मित्रांनो, यंदाच्या दिवाळीत काय काय करायचं ठरवलंय तुम्ही? नसेल तर आतापासूनच करा. दिवाळी जवळ आलीय. लवकरच तुम्हाला सुट्टी मिळेल. मग काय तुमची मज्जाच मज्जा!
दिवाळीमध्ये अभ्यास-गृहपाठ यांना बुट्टी असते. नवे कपडे, फटाके, फराळ आणि खास तुमच्यासाठीचे दिवाळी अंक यांची गम्माडीजम्मत असते. तुमच्यासाठी या वर्षीचा सर्वात पहिला दिवाळी अंक बाजारात आलाय, तो साधना साप्ताहिकाचा. संपूर्ण रंगीत छपाई, अतिशय सुंदर सुंदर चित्रे आणि तितक्याच चांगल्या गोष्टी अशी सारी भट्टी या अंकात जमून आलीय. त्यामुळे तो तुम्ही वाचायलाच हवा. या अंकात मोजून सात गोष्टी आहेत. त्या प्रसिद्ध गीतकार गुलजार, कवी-नाटकाकर दासू वैद्य, लेखिका अरुणा ढेरे, कादंबरीकार राजन गवस, ललित लेखक अनिल अवचट, मालदीवमधील भारतीय उच्चायुक्त ज्ञानेश्वर मुळे आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी लिहिल्या आहेत. त्या अशा-‘घगू आणि जामिनी’, ‘पिल्लू’, ‘माळावरचा कुरणोजीबुवा’, ‘मोर्चा’, ‘डोंगरातली शाळा’, ‘नो रिवर्स गिअर’ आणि ‘आईला आठवताना’.
‘घगू आणि जामिनी’ ही गुलजार यांची गोष्ट आहे. ती आहे घगू या पक्ष्याविषयी आणि जामिनी या पतंगाविषयी. सुरूंच्या झाडाच्या दाट फांद्यांमध्ये घगू बसलेला असताना त्याला आकाशात उडणारी पिवळ्या आणि जांभळ्या रंगाची पतंगी दिसते. तिचे रंग घगूला फार आवडतात. घगू तिचं नाव ठेवतो जामिनी. तो रोज तिची वाट बघत सुरूच्या झाडावर बसून असे. जामिनी आल्यावर तिच्या अवतीभवती फिरून तिच्याशी बोलायचा प्रयत्न करे. पण जामिनी काही घगूशी बोलत नसे. मग घगू म्हणे, ‘अशी तो-यात वागतेस ना, तेव्हा तू खूप खूप छान दिसतेस!’ घगू जामिनीच्या प्रेमातच पडला. एके दिवशी आकाशात खूप ढग दाटून येतात, तेव्हा घगूला स्वत:पेक्षा जामिनीचीच अधिक काळजी वाटते. तो उडत उडत जामिनीला जाऊन सांगतो, ‘जामिनी खूप वादळ आणि पाऊस येणार आहे. लवकर घरी जा.’ पण तेवढय़ात जोराचं वादळ येतंच. मग पुढे काय होतं ते थेट गोष्टीतच वाचा बुवा. नाहीतर त्यातली गंमत निघून जाईल ना!
‘पिल्लू’ या गोष्टीत तुमच्यासारख्या शाळकरी मुलांची सहल शिकारघाटला जाते. तिथे मुलं खूप गमतीजमती करतात. कोणी पाण्यात पोहतं, कोणी मासोळ्या पकडतं तर कोणाला कासवाचं छोटंसं पिल्लू सापडतं. पण ते बसमध्ये हरवतं. तो खूप दु:खी कष्टी होतो. पण आल्यावर त्याची आजी त्याला कासव देते. ते कासवच असतं, पण वेगळं.
अरुणा ढेरे यांची गोष्ट माळ्यावरच्या कुरणोजीबुवाविषयी आहे. गुरं साभाळणा-या किशा आणि त्याच्या मित्रांसोबत राम हा मुलगा एके दिवशी त्यांच्याबरोबर जातो. गुरं सांभाळणारी त्याची मित्रमंडळी त्याला कुरणोजीबुवाची मजेशीर गोष्ट सांगतात. चिंचेच्या झाडाखाली हा कुरणोजीबुवा राहत असतो. तुम्हाला भेटायचंय का त्या कुरणोजीबुवाला? बुवा तसा वाईट नाही, पण गमतीशीर आहे.
‘मोर्चा’ ही राजन गवस यांची गोष्ट भटक्या समाजातल्या बंदुक्या आणि पोलिश्या या मुलांची आहे. ज्ञानेश्वर मुळे हे एक सेकंडहँड गाडी विकत घेतात. त्या गाडीला रिवर्स गिअर नसतात. त्यामुळे होणा-या अनेक गमतीजमती या गोष्टीत आहेत. धक्का स्टार्ट गाडीची फट्फजिती या गोष्टीत आहे. रघुनाथ माशेलकरांनी लहाणपणी मुंबईतल्या गिरगावात शिकत असतानाच्या आणि आपल्या आईच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. तर अनिल अवचटांनी डोंगरातल्या शाळेची गोष्ट सांगितली आहे.
या अंकातल्या सातही गोष्टी तुम्हाला आवडतील अशा आहेत. यातल्या काही गोष्टींमध्ये धमाल मजा आहे तर काही गोष्टी वाचताना तुम्ही खळखळून हसाल. - साधना बालकुमार दिवाळी अंक,
- संपादक : नरेंद्र दाभोळकर,
- पाने : 32, किंमत : 24 रुपये
No comments:
Post a Comment