ही बंगालमधल्या एका छोटय़ा मुलीची, नईमाची गोष्ट आहे. नईमाला बंगालमध्ये काढतात, ती अल्पना चित्रं खूप सुरेख काढता येत. तिच्या गावातली ती उत्कृष्ट अल्पना चित्रकार होती. तिच्या चित्रांना दरवर्षी बक्षीस मिळत असे. शिवाय नईमा खूप हुशार मुलगी होती. तिला घरच्या गरिबीमुळे शाळा लवकर सोडावी लागली, पण तिच्या हुशारीवर तिचे आई-बाबा खूश होते. त्यांचा आपल्या मुलीवर खूप जीव होता. नईमाची छोटी बहीण शाळेत जात होती. पण तिलाही लवकरच शाळा सोडावी लागणार होती. कारण तिच्या परीक्षेची फी घरच्यांना परवडणारी नव्हती. नईमाचे अब्बाजान म्हणजे वडील सायकल रिक्षा चालवत. रात्रंदिवस रिक्षा चालवूनही त्यांना फार पैसे मिळत नसत. त्यामुळे ते भरदुपारी उन्हातान्हातही आराम न करता रिक्षा चालवत. त्याचं नईमाला फार वाईट वाटत असे.
नईमा आईला घरकामात खूप मदत करत असे. ती सतत कामात असे. पण तिच्या डोक्यात सतत पैसे कमवून वडलांना मदत करण्याच्या नवनव्या आयडियाच्या कल्पना येत. तिच्या वर्गातला आणि तिचा एकमेव मित्र सलीमही रिक्षा चालवून आपल्या वडलांना मदत करत असे. पण तो मुलगा होता आणि नईमा मुलगी. मुलींना घराबाहेर जाऊन कोणतीच कामं करता येत नसत. छोटय़ाशा खेडेगावात अशीच पद्धत असते. मुलींनी घरकामात आईला मदत करावी आणि मुलांनी वडलांना त्यांच्या कामात मदत करावी, असा रिवाजच असतो खेडेगावात. पण नईमाला मात्र वडलांना मदत करायची खूप इच्छा होत असे. त्यासाठी तिला वेगवेगळ्या कल्पना सुचत असत. त्या ती सलीमला सांगत असे. सलीम तिचा चांगला मित्र होता.
एकदा नईमाला एक आयडियाची कल्पना सुचली की, संध्याकाळच्या वेळात आपणच रिक्षा चालवायची. मुलगी रिक्षा चालवतेय हे गावातल्या लोकांना चालणार नाही. तेव्हा मुलाचे कपडे घालायचे आणि मुलाच्या आवाजात बोलायचं. तसा पुरुषासारखा आवाज तिनं सलीमला काढूनही दाखवला. सलीम त्यावर म्हणाला, ‘अरे बापरे! तुझा आवाज तर माझ्या आवाजापेक्षाही पुरुषी वाटतो.’ पण ही कल्पना काही सलीमला तितकीशी आवडली नव्हती. पण नईमा मात्र झपाटून गेली होती. मग तिनं दुपारी वडील झोपलेले असताना त्यांची रिक्षा चालवून पाहण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण रिक्षा वळवता न आल्यानं ती टेकडीवरून खाली गेल्यावर झाडीत जाऊन धडकणार होती. ते पाहून नईमानं पटकन रिक्षातून खाली उडी मारली. त्यामुळे तिला काही लागलं नाही, पण नव्या को-या रिक्षाचं बरंच नुकसान झालं.
यामुळे नईमाला खूप वाईट वाटलं. कारण आता वडलांना मदत करणं तर सोडाच पण उलट रिक्षाच्या दुरुस्तीसाठी पैसे लागणार होते. ते कुठून आणणार अब्बाजान? शेवटी आईनं तिच्या हातातल्या एकुलत्या दोन सोन्याच्या बांगडय़ांपैकी एक बांगडी विकायला सांगून त्यातून रिक्षा दुरुस्तीचा खर्च करायला सांगितला. वडलांनाही बांगडी विकताना खूपच वाईट वाटत होतं. आणि नईमाला तर बांगडी विकण्याच्या नुसत्या कल्पनेनंच खूप दु:ख झालं. कारण त्यांच्या घरात तिच्या आईच्या हातातल्या त्या दोन बांगडय़ांचाच तेवढा मंजुळ आवाज ऐकू येत असे. त्यामुळे नईमानं ठरवलं की, काहीतरी करून आपण अब्बाजानला रिक्षा दुरुस्तीच्या कामात मदत करायची. तिनं सलीमला आपली ही आयडिया सांगितली. सलीमला नईमाच्या हुशारीचं खूपच कौतुक वाटलं आणि अभिमानही. त्यानं तिला शेजारच्या गावात गुपचूप जाण्यासाठी स्वत:चे कपडे आणून दिले. एक कुडता, लुंगी आणि टोपी असा सलीमसारखाच वेष करून नईमा तिच्या नव्या मोहिमेवर निघाली. तिची ही मोहीम यशस्वी झाली का, का त्यात मागच्यासारखंच नईमाला अपयश आलं? की नईमानं वडलांना रिक्षा दुरुस्तीच्या कामात मदत केली? हे सगळे प्रश्न तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही थेट पुस्तकच वाचलेलं बरं! पण नईमा ही खूप हुशार आणि बहादूर मुलगी आहे हे पण लक्षात ठेवा.
- रिक्षावाली मुलगी : मिताली पर्किन्स, अनुवाद - सुनंदा अमरापूरकर,ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे,पाने :80, किंमत : 40 रुपये