Thursday, 16 February 2012

या पेन्सिलींशी करा दोस्ती!

हे एक छान पुस्तक आहे.
ही गोष्ट आहे एका चिमुरडीची.
घरातले सगळे लोक टीव्ही पाहत असतात. तिच्याशी कुणीच खेळत नाही की, बोलत नाही. ती ज्याम कंटाळून जाते. मग वैतागून खुर्चीवर चढून टीव्हीच बंद करून टाकते.
पण त्यामुळे आई तिच्यावर रागावते. बाबा डोळे मोठे करतो आणि दादा परत टीव्ही चालू करतो.
आई ऑफिसातून घरी आली की सरळ स्वयंपाकघरात जाते आणि कामाला लागते. चिमुरडी आईच्या मागे मागे जाते. तेव्हा ती तिला उचलून एका खुर्चीवर ठेवते आणि परत आपल्या कामाला लागते. चिमुरडी बराच वेळ खुर्चीवर बसून आईचं काम संपण्याची वाट पाहते, पण ते काही संपत नाही. मग ती रडायला लागते. आई तिला उचलून घेते, लाडानं तिचा एक पापा घेते आणि तिला परत खुर्चीत बसवते.
आई जेवण बनवत असते तेव्हा चिमुरडीला तिचा चेहरा दिसत नाही. त्यामुळे चिमुरडी खूप नाराज होते.
दादा पण शाळेतून आल्यावर चिमुरडीशी खेळत नाही. त्याचं होमवर्क करत बसतो. चिमुरडी खूप वेळ त्याच्याजवळ बसून त्याचं होमवर्क संपण्याची वाट पाहते. पण खूप वेळ ते संपतच नाही. मग चिमुरडी खुर्चीच्या मागे जाऊन त्याची पेन्सिल घेऊन पळते. तो तिच्या मागे पळतो.
बाबा पण ऑफिसातून येतो, तेव्हा तिच्याशी खेळत नाही. पेपर वाचत बसतो. चिमुरडी खूप वेळ त्याचं पेपर वाचन संपण्याची वाट पाहते. पण खूप वेळ ते संपत नाही. मग चिमुरडी बाबाच्या जवळ जाऊन तो वाचत असतो, त्याच्यावर आपले हात ठेवते. बाबा तिच्याकडे पाहतो. तिच्या पोटाला गुदगुदल्या करतो. चिमुरडी हसायला लागते. बाबाही हसतो आणि पुन्हा पेपर वाचायला लागतो.
चिमुरडीला प्रश्न पडतो कुणीच का माझ्याशी बोलत नाही? कुणीच का माझ्याशी खेळत नाही?
चिमुरडी जमिनीवर पडून विचार करू लागली. पण ती चिमुरडीच. तिला विचार कसा करतात हे कुठं माहीत? ती खूप वेळ तशीच पडून राहिली. काय करावं हे तिला काही सुचत नव्हतं. ती तशीच कितीतरी वेळ पडून होती. मग अचानक तिच्या पायावर काहीतरी पडलं. ती एक हिरवी पेन्सिल होती. ती चिमुरडीला म्हणाली, ‘तू माझ्याशी खेळतेस का?’ चिमुरडीला त्या पेन्सिलीच्या बोलण्याची मोठी गंमत वाटली. तेवढ्यात टेबलावरच्या निळ्या, पिवळ्या आणि लाल पेन्सिलींनीही खाली उडय़ा मारल्या. चिमुरडीभोवती त्यांनी गोल रिंगण केलं.
हिरवी पेन्सिल म्हणाली, ‘तुला वाटत असेल तर खेळ आमच्याशी.
चिमुरडीला मोठं आश्चर्य वाटलं. पेन्सिली तिला म्हणाल्या, ‘हो, आपण चित्र काढायचा खेळ खेळू या.चिमुरडीला चित्र कसं काढायचं तेही माहीत नव्हतं. पेन्सिली तिला म्हणाल्या, ‘खेळून तर पहा, मोठी मज्जा येते हा खेळ खेळताना.
मग चिमुरडी आणि पेन्सिली चित्र काढू लागल्या. चिमुरडीला वाटलं आधी जेवण बनवणाऱ्या आईचंच चित्र काढू या. त्यासरशी हिरवी पेन्सिल तिच्या बोटांमध्ये येऊन बसली. चिमुरडीनं झटपट आईचे कपडे रंगवले. पिवळ्या पेन्सिलीनंही काही कपडे रंगवले. एका पेन्सिलीने आईचे केस रंगवले. सगळ्या पेन्सिली कामाला लागल्या. शिवाय त्यांचा कामाचा उरकही मोठा होता. त्यामुळे फटाफट चित्र तयार झालं. चित्र पूर्ण झाल्यावर चिमुरडीनं ते आईला दाखवलं. ते चित्रं अगदी आईसारखंच दिसत होतं. तिनं ते स्वयंपाकघरातल्या कपाटावर लावलं.
मग चिमुरडीनं पेपर वाचणाऱ्या बाबाचं, गृहपाठ करणा-या दादाचंही चित्र काढलं. ती त्यांना दाखवली. ती त्यांनाही खूप आवडली. बाबाला तर चित्र खूपच आवडलं. त्यानं ते भिंतीवर लावलं. दादालाही त्याचं गृहपाठ करतानाचं रंगीत चित्र खूप आवडलं. त्यानंही ते चित्र भिंतीवर लावलं. त्यामुळे चिमुरडी खूश झाली. आणि तिच्या पेन्सिलीही खूप खूप खूश झाल्या. आता तिच्याशी खेळायला आणि गप्पा मारायला लाल, पिवळ्या, हिरव्या, निळ्या अशा खूप पेन्सिली होत्या. त्या तिच्या मैत्रिणी झाल्या होत्या.
दोस्तांनो, तुम्हालाही कधी कधी खेळायला कुणी सोबती मिळत नसेल तर तर तुम्ही या चिमुरडीशी गप्पा मारू शकता. किंवा मग पेन्सिलीशी खेळू शकता. या रंगीत रंगीत पेन्सिली फार करामती आहेत. सारी कामं त्या फटाफट करतात आणि सुंदर सुंदर चित्रं काढतात. त्यामुळे मज्जा येते. तर मग येणार ना तुम्ही पेन्सिलीशी खेळायला?
जरूर या बरं!
मूळ इंग्रजी भाषेतल्या या पुस्तकाचा हिंदी अनुवाद मनीषा चौधरी यांनी केला आहे. संपूर्ण रंगीत असलेल्या या पुस्तकात खूप चांगली चित्रं आहेत.
मैं और मेरी रंगीन पेंसिल : मासुमेह अंसारियन
प्रथम बुक्स, नवी दिल्ली
पाने : २४, किंमत : २५ रुपये

No comments:

Post a Comment