Sunday, 27 November 2011

चिटुकल्या दोस्तांची कमाल

कीटकांच जग अद्भुत का असतं? काही उदाहरणं पाहू...
  • माश्या एका सेकंदात जवळजवळ हजार वेळा पंखांची उघडझाप करतात.
  • कीटक सोडून सर्व जातीच्या प्राण्यांची एकत्र मोजणी केली तरी कीटकांची संख्या जास्त भरेल.
  • कीटकांमध्ये भुंगे, फुलपाखरे, पतंग, मुंग्या, मधमाश्या आणि माश्या यांची संख्या जास्त असते.
  • कीटक डोके न हलवता अनेक बाजूंना पाहू शकतात.
  • कीटकांच्या डोक्यावर असलेल्या अँटेनामुळे त्यांना आवाज, स्पर्श, चव आणि वास कळतो.
  • कीटकांना सहा पाय आणि दोन पंख असतात.
  • कीटक कुठल्याही पदार्थाची चव पायानेसुद्धा घेतात.
  • मुंग्या आणि मधमाश्या स्वत:च्या वजनापेक्षा कितीतरी अवघड वजनाची वस्तू ओढून नेऊ शकतात.
म्हणजे याचे दोन अर्थ होतात. पहिला, कीटकांचं जग आपल्या आणि इतर प्राण्यांपेक्षा वेगळं असतं. दुसरा, कीटकांचं हे जग नानाविध आश्चर्यानी भरलेलं आहे. त्यांच्या या जगाची थोडक्यात सफर या पुस्तकात घडवलेली आहे. हे पुस्तक मासिकाच्या आकारात आहे. आणि रंगीतही. त्यामुळे यातले सर्व कीटक आपल्याला त्यांच्या मूळ रंगात पाहता येतात. पुस्तकाची छपाईही उत्तम आहे. किंमतही तशी कमीच आहे.
 
पण एवढंच नाही. अजूनही काही गोष्टी हे पुस्तक वाचण्यापूर्वी जाणून घ्यायला हव्यात.
 
आपण राहतो त्या जगात एक हजार कोटीपेक्षा जास्त प्रकारचे कीटक आहेत. आणि त्यातला प्रत्येक कीटक वैशिष्टय़पूर्ण आहे. त्यामुळे कुठलाही कीटक आपल्याला त्याच्याकडे आकर्षित करून घेतो. हे कीटक एवढुसे असले तरी ते फार चपळ असतात. कीटकाच्या शरीराचे तीन भाग असतात. डोके, वक्ष (ज्याला मधला भाग म्हणतात) आणि उदर. कीटकांना दोनच डोळे दिसत असले तरी ते अनेक छोट्या छोट्या डोळ्यांचे मिळून बनलेले असतात. म्हणजेच ते संयुक्त असतात. हजारभर छोटय़ा छोटय़ा डोळ्यांचे मिळून हे डोळे बनलेले असतात.
 
कीटकांना सहा पाय असले तरी ते तीन पायांनी चालतात. ते पाय कुठले? तर एका बाजूचा पहिला, त्याच बाजूचा शेवटचा आणि दुस-या बाजूचा मधला. आहे की नाही गंमत?
 
कीटक भिंतीवर उलटेही चालू शकतात. हे तुम्ही घरात पाहतही असाल. म्हणजे माश्या आणि पालींना तर आपण नेहमीच तसं पाहतो. त्यांना असं कसं काय चालता येतं, असा प्रश्न तुम्हा ब-याचदा पडतो. तो तुम्ही आई-बाबांना विचारता. पण त्यांना त्याचं योग्य उत्तर देता येत नाही. कारण त्यांनी हे पुस्तक वाचलेलं नसतं.
 
काही कीटकाना चक्क कानही असतात. काही नाकतोडय़ांना त्यांच्या उदराच्या बाजूला कान असतात, तर काही नाकतोडय़ांच्या पुढच्या पायांना कान असतात. ज्या कीटकांना असे कान नसतात त्यांना त्यांच्या डोक्यावरच्या दोन स्पर्शसूत्रांमुळे (म्हणजे अँटेना हो!) आणि त्याच्या अंगावरच्या बारीक लवेमुळे ऐकायला येते.
 
कीटकांचा आवाज तुम्ही नेहमीच ऐकत असाल. म्हणजे रात्री रातकिडय़ांचा कलकलाट तुम्हाला चांगलाच माहीत असतो. त्याची तुम्हाला भीतीही वाटते. पण खरी गंमत अशी आहे की, कीटकांना स्वरयंत्रच नसतं. ते गाऊ शकत नाहीत, आणि आवाजही काढू शकत नाहीत. पण आवाज निर्माण मात्र करू शकतात. म्हणजे नाकतोडे आपले पाय एकमेकांवर घासून आवाज काढतात. रातकिडे आपले पंख एकमेकांवर घासून आवाज निर्माण करतात. ऐकायला येत असल्यामुळे रातकिड्याची गर्लफ्रेंड त्याच्या आवाजाला तसाच आवाज काढून प्रतिसाद देते.
 
सुरवंट कसा तयार होतो, त्या सुरवंटापासून फुलपाखरू कसे तयार होते हेही फार गंमतीशीर आहे. आपण राहतो त्या जगातली ही खरोखरच अद्भुत म्हणावी अशीच गोष्ट आहे. त्याच्याबद्दलही या पुस्तकात माहिती आहे. मुंग्या, मधमाश्या आणि वाळवी हे कीटक आपला भलीमोठी झुंड करून मोठमोठय़ा समूहानं राहतात. आपली कामं म्हणजे अन्न शोधणं, शत्रूवर हल्ला करणं, घर तयार करणं, अशी कामंही ते एकत्रच करतात. त्याचा त्यांना फायदा होतो. म्हणजे आपल्या वजनापेक्षा जड वस्तू, अन्नाचे तुकडे त्या वाहून नेऊ शकतात. कडक जमीन कोरून त्यात घर तयार करू शकतात.
 
मुंग्यांचं वारूळ म्हणजे खूप मोठ्ठं आणि भरपूर खोल्यांचं एक घरच असतं. अंडी एका स्वतंत्र खोलीत, अन्न एका स्वतंत्र खोलीत, एका स्वतंत्र खोलीत पाळणाघर..त्यांची कॉमन बेडरूमही स्वतंत्र असते. थोडक्यात मुंग्यांचं वारुळ म्हणजे एक मोठा राजवाडाच असतो.
 
मुंग्यांचं आणखी एक वैशिष्टय़ असतं. आपल्या मार्गात येणा-या शत्रूवर त्या तुटून पडतात. अतिशय कडवी झुंज देतात. अगदी त्यांच्यापेक्षाही कितीतरी मोठय़ा शत्रूवर त्या हल्ला चढवतात. ब-याचदा त्यात त्यांना यशही येतं. आपणही मुंग्यांच्या मार्गात अडथळा आणला तर त्या आपलाही कडकडून चावा घेतात. तुम्हाला असा प्रसाद मुंग्यांनी कधीतरी दिलेला असेलच.
 
पण मित्रांनो एक लक्षात ठेवा बरं. मुंग्यांना आपलं अन्न शोधण्यासाठी फार वणवण भटकावं लागतं. त्यामुळे त्यांच्या कामात कधीही अडथळे आणू नका. तुमच्या काही मित्रांना मुंग्यांना आणि इतरही काही कीटकांना त्रास देण्यात फार मज्जा येते. पण असा त्रास देणं बरोबर नाही हे त्यांना तुम्ही समजावून सांगा. त्यांना हे पुस्तक वाचायला द्या. तुम्हीसुद्धा जरूर वाचा.
 
अहो, आपल्यापेक्षा कितीतरी लहान असलेल्या, आपल्यापेक्षा कितीतरी कष्ट करणाऱ्या, आपल्यापेक्षा कितीतरी शिस्तप्रिय असणा-या, आपल्यापेक्षा कितीतरी चपळ असणाऱ्या आणि एकजुटीने काम करणा-या कीटकांना सॅल्यूट करण्यासाठी तरी हे पुस्तक वाचायला हवंच. उगाच नाही कीटकांच्या जगाला अद्भुत म्हणत!

No comments:

Post a Comment