Sunday, 27 November 2011

बिन भिंतींची शाळा

मित्रांनो, तुम्ही मोठय़ा, खूप यश मिळवलेल्या लोकांच्या गोष्टी आई-बाबा, आजी-आजोबा यांच्याकडून आणि शाळेतल्या शिक्षकांकडूनही ऐकल्या असतील. राजा-राणीच्या, दुष्ट चेटकिणीच्या आणि राजकुमाराच्या पराक्रमाच्या गोष्टी तुम्हाला खूप आवडतातही. आपणही मोठं झाल्यावर असंच बहादूर व्हायचं, असं तुम्हाला वाटत असतं. तुम्ही ‘तू मोठेपणी काय होणार?’ असं कुणी विचारल्यावर मारे ऐटीत ‘सैनिक होणार, डॉक्टर होणार, हिरो नाहीतर हिरॉईन होणार’ अशी काय काय उत्तरं देत असता.
 
असं काहीतरी होण्यासाठी तुम्ही मग शाळेत जाता, अभ्यास करता, आई-बाबांचं ऐकता, काका-मामांचं ऐकता. ते करतात तशा गोष्टी करून पाहता. त्यात कधी कधी तुमची फजितीही होते. म्हणजे तुम्ही बाबा ऑफिसला गेल्यावर त्याचा टाय गळ्यात अडकवून आणि त्याचे शूज घालून त्याच्यासारखं ऐटीत चालायला लागता, पण मध्येच धडपडता. मात्र असं एक-दोन वेळा पडल्यावर नेमकी काय गडबड होते, हे तुमच्या लक्षात येतं आणि ती चूक तुम्ही पुढच्या वेळी टाळण्याचा प्रयत्न करता. आणि एक वेळ अशी येते की, तुम्हाला बाबाचा टाय आणि शूज घालून त्याच्यासारखं व्यवस्थित चालायला येतं. तसं तुम्ही आईला चालून दाखवून भाव खाता.
 
म्हणजे जे तुम्हाला येत नाही, ते तुम्ही चार-दोनदा प्रयत्न करून शिकता. आणि काही दिवसांनी ते तुम्हाला व्यवस्थित यायला लागतं. असं सगळ्याच गोष्टींबाबत होतं. शाळेच्या अभ्यासाचंही असंच असतं. एखादी कविता पुन्हा पुन्हा वाचली की, ती आपल्या लक्षात राहते, तोंडपाठ होते. इंग्रजी शब्दांचे स्पेलिंगही पुन्हा पुन्हा घोकून पाठ होतं. नीट लक्ष देऊन वाचलं की लक्षात राहतं, रोज रोज मैदानावर खेळायला गेलं की, काही दिवसांनी तो खेळ चांगला खेळता येतो.
 
तुमच्या अवतीभवती कितीतरी आणि काय काय घडत असतं. ते पाहून तुम्हाला अनेक प्रश्न पडतात. खरं तर तुमच्या सारखे सारखे प्रश्न विचारण्याने आई-बाबा आणि शाळेतले शिक्षकही ब-याचदा हैराण होतात. कारण तुम्ही सतत काही ना काही विचारत असता. तुम्ही असा कधी विचार केलाय का, की मोठय़ा माणसांना का बरं असे प्रश्न पडत नाहीत? ते कुणाला विचारतात? त्यांनाही तुमच्याइतके नसले तरी कधी कधी प्रश्न पडतातच. ते त्यांच्या आई-बाबांना म्हणजे आजी-आजोबांना, इतर मोठय़ा माणसांना विचारतात. ज्यांना पुस्तकाची आवड असते, ते आई-बाबा लोक त्या त्या विषयावरची पुस्तकं आणून वाचतात. त्यातून त्यांचं समाधान होतं. काही लोक कॉम्प्युटरवर बसून आपल्याला हवी ती माहिती मिळवतात.
 
घरी येणारा पेपरसुद्धा रोज काहीतरी नवीन सांगत असतोच. म्हणूनच आपण तो वाचतो. समजा त्यानं रोज रोज त्याच त्याच बातम्या, माहिती सांगितली तर आई-बाबा आणि इतर मोठी माणसं तो पेपर वाचतील का? नाही वाचणार!
  कुठलाच माणूस जन्मत:च काही सगळ्या गोष्टी शिकलेला नसतो. जगातले सगळेच लोक जन्मतात तेव्हा अडाणीच असतात. मग ते आईकडून, बाबाकडून, आजी-आजोबाकडून, शाळेतल्या शिक्षकांकडून, मित्र-मैत्रिणींकडून, इतर मोठय़ा माणसांकडून रोज काही ना काही शिकतात, त्यांच्यासारखं वागून पाहतात, करून पाहतात. म्हणजे कुठल्याही लहान मुलाला मोठं झाल्यावर डॉक्टर, वकील, इंजिनिअर, चित्रपटातला अभिनेता होण्यासाठी अनेक गोष्टी रोजच्या रोज शिकाव्या लागतात. त्याचं हे शिक्षण फक्त शाळेतच चालू असतं असं नाही, तर ते घरी, खेळाच्या मैदानात, सिनेमा पाहताना, पेपर वाचताना, प्रवास करताना, गप्पा मारताना चालूच असतं.
जग हीच सर्वात मोठी शाळा असते आणि आई हीच पहिली शिक्षक असं म्हणतात, ते यामुळेच. पण तरीही आपण काही गोष्टींचं रितसर शिक्षण घेण्यासाठी शाळेत जातोच. कारण तिथलं शिक्षणही महत्त्वाचं असतं. आपण जसजसे मोठे होत जातो, तसतशी आपल्या शिक्षणाची भूक वाढत जाते, आपण भराभर नवनव्या गोष्टी शिकायला लागतो.
 
तुम्ही मजा म्हणून, गंमत म्हणून, वेळ घालवण्यासाठी गोष्टींची पुस्तकं वाचता. पण ती सुद्धा नकळत तुमच्या मनावर चांगले संस्कार करत असतात, नव्या गोष्टी तुम्हाला शिकवत असतात. गोष्टी वाचून वाईट काय आहे, चांगलं काय आहे, यातला फरक आपल्याला कळायला लागतो. काहीतरी पराक्रम करायची, बक्षीस मिळवायची इच्छा निर्माण होते.
 
म्हणजे गोष्टींची पुस्तकंही आपल्याला काही ना काही शिकवतच असतात. आज तुमच्यासाठी मी ‘उत्तम संस्कार कथा’ हे पुस्तक निवडलं ते याचसाठी की, या पुस्तकातल्या कथा अशाच खूप चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगतील, शिकवतील. या गोष्टी वाचताना तुम्हाला कधी कधी हसायला येईल, कधी कधी फार आनंद होईल, तर कधी कधी तुम्हाला वाईटही वाटेल. पण एखादा सिनेमा पाहताना किंवा मग नाटक पाहताना, नाहीतर तर एखादी तुमच्या आवडीची कार्टून मालिका पाहताना जेवढा तुम्हाला आनंद होतो, मजा येते, तेवढाच आनंद हे पुस्तक वाचतानाही होईल. कारण ‘उत्तम संस्कार कथा’ असं नाव असलं तरी हे मुळात गोष्टींचं पुस्तक आहे. शिवाय या गोष्टी मराठीबरोबरच गुजराती, उर्दू, तेलुगु, हिंदी, सिंधी आणि इंग्रजी अशा वेगवेगळ्या भाषेतल्या आहेत. या पुस्तकाचे वेगवेगळ्या वयोगटांसाठी तीन भाग आहेत.
 उत्तम संस्कार कथा (इयत्ता दुसरी ते चौथी) : संपादन : माधव राजगुरू,  
बालभारती पाठय़पुस्तक मंडळ, पुणे
,पाने : 56, किंमत : 20 रुपये

No comments:

Post a Comment