Sunday, 27 November 2011

मोगलीची जंगली गोष्ट

‘जंगल जंगल बात चली आहे, पता चला है, चड्डी पहन के फूल खिला है’ हे गाणं तुम्हाला आठवतं? आठवत नसणार. हे ‘जंगल बुक’ या मालिकेतलं गाणं आहे. विसेक वर्षापूर्वी ही मालिका टीव्हीवर येत असे. आणि या मालिकेचा हिरो होता, मोगली हा छोटा मुलगा.
 
ही मालिका रुडयार्ड किपलिंग या ब्रिटिश लेखकाच्या ‘द जंगल बुक’ या पुस्तकावर आधारित होती. किपलिंगचा जन्म मुंबईत झाला, तीन डिसेंबर 1865 रोजी. त्याचे वडील तेव्हा   जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे डीन होते. पण रुडयार्ड पाच वर्षाचा असताना त्याचे आई-वडील पुन्हा इग्लंडला परत गेले. पुढे 1894 साली म्हणजे वयाच्या 29व्या वर्षी रुडयार्डनं ‘द जंगल बुक’ हे पुस्तक लिहिलं. हे पुस्तक मुलांच्या पुस्तकांमधलं एक सर्वश्रेष्ठ पुस्तक मानलं जातं. जगभरातल्या अनेक भाषांमध्ये आजवर या पुस्तकांचा अनुवाद झाला आहे.  आता हे पुस्तक मराठीमध्येही आलंय.
 
आपल्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. कारण माणूस आणि जंगलातल्या प्राण्यांची ही गोष्ट घडते ती भारतात. म्हणजे मध्यप्रदेशातल्या सातपुडा पर्वतराजीच्या वैनगंगा नदीच्या परिसरात.
 
वैनगंगा नदीच्या किना-यावरच्या एका गावातून लाकूडतोडीसाठी एक लाकूडतोडय़ा जंगलात येतो. तेव्हा त्यांच्यावर शेरखान हा दुष्ट वाघ हल्ला करतो. त्यात त्याचं छोटंसं मूल हरवतं. ते मूल चालत चालत जंगलातल्या लांडग्याच्या कळपाकडे जातं. त्याला पाहून रक्षा या लेकुरवाळ्या लांडगीणीला पाझर फुटतो. आणि ते दुष्ट शेरखानच्या तावडीतून सुटलं याचा आनंदही होतो. रक्षानं माणसाचं इतकं सुंदर आणि गोजीरवाणं मूल कधीच पाहिलेलं नसतं. त्यामुळे ती त्याला आपल्या मुलांसोबत वाढवायचं ठरवते. या मुलाचं नाव ती मोगली ठेवते.
 
मोगली लहान असला तरी तो या प्राण्यांना पाहून अजिबात घाबरत नाही. उलट त्यांच्या शेपटय़ा ओढत त्यांच्याबरोबर आनंदानं खेळत राहतो. रक्षा लांडगीणीच्या छोटय़ा पिल्लांबरोबर मस्त राहतो. लांडगा आणि लांडगीण मोगलीचे आई-बाबा होतात.
 पण असं जंगलात कधीच घडलेलं नसतं. माणूस आणि जंगलातले प्राणी हे एकमेकांपासून लांब राहत आलेले असतात. पण आता तर एका माणसांचं पोर चक्क जंगलातल्या प्राण्यांमध्ये राहायला लागतं. आपण या पोराला आपल्या लेकरांबरोबरच वाढवायचं, मग काही झालं तरी हरकत नाही, असा लांडगा आणि लांडगीण निर्धार करतात. त्यांच्या मदतीला त्यांचे जंगलातले इतरही प्राणी येतात. लांडग्यांच्या कळपाचा प्रमुख अकेला मोगलीला आपल्या कळपात राहू देतो. मग मोगलीला जंगलातल्या कायद्याचं आणि इतर प्राण्यांशी बोलायच्या सांकेतिक भाषेचं शिक्षण देण्याचं काम जंगलातल्या प्राण्यांचा शिक्षक बालू हे अस्वल घेतं, शेरखान या वाघानं शिकारीसाठी मोगलीवर हल्ला केलेला असतो. त्यामुळे तो मोगलीला त्याच्या ताब्यात द्यायला सांगतो. पण रक्षा लांडगीण त्याला देत नाही. मग बघिरा नावाचा बिबटय़ा एका बैलाची शिकार करून त्या बदल्यात मोगलीला जीवदान देतो. शेवटी मोगलीचा शेरखान वगळता जंगलातले सगळे प्राणी स्वीकार करतात.
आळशी अजगर का, आकाशात भिरभिरणारी, निरोप पोहचवण्याचं काम करणारी रान ही घार, फाओ लांडगा, भुरं पिलू, वटवाघूळ मंगा, हत्तीदादा, हरणं, काळवीटं, वानरसेना, असे मोगलीचे मित्र होतात.
 
जंगलातल्या या मित्रांसोबत राहात मोगली बालू अस्वलाकडून जंगलातल्या कायद्याचं, बघिरा बिबटय़ाकडून शिकारीचं तर का अजगराकडून डावपेचांचं शिक्षण घेतो. त्यांसोबत मोठा होतो. पण पुढे शेरखान या वाघाच्या कटकारस्थानामुळे त्याला पुन्हा त्याच्या गावी परतावं लागतं. मोगली आपल्या आई-वडिलांकडे जातो खरा पण इतकी वर्षे जंगलातल्या प्राण्यांबरोबर घालवल्यामुळे त्याला माणसांची भाषा नीट बोलता येत नाही, त्यांचं वागणं-जगणंही त्याला पटत नाही. पण तो आपल्या आई-वडिलांना गावकऱ्यांच्या दुष्टपणापासून आपल्या प्राणीमित्रांच्या सहकार्याने वाचवतो. शेरखानलाही मारतो. त्याच्या या पराक्रमावर जंगलातले सर्व प्राणी खूश होतात. रक्षा, त्याचे भाऊ, बालू अस्वल आणि बघिरा बिबटय़ाला सर्वात जास्त आनंद होतो. ते मोगलीला जंगलाचा राजा करतात.
 
मोगलीची ही गोष्ट अतिशय थरारक आहे, गंमतीशीर आहे आणि वाचत राहावी अशीही आहे. जंगलातले प्राणी आणि आपलं म्हणजे माणसांचं एकमेकांशी कसं नातं असावं, याचंही उत्तम उदाहरण या पुस्तकात रुडयार्ड किपलिंग यांनी सांगितलं आहे. या पुस्तकातले प्राणी माणसांसारखं बोलतात, माणसासारखं वागतात. त्यांनाही आनंद, प्रेम, माणुसकी, कायदा, नियम या गोष्टी माणसांपेक्षाही चांगल्या पद्धतीनं समजतात. आणि त्या त्या पाळतातही. त्यामुळे हे फक्त मनोरंजन करणारं पुस्तक नाही तर ते माणूस आणि प्राणी यांच्या संबंधावरही चांगलं भाष्य करतं.
 
माणसांमध्ये एकमेकांचा द्वेष करण्याची वृत्ती असते, त्यांच्याकडे संताप, राग-लोभ असतात. ते स्वार्थी असतात आणि क्रूरही असतात. या उलट प्राणी असतात. म्हणून माणसांच्या जगात गेलेला मोगली पुन्हा जंगलात येतो. त्याला प्राण्यांचं जगच आवडतं माणसांच्या जगापेक्षा. मोगलीसारखं आपल्याला जंगलात जाऊन राहणं शक्य नाही. आता पहिल्यासारखी जंगलंही राहिली नाहीत, प्राणीही राहिले नाहीत. माणसानं आपल्या फायद्यासाठी जंगलांची नासधूस चालवली आहे. त्यामुळे जंगलातल्या प्राण्यांची घरं नाहिशी होताहेत. तुम्ही पेपरमध्ये बातम्या वाचत असाल की, हत्ती, वाघ, बिबटय़ा हे प्राणी कधीतरी गावात, शहरात येतात. ते स्वखुशीनं येत नाहीत, तर त्यांची घरं नाहीशी झाल्यामुळे येतात. त्यांना त्यांच्या जंगलातल्या घरी आनंदानं राहता आलं तर ते कशाला शहरात येतील? त्यांना पैशांचा मोह नसतो, त्यांना गाडय़ा-घोडय़ांचं वेड नसतं. आणि ट्रॅफिकला तर ते ज्याम वैतागून जातात. जंगलातले हे प्राणी स्वत:हून कधीच माणसाच्या वाटय़ाला जात नाहीत. त्यामुळे माणसानं त्यांना विनाकारण घाबरण्याची गरजही नसते. उलट माणसं त्यांच्याशी चांगलं वागली तर तेही माणसांशी चांगले वागतात. याचं उदाहरण म्हणजे हे पुस्तक. मोगलीसारख्या एका छोटुल्याचा हे प्राणी ज्या प्रेमानं सांभाळ करतात, त्याला वाढवतात, शिकवतात आणि जंगलाचा राजाही करतात. हे एवढं सगळं कसं घडून येतं? कारण प्राण्यांकडे मनाचा मोठेपणा असतो. ते माणसानं शिकण्याची गरज आहे.
 या पुस्तकातला मोगली तुम्हाला आवडेलच पण त्याचे प्राणीमित्रही आवडतील. हे पुस्तक तुम्ही वाचाच. मग तुमची खात्री पटेल की, माणसं आणि प्राणी यांच्यामध्ये दोस्ती होणं किती छान आहे!!   

No comments:

Post a Comment