Sunday, 27 November 2011

पुस्तकांबद्दलचं पुस्तक

आपण पुस्तकं का वाचतो? किंवा आई-बाबा, शाळेतले शिक्षक आपल्याला पुस्तकं का वाचायला सांगतात? अभ्यास का करायला सांगतात? माहितेय का? तर आपल्याला त्यातल्या माहितीची, ज्ञानाची आणि जगाची ओळख व्हावी. वेद, पुराणं, पंचतंत्र, जातककथा, कथासरित्सागर, रामायण, महाभारत, ही आपल्याकडील अमर पुस्तकं. म्हणजे ती लिहिली गेली हजारो वर्षापूर्वी, पण ती अजूनही वाचली जातात, वाचावीशी वाटतात. अनेक लोकांना तर ती तोंडपाठही असतात. असं काय आहे त्यांच्यामध्ये? तेच या अमर पुस्तकेमध्ये सांगितलं आहे. म्हणून हे पुस्तकांबद्दलचं पुस्तक आहे.
 
यातला पहिलाच लेख आहे की कुठलंही पुस्तक जाळून टाकलं, फाडून टाकलं वा नष्ट केलं तरी त्यातले विचार नष्ट होत नाहीत. ते पुस्तक वाचलेल्या लोकांच्या मनात ते असतातच. पुस्तकं आपल्याला जगायचं भान देतात, कसं जगायचं याची शिकवण देतात..समाजात कसं वागावं, बोलावं, काय करावं, काय करू नये..खरं कशाला म्हणतात, खोटं कशाला म्हणतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेहमी सत्याचाच विजय का होतो याचा वस्तुपाठ पुस्तकातून पुन्हा पुन्हा सांगितलेला असतो.
 या पुस्तकात वेद, पुराणं, पंचतंत्र, जातककथा, कथासरित्सागर, रामायण, महाभारत या आपल्याकडच्या गेली हजारो वर्षे घराघरात वाचल्या जाणाऱ्या पुस्तकांची अगदी सोप्या भाषेत ओळख करून दिली आहे. म्हणजे परमात्मा, परमसुख, सत्य म्हणजे काय आणि त्यांचा माणसाला काय उपयोग असतो, याची चर्चा वेदांमध्ये सांगितली आहे. प्राचीन काळी ज्ञान मिळवण्यासाठी नचिकेतासारखे जे कष्टाळू, निश्चयी लोक होऊन गेले त्यांच्या कथा उपनिषदांमध्ये सांगितल्या आहेत.
रामायणाबद्दल काय सांगावं? आतापर्यंत त्यातल्या ब-याच गोष्टी तुम्ही आजी-आई-बाबा यांच्याकडून ऐकल्या असतील. रामायण हे आपल्याकडचं पहिलं खरंखुरं महाकाव्य. पण त्याहीपेक्षा रामायणातून एक सद्वर्तनी राजा आपल्या प्रजेचा किती लाडका होऊ शकतो हे ज्याच्या उदाहरणातून समजतं त्या रामाची कथा आहे. महाभारत ही चांगल्या-वाईटाची लढाई आहे. पांडव चांगले का? आणि कौरव वाईट का? हे समजून घेण्यासाठी महाभारत वाचले पाहिजे.
 
पुराणांमध्ये जग कसं तयार झालं, ते स्थिर कसं झालं, त्यातल्या काही गोष्टी नष्ट कशा झाल्या आणि त्यात नव्या सृष्टीची, शोधांची उत्पत्ती कशी होत राहिली याच्या मोठय़ा सुरस कथा आहेत. तिरुक्कुरलहा तामिळनाडूतील काव्य ग्रंथ. त्यात माणसाला कधी कधी ज्या कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, त्याविषयी फार उत्तम मार्ग सुचवले आहेत.
 कथासरित्सागरमध्ये राजे-महाराजे, भूतंखेतं, हुशार मुलं-मुली, दुष्ट लोक आणि चांगले लोक, जादूचे पर्वत आणि बोलणारे प्राणी अशा जगातल्या अद्भुत गोष्टींचा खजिना आहे.
पंचतंत्राबद्दलही तुम्हाला काही सांगायला नको. पंचतंत्रातल्या गोष्टी प्राण्यांच्या असल्या तरी त्या माणसालाही लागू पडतात. आदर्श मित्र कोण, मैत्री कशी टिकवावी, मोह कसे टाळावेत, लबाडी का करू नये यांची शिकवण पंचतंत्रातून दिली आहे. तर जातककथेत बौद्ध धर्मातल्या पण धर्माच्या पलीकडे जाणा-या मानवी सद्वर्तनाच्या गोष्टी आहेत. कौटिल्य अर्थशास्त्रहा असाच आपल्याकडील प्राचीन ग्रंथ. पण तो गोष्टींचा वा कथांचा नाही. तो पैसा कसा वापरावा आणि राजानं कसं वागावं याचे धडे देणारा ग्रंथ आहे.
 मित्रांनो, ही एवढय़ा सगळ्या मोठमोठय़ा पुस्तकांची तोंडओळख या अमर पुस्तकेमध्ये आहे. हे पुस्तकं वाचून तुम्हाला वरची सगळी पुस्तकं का वाचायची हे कळण्यास मदत होईल. तेव्हा, करा सुरुवात..
  • अमर पुस्तके : मनोज दास, अनु. श्यामला शिरोळकर
  • पाने : 64, किंमत : 18 रुपये
  • नॅशनल बुक ट्रस्ट, विभागीय कार्यालय, रवींद्र नाटय़ मंदिर, मुंबई.

No comments:

Post a Comment