Sunday, 27 November 2011

इंजिनिअर, डॉक्टर होणार असलेले कवी

मित्रांनो, मी तुम्हाला अशा एका दिवाळी अंकाबद्दल सांगणार आहे, जो तुम्ही पाहावा, वाचावा असा मात्र नक्कीच आहे. या अंकाचे नाव आहे, रुजवण. हा कविता विशेषांक आहे. आणि या कविता लिहिल्यात तुमच्याच मित्रांनी. पण हे मित्र कोल्हापूर जिल्ह्यातल्या पेठशिवापूर इथल्या आश्रमशाळेत शिकणारे आहेत. गोविंद पाटील या त्यांच्या शिक्षकानं या कवितांचं संपादन केलं आहे. बाळ पोतदार यांनी प्रत्येक कवितेला चित्रं काढली आहेत.
 
पुस्तकं वाचणं, खेळणं, पोहणं, सायकल चालवणं, लेखन, गायन, चित्रं काढणं, प्रयोग करणं असे या मुला-मुलींचे छंद आहेत. त्यांना खूप शिकून मोठं व्हायचंय. कुणाला डॉक्टर, कुणाला इंजिनिअर, कुणाला गायक-गायिका व्हायचंय. एकाला शिक्षक, तर एका मुलीला चक्क वक्ता व्हायचंय. म्हणजे तिला मोठी मोठी आणि छान भाषणं करायची आहेत.
 
या मुला-मुलींनी लिहिलेल्या कविता फारच चांगल्या आहेत. राणी रणदिवे पाणीया कवितेत म्हणते,
पाऊस म्हणजे हवा गार
 पाऊस पडला मुसळधार
आता नदीतून वाहेल पाणी
डोहातसुद्धा साठेल पाणी
तर सुरज शिगवण ढगाला विचारतो,
निळे निळे अंग तुझे
त्यात निळे पाणी
तुझी गंमत सांगायला
येतोस का रे खाली? शिवानी वर्णेला मात्र फुलांचेही एक स्वतंत्र जग असते आणि ते जगही आपल्यासारखेच असते असे वाटते. म्हणून ती म्हणते,
कमळ झाले
फुलांचा राजा
गुलाब वाजवितो बाजा
निशिगंध
वाजविते बासरी
जाई-जुई निघाल्या सासरी
सुनील राठोड एका कॉलेजला जाणा-या इंगळीचीच गोष्ट सांगतो. ती अशी-
 
एक होती इंगळी
 
तिचे नाव चिंगळी
 
चालायची पांगळी
 
बोलायची वंगळी
 
नट्टापट्टा करायची
 
कॉलेजला जायची
 
भेलपुरी खायची
 
अभ्यास नाही करायची
 
रोज मार खायची
  रमीजा जमादार चिमुकल्या मुंगीचा पराक्रम सांगते. पण तिची ही मुंगी चक्क शेती करणारी आहे. पहा कशी ती-
मुंगी रे मुंगी
तिचे नाव चिंगी
दिसते छोटी
कामाची मोठी
एकदा काय झाले
मुंगीला वाटले
करावी शेती
काढावे पीक
गरिबीचा संसार
करावा ठीक
मुंगी रे मुंगी
तिचे नाव चिंगी
आणली रोपे नी
लावली वांगी 
आदित्य कणसेने मात्र आपल्या कवितेतून स्वयंपाक करता न येणा-या मनीमाऊची फजिती सांगितली आहे. तो लिहितो,
एक होती मनी
म्हणतात तिला राणी
एकदा काय झाले
उंदीर तावडीत गावले
त्याचा तिने केला रस्सा
बोक्याला म्हणते बसा, बसा
बसायला दिला रंगीत पाट
दिले पाणी वाढले ताट
रस्सा होता लई खारट
रागाने बोकोबा उठून गेले
म्हणून मनीला रडू आले   आरमान नाईकवाडेला मात्र अनेक प्रश्न पडतात. त्याने तेच आपल्या कवितेतून मांडले आहेत. तो विचारतो,
असतील कसे, असतील कसे?
जंगलातले रंगीत ससे
असतील कसे, असतील कसे?
पाण्यात राहणारे मासे   आकाश पाटीलची कविताही धमाल आहे. तो थेट एका लग्नातल्या फाजीलपणाचीच गोष्ट सांगतो. लग्नात लोक काय काय बालिश वाटावेत असे हट्ट करतात आणि मग त्यांची कशी फजिती होते,
संगीतपूरच्या वाजत्र्यांची
साग्रसंगीत कहाणी
दोन टन वजनाची
त्याची गोड पिपाणी
संगीतपूरचा राजासुद्धा
संगीताचाच नादी
वाजंत्र्याला दिला विडा
लग्न ठरण्याआधी
पिपाणीला हत्ती जोडून
न्यावी लागली ओढून
नेताना रस्त्यातली
आडवी घरे पाडून
साग्रसंगीत पिपाणी
लग्नात वाजवाय गेला
छाती फुटून वाजंत्री
साग्रसंगीत मेला   सुभाष शिगवण या लहानग्या मित्रानं आपल्या आवडत्या गाईबद्दल लिहिलंय,
हिरव्या रानात काळी गाय
ती मोठी हुशार हाय
तिला दिसले कोवळे गवत
खाण्यासाठी गेली धावत
गवतात दिसली काठी
गाईच्या शिंगाहून मोठी
गाईला आला राग
काठीला मारली धडाक   दिव्यांका शिंदेनं पावसाचं मोठेपण सांगायचा प्रयत्न केलाय. पावसामुळे काय काय होतं, हे सांगितलंय. तिची कविताच वाचा.
आकाशातले पाणी
जमिनीवर पडले
मातीच्या पोटामध्ये
सांगा काय दडले
डोंगरावरून पायथ्याकडे
झुळझुळ पडते पाणी
वा-याची लहर कशी
मजेत गाते गाणी
फुलून आली शेती
हिरवी हिरवीगार
वा-यासंगे डोलू लागली
मका आणि ज्वारी
हे सगळे  कवीमित्र खूप वाचतात आणि खूप खेळतातही.

No comments:

Post a Comment