Saturday, 11 February 2012

चांदोबाचं हाय हाय, चिमणीचं बाय बाय


दोन होते बोकेआणि अरे अरे मोराही दोन्ही कवितांची पुस्तकं आहेत. यातल्या कविता तशा गमतीच्या आहेत,
दोन होते बोके
कपड्यांच्या दोरीला
घेत होते झोके
किंवा मोराही कविता पहा-
अरे अरे मोरा
काय तुझा तोरा
पहा जरा आकाशात
ढग आहे कोरा!

मोर पावसाची चाहूल लागली की नाचतो. पिसारा फुलवून मनसोक्त नाचतो. पण एरवी तो डौलात चालतो. त्याचा डौल पाहून एका मुलाला हा प्रश्न पडतो. तो मुलगा पुढे म्हणतो-

फुलवतो पिसारा छान
नाचतो ही छान
गाणे कसे ऐकतो
दिसत नाही कान!

एकदा एका माकडानं ऐटीत चालणारा माणूस पाहिला. त्याला वाटलं आपण अशीच ऐट करावी. पण ती करणार कशी? मग त्यानं एक शक्कल लढवली-

माकडाने पाहिली माणसाची ऐट
मग त्याने घेतली शिंप्याची भेट
सुटा-बुटाचं कापड आणलं
टुणटुण उडत माप दिलं
शिंप्याने शिवला होता सूट
माकडाला झाला होता फिट

मग काय, माकड तो सूट घालून सुटाबुटात फिरलं, पण जंगलात.
या पुस्तकातली मुंगी मोठी विसरभोळी आहे. तिच्या काही म्हणून लक्षातच राहात नाही.

घरातून जाताना
आई खूप सांगते
पण चालताना मुंगी
सगळं विसरून जाते
रस्त्यावर पडलेलं
खात पुढे जाते
इवल्या इवल्या पायांनी
तुरू तुरू चालते
काय काय बोलते
घरी जायचं तेवढं
ती विसरून जाते.

असंच गमतीचं एक फूल आहे. ते मुलींसारखी फॅशन करतं-

एक होतं फूल
त्याच्या कानात डूल
त्याला पडली भूल
भुंगा म्हणाला, बी कूल
कोंबडा, अस्वल, मनीमाऊ, चिमणी, परी, झुरळ, घार, गोगलगाय यांच्या कविताही अशाच गमतीच्या आहेत.
अरे अरे मोरायातही अशाच तीस कविता आहेत.

एक जोकर एका झाडीच्या फांदीवर जाऊन बसतो आणि गडबड होते-
एकदा झाडावर बसला एक जोकर
फांदीने त्याला मारली ठोकर
तसा त्याने दिला मोठा ढेकर
ढेकर ऐकून हसला नोकर
झाडावर होती माकडे पाच
जोकरने केला फांदीवर नाच
हलवली त्याने फांदी नुस्ती
पडली सारी माकडे खाल्ती

यातल्या सगळ्या कविता प्राण्या-पक्ष्यांच्याच नाहीत काही! काही कविता तुमच्या घराबद्दलही आहेत. ही पहा-

नळाला येतं
सकाळी पाणी
रेडिओवर लागतात
मराठी गाणी
आजोबा गातात
अभंगवाणी
आई दिसते
घराची राणी!
सकाळी असते
सर्वाना घाई
ऑफिसला जाते
बेबीताई

एके दिवशी चंद्राला हुक्की आली. रोज रोज आकाशात उंचावर राहून राहून त्याला फार कंटाळा आला. मग-

एक दिवस एक दिवस
असे काय झाले
ढगामधून चांदोमामा
हळूच खाली आले
आल्या आल्या चांदोमामा
बादलीमध्ये पडले
एवढय़ाशी पाण्यातसुद्धा
भिजून चिंब झाले
तळे समजून बादलीला
त्यात लागले बुडू
तळाला जाता जाता
त्याला आले रडू
शेवटी घरातल्या लोकांनी चांदोबाला बाहेर काढलं. चांदोबानं मग थेट घर गाठलं. मागेसुद्धा वळून पाहिलं नाही. त्याची चांगली खोड मोडली. पण चांदोबा घरी जातात न जातात तो एका विमानात चिमणी घुसली.
एकदा एक चिमणी
विमानात घुसली
विमानात गेल्यावर
तिथेच फसली
एअर होस्टेस तिला बघून
गोड गोड हसली
चिमणी विमानात बसून मस्त फिरून आली. विमान खाली येऊ लागले तेव्हा-
विमानाने जेव्हा मात्र
पुन्हा लँडिंग केले
चिमणीने हळूच तेव्हा
सा-यांना बाय बाय केले

पण तुम्ही या दोन्ही पुस्तकांना हाय हायकरा. म्हणजे तुम्हाला चिमणीसारखा मस्त प्रवास करता येईल. मनसोक्त प्रवास करून झाला की, सर्वाना असंच गोड बाय बायकरा. पण त्यासाठी पहिल्यांदा हायकरायला विसरू नका.

अरे अरे मोरा आणि दोन होते बोके : मोहन काळे
अक्षर चळवळ प्रकाशन, मुंबई
पाने : प्रत्येकी 40
किंमत : प्रत्येकी 45 रुपये

No comments:

Post a Comment