Sunday, 27 November 2011

हरवलेल्या खेळण्यांच्या राज्यात

आई-बाबा, आजी-आजोबा, काका-मावशी, दादा-ताई, मामा-मावशी असे सर्वजण तुमच्यासाठी नवीनवी खेळणी आणत असतात. तुमच्या वाढदिवसाला तर तुमच्या मित्र-मैत्रिणींकडूनही अनेक प्रकारची खेळणी भेट मिळतात. पण ही सगळी खेळणी तुम्हाला आवडतात. त्यांच्याबरोबर तुम्ही भरपूर खेळता. रात्री त्यांच्याबरोबर झोपता, सकाळी त्यांच्याबरोबर चहा-नाष्टा, जेवण घेता..एकंदर नव्या खेळण्याबरोबरचे तुमचे सुरुवातीचे दिवस मोठे मजेत जातात. पण मग हळूहळू तुम्ही त्या खेळण्यांना विसरायला लागता. त्यांना आडगळीत टाकून देता.
 
पण ही सगळी खेळणी एकत्र आली तर ती तुमच्याबद्दल काय काय बोलतील? तुमचं प्रेम त्यांना एकेकाळी मिळालेलं असतं, पण आता ते कुठेतरी कोपऱ्यात धूळ खात पडलेले असतात. तेव्हा ते तुमच्याबद्दल नक्कीच तक्रारी करतील. हो की नाही? हे पुस्तक अशा हरवलेल्या खेळण्यांचंच आहे. तुमच्यासारखीच विनी नावाची एक मुलगी असते. तिच्या वाढदिवसाला तिला घोडा, बंदूकधारी सैनिक आणि सोनसाखळी ही बाहुली अशी खूप खूप खेळणी तिचे आजी-आजोबा, आई-बाबा आणि मित्र-मैत्रिणी देतात. त्यातले विनीला फक्त घोडा आणि सोनसाखळी फक्त आवडतात. ती त्यांच्याबरोबर रोज खेळते. सोनसाखळी तर विनीबरोबर जेवते, खेळते, बोलते आणि झोपतेही. विनी जाईल तिथं ती तिच्यासोबत असते. सोनसाखळी विनीची जिवाभावाची मैत्रीण असते. घोडय़ाच्या पाठीवर बसून विनी रोज आत्या, मामा आणि मावशीच्या गावाला जाऊन येते. अशी सगळी विनीची चंगळ चंगळ चाललेली असते. पण काही दिवसांनी विनी सोनसाखळीला बागेतच पेरूच्या झाडाखाली विसरते. घोडाही एका कोप-यात धूळ खात पडतो. मग रात्र झाल्यावर एक अस्वल येतं आणि विनीच्या सोनसाखळीला घेऊन जातं. तेव्हा सोनसाखळी विनीला ‘विनी धाव, मला वाचव’ अशा हाका मारते. विनी तिच्या हाका ऐकून धावतेही पण तोपर्यंत ते भुरं अस्वल सोनसाखळीला घेऊन पळून जातं.  विनीला खूप वाईट वाटतं. विनी रडायला लागते. मग घोडा तिला सांगतो, ‘विनी रडू नको. माझ्या पाठीवर बस. सोबत आपले सैनिक घे. आपण सोनसाखळीला परत आणू.’ मग विनी, घोडा आणि सैनिक सोनसाखळीला शोधायला अस्वलाच्या पाठीमागे जातात. शेवटी ते ‘हरवलेल्या खेळण्यांच्या राज्या’त पोचतात. तिथं खूप म्हणजे खूप खेळणी असतात. ती सर्व खेळणी अशीच तुमच्यासारख्या मुलांनी टाकून दिलेली असतात. म्हणून ती आच्छुजी हा राजा इथं घेऊन येतो. इथं तो त्यांची खूप काळजी घेतो, त्यांचे भरपूर लाड करतो. सर्वजण मजेत असतात. पण विनीला तिची सोनसाखळी हवी असते. ती आच्छुजीकडून जाऊन त्याला सोनसाखळीला परत पाठवायला सांगते. आच्छुजी मोठा गंमतीशीर राजा असतो. त्याला सारख्या शिंका येत असतात. तो विनीला सांगतो, ‘सोनसाखळीला तुझ्याबरोबर यायचं असेल तरच मी पाठवीन.’ सोनसाखळीही विनीला पाहताच तिच्या गळ्यात पडते. मग आच्छुजी सोनसाखळीला विनीबरोबर पाठवायला तयार होतो.
 
तेव्हा विनी तिथल्या सगळ्याच खेळण्यांनाही त्यांच्या त्यांच्या मूळ मित्रांकडे पाठवायला आच्छुजीला सांगते. कारण या राज्यात सर्व खेळणी मजेत असली तरी इथं त्यांच्यावर प्रेम करणारं कुणीच नसतं. त्यामुळे सगळी खेळणी मनातून दु:खी असतात. त्यांना विनीसारखी त्यांच्यावर खूप खूप माया करणारी, लाड करणारी मैत्रीण हवी असते. मग विनी आच्छुजीला एक मोठी योजना सांगते. ती योजना काय असते, ज्यामुळे सगळी खेळणी पुन्हा आनंदी होतात? ही सगळी खेळणी पुन्हा आपापल्या घरी जातात का? यासाठी तुम्हाला हे पुस्तक वाचायला हवं.
 त्याचबराबेर हेही लक्षात ठेवायला हवं की, विनीसारखं आपल्या खेळण्यांवर प्रेम, माया करायला हवी. नाहीतर तुमची खेळणीही एके दिवशी आच्छुजीची भुरी अस्वलं पळवून घेऊन जातील. मग तुम्हालाही विनीसारखं रडू कोसळेल. तसं होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे पुस्तक वाचायला हवं. म्हणजे समजा एखाद वेळी तुमच्याकडून चुकून तुमचं खेळणं हरवलं तर त्याला शोधायचं कसं आणि कुठं हेही तुम्हाला माहीत असेल. या पुस्तकातला आच्छुजी तसा वाईट राजा नाही. तो तुमची खेळणी जबरदस्तीने पळवून नेत नाही. तुम्ही टाकून दिलेली खेळणीच तो आपल्या राज्यात घेऊन जातो. तेव्हा या आच्छुजीची ओळख करून घ्या. म्हणजे तुमची हरवलेली खेळणी तुम्हाला परत मिळतील.

No comments:

Post a Comment