Sunday, 27 November 2011

‘क’च्या काखेत कळशी, ‘ढ’ मुलखाचा आळशी

तुम्ही शाळेत ‘अ’ अननसाचा, ‘आ’ आगगाडीचा, ‘ई’ ईडलिंबू असं शिकता आणि ‘ए’ फॉर अ‍ॅपल, ‘बी’ फॉर बॉल, ‘सी’ फॉर कॅट असंही शिकता. या अक्षरांचा कधी विचार केला आहे का? ही अक्षरं अतिशय वळणदार, नेटकी आणि लफ्फेदार असतात. त्यांच्यामध्ये रुबाब असतो, त्यांची त्यांची ऐट असते. त्यामुळे त्यांना एक स्वतंत्र रूप मिळते. ‘घटाघटाचे रूप आगळे’ अशीच अक्षरांची अवस्था असते. पण ते आपल्या ब-याचदा लक्षात येत नाही. आपण त्या अर्थाने त्यांच्याकडे पाहातही नाही. या अक्षरांपासूनच आपली मराठी भाषा तयार झाली. भाषेपासून संस्कृती तयार झाली. त्यामुळे आपली भाषा आणि संस्कृती समजून घ्यायची असेल तर अक्षरांशी मैत्री केली पाहिजे, त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत.
 
अशाच गप्पा अनिल अवचट यांनी अक्षरांशी मारल्या आणि त्यातून हे पुस्तक तयार झालं. यात मराठी अक्षरं, इंग्रजी अक्षरं आणि आकडे यांच्याशी अवचटांनी गप्पा मारून त्यांना त्यांचं महत्त्व पटवून दिलंय. आणि एका अक्षरातून दुसरं अक्षर कसं निर्माण झालं तेही सांगितलंय. त्यामुळे हे पुस्तक वाचताना अक्षरांचं महत्त्व पटतं आणि त्यांच्यापासून तयार होणारी इतर अक्षरं कुठली तेही समजतं.
 
एकदा अनिल अवचटांना एक स्वप्न पडलं. ते स्वप्न काय होतं? तर त्यात अक्षरं आली त्यांना भेटायला, आणि त्यांना आपल्या तक्रारी सांगू लागली. सगळी अक्षरं एकदमच आल्यामुळे त्यांचं संमेलनच भरलं. हास्य-विनोदाला उधाण आलं. जो तो इतरांना टोमणे मारू लागला. टमटमीत पोटाच्या ‘ट’ला पाहून अवचट म्हणाले, ‘बुवा, पोट सुटलं तुमचं.’ तर बुवा म्हणतात कसे, ‘मी एकदाच जेवतो रात्री. पण ते सपाटून जेवतो. दिवसा काही खात नाही. त्यामुळे ती बाजू खपाटी.’ या ‘ट’ला लाडू फार आवडतात. पण एकदा एक लाडू त्याला चिकटून बसला आणि ‘ट’चा ‘ढ’ झाला. पण ‘ढ’ला काही दिवसांनी त्या लाडवाचं इतकं ओझं झालं की, त्याच्या बाकीच्या अक्षरमित्रांनी त्याला खालून टेकू दिला आणि ‘ढ’चा एकदम ‘द’ होऊन गेला.
 
अशा एकातून दुसरे, दुस-यातून तिसरे अक्षर तयार होऊन आपली बाराखडी तयार झाली. पण ही बाराखडी आपल्याला लवकर पाठ होत नाही. त्यामुळे तुम्हाला शाळेत मार बसतो, बोलणी खावी लागतात. घरीही आई-बाबा रागावतात. पण या पुस्तकातल्या अक्षरांच्या गोष्टी वाचल्या की, तुमची बाराखडी एकदम तोंडपाठ होऊन जाईल.
 अशीच इंग्रजी बाराखडी तुम्हाला घडाघडा म्हणून दाखवता येईल. ‘ए’ ते ‘झेड’च्या गमतीजमतीही या पुस्तकात आहेतच. ‘ओ’चे दोन तुकडे झाले आणि ते ‘आय’च्या दांडीला चिकटून बसले. मग त्याचा झाला ‘बी’. त्याच्या दांडय़ा खेचल्यावर त्यातली एक तुटली आणि त्यामुळे ‘बी’चा ‘पी’ झाला. आहे की नाही गंमत? अशीच एक ते दहा आकड्यांची गोष्ट आहे. त्यांचेही एकापासून दुसरे-तिसरे आकडे कसे तयार होतात, ते मात्र तुम्ही थेट पुस्तकातच वाचा. कारण हे सिनेमासारखं आहे. मी सगळीच गोष्ट तुम्हाला सांगून टाकली, तर त्यातली मजा निघून जाणार नाही का? सिनेमा पाहताना नाही का, आपल्याला आधीचं काहीच माहीत नसतं. म्हणून आपण ‘आता पुढे काय घडणार, आता पुढे काय होणार’ या उत्सुकतनं सिनेमा पाहतो. हे पुस्तक सिनेमासारखंच आहे. ते थेट तुम्ही वाचायला सुरुवात करा म्हणजे त्यात रंगून जाल. मग तुम्ही वाचलेली गंमत तुमच्या मित्रांना सांगा आणि सगळे मिळून अक्षरांशी गप्पाटप्पा करा. तुमचा वेळही मजेत जाईल आणि अभ्यासही होईल. उगाच कशाला शाळेत शिक्षकांची आणि घरी आई-बाबांची बाराखडी, पाढे येत नाहीत म्हणून बोलणी खा!

  • अक्षरांशी गप्पा : अनिल अवचट
  • मॅजेस्टिक पब्लिशिगं हाऊस, मुंबई
  • पाने : 56, किंमत : 90 रुपये

No comments:

Post a Comment