हे पुस्तक मूळ मराठीतलं नाही. फ्रेंच या विदेशी भाषेतून मराठीत अनुवादित केलेलं आहे. पण हे पुस्तक जगभरातल्या अनेक भाषांमध्ये यापूर्वी अनुवादित झालं आहे. आणि या सगळ्या भाषांमध्ये या पुस्तकाचं खूप कौतुकही झालं आहे. थोडक्यात जगभरातल्या तुमच्यासारख्या अनेक मुलांना या पुस्तकानं वेड लावलं आहे. त्यांचा ते दोस्त झालं आहे. तुम्हाला त्याचा दोस्त व्हायला आवडेल? करा मग थेट वाचायला सुरुवात.
या पुस्तकाचा हिरो आहे एक चिमुरडा राजकुमार. परग्रहावरून आलेला हा राजकुमार त्याच्या मेंढीसकट सहा वर्षे लेखकाला फार आनंद देतो. अनेक गोष्टी सांगतो. आणि मुख्य म्हणजे मोठय़ानांही शिकवतो, समजून घेतो. म्हणून या पुस्तकाचा लेखक म्हणतो, मुलांनी वय वाढलेल्यांना नीट समजून घेतलं पाहिजे. हा छोटा राजकुमार एका छोटय़ा ग्रहावर राहत असतो. त्या ग्रहावर तो एकटाच त्याच्या फुलराणी आणि इतर झुडपांसोबत राहत असतो. त्या फुलराणीची मात्र तो खूप काळजी घेत असतो. हा त्याचा ग्रहही खूप मजेशीर असतो. त्यावर राजकुमाराला हवा तेव्हा सूर्यास्त पाहता येतो. बस्स, खुर्ची फिरवली की समोरच्या दिशेला त्याला सूर्यास्त दिसतो. म्हणजे मित्रांनो हा त्याचा ग्रह पृथ्वी, चंद्र, सूर्य यांच्यापेक्षाही कितीतरी उंचावर असतो!
एके दिवशी हा राजकुमार जगप्रवासाला निघतो. पहिल्यांदा त्याला एका छोटय़ा ग्रहावर एक राजा भेटतो. राजकुमार आलेला पाहून त्याला फार आनंद होतो. तो राजकुमाराला प्रजानन, न्यायमंत्री, राजदूत बनवण्याचं आश्वासन देतो. पण एकटा राजाच राहत असलेल्या ग्रहावर कुणाचा न्याय करणार, कुणाचा राजदूत बनणार म्हणून राजकुमार तिथून बाहेर पडतो.
दुस-या एका छोटय़ा ग्रहावर एक स्तुतीप्रिय माणूस राहत असतो. त्यापुढच्या ग्रहावर एक मद्यपी माणूस राहत असतो. नंतर व्यापारी, नंतर बत्तीवाला भेटतो. आतापर्यंत ‘वय वाढलेले लोक चमत्कारिक असतात’ असा अनुभव राजकुमाराला येतो. पण बत्तीवाल्याच्या ग्रहावर मात्र एका दिवसात एक हजार चारशे चाळीस सूर्यास्त होतात. शिवाय तो बत्तीवाला आधीच्या लोकांसारखा फक्त स्वत:पुरता जगत नसतो. त्यामुळे राजकुमाराला हा ग्रह सोडून जाण्याचं जीवावर येतं पण त्या ग्रहावर जागाच नसते.
सहाव्या ग्रहावर राजकुमाराला नकाशेतज्ज्ञ भेटतो. तो राजकुमाराला पृथ्वी नावाच्या ग्रहावर जायला सांगतो. नकाशेतज्ज्ञ त्याला सांगतो की, तिथे खूप माणसं आहेत, पण राजकुमाराला तर एकही माणूस दिसत नाही. पृथ्वीवर पोचल्यावर एक साप त्याचं ‘शुभ संध्या’ म्हणून स्वागत करतो. कारण राजकुमार पृथ्वी नावाच्या मोठय़ाच्या मोठय़ा ग्रहावर पहिल्यांदाच आलेला असतो. तो उतरतो तिथं जंगल असतं. मग तो वाळंवट ओलांडतो, पर्वतं पार करतो, खडक, बर्फ चालून जातो. मग त्याला कोल्हा भेटतो. तो राजकुमाराला माणसं कशी वाईट असतात ते सांगतो. राजकुमाराची माणसांच्या जगात आल्यावर पहिल्यांदा रेल्वेच्या सिग्नलवाल्याशी भेट होते, मग व्यापाऱ्याशी होते.
राजकुमार पृथ्वीवर एक वर्ष राहतो. इथेच त्याला लेखक भेटतो. त्याचं विमान बंद पडतं अणि राजकुमार त्याच्याकडे मेंढीचं चित्र काढून घ्यायला येतो. हळूहळू दोघांची मैत्री होते. राजकुमार त्याला त्याच्या जगप्रवासाची गोष्ट सांगतो.
या पुस्तकाचा शेवट मात्र तुम्हाला कदाचित आवडणार नाही. कारण तुम्ही पुस्तक वाचत वाचत तिथपर्यंत पोहचाल तेव्हा हा राजकुमार तुमचा दोस्त झालेला असेल. अगदी जिवाभावाचा दोस्त! मित्रा, दे टाळी असं तुम्ही म्हणायला जाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की, तुमचा हा राजकुमार तुम्हाला कायमचा सोडून गेलेला आहे.
हा अनुवाद असला तरी तो इतका बेमालूम आहे की आपण एका परकीय भाषेतलं पुस्तक वाटतोय असं वाटतही नाही.
No comments:
Post a Comment