Sunday, 27 November 2011

क्यांग, कांतचिल आणि पेलंडूक

मित्रांनो, आशियातल्या प्राण्यांच्या गोष्टींच्या एका पुस्तकाची मी या वेळी ओळख करून देणार आहे.
 
जंगलातल्या प्राण्यांच्या अनेक गोष्टी तुम्ही आजी-आजोबा, आई-बाबा यांच्याकडून ऐकल्या असतील, पुस्तकांतून वाचल्या असतील. त्या तुम्हाला आवडल्याही असतील. जंगलातले सगळे प्राणी आपल्यासारखेच बोलतात, या सगळ्या गोष्टींमध्ये! पण त्यांच्या मनात काय चाललंय, ते कसला विचार करत आहेत, हे आपल्याला आपसूकच समजतं. त्यांचा बहादूरपणा समजतो आणि कोल्हा, लांडगा, ससा हे वाघ, सिंह, चित्ता यांच्यापेक्षा तुलनेनं खूप लहान असलेले प्राणी आपल्या अक्कलहुशारीनं संकटांवर कशी मात करतात, तेही समजतं.
 
पण हे तुम्हाला माहीत आहे का, की जगातल्या सगळ्याच देशातले प्राणीही तिथल्या तिथल्या लोकांच्या भाषेत बोलतात! वाघ, सिंह, चित्ता, हत्ती, हरीण, कोल्हा, ससा, काळवीट हे प्राणी या गोष्टींमध्येही असतात. आशियातल्या प्राण्यांच्या गोष्टींचं पुस्तकही असंच आहे. आणि मजेशीरही. या पुस्तकात एकंदर सहा गोष्टी आहेत. पण या सर्वच गोष्टी अतिशय चांगल्या आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये सुंदर सुंदर चित्रंही आहेत. त्यामुळे हे पुस्तक नुसतं वाचण्याचंच नाही तर पाहण्याचंही आहे. पुलक विश्वास यांनी प्रत्येक गोष्टीला न्याय देतील अशीच चित्रं काढली आहे. शिवाय हे पुस्तक नॅशनल बुक ट्रस्टचं असल्यामुळे त्याची मांडणी, लेआऊट आणि निर्मिती तर चांगली आहेच. पण किंमतही खूपच कमी आहे. शिवाय संपूर्ण पुस्तक रंगीत आहे.
 
तर, गोष्टींकडे वळू या. पहिलीच गोष्ट आहे, ‘सशाला शहाणा का म्हणतात?’ कारण ससा आपली सिंहाच्या तावडीतून सुटका तर करून घेतोच, पण जंगलातल्या रोज एका प्राण्याची शिकार करणाऱ्या सिंहालाच विहिरीत युक्तीनं बुडवून मारून टाकतो. या युक्तीसाठी ससा कोणती भन्नाट आयडिया लढवतो, ते या गोष्टीमध्ये सांगितलं आहे.
 
दुसरी गोष्ट शिवाळू या हुशार आणि लबाड कोल्ह्याची आहे. या कोल्ह्याला एकदा आख्खा मेलेला हत्ती सापडतो. पण त्याची कातडी इतकी जाड असते की, ती त्याला सोलता येत नाही. पण तिथं आधी सिंह, मग वाघ आणि नंतर चित्ता येतो. कोल्हा सिंह आणि वाघाला युक्तीनं घालवून देतो. पण चित्त्याकडून मात्र हत्तीची कातडी सोलून घेतो आणि त्यालाही वाटेला लावतो.
 
तिस-या गोष्टीतही कोल्हा आहे, पण तो इथं म्हाता-या सिंहाला न फसवता त्याला ताज्या डुकराची शिकार मिळवून देतो. पण त्या डुकराचा सर्वात चविष्ट भाग मेंदू स्वत:च खाऊन टाकतो. आणि वर सिंहालाच ऐकवतो की, ‘महाराज, डुकराला मेंदूही नसतो आणि अक्कलही नसते.’
 
चौथ्या गोष्टीत कोल्हा, लांडगा, ससा आणि क्यांग नावाचे गाढव आहे. कोल्हा आणि लांडगा या गाढवाची मेजवानी करण्यासाठी निघालेले असतात. वाटेत त्यांना ससा भेटतो. या दोघांची योजना ऐकून सश्याला खूप वाईट वाटतं, आणि गाढवाची दया येते. तोही मग कोल्हा व लांडगा यांची योजना त्यांच्यावरच उलटवण्याचा बेत आखतो. आणि शेवटी कोल्हा व लांडगा यांना मारून टाकतो. गाढवाचा जीव वाचवतो. तो दिवस सश्याचा आयुष्यातला सर्वात आनंदाचा असतो, कारण त्यानं दुष्टांच्या हातून आपल्या एका मित्राला वाचवलेलं असतं.
 
या पाचव्या गोष्टीत पेलंडूक नावाचा उंदीर जंगलाचा न्यायाधीश होतो. खरं तर तशी त्याची इच्छा नसते, पण सालोमन हा राजा फारसा शहाणा नसतो, त्याला पेलंडूक थोडा शहाणपणा शिकवतो. पण सालोमन शेवटी माणूसच. तो उंदराला आपला न्यायाधीश न नेमता जंगलाचा न्यायाधीश नेमतो. पेलंडूकची त्याबाबत काहीच तक्रार नसते.
 
‘चुन्याचा पवित्र खड्डा’ ही या गंमतीदार पुस्तकातली शेवटची गोष्ट. या गोष्टीतला कांतचील हा उंदीर एका खड्डय़ात बसून एक पवित्र पुस्तक वाचत असतो. त्या पुस्तकात लिहिलेलं असतं की, आज प्रलय होणार आहे. त्यामुळे वाघ, डुकर, हत्ती घाबरून त्या खड्डय़ात आश्रयाला येतात. पण कांतचीलनं आपल्याला फसवलं आहे हे लक्षात येताच त्याला बाहेर फेकून देतात..नाही कांतचीलची सुटका करतात आणि स्वत: आत अडकून पडतात.

  • शहाणे आणि चतुर प्राणी : कला थैरानी,
  • मराठी अनुवाद : नीना हेजीब
  • नॅशनल बुक टॅस्ट, रवींद्र नाट्य मंदिर, मुंबई
  • पाने : 32, किंमत : 25 रुपये

No comments:

Post a Comment