एक असते मुंगी. तिचं नाव दांडगी. नावाप्रमाणेच ती चांगलीच खोडकर म्हणजे दांडगट होती. तिनं काही खोडी केली की, तिची आई तिला नेहमी हत्तीची भीती घालायची. ‘थांब, तुझं नाव आता हत्तीदादालाच सांगते. तो माझा भाचा आहे. तो आपल्या घरी आला की, तुला त्याच्या सोंडेनं उचलून उंच झाडावर टांगून ठेवीन. मग बस बोंबलत.’ असं आई दांडगीला म्हणायची. पण हा हत्तीदादा काही तिला दिसायचा नाही.
सुरुवाती-सुरुवातीला दांडगी पण हत्तीदादाचं नाव घेतलं की, ज्याम
घाबरायची. आईच्या पदराआड लपून बसायची. आणि मग हळूच वाकून हत्तीदादा आलाय
का ते पाहायची. पण तो काही दिसायचा नाही. मग जरा वेळ ती परत आईच्या पदराआड
लपून राहायची. मग परत वाकून पाहायची. पण मेला, हत्तीदादा काही यायचाच नाही. मग दाडंगी आईला म्हणायची,
‘कुठंय ग तुझा तो हत्तीदादा? अजून आला नाही?’
आई तिला जवळ घेत म्हणायची, ‘तू शांत बसलीस ना म्हणून तो आला नाही. यायला निघाला होता, पण तू शांत बसल्यामुळे परत घरी गेला.’
दांडगी म्हणे, ‘चल, काहीतरीच सांगतेस.’
आई म्हणे, ‘तुला एके दिवशी कळेल तो आल्यावर. त्याला मी सांगून ठेवलंय तुझं नाव.’
मग दांडगी ‘मोठ्या मुंग्यांसारखं वागायचं आपण उद्यापासून’ असं
ठरवायची. पण जरा वेळानं ती ते विसरून जायची. मग परत तिचा दांडगटपणा सुरू
व्हायचा. अन्न शोघत फिरणा-या मुंग्यांच्या रांगेत दगड टाकून त्यांचा रस्ता
अडवून टाक, वाट चुकलेल्या एखाद्या मुंगीला चुकीचा रस्ता सांग, एखाद्यी मुंगीनं अन्नाचा कण ढकलत ढकलत घराकडे नेत असेल तर दांडगी तो अन्नाचा कण दुस-या बाजूनं ओढून त्या मुंगीला बेजार करायची.
या खोड्यांमुळे सगळे मुंगे आणि मुंग्या दांडगीच्या आईकडे तिची तक्रार करायच्या. आई तिला रागं भरायची. पण दांडगी ‘मी काही केलं नाही, हे खोटं खोटं सांगत आहेत’ असं म्हणून रडण्याचं नाटक करायची. त्यामुळे आईलाही तिचंच खरं वाटायचं. परिणामी दांडगीच्या खोड्या वाढतच चालल्या होत्या.
एके दिवशी खरोखरच हत्तीदादा दांडगीच्या घरी आला. दांडगीची आई त्याची आत्या होती, म्हणून तो तिची ख्यालीखुशाली विचारायला आला होता. दांडगीला वाटलं, आई आपल्याला रोज भीती घालते, तोच हा हत्तीदादा असावा. म्हणून त्याला पाहताच ती कोप-यात दडून बसली.
दांडगीची
आई आणि हत्तीदादा बराच वेळ बोलत होते. हळूहळू विषय दांडगीच्या खोडकरपणाकडे
वळला. तिची आई हत्तीदादाला दाडंगी कसं जेरीस आणते ते रंगवून रंगवून सांगू
लागली. मग हळूच म्हणाली की, तुझं नाव घेऊन मी तिला रोज भीती घालते. पण तू काही येत नाही, म्हणून ती आता तुझ्या नुसत्या नावाला घाबरेनाशी झालीय. ती घरी आली की, तू तिला जरा भीती घाल. म्हणजे तिच्या खोड्या दोन-चार दिवसांपुरत्या तरी कमी होतील.
हत्तीदादा म्हणाला, ‘अग ताई, मी अगडबंब दिसत असलो तरी मला लहान मुलं खूप आवडतात. मला काही लहान मुलांना भीती घालता येत नाही.’
दांडगीची आई म्हणाली, ‘अरे, आपलं नुसतं तिला घाबरायचं थोडंसं नाटक कर.’
कोप-यात बसून दांडगी सगळं ऐकत होती. मग ती हळूच लपत लपत बाहेर गेली. आणि तिनं बाहेरून ‘आई, मी आले’ म्हणत
उड्या मारत एकदम हत्तीदादाच्या पायावरच पाय दिला. त्यामुळे हत्तीदादा
जोरात किंचाळला. दांडगीनं घाबरून आपला पाय काढून घेतला. हत्तीदादा म्हणाला, ‘काय दांडगट आणि वजनदार पोर आहे ग तुझी? माझा पाय पार चेंगरून गेला.’
तरी त्यानं आधी ठरल्यानुसार दांडगीला घाबरायचं नाटक करायला सुरुवात केली. पण आता दांडगीला कळलं होतं की, हा हत्तीदादा दिसतो अगडबंब, पण याच्या आतमध्ये नुसता भुस्सा भरलाय.’
हत्तीदादा तिला म्हणाला, ‘थांब, तुला आता उचलून या उंच झाडावरच टांगतो.’
तेवढ्यात दांडगी त्याच्या पायात लपली. हत्तीदादाला ती दिसेना. मग तो मान वळवून इकडेतिकडे शोधू लागला. तेवढय़ात दांडगीनं ‘जोर लगाके हय्या’ म्हणत
हत्तीदादाचे दोन्ही पाय उचलले. हत्तीदादाला कळेपर्यंत दाडंगीनं
हत्तीदादाला पार डोक्याच्या वर उचलला होता. हे पाहून हत्तीदादा पार घाबरून
गेला. आणि ‘मला खाली ठेव, अगं मी पडलो तर मरेन’ असं
म्हणत गयावया करू लागला. दाडंगीची आई तर तिचा हा पराक्रम पाहून अचंबित
झाली. तिची दातखिळीच बसली. आणि हत्तीची पण बसायची वेळ आली होती.