Sunday 27 November 2011

सुंदर पुस्तकं, अप्रतिम चित्रं



नुकतीच ज्योत्स्ना प्रकाशनाने ‘नीना आणि मांजर’, ‘गोड भेट’, ‘छोटा पक्षी’ आणि ‘आपला जॉन’ अशी मूळ फ्रेंच भाषेतली चार पुस्तकं मराठीमध्ये अनुवादित केली आहेत. मासिकापेक्षाही थोडय़ा मोठय़ा आकारातली ही पुस्तकं रंगीत आहेत. त्यातली  चित्रं इतकी सुंदर आहेत की, त्यांच्यासाठी ‘अप्रतिम’ हाच शब्द  योग्य ठरेल. मूळ पुस्तकातली चित्रं जशीच्या तशी घेतल्याने पुस्तकांची खुमारी वाढली आहे.
 
‘नीना आणि मांजर’, ‘छोटा पक्षी’ आणि ‘आपला जॉन’ या तिन्ही गोष्टी जंगलातल्या पक्षी-प्राण्यांविषयीच्या आहेत. हे प्राणी वेगळे आहेत. त्यांना जे जमतं आणि इतर प्राण्यांच्या मदतीने ते जेवढं शिकू शकतात, तेवढंच लेखकांनी त्यांना करायला लावलं आहे. हे प्राणी आपल्या गोष्टीत आहेत म्हणून त्यांच्याकडून भलतंच आणि उगाचंच अचाट वाटेल असं काहीतरी करायला लावलेलं नाही. ते प्राणी-पक्षी आहेत, त्यामुळे ते प्रत्यक्षात जंगलात जसं एकोप्याने राहतात, वागतात आणि खेळतात, तसेच ते या गोष्टीमध्ये आहेत.
 
पण मग तुम्ही म्हणाल की, यात काय मज्जा? तर तसं नाही, या गोष्टींमध्ये खूप मजा आहे. ती पुस्तक हातात घेतल्यापासूनच सुरू होते. कारण मुखपृष्ठापासूनच या पुस्तकातली चित्रं आपली पकड घेतात, ती पाहण्यात आपण रंगून जातो. या चित्रांमधूनच गोष्ट पुढे सरकत जाते.
 
‘नीना आणि मांजर’ या पुस्तकातलं नीना हे हत्तीचं पिलू एका मांजरीबरोबर राहतं. त्यामुळे त्याला मांजरीसारखं झाडावर चढता येतं, उंदीर पकडता येतो. पण मांजरीसारखंच ते पाण्याला घाबरतं, स्वत:चंच अंग चाटतं. त्यामुळे निनाचे आई-बाबा अस्वस्थ होतात. पण एके रात्री त्यांच्या घरात उंदराचं पिलू शिरतं, तेव्हा नीनाचे आई-बाबा घाबरतात. नीना मात्र अजिबात घाबरत नाही. ती त्या उंदराला सोंडेत पकडून बाहेर फेकून देते. तेव्हा आपलं पिलू मांजरीकडून काही चांगल्या गोष्टीही शिकलं आहे, हे त्यांच्या लक्षात येतं.
 
‘छोटा पक्षी’ या पुस्तकात नुसतंच घरटय़ात बसून बसून कंटाळलेल्या एका छोटय़ा पक्ष्याला जग बघायची उत्सुकता लागते. मग तो बाहेर पडतो. पण त्याला कसं उडायचं हे माहीत नसतं. तो चालतो. आधी उंदराच्या बिळात जातो. मग बदकाबरोबर त्याच्या तळ्यातल्या घरी जातो. शेवटी कुत्र्याच्या घरी जातो. पण कुत्रा आणि मांजरीच्या भांडणात तो त्यांच्यापासून लांब पळतो, तेव्हा तो अचानक आकाशात भरारी घेतो. आणि मग त्याला जमिनीवर भेटलेले, उंदीर, बदक, कुत्रा आणि मांजर, झाडं, त्यांच्यावर राहणारे छोटे छोटे पक्षी..सारंच जग दिसायला लागतं.
 
‘आपला जॉन’ ही पक्ष्यांची गोष्ट आहे. यातल्या बदकाला वाटेत एक अंडं सापडतं. ती गंमत पाहायला ते कोंबडीला बोलावतं. अंडय़ातून बाहेर येणारं पिलू आपलंच असणार आणि ते आपल्यासारखंच असणार यावरून त्यांच्यामध्ये वादावादी होते. मग तिथे करकोचा, घुबड, नाइटिंगेल, अल्बेट्रॉस, हमिंग बर्ड, शहामृग येतात. ते सगळेच आपल्यासारखंच पिलू यातून बाहेर येईल असं म्हणतात. मग त्यांच्यामध्ये भांडणाला सुरुवात होते. तेवढय़ात त्या अंडय़ातून मगरीचं पिलू बाहेर येतं. पण त्यांच्या जवळपास एकही मगर नसल्यानेच तेच त्याचे पालक व्हायचं ठरवतात. त्याचं नाव जॉन ठेवतात. सगळे त्याची रोज शिकवणी घेतात. ‘‘मी अभ्यास करायला शिकवेन’’, ‘‘मी पळायला..’’, ‘‘मी मासे पकडायला’’, ‘‘मी अंडी घालायला’’, ‘‘मी गायला’’, ‘‘मी फुलातला मध चाखायला’’, ‘‘मी उंच उडायला’’ असे सगळे आपापले विषय ठरवून जॉनची शिकवणी घेतात. पण करकोच्याची मासे पकडण्याच्या आणि बदकाची पोहण्याच्या या दोनच विषयात जॉन पास होतो. कारण काही झालं तरी मगर ती मगरच, ती आकाशात कशी काय उडणार? या पुस्तकातल्या सगळ्याच पक्ष्यांनी आपले कपडे नव्या शिंप्याकडून शिवून घेतलेले असावेत. कारण त्यांचे रंग आणि आकार त्यांना अगदी खुलून दिसतात. करकोच्याच्या गळ्यात कायम माशांचा छोटा डब्बा असतो, तर घुबड गुरुजींच्या हातात कायम पुस्तक असतं. तेच जॉनला गणित शिकवतात.
 
‘गोड भेट’ हे असंच आणखी एक गोड पुस्तक. यातला ससूला बाजारात जाताना एक  मुलगी दिसते. ती त्याला आवडते. दुस-या दिवशी तो तिला भेटायला निघतो. सोबत दहा हिरवीगार आणि रसरशीत कलिंगडांची करंडी घेतो. पण चालून चालून थकतो. मग चार कलिंगडं देऊन गाय विकत घेतो, तिच्या पाठीवर बसून निघतो. पण वाटेत गाय बसते तेव्हा ससू आणखी चार कलिंगडं देऊन एक उंट घेतो. त्याच्या पाठीवर गाय ठेवतो, त्या गायीच्या पाठीवर बसून उरलेली कलिंगडं डोक्यावर घेतो. पण शहरातल्या रस्त्यावरून चालताना तो उंटही थकतो. मग ससू एक म्हातारा हत्ती एक कलिंगड देऊन विकत घेतो. आता त्याच्याजवळ मैत्रिणीला द्यायला एकच कलिंगड उरलेलं असतं. मग तो हत्तीच्या पाठीवर गाय, उंट यांना ठेवतो आणि स्वत:ही कलिंगड घेऊन बसतो. पण म्हातारा हत्तीही एवढय़ा ओझ्याने थकून जातो. मग ससू हत्ती, उंट, गाय आणि कलिंगड यांना डोक्यावर घेऊन निघतो. पण एवढं ओझं त्यानं कधीच डोक्यावर घेतलेलं नसतं. त्यामुळे त्याला तहान लागते, त्याचा घसा कोरडा पडतो. मग तो डोक्यावरचं ओझं खाली ठेवून उरलेलं कलिंगड खातो. आता मैत्रिणीला काय भेट देणार? हत्ती, उंट आणि गाय यांना आपण केलेली मेहनत फुकट गेली असंच वाटायला लागतं. पण ससू मैत्रिणीच्या घरी जाऊन तिला एक सुंदर भेट देतो. ती तिला खूप आवडते. ती भेट कोणती? त्यासाठी तुम्हाला मूळ पुस्तक वाचायला हवं.
 
 या पुस्तकाली चित्रं पाहण्यात खरी मजा आहे. ती पाहताना तुमची हसून हसून पुरेवाट होईल. मुलांची पुस्तकं म्हणजे मोठय़ा अक्षरात छापलेली आणि काहीतरी बोध देणारी असा अनेकांचा गैरसमज असतो. तो आई-बाबा, लेखक लोक आणि प्रकाशक अशा साऱ्याच मोठय़ा माणसांचा असतो. पण ही पुस्तकं तशी नाहीत. तुमची गट्टी कुणाबरोबर होते? तर जो तुमच्याशी खूप गप्पा मारतो आणि आपण मोठे आहोत, हे विसरून तुमच्याशी खेळतो. हो की नाही? ही पुस्तकं अगदी तशीच आहेत!

No comments:

Post a Comment