‘‘मुंग्या कधीही खडूची रेषा पार करत नाहीत.’’
‘‘जिथे प्रकाश पोचत नाही इतक्या खोल समुद्रातही मासे असतात.’’
‘‘स्थलांतर करणारी फुलपाखरे चौदा दिवसात तीन हजार किलोमीटर प्रवास करू शकतात.’’
‘‘साप आणि मुंगसाची लढाई जुंपते, त्या वेळी मुंगसाच्या अंगावरील केस ताठ उभे राहतात. त्यामुळे सापाला त्याचा चावा घेता येत नाही.’’
मित्रांनो, या अद्भुत पुस्तकात अशा अद्भुत गोष्टींचा मोठ्ठाच्या मोठ्ठा खजिना आहे खजिना! पण हे काही अभ्यासाचं पुस्तक नाही आणि निव्वळ माहितीचंही नाही. तर ते माहिती आणि गोष्टी अशा दोन्हींचंही आहे. म्हणजे या पुस्तकात माहिती गोष्टीसारखी सांगितली आहे.
या गोष्टी सांगतो, चंदूकाका. त्याला तुम्ही ओळखत नसाल. हो की नाही? पण काही हरकत नाही. हे पुस्तक वाचायला सुरुवात केली की, तुमची त्याच्याशी एकदम गट्टीफू होऊन जाईल. तो आहेच तसा!
या चंदूकाकाला तुमच्यासारखी मुलं खूप आवडतात. आणि मुलांनाही तो खूपखूप आवडतो. का म्हणून विचारता? अहो, तो आहेच मुळी गोष्टीवेल्हाळ आणि बडबडा. पण त्याच्या बडबडीत तो नकळत आपल्याला अनेक गोष्टींबद्दल माहिती देतो. म्हणजे आपल्या घरात, हॉटेलांत..जिथं जिथं खाण्याचे पदार्थ असतात, तिथे तिथे माशा असतात. आपण तिचा ‘घाण’ म्हणून तिरस्कार करतो. पण माशीबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. ‘‘माशीला दोन हजारावर डोळे असतात.’’ यावर तुमचा विश्वास बसेल? आणि एवढुशा माशीला इतके डोळे? पण ही खरीच गोष्ट आहे. हे डोळे कुठे असतात, कसे असतात यासाठी तुम्हाला आधी चंदूकाकाची ओळख करून घेतली पाहिजे.
पाल, मुंगी, झुरळ, मुंगळा, कसर, उंदीर, कोळी, ढेकूण, यांच्याबद्दलही आपल्याला फारशी माहिती नसते. हे प्राणी आपल्या घरात राहतात आपल्याबरोबर. पण आपण त्यांची नीट ओळखच करून घेत नाही.
या झाल्या घरातल्या गोष्टी. पण आपल्या घराभोवतालच्या वा चौकातल्या बागेतल्या मित्रांबद्दलही आपण फार जाणून घेत नाही. तिथं सुट्टीच्या दिवसी खेळायला मात्र जातो. या बागेत सरडे, वाळवी, घरकावळा, कुंभारमाशी, गांधीलमाशी, पैसा, गांडूळं, वेगवेगळे पक्षी असतात. यातले काही प्राणी आपल्याला अज्जिबात म्हणजे अज्जिबात आवडत नाहीत! आपण त्यांचा राग राग करतो. कावळ्याला तर दिसताक्षणी हाकलून लावतो. हो की नाही?
पण हे तुम्हाला माहीत आहे का, निसर्गातला कुठलाच प्राणी निरुपयोगी नसतो! प्रत्येकात काही ना काही खासियत असते. आपण त्यांच्याकडून बरंच काही शिकू शकतो. सरडा आपल्याला कुरूप वाटत असला तरी तो खूप चपळ असतो. त्याच्या झाडावरच्या हालचाली पाहण्यासारख्या असतात. या चपळाईने तो शत्रूंपासून स्वत:चं संरक्षण करतो आणि आपलं भक्ष्यही पकडतो. आहे की नाही गंम्माडीजम्मत?
या पुस्तकात चंचूकाकाने मोठय़ा बागेतल्या, समुद्रातल्या, जंगलातल्या, प्राणी, पक्षी, किटक, मासे, वाघ, बिबळ्या, साप, हरिणं, फुलपाखरं यांच्या कितीतरी गोष्टी सांगितल्यात. आणि त्याही अगदी रंगवून रंगवून. चंदूकाका दामिनी आणि तिच्या मित्रांना घेऊन बागेत, जंगलात, समुद्र किनाऱ्यावर जातो. आणि तिथं त्यांना जे जे दिसतं त्यांची माहिती सांगतो. दामिनी आणि तिचे मित्र त्याला अनेक प्रश्न विचारून भंडावून टाकतात. त्यामुळे हे पुस्तक वाचताना मोठ्ठी मज्जा येते! या चंदूकाकाने आपल्यालाही अशा गोष्टी सांगाव्यात, आपल्याशीही बोलावं असं तुम्हाला वाटत असेल नाही आता? मग तुम्ही त्याच्याशी सरळ दोस्ती करून टाका, म्हणजे प्रश्न मिटला!
- परिसरातील प्राणिसृष्टीची ओळख
- चंदूकाका : निलीमकुमार खैरे
- ज्योत्स्ना प्रकाशन, मुंबई
- पाने : 104, किंमत : 50 रुपये
No comments:
Post a Comment