गोष्टी ऐकायला कुणाला आवडत नाहीत? आजी-आजोबांकडून ऐकलेल्या, आई-बाबांकडून ऐकलेल्या, वर्गातल्या बाईंकडून ऐकलेल्या, पुस्तकात वाचलेल्या, टीव्हीवर पाहिलेल्या कितीतरी गोष्टी सगळ्या लहान मुलांना माहीत असतात. प्रत्येक भाषेमध्ये अशा कितीतरी गोष्टी मुलांना त्यांच्या त्यांच्या आई-बाबांनी, आजी-आजोबांनी सांगितलेल्या असतात. त्या खरंतर इतक्या जुन्या असतात की त्या कुणी लिहिल्या? की नुसत्याच एकमेकांना सांगितल्या याचा काहीच पत्ता नसतो. जगभरात गाजलेल्या अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्यांची भाषांतरं जगातल्या सगळ्या भाषांमध्ये झालेली आहेत. अगदी आपल्या मराठी भाषेतसुद्धा. पण या गोष्टी इतक्या छान आहेत की त्या पुन्हा पुन्हा सांगाव्याशा वाटतात. ऐकाव्याशा वाटतात. ‘जगप्रसिद्ध परिकथा’ नावाच्या पुस्तकामध्येही अशाच जगभर गाजलेल्या परिकथा नव्याने सांगितल्या आहेत.
यातली पहिलीच गोष्ट हॅन्स अँडरसनची कुरुप पिलाची गोष्ट आहे. बदकांच्या पिलांमध्ये वाढणा-या राजहंसाची ही गोष्ट. आपण इतर पिलांसारखं दिसत नाही म्हणून स्वत:शीच दु:खी होणा-या या पिलाला आपण खरं कोण आहोत ते कळल्यावर किती आनंद झाला असेल ते यात वाचायला हवं.
झोपलेल्या राजकन्येची गोष्टही तुमच्या आवडीची. दुष्ट प-यांच्या शापाने शंभर वर्ष झोपून गेलेली राजकन्या अरौर हिची ही छानशी गोष्टही या पुस्तकात आहे. या सगळ्या राजकन्यांच्या जगामध्ये चांगल्या आणि वाईट प-या, चेटकिणी नेहमीच काही ना काही घडवून आणत असतात. त्यांची ओळख सिंड्रेला आणि हिमगौरी, स्नो व्हाईट या दोन्ही गोष्टीत होते.
‘लाल टोपडेवाली मुलगी’ हे ‘द रेड रायडिंग हूड’ या अतिशय गाजलेल्या परिकथेचं भाषांतर आहे. छोटय़ा मुलीला मटकावून टाकणा-या दुष्ट लांडग्याची शिकारी कशी फटफजिती करतो आणि मुलीची सुटका कशी करतो याची ही गोष्ट भीतीही वाटायला लावते आणि मजाही आणते.
लांब केसांची राजकन्या आणि तिला उंच वाडय़ामध्ये डांबून ठेवणारी दुष्ट चेटकिण यांच्या गोष्टीवरचं तर एक छान मराठी नाटक खूप वर्षापूर्वी खूप गाजलं होतं. आता तुम्हाला ते पाहायला मिळणार नाही. पण या पुस्तकातली ‘रेपंझल’ नावाची या राजकुमारीची गोष्ट तुम्हाला नक्की आवडेल.
याशिवाय ‘अॅलिस इन वंडरलँड’(अॅलिसची अद्भूत कथा’), ‘द पिएड पायपर’(अनोखा बासरीवाला), थंबलीना(इटुकली) या गोष्टींचे अनुवादही या पुस्तकात आहेत. या सगळ्या गोष्टी कार्टून फिल्म्समधून तुम्ही पाहिल्या असतील. रेपंझल वरची गोष्ट तर डिस्नेच्या ‘टँगल्ड’ नावाच्या चित्रपटात नुकतीच दाखवली होती. पण तुम्हाला माहीत आहे नुसतेच चित्रपट पाहण्यापेक्षाही खूप खूप मजा गोष्टी वाचण्यात असते. कारण कार्टून फिल्ममधली चित्रं कार्टूनिस्ट मंडळींनी बनवलेली असतात. पण गोष्टी वाचून तुम्ही तिचं जे चित्रं डोळ्यांसमोर उभं करता ते तुमच्या कल्पनाशक्तीमधून तयार झालेलं असतं. म्हणून खूप खूप गोष्टी वाचल्या की खूप खूप कल्पना सुचायला लागतात. ‘जगप्रसिद्ध परिकथा’ सारख्या पुस्तकातून तुम्हाला या छान छान गोष्टींची ओळख होईलच पण आणखी गोष्टी जमवण्याचा छंदही लागेल. जगप्रसिद्ध परीकथा : अनुवाद- लीला शिंदे
साकेत प्रकाशन, औरंगाबाद
पाने - 56, किंमत - 40 रुपये
No comments:
Post a Comment