मित्रांनो, दिवाळी जवळ येतेय. आणि तुमच्या आवडीचे दिवाळी अंकही. गोष्टी, धमालगाणी, कोडी, गंमतीजमती, विनोद, चित्रं अशा साऱ्या गोष्टी या दिवाळी अंकामध्ये असतात. तुमच्यासाठीचे सगळेच दिवाळी अंक अजून पुस्तकांच्या दुकांनात आले नसले तरी ‘साधना’चा बालकुमार दिवाळी अंक मात्र याच आठवडय़ात सर्वत्र उपलब्ध होणार आहे. हा अंक महाराष्ट्रातल्या 23-24 जिल्ह्यांतल्या शाळांतल्या मुलांपर्यंत एव्हाना पोहचलाही असेल. कारण या अंकाच्या तब्बल साडेतीन लाख प्रतींची नोंदणी महाराष्ट्रभरातून झाली आहे.
हा अंक अवघा चौतीस पानांचा असला तरी तो संपूर्ण रंगीत आहे. त्यात फक्त सातच गोष्टी आणि लेख आहेत. आणि तुम्हाला आवडतील अशी भरपूर चित्रंही. ती गिरीश सहस्र्बुद्धे यांनी काढली आहेत.
‘राम आणि कृष्णी’ (अरुणा ढेरे), ‘जादूचा फ्रॉक’ (राजीव तांबे), ‘टी शर्ट’ (राजन गवस), ‘बोगदापर्व’ (अनिल अवचट), ‘गंगातीरी आणि ग्रांटाकाठी’ (जयंत नारळीकर), ‘ऐन मध्यरात्री’ (दासू वैद्य) आणि ‘लांब मिशीवाल्या माणसाचं रहस्य’(भारत सासणे) अशा सात गोष्टी-लेख या अंकात आहेत.
‘राम आणि कृष्णी’ ही राम-पमी या छोटय़ा भावा - बहिणीची आणि त्यांच्या आवडत्या कृष्णी या गायीची गोष्ट आहे. मोठय़ा मोठय़ा डोळ्यांची, कपाळावर पांढरा चांदोबा असलेली कृष्णी आबा जबरदस्तीनं आपल्या गावी घेऊन जातात. पण राम-पमीची त्याला तयारी नसते. तो, पमी आणि आजी सगळेच रडत रडत कृष्णीला निरोप देतात. पण कृष्णीलाही राम-पमीचा एवढा लळा असतो की, ती आबांच्या गावाहून एकटीच परत येते. तेव्हा तिच्या मोठय़ा मोठय़ा डोळ्यातूनही टपटप अश्रू गळत असतात. आजी कृष्णी परतल्याच्या आनंदानं रडू लागते. राम कृष्णीच्या मानेवर गाल घासत सरळ तिचं दूध पिऊ लागतो आणि कृष्णीही आपला पान्हा मोकळा सोडते. ‘जादूचा फ्रॉक’ ही कचरा वेचणा-या टवळी या मुलीची गोष्ट आहे. टवळी जादूचा फ्रॉक घालते आणि तिचं आयुष्यच बदलून जातं. ती खूप शिकते. मोठी होते. आणि आपल्या वस्तीतल्या मुलींनीही शिकावं म्हणून प्रयत्न करते. त्याचीच तर ही गोष्ट आहे, एका टवळीच्या पराक्रमाची.
‘टीशर्ट’ ही गोष्ट एका खेडय़ातल्या पावडू या मुलाची आहे. एकच शर्ट- पॅण्ट असलेला पावडू गावाच्या सभेत टीशर्ट मिळणार म्हणून तिथे जातो. घसा बसेतोवर घोषणा देतो, इतर बारकीसारकी कामं करतो. पण त्याला टी शर्ट काही मिळत नाही. त्यातून पावडू एक मोठा धडा शिकतो. ‘बोगदा पर्व’ ही गोष्ट आहे डोंगर आजोबांची. या डोंगरातून रेल्वे जाते. ती जाताना डोंगराला गुदगुल्या करून जाते. कधी कधी डोंगर आजोबा झाडांना म्हणतात, ‘ती अमकी गाडी आज लेट आहे वाटतं..’किंवा सुटीच्या दिवशी वाहनं कमी असली की म्हणतात, ‘ही पोरं नसली की करमत नाही हो..’
‘गंगातीरी आणि ग्रांटाकाठी’ हा लेख आहे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचा. नारळीकर यांच्या आयुष्याच्या सुरुवातीचा जडणघडणीचा काळ गंगातीरी बनारस हिंदू विद्यापीठात आणि लंडनच्या केंब्रिज या ग्रांटाकाठच्या विद्यापीठात गेला. या दोन्ही ठिकाणच्या बौद्धिक वातावरणाचा त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम झाला त्याचा अनुभव त्यांनी या लेखात सांगितला आहे. ‘ऐन मध्यरात्री’ ही एक रहस्य कथा आहे. गावातल्या एका मुलाच्या घरातल्या माडीवर रात्री बारा वाजता एक भूत घुंगरं लावून नाचत असतं. गावातले चारपाच धट्टेकट्टे लोक त्या भुताचा बंदोबस्त करायला जातात. त्या नाचणा-या भुताची ही गोष्ट आहे. ती प्रत्यक्षच वाचायला हवी.
‘लांब मिशीवाल्या माणसाचं रहस्य’ही गोष्ट आहे समशेर कुलुपघरे याच्या पराक्रमांची. म्हणजे शेरलॉक होम्स नाही ना असं तुम्हाला वाटेल, हो की नाही? एकदम बरोबर. समशेर मधला ‘शेर’, कुलुप म्हणजे ‘लॉक’ आणि घरे म्हणजे ‘होम्स’. ह्या समशेरचे नऊ पराक्रम या कथेत सांगितले आहेत. तर मग मित्रांनो, करा सुरुवात. हा दिवाळी अंक तुमचं भरपूर मनोरंजन करेल, हसवेल, खिदळवेल आणि काही ठिकाणी तुम्हाला विचार करायला लावून शहाणंही करेल.
- साधना : बालकुमार दिवाळी अंक
- किंमत : 20 रुपये
- पत्ता : साधना साप्ताहिक,सदाशिव पेठ, पुणे.
- फोन : 020-24432402
No comments:
Post a Comment