Sunday 27 November 2011

खांद्यावर घेतला की बंदूक, हातात घेतला की चिमटा


मित्रांनो, प्रेमचंद हे हिंदीतले मोठे लेखक तुम्हाला माहीत आहेत? पण माहीत नसलं तरी फारसं काही बिघडत नाही म्हणा. हे पुस्तक वाचून ते तुम्हाला नक्की माहीत होतील. त्यांनी तुम्हा मुलांसाठी थोडंच लिहिलं आहे, पण खूप चांगलं लिहिलं आहे.
 
‘ईदगाह’ हे त्यांचं असंच छोटंसं पुस्तक. रमजानच्या महिन्यात तीस दिवस मुस्लिम समाजातले लोक उपवास करतात. या महिन्यानंतर ईदचा सण येतो. हा सण साजरा करण्यासाठी सर्व लोक मशिदमध्ये जमतात. त्या मशिदीला ‘ईदगाह’ म्हणतात. लहान मुलं काही उपासतपास करत नाहीत. कारण त्यांना तेवढा धीर निघत नाही. म्हणजे भूक लागली की, दम धरवत नाही. शिजूपर्यंत दम निघतो पण निवेपर्यंत निधत नाही, असं म्हणतात ना! तरी पण काही मुलं एक दिवसाचा, दोन दिवसाचा रोज ठेवतात. कारण त्यांना येणा-या ईदचा आनंद लुटायचा असतो.
 
अखेर ईदचा दिवस उजाडतो. महमूद, मोहसीन, सम्मी, नुरे आणि हमीद ही छोटी मुलं गावाबाहेरच्या ईदगाहमध्ये जायला निघतात. सर्वाना त्यांच्या अब्बाजान आणि अम्मीजानने खाऊ-खेळणी घेण्यासाठी पैसे दिलेले असतात. मेहमूदजवळ बारा पैसे असतात, मोहसीनजवळ पंधरा पैसे असतात, पण हमीदजवळ फक्त तीनच पैसे असतात. हमीद चार-पाच वर्षाचा छोटा मुलगा असतो. मागच्याच वर्षी त्याचे आई-बाबा देवाघरी गेलेले असतात. त्यामुळे हमीद त्याच्या अमीना आजीजवळ राहत असतो. अमीना आजी लहानग्या हमीदला खोटं खोटंच सांगते की, त्याचे बाबा खूप खूप पैसे कमवायला बाहेरगावी गेले आहेत, तर आई अल्लाच्या घरून खूप खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आणायला गेली आहे. त्यामुळे हमीद आनंदात असतो. त्यात आज तो मित्रांबरोबर ईदगाहमध्ये जायला निघतो.
 
अमीना आजीला आपण हमीदला आज एक पैसाही देऊ शकत नाही याचं वाईट वाटतं पण हमीदजवळ तीन पैसे असतात. तो आनंदात असतो. मित्रांबरोबर मजा करत तो ईदगाहला जायला निघतो. रमतगमत, गप्पा मारत, रस्तातल्या गमतीजमती पाहत सारी मुलं ईदगाहमध्ये पोचतात. नमाज होतो. त्यानंतर सर्व लोक एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा देतात. मग सारे खेळण्यांच्या आणि मिठाईच्या दुकानांवर तुटून पडतात. महमूद, मोहसीन, नूर आणि सम्मी जत्रेतल्या चक्रातल्या हत्ती, घोडा, उंट यावर बसतात. पण हमीद काही बसत नाही. मग सारे जण खेळण्यांच्या दुकानात जातात. महमूद शिपाई घेतो, खाकी पोशाख, लाल पगडी, खांद्यावर बंदूक असलेला. मोहसीन कंबरेत वाकलेला, पण त्या वाकलेल्या कमरेवर पखाल ठेवलेला भिस्ती घेतो. तो भिस्ती पखालीतून पाणी उडवण्याच्या तयारीत असतो. नूर काळ्या कोटाचा, पांढरी विजार असलेला, सोनेरी साखळी असलेलं घडय़ाळ आणि हातात कायद्याचं जाडजूड पुस्तक असलेला वकील घेते. ही सगळी खेळणी दोन दोन पैशांची असतात. हमीदकडेही तीन पैसे असतात. पण हमीद काहीही घेत नाही.
 
मोहसीन म्हणतो - माझा भिस्ती रोज सकाळ-संध्याकाळ पाणी देऊन जाईन.
 
नूर म्हणते -माझा वकील जोरदार खटले लढवील.
 
सम्मी म्हणते - माझा धोबी रोज कपडे धुईल.
 
पण हमीद मनात म्हणतो, ही खेळणी काय कामाची हातातून खाली पडली की फुटून जातील. पण तरी त्याला वाटतं, ती खेळणी  हातात घेऊन पहावीत. पण त्याचे मित्र काही त्याला हात लावू देत नाहीत. मग ते सारे मिठाईच्या दुकानात जातात. सगळी मुलं रेवडय़ा, गुलाबजाम घेतात. हमीदलाही काहीतरी घ्यायचा आग्रह करतात. कारण हमीदजवळ तीन पैसे तर तसेच असतात. पण हमीद काहीच घेत नाही. मुलं पुढं निघतात. आता लोखंडाच्या सामानांची दुकानं लागतात. हमीद एका दुकानदाराजवळ जातो. त्या दुकानदाराकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे चिमटे असतात. हमीद ते पाहतो आणि अचानक त्याला आठवतं, तव्यावर पोळ्या भाजताना आजीचे हात पोळतात. आपण तिच्यासाठी यातला एखादा चिमटा घेतला तर तिचे हात मुळीच भाजणार नाहीत आणि पोळ्या भाजायचं तिचं कामही लवकर होईल.
 हमीदचे मित्र सरबत प्यायला लागतात. हमीद चिमटेवाल्या- जवळ रेंगाळतो. त्याला विचारतो, ‘हा चिमटा, कितीला देणार?’
दुकानदार म्हणतो, ‘बाळा, हे काही खेळणं नाही.’
 
हमीद मोठा हुशार आणि चुणचुणीत मुलगा असतो. तो म्हणतो, ‘विक्रीसाठी नाहीय का?’ दुकानदार म्हणतो, ‘आहे, पण सहा पैशाला आहे.’ हमीदकडे तीनच पैसे असतात. तो म्हणतो, ‘तीन पैशाला द्याल?’ दुकानदार आधी तयार नसतो, पण मग देतो. हमीद चिमटा घेऊन मित्रांकडे जातो. सगळे त्याला हसतात. म्हणतात, ‘अरे वेडय़ा हा चिमटा कशाला घेतलास? हे काय खेळणं आहे का?’ हमीद त्यांना सांगतो, ‘का नाही? खांद्यावर घेतला की झाली बंदूक. हातात घेतला की झाला फकिराचा चिमटा. एकदा असा फिरवला तर तुमच्या खेळण्यांचा चक्काचूर होईल. माझा चिमटा शूरवीर सिंह आहे.’
 
सगळ्या मुलांना त्याचं म्हणणं पटतं. ते त्याचा चिमटा पाहायला मागतात. हमीद त्यांना देतो. मित्र त्यांची खेळणी हमीदला पाहायला देतात. सगळी मुलं घरी निघातात. रस्त्यात त्यांना भूक लागते. महमूदकडे केळी असतात. ती तो हमीदलाही देतो. हा त्याच्या चिमटय़ाचाच पराक्रम म्हणायला हवा. कारण त्याने आधी मिठाई काही हमीदला दिली नव्हती.
 
सगळे आपापल्या घरी जातात. हमीदही जातो. अमीना आजी त्यानं जत्रेतून काय आणलं ते पाहते. हमीदच्या हातात चिमटा असतो. तिला खूप राग येतो. एवढासा पोर सकाळपासून काही खाल्लं नाही, प्यायला नाही, एवढा लांब गेला आणि आला. आणि जत्रेतून काय आणलं तर चिमटा! हमीद अपराधी आवाजात म्हणाला, ‘तुझे हात तव्यानं भाजतात नं म्हणून आणलाय मी चिमटा!’ ते ऐकून अमीना आजी हमीदला छातीशी धरून रडू लागते. खरं तर लहान होता हमीद, अमीना आजी तर म्हातारीच होती. पण हे काही दु:खाचे अश्रू नव्हते, तर ते आनंदाचे अश्रू होते, आनंदाचे! हमीदच्या हुशारीला, त्याच्या शहाणपणाला अमीना आजीने केलेला तो सलाम होता!!
 
  • ईदगाह : प्रेमचंद, मराठी अनुवाद - संजीवनी खेर
  • नॅशनल बुक ट्रस्ट, प्रभादेवी, मुंबई
  • पाने : 34, किंमत : 11 रुपये

No comments:

Post a Comment