जागृती ही मोठी गोड गोड मुलगी होती. ती सर्वाची लाडकी होती. जागृतीला खूप वेगवेगळ्या गोष्टी आवडायच्या. म्हणजे, ती खूप गोष्टींची पुस्तकं वाचायची. आई-बाबांबरोबर बागेत, प्राणीसंग्रहालयात जायची. तिथले प्राणी-पक्षी तिला खूप म्हणजे खूपच आवडायचे. बागेत फुलांच्या झाडांवर फुलपाखरं भिरभिरत असायची. जागृती त्यांच्या मागे धावायची. मग आई-बाबा तिला ओरडायचे, ‘अगं जागृती, फुलपाखरांना पकडायचं नसतं. ती फार नाजूक असतात.’ मग जागृती म्हणायची, ‘ही गोग्गोड फुलपाखरं एवढी नाजूक का असतात?’ बाबा म्हणायचा, ‘अगं, त्यांचं आयुष्य फार छोटं म्हणजे काही आठवडय़ांचंच असतं ना म्हणून..’ त्यावर जागृतीचा प्रश्न असायचा, ‘तेवढंच का म्हणून?’
जागृतीच्या अशा प्रश्नांनी आई-बाबा कधी कधी हैराण होत. पण तिच्या चौकसपणाचं आणि हुशारीचं त्यांना कौतुकही वाटायचं. जागृतीला काय काय सुचत असायचं. फुलपाखरांना पाहून तिला वाटायचं, आपण असं फुलपाखरू झालं तर काय मज्जा येईल?, आकाशात उडणारे पक्षी पाहून तिला वाटायचं यांच्यासारख्या आपल्यालाही आकाशात भराऱ्या मारता आल्या तर कित्ती गमाडीजम्मत ना!
एके दिवशी जागृती गोष्टीचं पुस्तक वाचत होती. त्यात एक परी सारखीच आपली वेगवेगळी रूपं घेऊन इकडेतिकडे फिरत होती. आकाशात उंचउंच जात होती, विमानासारखी इकडून तिकडे आणि तिकडून इकडे फिरत होती. परीची गोष्ट जागृतीला खूपच आवडली. ज्याम म्हणजे ज्याम. तिलाही वाटायला लागलं की, आपणही गोष्टीतली परी झालो तर! पण परी व्हायचं कसं? तिनं डोकं खाजवलं. पण काही सुचेना. बरं, आई-बाबांना ही गम्माडीजम्मत सांगावी तर ते या गोष्टीला अज्जिबात होकार देणार नाहीत. उलट रागे भरतील. मग जागृतीनं ठरवलं की, त्यांच्यापासून हे लपवूनच ठेवायचं. जागृती दिवसभर विचार करत होती. घरी, शाळेत, खेळताना, जेवताना परी व्हायचं कसं, हाच विचार तिच्या मनात चालू होता. सकाळपासूनच तिची तंद्री लागली होती, परी होण्याच्या कल्पनेनं.
‘जागृती तुझं लक्ष कुठंय सकाळपासून? नाष्टा नीट केला नाहीस, नीट आंघोळ केली नाहीस..काय झालंय बेटा तुला?’ आईच्या या प्रेमळ बोलानं तिला वाटलं.. सांगून टाकावं आईला. पण नंतर वाटलं नको नको..एकदम परी झाल्यावरच आईसमोर येऊन उभं राहू. मग तिला खूप खूप खूप आनंद होईल. माझी लाडकी परी म्हणून ती आपल्याला जवळ घ्यायला येईल..पण आपण उडून जाऊ..आकाशातून तिची गंमत बघू.
जागृतीला या कल्पनेनंच हसू येत होतं. या आनंदातच ती रात्री घाईघाईनं जेवून झोपी गेली. ती गाढ झोपल्यावर तिच्या खोलीत एक देवदूत आला. त्यानं अगदी अलगद जागृतीला उचलून एका दिव्यात ठेवलं. मग देवदूतानं त्या दिव्याचं झाकण लावून काही मंत्र म्हटले. त्याबरोबर जागृतीची लांब केसांची एक सुंदर परी झाली. ती दिव्यातून बाहेर पडली. पण तिला दिसायच्या आधीच देवदूत गायब झाला. जागृतीला आता हाताच्या मागे दोन सुंदर पंख आले होते. ते पाहून जागृती हरखून गेली. तिला काय करावं अन् काय नाही असं झालं. ती उडत उडत घराबाहेर आली. नुकतंच फटफटलं होतं. जागृती अल्लद चालायला, नाही नाही उडायला लागली. आनंदानं तिनं एक गिरकी घेतली.
त्याबरोबर जागृती खूप उंच उंच गेली. तिला शहराबाहेरची सुंदर सुंदर फुलांची बाग दिसू लागली. आई-बाबा किती दिवसांपासून तिला या बागेत आज जाऊ, उद्या जाऊ असं सांगत होते. सकाळच्या कोवळ्या उन्हात बागेतली कोवळी कोवळी फुलं आकाशातून बघताना जागृतीला मोठ्ठी मज्जा येत होती. ती हळूच बागेत उतरली. एका फुलाच्या दांडीला तिनं लोंबकाळून पाहिलं. पण तरीही ते फुलाचं झाड ताठच होतं. म्हणजे आपण खूप हलके हलके झालो की काय? जागृतीला स्वत:चं हसू आलं. मग ती या फुलाच्या झाडावरून त्या झाडावर लोंबकळत राहिली.
मग परत एक मोठी गिरकी घेऊन बागेतल्या एका लाल लाल फळाच्या झाडाच्या फांदीवर जाऊन बसली. तिथून वाऱ्याच्या तालावर नाचणारी फुलं बघताना तिलाही नाचावंसं वाटत होतं. पण आता तर ती परी झाली होती. जमिनीवर चालायला गेलं की, ती उडतच होती. गिरकी घेतली की उंच उंच जात होती. आणि मज्जा म्हणजे तिने गिरकी घेतली की तिच्या छान छान फ्रॉकचा रंग बदलत होता. ‘अरेच्च्या, तरीच चित्रातल्या पऱ्या नेहमी इतक्या छान छान कपडय़ांत दिसतात’ ती स्वत: शीच खूष होऊन म्हणाली. जागृती बागेतल्या फुलांवर खेळत राहिली. खेळून खेळून खूप वेळ झाला तरी तिला काही भूक लागली नव्हती. आताच जेवल्यासारखं वाटत होतं. अरेच्चा, म्हणजे पऱ्यांना भूक लागत नाही? जागृतीला परत स्वत: चंच हसू आलं.
थोडय़ा वेळानं संध्याकाळ झाली. पांढरी शुभ्र चंद्रकोर आकाशात चालू लागली. तिच्या अवतीभवती कितीतरी चांदण्या एखाद्या झाडाला लगडाव्यात तशा लगडलेल्या होत्या. जागृतीनं परत स्वत: शीच मोठी गिरकी घेतली. आता ती आकाशात उंच उंच जाऊ लागली. कापसासारखं आपण हलके हलके झालो आहोत याचा तिला कोण आनंद झाला होता! आता ती चंद्राच्या दिशेनं जाऊ लागली. तसतशी तिला चंद्राचा आकार मोठा मोठा होताना दिसू लागला. चांदण्याही मोठय़ा दिसू लागल्या. आणि जमीनवरचं छोटं छोटं दिसू लागलं.
जागृती चंद्रावर पोचली. पांढरी शुभ्र चंद्रकोर तिचे डोळे दिपवत नव्हती, की काही नव्हती. ती हळूच चंद्राच्या जवळ गेली. तिनं त्या चंद्रकोरीवरून हळूवार हात फिरवला. अतिशय मुलायम आणि मऊ स्पर्श होता तिचा. अगदी आज्जीच्या गालासारखा. मऊमऊ दुलईच जणू. जागृती मग त्या दुलईवर बसली. तिथून आपलं घर कुठं दिसतंय का ते पाहू लागली. पण खाली एवढी घरं, झाडं, इमारती, जंगलं, डोंगर-दऱ्या दिसत होत्या की आपलं घर नेमकं कुठलं हेच तिला आठवेना.
पण आता तिला आई-बाबांची आठवण येऊ लागली होती. कितीतरी वेळेपासून ती घराबाहेर होती. शिवाय आज्जीला तिला ही गंमत दाखवायची होती. तिनं नेहमीसारखी आरोळी ठोकळी, ‘आई-बाबा-आज्जी मी परी झाले, परी!’ तिचा आवाज ऐकून शेजारच्या खोलीतून आई-बाबा धावत आले. काय झालं जागृती, तुला स्वप्न पडलं का? असं विचारू लागले. पण जागृतीचं त्यांच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. ती सारखं सारखं आपल्या शरीराकडे पाहत होती, तिला तिचे नवे नवे सुंदर पंख आई-बाबांना दाखवायचे होते. पण ते तर काही दिसत नव्हते. ती पंख चाचपून पाहत आईला म्हणाली, ‘अगं आई, कुठं गेले गं माझे पंख? मी परी झाले होते माहीतेय?’ आई तिला जवळ घेत म्हणाली, ‘हो गं बाई, माझी सोनुली परी.’
No comments:
Post a Comment