Sunday 27 November 2011

तुम्ही, आम्ही, आपण सगळेच

आठवीच्या वर्गातली मुला-मुलींची गडबड चाललेली असते. तेवढय़ात माळी सर वर्गात येतात. सारे चिडीचूप बसतात. पण माळी सर त्यांचे आवडते शिक्षक असतात. ते मुलांना विचारतात, आज कोणता दिवस आहे? मुलांना काही ते सांगता येत नाही. मग माळी सर सांगतात, आज संविधान दिन आहे. पण राहुल, तन्वी, सचिन, दिनेश, आनंद, प्रिया, केतन, विद्याधर कुणालाच या दिवसाबद्दल काही माहीत नसतं. मग माळी सर या दिवसाची आणि संविधान म्हणजे काय याची गोष्ट मुलांना सांगतात. त्या गोष्टीचं हे पुस्तक आहे. म्हणजे हे पुस्तक गोष्टी सारखंच आहे. म्हणून ते वाचताना कुठेही कंटाळा येत नाही. शिवाय पुस्तक वाचताना आपणही तन्वी, केदार, राहुलच्या वर्गात आहोत की काय असंच वाटायला लागतं.  म्हणजे हे गोष्टीचं पुस्तक नाही, पण त्यात एक गोष्टच सांगितली आहे. हे कवितेचंही पुस्तक नाही, पण कवितेसारखी मजा यात आहे.  
.. तर हे पुस्तक तुमचं, आमचं, आपल्या सगळ्यांचं  आहे. म्हणजे तुम्ही शाळेत जाता, शाळेतले शिक्षक तुम्हाला शिकवतात. पण तुमच्यामध्ये ते कधी भेदभाव करत नाहीत. अमूक मुलगा वा मुलगी श्रीमंत आहे वा अमूक गरीब आहेत म्हणून त्यांना वेगवेगळं शिकवलं जात नाही.  सर्वाना एकाच न्यायानं शिक्षणाचा लाभ दिला जातो. असं का होतं बरं? असा काही कायदा आहे का आपल्या देशात? याच्या राहुल, तन्वी, सचिन, दिनेश, आनंद, प्रिया, केतन, विद्याधर यांनी माळी सरांशी मारलेल्या गप्पा या पुस्तकात आहेत.
 काय काय आहे या पुस्तकात?15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला, हे आपल्या सर्वाना माहीत असतं. दरवर्षी हा दिवस आपण शाळेत साजराही करतो. त्या दिवशी दुपारनंतर आपल्याला सुट्टी असते, संध्याकाळी आई घरी गोड गोड पदार्थ करते. म्हणजे हा दिवस आपण राष्ट्रीय सणासारखा साजरा करतो. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे नक्की काय झालं? तर आपण स्वतंत्र झालो. पण मग देशाची घडी बसवण्याचं, त्याला शिस्त लावण्याचं काम त्या वेळच्या लोकांवर येऊन पडलं. त्यासाठी पं. नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्रप्रसाद अशा मोठमोठय़ा नेत्यांनी एकत्र येऊन भारताची राज्यघटना म्हणजे संविधान तयार करण्याचं काम हाती घेतलं. त्यासाठी त्यांनी अनेक देशांच्या घटनांचा अभ्सास तर केलाच पण आपल्या देशताले वेगवेगळे धर्म, जाती, वेगवेगळ्या प्रदेशात राहणारे लोक, त्यांचं त्यांचं वेगळेपण, शिक्षणाचं प्रमाण अशा अनेक गोष्टींचा विचार केला.  सर्व देशातल्या मुलांना शिक्षण घेता येईल अशी योजना तयार केली. आपला भारत लोकशाही देश असल्यानं त्यात लोकांना आपले प्रतिनिधी संसदेमध्ये निवडून देण्यासाठी मतदानाची पद्धत सुरू केली. देशातल्या लोकांना त्यांच्यातील भांडणामध्ये न्याय मिळावा यासाठी न्यायव्यवस्था तयार केली. म्हणजे थोडक्यात असं की, आपला देश हे एक मोठं कुटुंब आहे. त्यात कुणी काय करायचं, कुणी कुठली कामं करायची, याची जबाबदारी प्रत्येकाला नेमून दिलेली आहे. त्यानुसार प्रत्येक जण आपापली काम करतो. त्यामुळे या देश नावाच्या कुटुंबाचा एवढा मोठा कारभार अगदी बिनबोभाटपणे व्यवस्थित चालतो. या सगळ्या कारभाराचे नियम आपल्या घटनेमध्ये म्हणजेच संविधानामध्ये सविस्तर दिलेले आहेत. ही घटना 22 भागात लिहिलेली असून त्यात 395 कलमे आहेत. तर त्याला १२ पुरवणी कलमांची जोड दिलेली आहे. या घटनेमध्ये अनेक छोटय़ामोठय़ा गोष्टींचा विचार केला गेला आहे. म्हणजे असं की, राज्यपालपदी निवडणूक करायची असेल तर त्यासाठीच्या सर्व अटी, नियम दिलेले आहेत.  या घटनेमध्ये जसे आपल्याला अनेक अधिकार दिलेले आहेत, वेगवेगळी स्वातंत्र्यं दिलेली आहेत, तसंच आपण करायची कर्तव्ये आणि आपल्याकडून असलेल्या अपेक्षाही दिलेल्या आहेत.  न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही आपल्या घटनेची चार मुख्य मूल्ये आहेत. न्याय म्हणजे कोणावरही अन्याय होऊ नये यासाठीची यंत्रणा म्हणजे न्यायव्यवस्था. वैयक्तिक, सामाजिक, सार्वजनिक, राजकीय कुठल्याही प्रकारचा कुणावरही अन्याय होऊ नये यासाठी न्याययंत्रणा आहे. ज्यांच्यावर अन्याय होतो, त्यांना न्यायालयात दाद मागता येते. तेव्हा न्यायव्यवस्था सर्व साक्षी-पुराव्यांचा बारकाईने विचार करून निर्दोष व्यक्तीला मुक्त करते, तर जो गुन्हेगार असेल त्याला त्याच्या गुन्ह्याच्या स्वरूपानुसार शिक्षा केली जाते. हे आणखी सोपं करून सांगायचं तर तुम्हा मुलामुलांमध्ये शाळेत भांडणं झाली तर शिक्षक त्याची नीट चौकशी करून ती सोडवतात आणि ज्याची चूक असेल त्याला छडीचा प्रसाद दिला जातो, कान करून कोप-यात उभं केलं जातं किंवा उठाबश्या काढायला सांगितल्या जातात. न्यायव्यवस्थाही असंच काम करते.  
स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला जे हवं ते आपण करू शकतो. त्यात कुणीही आडकाठी आणू शकत नाही. पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. कारण आपल्याला बोलायचं स्वातंत्र्य घटनेनं दिलं असलं तरी आपण कुणालाही वाटेल तसं बोलू शकत नाही. आपल्या बोलण्यातून इतरांवर अन्याय होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागते.
 तिसरं मूल्य आहे समता. याचा अर्थ असा की, आपल्या घटनेनं सर्वाना समान हक्क दिला आहे. गरीब-क्षीमंत, काळा-गोरा, स्त्री-पुरुष असा कोणताही भेद आपला देश मानत नाही. म्हणूनच आपण एका शाळेत, एका वर्गात बसून शिकतो. त्यात कुठलाही भेदभाव केला जात नाहीत. आता शेवटचं मूल्य. ते आहे बंधुता. तुम्ही शाळेत रोज जी प्रार्थना म्हणता, त्यात कोणते शब्द आहेत? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत.. ही आपली प्रार्थना आपल्याला बंधूभावाचंच दर्शन घडवते. या संस्कारातून हा आपल्या सर्वाचा देश आहे, तो तुमचा, आमचा, आपल्या सगळ्यांचा देश आहे ही भावना रुजवली जाते. म्हणूनच मी आधी म्हणालो होतो की, हे गोष्टीचं पुस्तक नाही, पण यात यात आपल्या देशाची गोष्ट सांगितली आहे. ती वाचायला तुम्हाला नक्की मजा येईल. राहुल, तन्वी, सचिन, दिनेश, आनंद, प्रिया, केतन, विद्याधर यांच्याशी आणि माळी सरांशीही तुमची दोस्ती होईल.

No comments:

Post a Comment