मित्रांनो, दिवाळीची सुट्टी तुम्ही मजेत घालवत असाल. शाळा नाही, अभ्यास नाही. अभ्यास नसल्यामुळे गृहपाठही नसणार. पण तुम्हाला गोष्टी, गाणी, कविता वाचायला नक्कीच आवडणार. हे लक्षात घेऊन मोठय़ांच्या दिवाळी अंकांबरोबर तुमच्यासाठीही काही दिवाळी अंक बाजारात आले आहेत. तसे ते दरवर्षी येतातच म्हणा. यावर्षी ‘गंमतजमत’, ‘किशोर’, ‘बाल मैफल’, ‘साधना बालकुमार दिवाळी अंक’, ‘टॉनिक’, असे बरेच दिवाळी अंक नवनव्या गोष्टी, कथा, गाणी, कविता घेऊन तुमच्यासाठी बाजारात दाखल झाले आहेत.
‘साधना बालकुमार दिवाळी अंका’ची काही दिवसांपूर्वीच इथेच ओळख करून दिली होती. या वेळेस तुम्ही आवर्जून वाचलेच पाहिजेत अशा दिवाळी अंकांमध्ये मानकरकाकांचा ‘टॉनिक’, ‘किशोर’ आणि ‘बालमैफल’ या तीन दिवाळी अंकांची ओळख करून देत आहोत.
‘किशोर’चा मासिकाच्या आकारातला संपूर्ण रंगीत अंक नेहमीच चांगला असतो. तीच परंपरा यावर्षीही त्यांनी जपली आहे. मुखपृष्ठावर भाऊबीजेच्या निमित्ताने दोन बहिणींचं सुंदर छायाचित्र छापलं आहे. या अंकाचे किशोर आणि बाल असे दोन विभाग आहेत. म्हणजे तुमचा विभाग वाचून झाला की तुम्ही तो ‘बालविभाग’ वाचायला छोटय़ा भावाला किंवा बहिणीला द्यायचा, म्हणून ही सोय केली आहे. कविता, कथा, नाटिका, संगीतिका, कोडी, कार्टून मालिका, विनोद आणि भरपूर रंगीत चित्रं असा मजकुराने हा अंक नटला आहे.
स्वेन हेडिन हा स्वीडिश संशोधकाने तिबेट, चीन आणि मध्य आशियात चार वेगवेगळ्या मोहिमा काढल्या. त्या मोहिमांची रोमहर्षक माहिती लक्ष्मण लोंढे यांनी करून दिली आहे. ‘गाढवाचा बाप’ ही गाढवाच्या प्रामाणिकपणाची आणि इमानदारीची गोष्ट आहे. ‘आय म्या सोन्या न्हाई गं!’ या गोष्टीत मन्या हरवतो. तो कसा हरवतो? सापडतो की नाही? त्याला शोधण्यात पोतराज कसा मदत करतो, याची कहाणी आहे. ‘मंकूची गोष्ट’ ही एका माकडाची अतिशय वेगळी गोष्ट आहे.
पीक डोलती शेतात, पीक बोलती शेतात
थेंब कष्टाच्या घामाचे, पीक झेलती शेतात
अशा चांगल्या कविताही आहेत.
‘बालविभागा’ची सुरुवातच
‘भुई.. भुई’ मोतल फिलवून दाखवू का?
कुतल्यासारखं ‘भो.. भो’ भुंकून दाखवू का?
‘थयथय’ मोल होऊन नाचून दाखवू का?
‘कुकुचकू’ कोंबला आलवून दाखवू का?
या बोलगाण्याने होते. मग अनुस्वार हरवल्यावर काय होतं, याची गंमत सागंणारी एक कविता आहे, अशोक पाटील यांची.
आबाचा केला आंबा
भांडय़ाचा केला भाडय़ा
पांडाचा पाडा करणे
चुका नसे या थोडय़ा
दंग्याऐवजी दगा जाला
खंडूचा झाला खडू
चिंता म्हणता रचली चिता
आता हसू की रडू?
करंजी आणि भाकरीची, शाळेत हुशार असलेल्या राजूची अशा गोष्टी आहेत. चिडणाऱ्या शास्त्रीबुवाची फटफजिती सांगणारी कार्टूनमालिका आहे.
- किशोर : संपादक एम. आर. कदम
- किंमत : 45 रुपये
- टॉनिक : संपादक मानकरकाका
- किंमत : 60 रुपये
- बालमैफल : संपादक कुमार कदम
- किंमत : 40 रुपये
No comments:
Post a Comment