Sunday, 27 November 2011

देणारं झाड...

देणा-याने देत जावे
 
घेणा-याने घेत जावे
 
घेता घेता देणा-याचे हातच घ्यावे
 
अशी विंदा करंदीकर यांची सुंदर कविता आहे. पुस्तकं लिहिणारे लोकही असेच ‘देणारे’ असतात, आणि वाचणारे ‘घेणारे’ असतात. असाच मुलांसाठी सतत नवीन आणि चांगली चांगली पुस्तक ‘देणारा’ अमेरिकेत एक लेखक होता.  शेल सिल्व्हरस्टाइन. त्याला आपण शेल अंकल म्हणू.
 
शेल अंकलनं मुलांसाठी खूप पुस्तकं लिहिली, कविता लिहिल्या आहेत. तो संगीतकार होता, गाणीही लिहायचा. चित्रंसुद्धा काढायचा. त्याच्या पुस्तकांचा वीसेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे आणि त्यांच्या जवळपास दोन कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत. शेल अंकलला मुलांसाठी लिहायला खूप आवडायचं.
 
शेल अंकलने ‘अंकल शेल्बी एबीझेड बुक’, ‘अ गिव्हिंग ट्री’, ‘अ जिराफ अँड अ हाफ’, ‘द लायन हू शॉट बॅक’, अशी अनेक पुस्तकं मुलांसाठी लिहिली आहेत. आणि ती सर्वच्या सर्व उत्तम म्हणावी अशी आहेत.
 
‘अ गिव्हिंग ट्री’ हे शेल अंकलचं छोटंसं पुस्तक आहे. त्यात त्यानं ‘देणा-या’ झाडाची गोष्ट सांगितली आहे. झाडाचा एक मोठा गुणधर्म असतो. ते आपल्याला सतत देत असतात. काय काय देतात झाडं आपल्याला? पानं, फळं, फुलं, फांद्या, लाकडं, बुंधा, सावली, ऑक्सिजन, सगळं काही देतात. आपण वाहनं चालवून, काय काय जाळून धूर करतो. झाडं तो शोषून घेतात आणि आपल्याला शुद्ध ऑक्सिजन देतात.
 
इतकंच नाही तर मेल्यावरही आपल्याला उपयोगी पडतात. झाडं स्वत:साठी काहीही राखून ठेवत नाहीत. शिवाय देताना ‘त्या बदल्यात तू मला काय देशील?’ असंही कधी म्हणत नाहीत. त्यांना फक्त देणं माहीत असतं. त्यासाठी त्यांच्या कुठल्याच अटी-नियम नसतात. इच्छा-अपेक्षाही नसतात.
 
झाडांना त्यांच्यावर केलेली माया कळते. आणि त्या मायेची परतफेड ते अशा पद्धतीने करतात, की विचारू सोय नाही. कारण झाडं निस्वार्थी असतात, परोपकारी असतात.
 
अशाच एका झाडाची गोष्ट शेल अंकलनं या पुस्तकात सांगितली आहे. या झाडाला एक छोटा मुलगा फार आवडायचा. तो मुलगा रोज त्या झाडाजवळ यायचा, त्याची पानं गोळा करायचा, त्याची फुलं गोळा करायचा. त्याच्या फांद्यावर चढायचा. फांद्यांना धरून झोके घ्यायचा. झाडाची फळं खायचा. झाडाबरोबर लपाछपी खेळायचा. खेळून खेळून दमला की, त्याच्या गार गार सावलीत झोपायचा. झाडाला त्या मुलाच्या या सगळ्या वागण्यामुळे फार आनंद व्हायचा. मुलगा त्याच्यासोबत असला की, ते खूप खूश असायचं.
 
असे खूप दिवस, महिने, वर्षे जातात. तो मुलगा मोठा होतो. मग तो झाडाकडे येईनासा होतो. झाडाला फार वाइट वाटतं. त्याला मुलाची फार आठवण येते. ते त्याची वाट पाहात राहतं.
 
एक दिवस तो मोठा झालेला मुलगा त्या झाडाकडे येतो. त्याला पाहून झाडाला फार आनंद होतो. झाड त्याला म्हणतं, ‘ये बेटा, माझ्या फांद्यावर चढ, झोके घे, माझी फळं खा. माझ्या सावलीत मजेत बस.’ पण मुलाला आता वेळ नसतो. मुलगा म्हणतो, ‘मी आता मोठा झालो. आता मला आणखी मजा, वेगळी मजा करायची आहे. तू मला पैसे देऊ शकतोस का?’ झाडाजवळ काही पैसे नसतात. मग ते मुलाला आपली सारी फळं देतं. ती फळं तो मुलगा बाजारात नेऊन विकतो. त्याचे त्याला पैसे मिळतात. झाडाला फार आनंद होतो.
 
काही दिवसांनी तो मुलगा झाडाकडे परत येतो. आता त्याला घर बांधायचं असतं, लग्न करायचं असतं. मग झाड त्याला आपल्या फांद्या देतं. त्या विकून मुलगा घर बांधतो,  लग्न करतो. झाडाला फार आनंद होतो. पण परत तो मुलगा खूप दिवस झाडाकडे येत नाही.
 
पण एके दिवशी तो परत झाडाकडे येतो. आता झाडाचं फक्त खोड शिल्लक असतं. मुलाला पाहून त्याला आनंद होतो. मुलगा म्हणतो, ‘मला परदेशी जायचं आहे. मला एक होडी हवीय.’ झाड त्याला होडी करायला आपलं खोड देऊन टाकतं. तो घेऊन मुलगा जातो. त्याची होडी बनवून तो साता समुद्रापार जातो. त्याला आनंद होतो. झाडालाही मुलाला आपण मदत केली याचा आनंद होतो. 
 
अशीच खूप वर्षे जातात. तो मुलगा आता म्हातारा झालेला असतो. तो काठी टेकत टेकत त्या झाडाकडे येतो. झाडाचा आता केवळ छोटासा बुंधा शिल्लक असतो. झाडाला त्या मुलाला पाहून फार आनंद होतो. पण ते मुलाला म्हणतं, ‘बेटा, मला माफ कर. आता मी तुला काहीच देऊ शकत नाही.’ तो म्हातारा मुलगा म्हणतो, ‘मला आता काहीच नको आहे. मी आता म्हातारा झालो आहे. माझे दात दुखतात, मला फळं खाता येत नाहीत.  फांद्यांना लटकून झोके घेता येत नाहीत. मी आता फार थकलो आहे. एका जागी शांतपणे बसून राहावंसं वाटतं.’
 
झाड आपला छोटासा बुंधा सरळ आणि स्वच्छ करतं. आणि त्या म्हाता-या मुलाला म्हणतं, ‘ ये, माझ्या बुंध्यावर बस आणि आराम कर.’ म्हातारा मुलगा बुंध्यावर स्वस्थपणे बसतो. त्या झाडाला फार फार आनंद होतो. आणि म्हाता-या मुलालाही!
 
अशी ही गोष्ट आहे देणा-या झाडाची! शेल अंकल अतिशय साध्या सोप्या भाषेत, अगदी गप्पा माराव्यात अशा पद्धतीने लिहितात. छोटी छोटी वाक्यं, नेमके शब्द, आणि मोजकीच पण सुंदर चित्रं असं शेल अंकलच्या प्रत्येक पुस्तकाचं वर्णन करता येईल. तुम्हाला हे पुस्तक वाचायला आवडेल. ते वाचून झाल्यावर तुमचीही या ‘देणा-या’ झाडाशी आणि शेल अंकलशी दोस्ती होऊन जाईल. शेल अंकलबद्दल पुन्हा कधीतरी आणखी माहिती देईन.
  
देणारं झाड :  शेल सिल्व्हरस्टाइन,

 मराठी अनुवाद शोभा भागवत

कजा कजा मरू प्रकाशन, गरवारे बालभवन, पुणे
दूरध्वनी 020 - 2444 2109 पाने 26, किंमत : 10 रुपये

No comments:

Post a Comment