Sunday 27 November 2011

पुस्तक वाचायचं? नाही, पाहायचं!

-महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत?
 
-महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो?
 
-अजिंठा-वेरूळची लेणी कुठल्या शहराजवळ आहे?
 
-शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ला कुठल्या जिल्ह्यात आहे?
 
-कुठल्या गावांना समुद्रकिनारा आहे?
 
-संत्री कुठे पिकतात?
 - या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहीत आहेत का?
-नाही आठवत पटकन?
 
ठीक आहे, तुम्ही विचार करून सांगा. पण त्या आधी या आणि अशाच काही प्रश्नांची उत्तरं भूगोलाच्या पुस्तकात मिळतात हे तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल. ‘भूगोल’ हा तुमचा आवडता विषय आहे का?
 
शाळेतला तुमचा सर्वात आवडता विषय कोणता, याचं उत्तर कदाचित तुम्ही ‘इतिहास’ असं द्याल. कारण त्यात राजे-महाराजे, मोठय़ा मोठय़ा लढाया, हत्ती, घोडे, उंट यांच्या सवा-या असं काय काय असतं. ‘विज्ञान’ हा विषयही तुम्हाला आवडत असेल. कारण त्यात वेगवेगळे ‘जादूचे’, नाही नाही विज्ञानाचे, प्रयोग करता येतात. हे प्रयोग करताना खूपच मजा येते. असेच आणखी दोन विषय गंमतीशीर आणि मजेशीर आहेत. ते म्हणजे गणित आणि भूगोल. पण हे विषय सहसा तुमच्या आवडीचे नसतात. ‘भूगोल’ तर अजिबातच आवडत नाही तुम्हाला, हो की नाही?
 
पण तुम्ही भूगोलाचं पुस्तक नीट पाहिलं, मी पाहिलं म्हणतोय, लक्षात घ्या. भूगोलाचं पुस्तक वाचण्यापेक्षाही जास्त पाहण्यासाठी असतं! कारण त्यात वेगवेगळे नकाशे असतात. आणि त्या नकाशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती असते. तुमच्या भूगोलाच्या पुस्तकात तुमच्या जिल्ह्याचा आणि मग महाराष्ट्राचा नकाशा असतो. तुमच्या जिल्ह्याच्या नकाशामध्ये तुम्ही तुमचं गाव नेमकं कुठं आहे, त्याच्या शेजारी कुठली नदी आहे, आजूबाजूला कुठली गावं आहेत, जवळचं प्रसिद्ध गाव कुठलं आहे, तालुक्याचं गाव कुठे आहे असं काय काय पाहू शकता. तसंच तुमचं गाव महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागात आहे, त्या भागाचं वैशिष्टय़ काय आहे, भागात कुठली पिकं येतात, कुठली फळं येतात अशी खूप सारी माहिती असते.
 
‘मुलांचा चित्रमय महाराष्ट्र’ या पुस्तकात महाराष्ट्राविषयीची अशी खूप माहिती आहे. म्हणजे लेखी माहिती खूपच कमी आहे. चित्रं आणि नकाशेच जास्त आहेत. म्हणजे पान 13 वर महाराष्ट्रात भीमा, गोदावरी, दुधना, प्रवरा, पूर्णा, वैनगंगा अशा पंधरा-वीस नद्या कुठे उगम पावतात, कशाकशा वाटा-वळणांनी जात शेवटी समुद्राला मिळतात याचा नकाशा दिला आहे. पान 16 वरच्या नकाशामध्ये महाराष्ट्रात कुठे कुठे कोळसा, चुनखडक, बॉक्साइट, बेसाल्ट यांच्या खाणी आहेत हे दाखवले आहे. असेच गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, ऊस, कापूस ही पिकं कुठे येतात यांचेही नकाशे आहेत.
 
तुम्ही उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाता. एस.टी.ने जाता किंवा रेल्वेने. समजा एस.टी.ने गेला तर तुमची बस कशी कशी जाते किंवा रेल्वेने गेलात तर ती कशी कशी जाते, हा रस्ता नेमका कसा आहे, याचेही स्वतंत्र नकाशे आहेत. त्यावरून तुम्हाला महाराष्ट्रात कुठे कुठे एस.टी. जाते आणि कुठे कुठे रेल्वे जाते याची माहिती मिळते.
 
या पुस्तकामध्ये तुम्ही स्वत: भरण्यासाठीही काही नकाशे दिले आहेत. पान 34 वरच्या नकाशामध्ये संत्री, टरबूज, सीताफळ, केळी, काजू, डाळिंब, द्राक्षे हे नकाशात दाखवले आहेत. त्यावरून तुम्हाला ही फळं कुठल्या भागात येतात त्यांचे जिल्हे सांगायचे आहेत. तर पान 44 वर नकाशाचंच शब्द-कोडं आहे! या पानावर येईपर्यंत तुम्हाला बरीच माहिती झालेली असणार त्यामुळे हे कोडं तुम्ही चुटकीसरशी भरू शकाल.
 त्यामुळे हे पुस्तक पाहताना तुम्हाला खूप माहिती मिळेल, तुमचं मनोरंजन होईल आणि आपोआप तुमचा अभ्यासही होऊन जाईल. त्यामुळे सध्याच्या सुट्टीत हे पुस्तक तुम्ही वाचायला, नाही नाही, पाहायला हरकत नाही. कारण हे पुस्तक पाहायचंच पुस्तक आहे.  
  • मुलांचा चित्रमय महाराष्ट्र-  विद्याधर अमृते
  • पाने- 48 किंमत- 100 रुपये
  • मनन प्रकाशन, मुंबई

No comments:

Post a Comment