Monday, 11 June 2012

शेपूट कापा, शेपूट कापा

इसापनीतितल्या गोष्टी जरा नव्या प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न मी सध्या किलबिलमध्ये करतो आहे. त्यातील हे एक गोष्ट.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
एकदा एका पारध्यानं जंगलात सापळा लावला. त्याला खरं तर हरीण पकडायचं होतं. बऱ्याच दिवसांपासून त्याला हरणाची शिकार करायची इच्छा होती, पण ते लेकाचं काही त्याच्या तावडीत सापडत नव्हतं. कसं सापडणार, शिकारी दिसला की, ते अशी काही धूम ठोके की, शिकारी त्याच्याकडे नुसता पाहतच राही. शेवटी बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही यश येत नाही म्हटल्यावर शिका-यानं त्याला पकडण्यासाठी सापळा लावला आणि तो घरी गेला. दुपारी छानपैकी जेवण करू, थोडीशी झोप काढू, तोवर सापळ्यात अलगद आपली शिकार आलेली असेल असा शिका-याचा विचार होता.
 
पण इकडे जंगलात झालं उलटंच. शिका-यानं लावलेल्या सापळ्यात हरणाऐवजी एक कोल्हा अडकला. शिकारी घरी होता म्हणून ठीक होतं, नाहीतरी त्याची काही खैर नव्हती. पण कोल्हाही चतुर होता. त्यानं धडपड करून करून त्या जाळ्याला भोक पाडलं आणि त्याला जोर लावून लावून बरंच मोठं केलं. पण या धडपड उद्योगात त्याची शेपटी तुटली. पण जाळ्यात राहिलो तर आपला जीवच जाणार असा विचार करून कोल्ह्यानं कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली आणि घराकडे धूम ठोकली. पण शेपटी तुटल्यानं त्याला इतर कोल्हे मंडळींना भेटण्याची लाज वाटू लागली. शेपूट तुटका कोल्हाअसं त्याला बाकीचे कोल्हे चिडवतील याची भीती वाटू लागली. पण जंगलात राहायचं तर इतर कोल्ह्यांशी गाठभेट होणारच, मग करायचं काय? शेवटी कोल्ह्याला एक युक्ती सुचली. खरं म्हणजे कोल्ह्यानं इतर कोल्ह्यांना विश्वासात घेऊन आपण जिवावर बेतलेल्या संकटातून कसे निभावलो, हे सांगितलं असतं तर कुणी त्याला फार चिडवलं नसतं. पण कोल्हाच तो, अतिशहाणपणा करणारच ना?
 
कोल्ह्यानं ठरवलं की, आपण सर्व कोल्हेभाऊ-कोल्हेबहिणींची सभा घेऊ आणि त्यांना आपण शहरात आपल्यासाठी नवं ब्युटी पार्लर उघडल्याचं सांगू. तिथं कोल्ह्यांच्या शेपटय़ा फुकटात कापून मिळतात असं सांगू.
 
त्यानुसार त्यानं जंगलातल्या सर्व कोल्हेभाऊ-कोल्हेबहिणींची सभा बोलावली. सर्व जमल्यावर शेपूट तुटका कोल्हा त्यांना सांगू लागला, ‘‘माय-बापांनो, भाऊ-बहिणींनो आणि सग्यासोय-यांनो, मी आज तुम्हाला एक खुशखबर सांगणार आहे. जवळच्या शहरात खास आपल्यासाठी एक नवंकोरं ब्युटी पार्लर सुरू झालं आहे. तिथं आपल्याला केस, नखं कापून मिळतात. आणि ज्यांच्या शेपटय़ा बेढब आणि बेंगरूळ आहेत, त्याही कापून मिळतात. मुख्य म्हणजे या सर्व सोयी अगदी फुकटात आहेत. त्यामुळे मी माझी बेढब-बेंगरूळ शेपटी कापून घेतली आहे. ही पहा. तेव्हापासून मला खूपच बरं आणि हलकं हलकं वाटतंय. नाहीतरी शेपटीचा आपल्याला काही उपयोग नसतो. उगाच जिवाला भार असते ती शेपटी! म्हणून मी ती कापून टाकली. शहरातल्या माणसांना कुठं असतात शेपटय़ा? पण तरीही ती किती गोंडस आणि रूबाबदार दिसतात! त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की, जमाना आता बदलला आहे. तुम्ही माझ्यासारख्याच स्वत:च्या बेंगरूळ शेपटय़ा कापून टाका आणि माझ्यासारखे स्मार्ट व्हा! कसं?’’
 
कोल्ह्याच्या या अजब भाषणावर काही नुकत्याच बाळसं धरू लागलेले शेपटय़ावाले तरुण कोल्हे खूश झाले, तर काही म्हातारे जाणकार कोल्हे हसू लागले. तेवढय़ात एक हुशार कोल्हा उभा राहिला. तो बोलू लागला, ‘‘ मित्रांनो, या कोल्ह्याची जंगलात काहीतरी उपद्व्याप करताना शेपटी तुटली आहे. त्याला आपण हसू म्हणून हा शेपटय़ा कापून देणाऱ्या ब्युटी पार्लरची बतावणी करतोय. अहो, कोल्ह्याचं खरं सौंदर्य त्याच्या झुपकेदार आणि गोंडस शेपटीमध्येच असतं. शेपटी काही कामाची नसते, हे खरं पण ती नसली तर तुम्हाला कोणी कोल्हाही म्हणणार नाही. जंगलातल्या कुठल्या प्राण्याला शेपटी नसते? तेव्हा हा शेपूट तुटका कोल्हा कोण मोठा शहाणा लागून गेलाय, शेपूट कापा म्हणणारा? तुम्हाला इतिहासातल्या शायिस्तेखानाची गोष्ट माहीतच असेल. पुण्याच्या लाल महालात लपलेल्या शायिस्तेखानावर शिवाजी महाराजांनी रात्रीच्या अंधारात हल्ला केला तेव्हा, त्याला पळता भुई थोडी झाली. खिडकीतून उडी टाकताना शिवाजी महाराजांनी तलवारीनं त्याच्या एका हाताची बोटंच कापून टाकली. तसाच काहीतरी प्रसंग आपल्या या कोल्हेभाऊवर गुदरलेला दिसतो. पण तो सांगायची त्याला लाज वाटते, म्हणून तो अशा थापा मारतोय. तुम्ही त्याला अजिबात भुलू नका. अहो, शहरात माणसांसाठी ब्युटी पार्लर असतात आणि प्राण्यांसाठी प्राणीसंग्रहालय असतं. तिथं आपल्याला डांबून ठेवतात. आणि माणसांच्या पिलांपुढे वाकडय़ातिकडय़ा उडय़ा मारून दाखवाव्या लागतात. जंगल हेच आपलं घर आहे आणि शेपटी आपला प्राण आहे.’’
 शेपूट तुटक्या कोल्ह्याची या भाषणानं ज्यामच पंचाइत झाली. सगळे त्याला कोल्हा शेपूट तुटका, मारतोय मटका, मारतोय मटका!असं म्हणून चिडवू लागले. त्यामुळे शेपूट तुटक्या कोल्ह्यानं तिथून पळ काढला.