मित्रांनो,
तुम्हाला गणित आवडतं का गणित? यावर तुम्ही म्हणणार ‘तू वेडा की खुळा? गणित हा काय आवडण्याचा विषय असतो का राव? त्यात काय गोष्टी, कविता, गाणी असतात? सारी आकडेमोड, बेरीज-वजाबाकी, गुणाकार-भागाकार..एक ना दोन..ज्याम ताप होतो डोस्कं लढवून लढवून.’ पण तरीही मी सांगेन की गणितासारखा (आणि विज्ञानासारखा) मनोरंजक आणि रंगतदार दुसरा विषय नाही. गणितात आकडेमोड असते हे खरे, त्यात कविता-गाणी नसतात हेही खरे पण तरीही त्यात खूप गमतीजमती असतात. मुख्य म्हणजे गणित आपली करमणूक करत नाही तर आपल्या बुद्धीला चालना देतं, आपल्याला प्रश्न विचारायला भाग पाडतं, आणि त्या प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची, त्यासाठी कुठली पद्धत वापरायची हेही शिकवते. त्यामुळे गणित हा विषय खूप महत्त्वाचा आणि मनोरंजक होतो.
आता हेच पहा ना, गणित म्हणजे ‘का’? हे असेच गमतीशीर पुस्तक आहे. हे असंच का, ते तसंच का असे प्रश्न विचारण्यातून काय होतं? तर तुम्ही मोठेपणी वैज्ञानिक, संशोधक, अभियंता होण्याची शक्यता असते. तसं व्हायचं असेल तर आतापासूनच तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत आणि त्यांची उत्तरं शोधण्याचीही धडपड तुम्ही केली पाहिजे. शिवाय गणितात आणि विज्ञानात प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं. प्रश्नांच्या उत्तराशिवाय हे दोन्ही विषय पूर्णच होऊ शकत नाहीत. किंबहुना प्रश्नांचा उलगडा करणं हेच या दोन्ही विषयांचं काम आहे. पण म्हणजे केवळ युक्त्या शोधणं म्हणजे गणित नव्हे, हेही लक्षात घ्या. तर त्या प्रत्येक युक्तीमागची कारणं जाणून घेणं महत्त्वाचं असतं. गणितातला हाच सिद्धांत तुम्हाला इतरही विषयाबाबत लावता येईल. लावलाच पाहिजे.
तर मग, आपल्या प्रत्येक प्रश्नाचं, शंकेचं समाधान करणारा, योग्य उत्तर देणारा विषय हा तुमचा आवडता असायला हवा की नको? नक्कीच असायला हवा. अशा पद्धतीने इतरही काही संख्यांचे वर्ग काढण्याची युक्ती या पुस्तकात सांगितली आहे. याशिवाय वजाबाकी, बेरीज, विभाज्यतेच्या कसोटय़ा, यांची साध्या, सोप्या भाषेत माहिती दिली आहे. गणितामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची असते. गणित सोडवायची रीत कोणतीही असो, तिच्यामागील गणिताचं सूत्र कोणतं हे समजावून घेतल्याशिवाय त्याला शरण जायचं नाही. कारण गणितामध्ये ‘का?’ या प्रश्नाला खूप महत्त्व असतं. त्याचं उत्तरं शोधणं म्हणजेच गणित.
- गणित म्हणजे ‘का’? :
- मनोहर रामचंद्र राईलकर
- वाई तालुका गणित अध्यापक मंडळ, वाई
- दूरध्वनी : 02167-220766
- पाने : 10, किंमत : 20 रुपये
No comments:
Post a Comment