Thursday 2 February 2012

पाचबल रोलची दे धम्माल!

आज तुम्हाला एका चिनी पुस्तकाची ओळख करून देणार आहोत. मूळ चिनी पुस्तकाचं नाव आहे, फाइव्ह चायनीज ब्रदर्स. त्याचा हा मराठी अनुवाद आहे.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आज तुम्हाला एका चिनी पुस्तकाची ओळख करून देणार आहोत. मूळ चिनी पुस्तकाचं नाव आहे, फाइव्ह चायनीज ब्रदर्स. त्याचा हा मराठी अनुवाद आहे.
तर ही पाच चिनी भावांची गोष्ट आहे. हे पाचही भाऊ दिसायला सारखे होते. म्हणजे एकमेकांची डुप्लिकेट होते. सिनेमांत तुम्ही अनेकदा हिरोचा डबल रोल पाहता, पण या पुस्तकात तो पाचबल रोलआहे.
 
पाचही भाऊ दिसायला तसे ध्यान होते! म्हणजे सगळ्याच्या डोक्यावर काळी टोपी आणि लांबलचक बारीक वाढवलेली शेंडी. शिवाय ते कपडेही सारखेच घालायचे. त्यामुळे त्यांना पाहणा-यांना कळायचंच नाही की, त्यातलं कोण कुणासारखं आहे! पण हे भाऊ दिसायला थोडेसे बावळट ध्यान असले तरी मोठे हुशार होते.   म्हणजे त्या पाचही भावांकडे एकेक मजा होती. पहिला भाऊ समुद्राचं सगळं पाणी पिऊ शकायचा. दुस-या भावाची मान लोखंडाची होती. तिस-या भावाचे पाय खूप लांब लांब व्हायचे. म्हणजे तो त्याला हवे तेव्हा त्याचे पाय हवे तेवढे लांब करायचा आणि हवे तेव्हा कमीही करता यायचे. चौथा भाऊ आगीतून येऊ-जाऊ शकायचा. म्हणजे त्याला आग काहीही करू शकायची नाही. आणि पाचवा भाऊ त्याचा श्वास कितीही वेळ थांबून ठेवू शकायचा. आहे की नाही गंमत? म्हणूनच म्हटलं होतं की, हे पाचही भाऊ जरासे चमत्कारिकच होते. पण गुणी होते बिच्चारे!
 
हे पाचही भाऊ आपल्या आईसोबत समुद्राकाठच्या एका छोटय़ा घरात राहत होते.
 
पहिला भाऊ रोज सकाळी समुद्रावर मासे पकडायला जात असे. तो रोज खूप रंगीबेरंगी मासे पकडत असे. ते मासे गावातल्या बाजारात विकत असे. त्या माशांना खूप चांगली किंमत येई. एके दिवशी एक छोटा मुलगा त्याला म्हणाला, ‘मला तुमच्याबरोबर मासे पकडायला न्याल का?’ पहिला भाऊ म्हणाला, ‘नाही नेणार.पण त्या छोटय़ा मुलानं खूपच हट्ट धरला. मग पहिला भाऊ म्हणाला, ‘तिथं तुला माझं ऐकावं लागणार.तो मुलगा होम्हणाला. दुस-या दिवशी समुद्रावर गेल्यावर पहिला भाऊ त्या मुलाला म्हणाला, ‘तुझ्या लक्षात आहे ना मी सांगितलेलं?’ मुलानं मान डोलावली. मग पहिल्या भावानं समुद्राचं सगळं पाणी पिऊन टाकलं. सगळं पाणी संपल्यामुळे मासे  तडफडू लागले. हे पाहून तो छोटा मुलगा फार खुश झाला. तो नाचायला लागला. समुद्रातले शंख-शिंपले गोळा करू लागला. थोडय़ा वेळानं पहिल्या भावानं काही मासे पकडले. त्यानं समुद्राचं सगळं पाणी पिऊन टाकलं नव्हतं, नुसतं तोंडात घेतलं होतं. म्हणजे तुम्ही चूळ भरता ना तसं. आता बराच वेळ झाल्यामुळे त्याचं तोंड गळून आलं होतं. अख्या समुद्राचं पाणी तोंडात धरून ठेवणं चेष्टा आहे का राव? म्हणून त्यानं समुद्रातले शंख-शिंपले गोळा करणाऱ्या त्या छोटय़ा मुलाला बाहेर यायला सांगितलं, पण तो काही आला नाही. मग त्यानं खूप हातवारे करून त्याला बोलवायचा प्रयत्न केला. पण तो मुलगा काही त्याचं ऐकेना. पहिल्या भावाच्या तोंडात अख्या समुद्र सारखा बाहेर यायला उसळी मारत होता. शेवटी त्याला राहवलं नाही. त्यानं ते पाणी परत समुद्रात टाकायला सुरुवात केली. सगळं पाणी टाकल्यावर समुद्र परत काठोकाठ भरून गेला. त्यात तो छोटा मुलगा वाहून गेला. आता झाली का पंचाईत?
 
पहिला भाऊ एकटाच गावात परत आला. छोटा मुलगा वाहून गेल्याची शिक्षा म्हणून त्याचं डोकं छाटून टाकण्याची शिक्षा झाली. तेव्हा तो म्हणाला, ‘मला माझ्या आईला शेवटचं भेटू द्या.लोकांनी परवानगी दिली. तो घरी आला आणि त्यानं त्याच्या दुस-या भावाला पाठवलं. ते पाचही भाऊ दिसायला सारखे असल्यामुळे कुणाला काही कळलं नाही. या दुस-या भावाची मान लोखंडाची होती. त्यामुळे ती तलवारीनं कापली गेली नाही. मग त्याला समुद्रात बुडवायचं ठरलं. तेव्हा दुसरा भाऊ म्हणाला, ‘मला आईला शेवटचं भेटू द्या.घरी आल्यावर त्यानं तिस-या भावाला पाठवलं. ते पाचही भाऊ दिसायला सारखे असल्यामुळे कुणाला काही कळलं नाही. या तिस-या भावाचे पाय खूप लांब व्हायचे. त्यामुळे त्याला समुद्रात टाकलं, तेव्हा त्याने आपले पाय लांब करायला सुरुवात केली. ते त्याने इतके लांब केले की, त्याचं डोकं समुद्राच्या पाण्याबाहेर आलं, पाय समुद्राच्या तळाला टेकले.
 
मग लोकांनी त्याला जाळून टाकायचं ठरवलं. तेव्हा तिसरा भाऊ म्हणाला, ‘मला आईला शेवटचं भेटू द्या.घरी आल्यावर त्यानं चौथ्या भावाला पाठवलं. या भावाला आग काहीच करू शकत नसे. म्हणून तोही आग लावल्यावर जिवंत राहिला. आता लोक खूपच चिडले. त्यांनी त्याला आगीच्या भट्टीतच टाकायचं ठरवलं. सारे लोक आगीच्या भट्टीबाहेर उभे राहिले रात्रभर. सकाळी तो चौथा भाऊ डोळे चोळत बाहेर आला आणि त्या लोकांना म्हणाला, ‘रात्री काय छान झोप लागली मला!तेवढ्यात तिथे न्यायाधीश आले. ते त्याला जिवंत पाहून म्हणाले,‘तुला मारण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी अपयश आलं. त्यामुळे तू निर्दोष आहेस हे सिद्ध होतं.
 
मग त्याला सोडून दिलं. तो चौथा भाऊ घरी आला. त्या दिवसापासून पाचही भाऊ आपल्या आईसोबत मजेत राहू लागले.
 पाच चिनी भाऊ : क्लेअर हचिट बिशपमराठी अनुवाद : नेहा सुगवेकरकजा कजा मरू प्रकाशन,द्वारा गरवारे बालभवन, पुणे
फोन : 020-24442109
पाने : 36, किंमत : 15 रुपये 

No comments:

Post a Comment