्यात मुलांनी काढलेली खूप चित्रं छापली आहेत. चंद्रकांत खोत यांची ‘लाल, बाल आणि पाल’ ही मुंगी, झुरळ आणि पालीची धमाल मजेशीर गोष्टही या अंकात आहे. आतापर्यंत तुम्ही कधी मुंगीला बोलताना पाहिलंय का? बहुधा नसेल, कारण गोष्टीत मुंग्या असल्यातरी त्या माणसासारखं बोलत नसतात. पण ही मुलगी चक्क माणसासारखं बोलते. नव्हे, ती चक्क बडबड करते. म्हणजे खूप खूप बोलते. ‘नीताचा निश्चय’ ही नीता आणि शलाका या दोन बहिणांची गोष्टही वाचण्यासारखी आहे. क्रिकेटपटू सुनील गावस्कर तुम्हाला माहीत असणारच. त्याचे मामा माधव मंत्री यांनी गावस्करांच्या लहाणपणाची गोष्ट सांगितली आहे. अशा खूप चांगल्या गोष्टी, कविता आणि चित्रं या अंकात आहेत. त्या सगळ्यांबद्दल इथं तुम्हाला सांगणार नाही. त्यासाठी तुम्ही ‘टॉनिक’चा दिवाळी अंकच वाचायला हवा. कारण तो वाचून तुमच्यामध्येही ‘टॉनिक’ येईल, म्हणजे तुम्ही ताजेतवाने व्हाल.
  • टॉनिक : संपादक मानकरकाका
  • किंमत : 60 रुपये
 ‘बालमैफल’चा दिवाळी अंक मराठी, िहदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये आहे. आणि तिन्ही भाषांमध्ये गोष्टी, कविता आणि कोडी आहेत. गिरिजा कीर, वसुधा पाटील, श्याम कुरळे, अरविंद देशपांडे, दर्शना पवार, गणेश रसाळ, सुवर्णा मेस्त्री यांनी लेख-गोष्टी लिहिल्या आहेत, तर निर्मला देशपांडे, सुधाकर देशपांडे, सुमन नवलकर यांच्या आणि इतरांच्या कविता आहेत. ‘हिंदी’ विभाग मराठीपेक्षा थोडासा छोटा आहे. त्यात ‘आगरा उधर है’, ‘चल , जल्दी’, ‘कैसी बनी सायकिल’ हे लेख-गोष्टी तुम्ही वाचल्याच पाहिजेत. सायकलचा जन्म कसा झाला हे वाचायला तर तुम्हाला आवडणारच. नाही का? ‘इंग्रजी’ विभागात वाघ, विवेकानंद, सौर ऊर्जा, बार्बी, वेगवेगळ्या देशांची माहिती आहे.
  • बालमैफल : संपादक कुमार कदम
  • किंमत : 40 रुपये

अंगठ्याला नो ठेंगा


मित्रांनो, अरविंद गुप्ता हा खूप कलंदर आणि गमत्या माणूस आहे. त्याने तुमच्यासाठी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. ‘अंगठय़ाची चित्रं’ हे त्यांचं पुस्तक तर खूपच मस्त आहे. तुम्ही तुमच्या मित्राला, मोठय़ा बहिणीला चिडवायला ‘अंगठा’ दाखवता. त्याला ठेंगा दाखवणे असंही म्हणतात आणि निरक्षर माणसाला अंगठे बहाद्दर असंही म्हणतात. एकंदरच अंगठय़ाविषयी काही आपलं बरं मत नाही. पण हे तुम्हाला माहीत असेलच की, अंगठा हे हाताच्या पंजातलं एक महत्त्वाचं बोट आहे. बरीचशी काम करताना त्याचा उपयोग होत नाही. म्हणजे लिहिताना, वस्तू उचलताना, भांडाभांडी करताना आपण अंगठय़ाचा वापर करतो का? खरं तर करतो. कारण अंगठा हा इतर चार बोटांचा कॅप्टन असतो. सचिन तेंडुलकर नाही का भारतीय क्रिकेट टीममध्ये सगळ्यात महत्वाचा, तसाच अंगठा हा हातांच्या बोटांचा कॅप्टन आहे. त्यामुळे आपण जे जे करतो, हाताची बोटं जशी जशी कामाला लावतो, त्या प्रत्येक वेळी अंगठा त्या बोटांच्या पाठीशी असतो. त्यांना आधार देण्याचं काम करतो. हाताला अंगठा नसेल तर इतर बोटांना आपलं काम चांगल्या प्रकारे करता येणार नाही. त्यामुळे अंगठय़ाची कॅप्टनची भूमिका महत्त्वाची असते.
 
पण त्या बिचा-याला एवढा महत्त्वाचा रोल करत असूनही काही लोक बदनाम करतात. म्हणजे इतरांना वेडावण्यासाठी त्याला अंगठा दाखवतात. पण काही लोक विजय साजरा करण्यासाठी ‘चिअर्स’ करताना अंगठा उंचावतात. तेव्हा अंगठय़ाची मानही अभिमानाने उंचावत असेल. तेवढी एकच चांगली कामगिरी त्याच्या वाटय़ाला येते ना!
 
पण आज मी ज्या पुस्तकाची तुम्हाला ओळख करून देणार आहे, ते अंगठय़ाबद्दलचंच आहे. पण ते काही अंगठय़ाचं रामायण सांगणारं पुस्तक नाही, तर हे अंगठय़ाचं महाभारत सांगणारं पुस्तक आहे. म्हणजे तुम्हाला माहीत नसलेल्या अंगठय़ाच्या करामती या पुस्तकात सांगितल्या आहेत. आणि या सा-या करामती अंगठा एकटा, एकट्याच्या जोरावर करतो. पण शेवटी शेवटी त्याला थोडी इतर बोटांची मदत लागतेच. पण त्यातून जे तयार होतं ते मजेशीर असतं.
 
आता तुमच्या लक्षात आलं असेलच की, हे अंगठय़ापासून कोणकोणती चित्रं काढता येतात, याच्या करामती सांगणारं पुस्तक आहे. अंगठा तसा करामती आहेच. कारण त्याच्यापासून खूप चित्रं बनवता येतात, आणि खूप खूप चांगली चांगली चित्रं बनवता येतात. अनेक माणसांचे चेहरे, आकार, प्राण्यांचे चेहरे, आकार आणि इतर काही प्राणी, वस्तूही अंगठय़ापासून तयार करता येतात. आणि त्या फार लवकर आणि चटकन बनवता येतात. ‘उंगली दबाके अंगुठा बना दूँगी टंक टंक’ हे गाणं तुम्ही कधी ऐकलं का? तसं पाहिलं तर हे गाणं थोडं भीती दाखवणारं आहे खरं, पण ती अंगठय़ाची करामत आहे हेही खरं. कारण इतर बोटं वापरूनही ही करामत करता येते पण अंगठय़ाच्या अंगी मात्र ही कला जरा जास्तच आहे.
 तर मग या पुस्तकाला अंगठा न दाखवता, अंगठा उचलून त्याला ‘चिअर्स’ म्हणा. आणि त्याला कामाला जुंपून भरपूर चित्रं काढा.

देणारं झाड...

देणा-याने देत जावे
 
घेणा-याने घेत जावे
 
घेता घेता देणा-याचे हातच घ्यावे
 
अशी विंदा करंदीकर यांची सुंदर कविता आहे. पुस्तकं लिहिणारे लोकही असेच ‘देणारे’ असतात, आणि वाचणारे ‘घेणारे’ असतात. असाच मुलांसाठी सतत नवीन आणि चांगली चांगली पुस्तक ‘देणारा’ अमेरिकेत एक लेखक होता.  शेल सिल्व्हरस्टाइन. त्याला आपण शेल अंकल म्हणू.
 
शेल अंकलनं मुलांसाठी खूप पुस्तकं लिहिली, कविता लिहिल्या आहेत. तो संगीतकार होता, गाणीही लिहायचा. चित्रंसुद्धा काढायचा. त्याच्या पुस्तकांचा वीसेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे आणि त्यांच्या जवळपास दोन कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत. शेल अंकलला मुलांसाठी लिहायला खूप आवडायचं.
 
शेल अंकलने ‘अंकल शेल्बी एबीझेड बुक’, ‘अ गिव्हिंग ट्री’, ‘अ जिराफ अँड अ हाफ’, ‘द लायन हू शॉट बॅक’, अशी अनेक पुस्तकं मुलांसाठी लिहिली आहेत. आणि ती सर्वच्या सर्व उत्तम म्हणावी अशी आहेत.
 
‘अ गिव्हिंग ट्री’ हे शेल अंकलचं छोटंसं पुस्तक आहे. त्यात त्यानं ‘देणा-या’ झाडाची गोष्ट सांगितली आहे. झाडाचा एक मोठा गुणधर्म असतो. ते आपल्याला सतत देत असतात. काय काय देतात झाडं आपल्याला? पानं, फळं, फुलं, फांद्या, लाकडं, बुंधा, सावली, ऑक्सिजन, सगळं काही देतात. आपण वाहनं चालवून, काय काय जाळून धूर करतो. झाडं तो शोषून घेतात आणि आपल्याला शुद्ध ऑक्सिजन देतात.
 
इतकंच नाही तर मेल्यावरही आपल्याला उपयोगी पडतात. झाडं स्वत:साठी काहीही राखून ठेवत नाहीत. शिवाय देताना ‘त्या बदल्यात तू मला काय देशील?’ असंही कधी म्हणत नाहीत. त्यांना फक्त देणं माहीत असतं. त्यासाठी त्यांच्या कुठल्याच अटी-नियम नसतात. इच्छा-अपेक्षाही नसतात.
 
झाडांना त्यांच्यावर केलेली माया कळते. आणि त्या मायेची परतफेड ते अशा पद्धतीने करतात, की विचारू सोय नाही. कारण झाडं निस्वार्थी असतात, परोपकारी असतात.
 
अशाच एका झाडाची गोष्ट शेल अंकलनं या पुस्तकात सांगितली आहे. या झाडाला एक छोटा मुलगा फार आवडायचा. तो मुलगा रोज त्या झाडाजवळ यायचा, त्याची पानं गोळा करायचा, त्याची फुलं गोळा करायचा. त्याच्या फांद्यावर चढायचा. फांद्यांना धरून झोके घ्यायचा. झाडाची फळं खायचा. झाडाबरोबर लपाछपी खेळायचा. खेळून खेळून दमला की, त्याच्या गार गार सावलीत झोपायचा. झाडाला त्या मुलाच्या या सगळ्या वागण्यामुळे फार आनंद व्हायचा. मुलगा त्याच्यासोबत असला की, ते खूप खूश असायचं.
 
असे खूप दिवस, महिने, वर्षे जातात. तो मुलगा मोठा होतो. मग तो झाडाकडे येईनासा होतो. झाडाला फार वाइट वाटतं. त्याला मुलाची फार आठवण येते. ते त्याची वाट पाहात राहतं.
 
एक दिवस तो मोठा झालेला मुलगा त्या झाडाकडे येतो. त्याला पाहून झाडाला फार आनंद होतो. झाड त्याला म्हणतं, ‘ये बेटा, माझ्या फांद्यावर चढ, झोके घे, माझी फळं खा. माझ्या सावलीत मजेत बस.’ पण मुलाला आता वेळ नसतो. मुलगा म्हणतो, ‘मी आता मोठा झालो. आता मला आणखी मजा, वेगळी मजा करायची आहे. तू मला पैसे देऊ शकतोस का?’ झाडाजवळ काही पैसे नसतात. मग ते मुलाला आपली सारी फळं देतं. ती फळं तो मुलगा बाजारात नेऊन विकतो. त्याचे त्याला पैसे मिळतात. झाडाला फार आनंद होतो.
 
काही दिवसांनी तो मुलगा झाडाकडे परत येतो. आता त्याला घर बांधायचं असतं, लग्न करायचं असतं. मग झाड त्याला आपल्या फांद्या देतं. त्या विकून मुलगा घर बांधतो,  लग्न करतो. झाडाला फार आनंद होतो. पण परत तो मुलगा खूप दिवस झाडाकडे येत नाही.
 
पण एके दिवशी तो परत झाडाकडे येतो. आता झाडाचं फक्त खोड शिल्लक असतं. मुलाला पाहून त्याला आनंद होतो. मुलगा म्हणतो, ‘मला परदेशी जायचं आहे. मला एक होडी हवीय.’ झाड त्याला होडी करायला आपलं खोड देऊन टाकतं. तो घेऊन मुलगा जातो. त्याची होडी बनवून तो साता समुद्रापार जातो. त्याला आनंद होतो. झाडालाही मुलाला आपण मदत केली याचा आनंद होतो. 
 
अशीच खूप वर्षे जातात. तो मुलगा आता म्हातारा झालेला असतो. तो काठी टेकत टेकत त्या झाडाकडे येतो. झाडाचा आता केवळ छोटासा बुंधा शिल्लक असतो. झाडाला त्या मुलाला पाहून फार आनंद होतो. पण ते मुलाला म्हणतं, ‘बेटा, मला माफ कर. आता मी तुला काहीच देऊ शकत नाही.’ तो म्हातारा मुलगा म्हणतो, ‘मला आता काहीच नको आहे. मी आता म्हातारा झालो आहे. माझे दात दुखतात, मला फळं खाता येत नाहीत.  फांद्यांना लटकून झोके घेता येत नाहीत. मी आता फार थकलो आहे. एका जागी शांतपणे बसून राहावंसं वाटतं.’
 
झाड आपला छोटासा बुंधा सरळ आणि स्वच्छ करतं. आणि त्या म्हाता-या मुलाला म्हणतं, ‘ ये, माझ्या बुंध्यावर बस आणि आराम कर.’ म्हातारा मुलगा बुंध्यावर स्वस्थपणे बसतो. त्या झाडाला फार फार आनंद होतो. आणि म्हाता-या मुलालाही!
 
अशी ही गोष्ट आहे देणा-या झाडाची! शेल अंकल अतिशय साध्या सोप्या भाषेत, अगदी गप्पा माराव्यात अशा पद्धतीने लिहितात. छोटी छोटी वाक्यं, नेमके शब्द, आणि मोजकीच पण सुंदर चित्रं असं शेल अंकलच्या प्रत्येक पुस्तकाचं वर्णन करता येईल. तुम्हाला हे पुस्तक वाचायला आवडेल. ते वाचून झाल्यावर तुमचीही या ‘देणा-या’ झाडाशी आणि शेल अंकलशी दोस्ती होऊन जाईल. शेल अंकलबद्दल पुन्हा कधीतरी आणखी माहिती देईन.
  
देणारं झाड :  शेल सिल्व्हरस्टाइन,

 मराठी अनुवाद शोभा भागवत

कजा कजा मरू प्रकाशन, गरवारे बालभवन, पुणे
दूरध्वनी 020 - 2444 2109 पाने 26, किंमत : 10 रुपये