Sunday, 27 November 2011

माणसाची अजबगजब गोष्ट

‘‘सुमारे दहा लाख वर्षापूर्वी दोन पायांवर ताठ उभे राहून चालणा-या माकडाच्या जातीपासून आपले, म्हणजेच माणसाचे पूर्वज निर्माण झाले. आपल्या या पूर्वजाला पिथेकॅन्थ्रॉपम्हणजे माकड-माणूस असं म्हणतात. या माकड-माणसापासून आदिमानव तयार झाला. त्याचं नाव नीअँडरथाल’. आणि त्यापासून एक लाख वर्षापूर्वी आजच्यासारख्या म्हणजेच आपल्यासारख्या माणसांचा जन्म झाला. त्याच्याआधीही वीस लाख वर्षापूर्वी प्राण्यांचा आणि वनस्पतींचा जन्म झाला.’’
 
हे सगळं किती मजेशीर आणि गंमतीशीर आहे नाही?
 
माणूस माकडापासून तयार झाला, म्हणजे नेमकं काय झालं? ही जादू कशी काय झाली? आणि कशामुळं झाली? पण यात जादूबिदू काही नाही. हा उत्क्रांतीचा अर्थात निसर्गाचा नियम आहे. पण ही गोष्ट एवढी अद्भुत आहे की, त्यावर आपला सहजासहजी विश्वास बसत नाही.
 
पण खरंच असंच घडलं हे शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोगांतून आणि ठिकठिकाणी सापडलेल्या माणसाच्या अवशेषांवरून सिद्ध केलं आहे. त्यामुळे या गोष्टीवर आपला विश्वास बसो न बसो, पण ही गोष्ट खरी आहे. पण माणसानं पुढे जाऊन अनेक प्रकारची प्रगती केली, तो स्वत: अनेक गोष्टी शिकला, त्यानं अनेक शोध लावले, तो शेती करायला शिकला, त्यानं अग्नी आणि लोखंडावर वर्चस्व मिळवलं, जगाचं ज्ञान करून घेण्यासाठी त्यानं हरतऱ्हेचे प्रयत्न केले, तो काम आणि विचार करायला शिकला, आणि त्यानं निसर्गावर सत्ता गाजवण्याचाही प्रयत्न केला.
 
हे सगळं माणसानं केलं तरी कसं हे सांगणारं पुस्तक म्हणजे, ‘माणूस महाबलाढय़ कसा बनला’. या पुस्तकात एकंदर बारा प्रकरणे आहेत. त्यातून माकड-माणसाचा आधुनिक माणूस कसा झाला याची सविस्तर कहाणी सांगितली आहे. पण मित्रांनो, हे काही इतिहासाचं पुस्तक नाही की विज्ञानाचं पुस्तक नाही. पण तरीही यात इतिहास आणि विज्ञान आहे. लेखकानं हे पुस्तक अशा शब्दांत लिहिलं आहे की, आपण एखादं गोष्टीचं पुस्तक वाचतो की काय असं वाटतं. कुठलेही अवघड आणि कठीण शब्द न वापरता आणि नमनाला घडाभर तेल न घालता हे पुस्तक टप्प्याटप्प्यानं माणसाचा रंजक प्रवास सांगतं.
 
म्हणजे असं की, माकड-माणूस चार पायांचा होता, त्याला हात नव्हते. पण पुढच्या दोन पायांचा तो सतत कामात वापर करू लागला. त्यांच्या सततच्या वापरानं या पायांचे हातात रूपांतर झाले. त्यामुळे चार पायाचा माणूस दोन पायावर उभा राहिला. मग त्यानं जंगलातल्या हिंस्र् प्राण्यांपासून स्वत:चा जीव वाचवण्यासाठी हत्यारं बनवली. ही हत्यारं सुरुवातीला दगडाची आणि लाकडाची होती. पण तरीही एकटय़ा माणसाला अस्वलासारख्या प्राण्याशी लढणं शक्य नव्हतंच. मग तो समूहानं राहून अस्वलाचा सामना करू लागला.
 
माणूस असा हळूहळू अनुभवातून शिकत गेला. त्यात त्याच्याकडून चुका झाल्या, पण प्रत्येक गोष्टीवर त्यानं बुद्धीच्या जोरावर मात करण्याचा प्रयत्न केला.
 
पण हे व्हायला खूप वर्षे लागली. अन्नाच्या गरजेतून त्या वेळच्या स्त्रियांनी शेतीचा शोध लावला. जमिनीवर पडलेलं बीमातीत रुजलं की त्यापासून नवी रोपं तयार होतात, हे त्यांच्या निरीक्षणातून लक्षात आलं. मग माणसं आधी कुदळीनं आणि नंतर नांगरानं जमीन उकरून शेती करू लागली. गायी, मेंढय़ा, घोडे पाळू लागली. त्यामुळे माणसाचे बरेचसे कष्ट कमी झाले. या प्राण्यांवर ओझं लादून ते एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी येऊ-जाऊ लागले.
 
म्हणजे काही गोष्टींचा शोध माणसानं स्वत:च्या बुद्धीच्या जोरावर विचार करून लावला तर, काही गोष्टींचा शोध त्याला अनुभवातून, निरीक्षणातून लागला. माणसाचं सुरुवातीपासूनच हे वैशिष्टय़ होतं की, त्यानं प्रत्येक संकटावर, अडचणीवर मार्ग शोधला. समोर येईल त्या संकटाला तो सामोरा गेला. त्यामुळे तो अधिकाधिक धाडसी, लढावू झाला. त्यानं काळानुसार स्वत:ला बदलवलं. जसजसा त्याचा विकास झाला, तसतसा त्याच्या राहणीमानात, खाण्यापिण्यात बदल होत गेला. त्यानं नाती तयार केली, स्वत:चे नीतिनियम तयार केले.
 
..तर असा माणूस सतत शिकत राहणारा विद्यार्थी आहे. त्याला अभ्यासाचा, जग समजून घेण्याचा कंटाळा नाही. म्हणून आजवर त्यानं एवढी प्रगती केली. तुम्हाला नाही का जगातल्या अनेक नवनव्या गोष्टींबद्दल कुतूहल असतं. प्रत्येक नवी गोष्ट जाणून घेण्याचा तुमचा प्रयत्न असतो. माकड-माणसाचा आधुनिक माणसापर्यंतचा प्रवास याच कुतूहलातून आणि त्याच्या सततच्या नवनव्या गोष्टी शिकण्यातून झाला आहे.
 
माणसानं एवढय़ा सगळ्या अजबगजब गोष्टी करून दाखवल्या आहेत, त्या केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर. म्हणूनच माणूस हा जगातला सर्वात बुद्धिमान प्राणी समजला जातो. आणि महाबलाढय़ही. माणूस बुद्धिमान आणि महाबलाढय़ कसा झाला, हे या पुस्तकातून जाणून घेता येईल.
 
थोडक्यात हे माणसाचं म्हणजे आपलंच पुस्तक आहे. आपल्या इतिहासाचं पुस्तक आहे.

No comments:

Post a Comment