Saturday, 3 March 2012

पोर उडाला भुर्रर!

सगळ्याच मावश्या फार प्रेमळ असतात! हो की नाही? तुमची मावशी पण तुमच्यावर खूप खूप प्रेम करत असणार आणि तुमचे लाडही खूप करत असणार! नाही म्हणू नका, आम्हाला माहीत आहे!  आता, एखादी मावशी काकूसारखी किंवा मामीसारखी खडूस असणार म्हणा. त्यामुळे दोन-तीन मावश्या असलेल्या जास्त चांगल्या. म्हणजे त्यातली एखादी तरी आपले लाड करते! पण आपल्याला किती मावश्या असणार हे आपण कसं ठरवणार? पण ते जाऊ द्या, आज तुम्हाला एका वेगळ्या मावशीची ओळख करून देतो.
 
ही मावशी साधीसुधी नाही. म्हणजे ती खडूस वगैरे नाही, तर फार चांगली आणि प्रेमळ आहे. शिवाय ती खूप चटपटीत आहे. सदा आपल्या कामात असते. रोज नवीन नवीन फुलांची नक्षी असलेले घागरे आणि त्यावर छानशी ओढणी असा पाहताच मन प्रसन्न करणारा पोशाख ती करते. त्यामुळे ती गावातल्या सगळ्या पिटुकल्या उंदरांची लाडकी आहे. गावाबाहेरच्या जुन्या आंब्याच्या बुडाशी तिचं दुकान आहे. या दुकानात ती छोटुकल्या पिटुकल्यांसाठी खाऊ आणि खेळणी विकते. त्यामुळे तिच्या दुकानात सतत गर्दी असते. पण मोठय़ा बायकांसाठीही तिच्या दुकानात काही वस्तू असतात. म्हणजे सुया, दो-यांची रिळे, बटणं, झालरी, हुक वगैरे. त्यामुळे शेजारपाजारच्या बायाबापडय़ाही तिच्या दुकानात येतात.
 
..तर या मावशीचं नाव आहे, बेगम गुलाबो. किती गोड नाव आहे की नाही?
 
पावसाळा संपला. आता लवकरच हिवाळा सुरू होणार होता. त्यामुळे बेगम गुलाबो मावशीनं बाजाराला जायची तयारी केली. तिला बाजारातून बऱ्याच वस्तू विकत घ्यायच्या होत्या दुकानासाठी. मावशीनं लाल घाग-यावर फुलाफुलांचा कुडता घातला, वर पिवळीधम्मक ओढणी घेतली, एका हातात मोठी पिशवी घेतली आणि मावशी निघाली बाजाराला..
 
मावशी तिच्या घरापासून चार पावलं चालते न चालते तोच भुरेमियाँची गोडी आली. हा मियाँही मावशीसारखाच चांगला आहे. तो म्हणाला, ‘मावशी, बस माझ्या गाडीत.मावशी बसली. वाटेत आणखी बरेच लोक बसले. भुरेमियाँची गाडी बाजारात पोचली. मावशीनं लगबगीनं गाडीतून उडी मारून खरेदीला सुरुवात केली. बाजारातल्या सगळ्या दुकानदारांबरोबर तिच्या ओळखी होत्या. त्यामुळे त्यांच्याशी गप्पाटप्पा करत मावशीनं झटपट खरेदी केली. मावशीनं स्वत:साठी एक छानशी साडीही घेतली. ती आता गाडीकडे निघणार, तेवढय़ात तिचं लक्ष एका दुकानाकडे गेलं. त्या दुकानात वेगवेगळे फुगे सगळीकडे लटकत होते. मावशी ते फुगे पाहून खुश झाली. मनात म्हणाली, ‘अरे, हे फुगे गावातल्या मुलांना खूप आवडतील. ते विकत घ्यायला त्यांची माझ्या दुकानात झुंबड उडेल.मग मावशीनं एकेका रंगाचे दोन दोन फुगे घेतले.
 भुरेमियाँच्या गाडीत बसून मावशी सगळ्यांबरोबर घरी आली. दुस-या दिवशी सकाळी सकाळी तिनं आपलं दुकान उघडलं. त्यात बाजारातून आणलेल्या वस्तू लावायला सुरुवात केली. तेवढय़ात खुडबुड खुडबुडअसा आवाज येऊ लागला. मावशीला कळेना, हा आवाज कुठून येतोय. आधी तिला वाटलं दुकानातल्या एखाद्या बरणीत गांधीलमाशी अडकून पडली असावी. तिनं सगळ्या बरण्या पाहिल्या, पण तिला काहीच दिसलं नाही. मग तिनं परत दुकान लावायला सुरुवात केली. पण परत खुडबुड खुडबुडअसा आवाज येऊ लागला. तेवढय़ात  मावशीनं फुग्यांकडे आपला मोर्चा वळवला. तिला वाटलं, हे फुगे दुकानाच्या बाहेरच्या बाजूला लावले तर पोरांना ते दिसतील आणि मग ते त्यांच्या आयांकडे फुगे घेण्यासाठी टुमणं लावतील. मावशी फुग्याजवळ गेली तशी एका फुग्यातूनच खुडबुड खुडबुडअसा आवाज येत होता. मावशीनं नीट पाहिलं तर एका फुग्यात एक छोटासा मुलगा होता. तो मावशीला म्हणाला, ‘मला बाहेर काढा ना..मी कधीचा अडकून पडलोय या फुग्यात.मावशीनं एका सुईनं फुग्याला भोक पाडलं, तसा फुगा फुटला आणि तो छोटा मुलगा बाहेर आला. त्या मुलाला इवले इवले पंख होते.
तो इवला पोर म्हणाला, ‘‘मी सूर्याच्या किरणात राहतो. आम्हाला खेळण्यांच्या दुकानात जायचं होतं. म्हणून आम्ही शिडी लावून एका दुकानात उतरलो. मग मी मित्राबरोबर लपाछपी खेळत होतो. मी एका फुग्यात जाऊन लपलो. तर तिथं कुणीतरी आलं आणि त्यानं त्या फुग्यात हवा भरून त्याचं तोंड बंद करून टाकलं. त्यामुळे मी आत अडकून पडलो. पण आता मी घरी कसा जाणार, माझी शिडी तर त्या खेळण्यांच्या दुकानातच राहिली?’’
 मावशी त्याला म्हणाली, ‘‘काळजी करू नकोस. उद्या तुला त्या दुकानात घेऊन जाईन. मग तू शिडीवर चढून आपल्या घरी जा.’’ मग रात्री तो इवल्या इवल्या पंखांवाला मुलगा मावशीच्या घरात झोपला. सकाळी मावशीनं त्याच्यासाठी छान नाश्ता बनवला. मग चिमणेदादाला त्याला खेळण्यांच्या दुकानात घेऊन जायला सांगितलं. जाताना मावशीनं त्याला आपल्या दुकानातला छोटासा ढोल भेट दिला. मग तो इवल्या इवल्या पंखांचा पोर चिमणेदादाच्या पाठीवर बसून भुर्रर उडाला..
पण तो खेळण्याच्या दुकानात पोचला का? शिडीवर चढून सूर्याच्या घरी गेला का? याच्यासाठी तुम्ही बेगम गुलाबो मावशीचं हे पुस्तकच वाचा. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आहे की, मावश्या प्रेमळ असतात. बेगम गुलाबो मावशी तर फार फार प्रेमळ आहे. तुम्ही कधी तिच्या घरी गेलात तर ती तुमचंही असंच स्वागत करेल.
 
पण आधी तिची ओळख करून घ्या. बाजारात लाल घाग-यावर फुलाफुलांचा कुडता घातलेली आणि पिवळीधम्मक ओढणी घेतलेली कुणी बाई दिसली तर ती बेगम गुलाबो मावशीच असणार, हे लक्षात ठेवा!
  • बेगम गुलाबो मावशी आणि तिचे फुगे : क्वादसिया झैदी, मराठी अनुवाद मुकुंद टाकसाळे
  • नॅशनल बुक ट्रस्ट, प्रभादेवी, मुंबई
  • पाने : 24, किंमत : 15 रुपये

No comments:

Post a Comment