माधुरी पुरंदरे म्हणजे माधुरीताई हे तुम्हाला माहीत असेल. त्यांची काही पुस्तकंही तुम्ही वाचली असतील. ‘वाचू आनंदे’ हे भन्नाट पुस्तक वाचलं की नाही? ते माधुरीताईंनीच तयार केलं आहे. ‘झाड लावणारा माणूस’, ‘राधाचं घर’, ‘चित्रवाचन’, ‘किकीनाक’ अशी अनेक सुंदर सुंदर आणि चांगली चांगली पुस्तकं माधुरीताईंनी आजवर लिहिली आहेत. ‘मासोळी आणि चिमुकलं पाखरू’ हे असंच त्यांचं छोटुकलं पण चांगलं पुस्तक आहे. नुकतीच त्याची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे.
..तर या पुस्तकात ‘थंडी पळाली,’ ‘मधात पडली आळशी’, ‘मासोळी आणि चिमुकलं पाखरू’ अशा तीन गोष्टी आहेत. या सगळ्याच गोष्टींना खूप खूप आणि सुंदर सुंदर चित्रं काढली आहेत मेधा सुदुंबरेकर यांनी. म्हणजे यातलं एकही चित्र रंगांनी काढलेलं नाही. तर ते वेगवेगळे रंगीत कागद कापून तयार केलं आहे. पण तरीही ही चित्रं अगदी काढल्यासारखी वाटतात. आणि ती सुंदर तर आहेतच. म्हणजे बबी, लिंबू उंदिर, पंकज, खारूताई, झाडं, धनगराचा मुलगा..सगळी सगळी चित्रं पाहताच असं वाटतं की, ती आता बोलायला लागतील.
तुम्ही हे पुस्तक उघडून बघा, तुमच्याशीही ही चित्रं नक्की बोलतील. किंवा समजा तुम्हाला त्यांचं बोलणं ऐकायचं असेल तर तेही ऐकता येईल, वाचता येईल. म्हणजे एक मधमाशी असते. तिला कामाचा ज्याम म्हणजे फार म्हणजे भयंकरच कंटाळा असतो. पण इतर मधमाश्यांबरोबर तिला काम करावंच लागायचं, नाहीतर उपाशी राहावं लागायचं. एके दिवशी तिला असाच फार म्हणजे अतीच कंटाळा येतो. ती म्हणते, ‘‘आज मी नाही उठणार लवकर. कामावर जाणार नाही, मध गोळा करणार नाही, अश्शी पंख मिटून बसून राहीन.’’ ही आळशी माशी ‘मधात पडली आळशी’ या गोष्टीतली आहे. या गोष्टीत आळशीच्या धम्माल फजितीची मोठी गंमत आहे. आळशी फुकटचा मध चापायला जाते आणि मधाच्या बरणीतच अडकून पडते. मग ती भुरक्या मांजरीला, चिऊताईला, मंटू कुत्र्याला, लिंबू उंदराला अशा सगळ्यांना ती मदत करायला सांगते. पण कुण्णीकुण्णी तिला मदत करत नाही. ती रडकुंडीला यायला लागते. तेवढय़ात पंकज येतो आणि तिची सुटका करतो. तेव्हापासून आळशीची खोड मोडते. तिला चांगलीच अद्दल घडते.
‘थंडी पळाली’ ही पहिलीच भरपूर लोकरीचं जावळ अंगावर असलेल्या बबीची गोष्ट आहे. बबी चिऊताईला, काऊताईला, साळुंकी, बाया, शिंपीण, बुलबुल, दयाळ, कबुतर आणि उंदिरमामा, खारूताई, चिचुंद्री, मुगूंस अशा सगळ्यांना मऊमऊ गादी करायला आपली थोडी थोडी लोकर देते. तिच्याही अंगावरचं ओझं कमी होतं. पण काही दिवसांनी थंडी पडते. बबी गारठून जाते. मग ती आधीच्या सगळ्यांकडे आपली लोकर मागायला जाते, पण सगळ्यांची बाळं गारठून जातील म्हणून कुण्णीच तिला लोकर परत देत नाही. बबी हिरमुसून जाते. तेवढय़ात धनगराचा मुलगा येतो. तो बबीला आपल्या ऊबदार घोंगडीत लपेटून घेतो. बबीची थंडी पळून जाते.
‘मासोळी आणि चिमुकलं पाखरू’ ही एका माशाची आणि चिमुकल्या पाखराची गोष्ट आहे हे तुम्हाला नावावरूनच कळलं असेल. या दोघांची मैत्री होते. दोघेही सुंदर असतात. पाखरू रोज तळ्याकाठी येऊन मासोळीशी गप्पागोष्टी करत असतं. तिला दूरदूरच्या गावच्या गोष्टी सांगतं. ती गावं मासोळीनं कधीच पाहिलेली नसतात. ती तळं सोडून कधीच कुठे गेलेली नसते. तिच्या आईबाबांनी तिला मुळी कुठं फिरायलाच नेलेलं नसतं. पाखराच्या गोष्टी ऐकून मासोळीला आपणही त्याच्यासारखं आकाशात उडावंसं वाटू लागतं. ती आई-बाबाकडे जाऊन त्यांना ‘उडायचं कसं ते शिकवा’ असं सांगते पण ते दोघेही तिला ‘मासे कधी उडतात का?’ म्हणून वेडय़ात काढतात. मासोळीला आई-बाबांचा खूप म्हणजे फारच म्हणजे भयंकरच राग येतो. मग ती पाखराला त्याला उडायला शिकवायला सांगते. पण पाण्याबाहेर गेल्यावर मासोळीला श्वासच घेता येत नाही. पाखराला तिला पुन्हा पाण्यात ढकलता येत नाही. तेवढय़ात एक बेडूकदादा येतो आणि मासोळीला पाण्यात टाकतो. तेव्हापासून मासोळी उगाच भलतेसलते हट्ट करत नाही. पाण्यातल्या गमतीजमती पाहात खेळत राहते.
तर अशा या तीन मजेदार गोष्टी आहेत. त्या तुमच्या पटकन वाचून होतील खऱ्या. पण त्या पुन्हा पुन्हा वाचाव्या अशा आहेत. पहाच तुम्ही हे पुस्तक तुम्हाला खूप म्हणजे फारच म्हणजे मस्तच आवडेल.
No comments:
Post a Comment