Friday 23 March 2012

तोत्तोचानची, नव्हे तुमची गोष्ट!

दोस्तांनो, तुम्ही तोत्तोचानहे पुस्तक वाचलंय की नाही? तोत्तोचान ही तुमच्यासारखीच छोटीशी मुलगी. तिला तिच्या पहिल्या शाळेतून काढून टाकलं जातं. मग तिची आई तिला नव्या शाळेत घालते. या नव्या शाळेत रेल्वेच्या डब्यासारखे वर्ग असतात. या शाळेचे मुख्याध्यापकही वेगळे असतात आणि शिक्षकही. पण ती सगळीच गंमत सांगण्यात मज्जा नाही. ती तुम्ही प्रत्यक्ष वाचायला हवी. कारण हे असं पुस्तक आहे की, वाचणारा प्रत्येक जण त्याच्या प्रेमात पडतो.
 
माहितेय या पुस्तकाच्या आत्तापर्यंत कितीतरी आवृत्त्या निघाल्या आहेत, जगातल्या कितीतरी भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाला आहे! कितीतरी भाषांतल्या मुलांच्या पुस्तकांत तोत्तोचानमधील धडे नेमले आहेत. मराठीमध्येही आत्तापर्यंत या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या झाल्या आहेत. गुजराती, बंगाली, हिंदी, तमिळ, तेलुगू या भाषांमध्येही या पुस्तकाचा अनुवाद झाला आहे.
 
म्हणजे हे पुस्तक अफाट लोकप्रिय झालं. तेत्सुको कुरोयानागी या जपानी मुलीनं हे पुस्तक लिहिलं आहे. ही मुलगी तोमाईया लहान मुलांच्या शाळेत शिकत होती. सोसाकु कोबायाशी हे या शाळेचे मुख्याध्यापक होते. हीच ती शाळा जिचे वर्ग रेल्वेच्या डब्यासारखे होते. 1945 साली ही शाळा आगीत सापडून नष्ट झाली आणि तिचे मुख्याध्यापक सोसाकु कोबायाशी यांचं 1963 साली निधन झालं. म्हणजे आता ती शाळाही नाही आणि त्या शाळेचे शिक्षकही नाहीत. पण जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचायला लागाल, तेव्हा तुम्हाला वाटेल की आपली शाळाही अशीच असली पाहिजे आणि आपले शिक्षक-बाई अशाच पाहिजेत.
 
कारण आपण तोत्तोचानसारखेच असतो. आपण अभ्यास करतो. पण फार अभ्यास करायचा आपल्याला कंटाळा येतो. तसा फार खेळायचा कंटाळा येत नाही. म्हणून आपण अभ्यास कमी करतो आणि खेळतो खूप. हे काही बरोबर नाही, असं आई-बाबा आपल्याला सांगत असतात. पण मोठय़ा माणसासारखं मान मोडून अभ्यास करण्याचं आपलं वय थोडंच असतं. मोठी माणसं आपली सारखी सांगत असतात शहाण्यासारखं वाग, शहाण्यासारखं वाग. पण शहाण्यासारखं वागायला आपण थोडेच मोठे असतो? मोठी माणसंही कधीतरी लहान असतात ना? तेव्हा ती किती शहाण्यासारखी वागतात? पण आपल्यामागे सारखी धोशा लावतात, ‘अमूक कर, तमूक करू नको. आता अभ्यास कर, खेळ बास.सतराशे साठ सूचना आणि तक्रारी. त्यामुळे आपल्याला कधी कधी त्यांचा राग येतो.
 आपण मुलंच थोडी हट्टी असतो असं नाही काही. आई-बाबाही हट्टी असतात. त्यामुळे तोत्तोचानहे मुलांनी आणि त्यांच्या आई-बाबांनीही वाचायचं पुस्तक आहे. खरं तर ते दोघांनी मिळून वाचलं पाहिजे. कारण तोमाई शाळा, तोत्तोचान आणि तिचे शाळेतले मित्र या सर्वाची ही गोष्ट फार म्हणजे फार मजेशीर आहे.
  • तोत्तोचान : तेत्सुको कुरोयानागी
    मराठी अनुवाद चेतना सरदेशमुख गोसावी
  • नॅशनल बुक ट्रस्ट, प्रभादेवी
  • पाने : 150, किंमत : 50 रुपये

No comments:

Post a Comment