महावीर जोंधळे यांनी तुम्हा मुलांसाठी पुष्कळ लेखन केलं आहे. विशेष म्हणजे किशोर कादंब-याही लिहिल्या आहेत. मात्र प्रस्तुत पुस्तकात त्यांचं स्वतंत्र लेखन नाही. तर या पुस्तकात त्यांनी जपान, श्रीलंका, चीन, फिलिपाइन्सच्या या देशातील लोकप्रिय लोककथांचे स्वैर रूपांतर केलं आहे. यात एकंदर सहा लोककथा आहे, पण त्यापैकी कुठल्या कथा, कुठल्या भाषेतल्या आहेत, याचा त्यांनी उल्लेख केलेला नाही. तो केला असता तर बरं झालं असतं.
या पुस्तकातली पहिली कथा ‘सातूचं पीठ’ तर मजेशीर आहे. चीनमधली एक म्हातारी खाणावळ चालवत असे. तिची ही खाणावळ फार प्रसिद्ध होती. त्यामुळे प्रवासी हमखास तिच्या खाणावळीत येत. तिचा पाहुणचार घेत. शिवाय म्हातारी खेचरंही विकत असे. असाच एकदा या म्हातारीच्या खाणावळीत एक हुशार व्यापारी येतो. सतत त्याच्या हाताशी तलवार असे. हा व्यापारी खाणावळीत जेवतो पण नंतर म्हातारीने दिलेला सातूचा वाडगा मात्र खात नाही. मध्यरात्री तो कसल्याशा आवाजाने जागा होतो. पाहतो तर काय खालच्या खोलीत म्हातारी जादूच्या नांगर-बैलाने गव्हाचे पीक घेत असते. त्या गव्हाचे नंतर दळून पीठ तयार करते. व्यापारी हे सारं गुपचूप पाहतो आणि नंतर आपल्या खोलीत येऊन झोपतो. सकाळी उठून पाहतो तर काय? त्याच्याबरोबरचे इतर प्रवासी गायब असतात आणि त्यांच्या जागी खेचरं खोलीत फिरत असतात. व्यापा-याच्या लक्षात सारा प्रकार येतो. तो त्या म्हातारीकडून निघताना प्रवासात खायला म्हणून सातूचं पीठ बांधून घेतो. हा व्यापारी शूर आणि हुशारही असतो. तो म्हातारीला धडा शिकवायचा असं ठरवतो. काही दिवसांनी परत म्हातारीच्या खाणावळीत जाऊन तिला आपण परदेशातून आणलेलं सातूचं पीठ खायला देतो. ते खरं म्हणजे म्हातारीच्याच सातूचं पीठ असतं. त्यामुळे ते खाताच त्या म्हातारीचंही खेचरामध्ये रूपांतर होतं.
‘राजा बुस्किद’ ही दुसरी गोष्ट काही जादूची नाही. तर ती कष्टाचं महत्त्व सांगणारी आहे. बुस्किद हा एका तंबाखू पिकवणाऱ्या प्रदेशाचा राजा असतो. जनतेचं त्याच्यावर फार प्रेम असतं. तो जनतेला अधिकाधिक तंबाखूचं पीक कसं घ्यावं ते सांगे. जनता त्यानुसार पीक घेई. असं खूप वर्षे चालतं. एकदा राजा लांबच्या प्रवासाला जातो. इकडे प्रजा त्याची वाट पाहत पाहत तंबाखू पिकवत राहते. कालांतराने त्यांच्याकडे खूप पैसा येतो, मग ते उधळमाधळ करायला लागतात. ते शेतीकडे लक्ष देत नाहीत. अनेक वर्षे जमीन पडीक राहिल्याने ती नापिक होते. राजा गावी येतो, तेव्हा सारी जनता व्यसनांमध्ये बुडालेली पाहून त्याला फार वाईट वाटतं. राजा रागारागाने एका शिखरावर तंबाखूने भगदाड पाडून त्यात शिरून गुप्त होतो. तेव्हापासून सारे लोक पुन्हा कष्ट करायला लागतात.
तिस-या गोष्टीचं नाव ‘पंख तुटलेला पक्षी’ असं आहे, पण खरं तर ते ‘सोन्याची नाणी देणारे कोहळे’ असं पाहिजे होतं. कारण या गोष्टीतला इलचुंग एका जखमी पक्ष्याला मदत करतो. दुस-या दिवशी तो पक्षी इलचुंगला एक कोहळ्याची बी देतो. इलचुंग ती घराशेजारी लावतो. रात्रीतून त्याला भरपूर कोहळे उगवतात. कोहळा कापला की, त्यातून बदाबदा सोन्याची नाणी बाहेर पडतात. बाकी गोष्ट मात्र तुम्ही थेट पुस्तकातच वाचा.
चौथी गोष्ट एका पक्ष्याची आणि एका शेतकरी मुलाची आहे. हा सारस पक्षी तरुणीचं रूप घेऊन या मुलाच्या घरात येतो आणि त्याला सूतापासून सुंदर कापड विणून देतो. ते कापड बाजारात नेऊन विकल्यावर त्याची मोठी किंमत येते. पण एके दिवशी ही तरुणी नसून हा तर तोच सारस पक्षी आहे, ज्याला आपण शिका-यापासून वाचवलं होतं, हे त्या मुलाच्या लक्षात येतं. तेव्हा तो सारस उडून जातो. त्याने आपल्या उपकाराची परतफेड केलेली असते.
‘लंगड्या उंटाची गोष्ट’ आणि ‘राजा चंदापाजोता’ या शेवटच्या दोन्ही गोष्टीही चांगल्या आहेत.
थोडक्यात या पुस्तकातल्या गोष्टींमधून जादू, गमतीजमती, हुशारी, दयाळूपणा, काम करण्याची तयारी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. - सातूचं पीठ : महावीर जोंधळे
- लोकवाङ्मय गृह, मुंबई
- पाने : 32, किंमत : 40 रुपये
No comments:
Post a Comment