हे पुस्तक भुतांचं आहे. म्हणजे या पुस्तकात एकंदर बावीस भुतं आहेत. त्यातल्या दोन भुतांचं नाव आहे हरी आणि प्रिया. आणि ते दोघेही जवळपास तुमच्या वयाचेच आहेत. पण ते काही भुतं नसतात. तुमच्यासारखीच मुलं असतात. प्रिया आपल्या नव्या घरात नुकतीच राहायला आलेली असते. तिच्या शेजारी हरी उर्फ हर्ष राहत असतो. तो तिला आपल्या घरी सायकल दाखवायला घेऊन जातो. त्याच्या घरात पुस्तकांची ही भली मोठी कपाटं असतात. त्यातून प्रिया एक पुस्तक बाहेर काढते. तो हरीच्या पणजीच्या काळातला छायाचित्रांचा अल्बम असतो. प्रिया तो अल्बम उघडते आणि पणजी तिच्याशी बोलू लागते. अगदी साध्या-सोप्या भाषेमध्ये या गप्पा सुरू होतात.
पणजी त्यांना तिच्या कुटंबाविषयी सांगत असताना हरी आणि प्रिया दोघेही नकळतपणे त्या अल्बममध्ये जाऊन त्यांच्या घरात जातात आणि हरीच्या चार छोटय़ा आजोबांचे खेळ, मारामा-या पाहतात.
हरीच्या या आजोबांचे नाव असते टिप्पू. तुम्हाला काय आठवलं या नावावरून? टिप्पू सुलतान? अगदी बरोबर. जुनी माणसं अशीच पराक्रमी आणि रागीट स्वभावाची असतात. हरी त्या फोटोतल्या बाईकडे म्हणजे त्याच्या पणजीकडे पाहून म्हणतो, ‘या बाईचा चेहरा किती उभट आहे हे पाहिलंस का?’ त्यावर पणजी म्हणते, ‘याला शिष्टाचार म्हणत नाहीत.’.तर या पुस्तकातली भुतं ही अशी गमतीदार, प्रेमळ आणि चांगलं चांगलं वागणारी आहेत.
मग हरी आणि प्रिया त्यांच्या आजोबांच्या घरात जातात. तिथे ते सर्व पाहू शकतात, पण त्यांना कुणी पाहू शकत नाही. त्यामुळे त्या दोघांना ज्याम मज्जा येते. पान पाहून झालं की, ती दोघं पुस्तकाच्या बाहेर येतात आणि पुढचं पान उलटल्यावर त्या पानात जातात. तिथल्या पानावर असलेल्या व्यक्तीशी बोलतात. पुढच्या पानावर हरीची आज्जी असते. मग आज्जी त्यांना तिच्या गोष्टी सांगते. त्या पुढच्या पानावर आजोबा भेटतात.
आणि हे सर्व फोटो त्यांच्या तरुण वयातले असल्यानं ते तरुणच दिसतात, पण प्रिया-हरीनं वय विचारलं की, सांगतात एकशेपाच, एकशेदहा. पुढच्या एका पानावर ते डांबर-बाळाला भेटतात. म्हणजे हरीच्या लहानपणीच्या वडिलांना. ते लहान असताना कोठीतली एक भिंत डांबरानं रंगवून टाकतात. मग आजोबा रागावून त्यांना त्याच डांबरानं रंगवतात. म्हणून त्यांचं टोपणनाव ‘डांबर बाळ’ पडतं. त्याच रात्री झोपेत हरी त्याच्या खोलीत तो संग्रह पहात, आज्जीशी बोलत राहतो. त्याचा आवाज ऐकून त्याचे बाबा जागे होतात. पण हरी झोपेतच असतो. ते हरीला परत बिछान्यावर झोपवतात. आणि तो फोटोंचा अल्बम पुन्हा अडगळीत टाकून देतात. दुस-या दिवशी हरी तो खूप शोधतो पण त्याला तो सापडत नाही. मग तो म्हणतो, ‘काही हरकत नाही. बाबांनी तो कुठेतरी ठेवला असेल. मी त्याला एक दिवस शोधेनच.’ पण गंमत अशी असते की, त्याची आज्जी फक्त तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच बोलू शकत असते. तेवढे दिवस आज्जीची वाट पहायचं हरी ठरवतो की, नाही यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष पुस्तकच वाचलं पाहिजे.
पण मित्रांनो, तुम्हाला आणखी एक गंमत सांगतो. अशीच पण थोडीशी वेगळी गोष्ट असणारा एक सिनेमा आहे. त्याचं नाव आहे, नार्निया. सिनेमा इंग्रजीत आहे. पण त्यातले हिरो तुमच्यासारखीच छोटी छोटी मुलं असल्यानं तुम्हाला तो समजायला काहीच अडचण येणार नाही. हरी आणि प्रिया तर फक्त त्यांच्या पणजी-आज्जी-आजोबा यांना भेटतात, त्यांच्याशी बोलतात. पण ‘नार्निया’ या सिनेमातली मुलं घरातल्या कपाटात काय आहे हे पाहायला जातात, पण ते कपाट एका वेगळ्या जगाचं दार असतं. त्यामुळे ते एका वेगळ्याच जगात जातात. तिथे गेल्यावर ते खूप गमतीजमती करतात. त्यांची एका सिंहाशी मैत्री होते. तो सिंह त्यांना अनेक संकटातून वाचवतो. या सिनेमातही प्रियासारखीच एक गोड मुलगी आणि हरीसारखा एक थोडासा खोडकर मुलगा असतो.
तेव्हा मिळालं तर ‘गमतीदार भुते’ हे पुस्तकं वाचा, जमलं तर ‘नार्निया’ हा सिनेमा पहा. तुम्हाला मज्जा येईल.
No comments:
Post a Comment