Sunday 27 November 2011

‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’च्या करामती

मित्रांनो,
 
फास्टर फेणेतुम्हाला माहीत आहे? भा. रा. भागवंत यांचा हा बहादूर हिरो माहीत नाही असं सहसा होत नाही. फास्टर फेणेच्या करामतींनी तर अनेक मुलांच्या मनावर मोठं गारुड केलं आहे. तो अचाट करामती आणि उचापती करून धमाल उडवून देतो.
 
बंगालमधले प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांचा फेलूदाहा हिरो फास्टर फेणेसारखाच बहादूर आहे. तो कुठल्याही संकटाला आणि अडचणीला न घाबरता तोंड देतो. त्यातून मार्ग काढतो. त्यामुळेच तो  बंगालमधल्या मुलांचा गेल्या कित्येक वर्षापासून हिरो आहे. आणि आता तो मराठीमध्येही आलाय, खास तुमची मनं जिंकायला. तेव्हा चला तर मग या फॅन्टॅस्टिक फेलूदाची ओळख करून घेऊ.
 
फेलूदाची ही पुस्तक मालिका एकंदर बारा भागांची आहे.  बादशहाची अंगठी’, ‘गंगटोकमधली गडबड’, ‘सोनेरी किल्ला’, ‘केस-अ‍ॅटॅचीकेसची’, ‘कैलासातील कारस्थान’, ‘रॉयल बेंगॉलचे रहस्य’, ‘गणेशाचे गौडबंगाल’, ‘मुंबईचे डाकू’, ‘दफनभूमीतील गूढ’, ‘देवतेचा शाप’, ‘मृत्यूघरआणि काठमांडूतील कर्दनकाळअशा या बारा छोटेखानी कादंब-या आहेत. या सर्वच कादंब-या क्राउन आकारात असून शंभर-सव्वाशे पानांच्या आहेत. त्यामुळे त्या बैठकीत वाचून होतात.
 या मालिकेसोबत अ‍ॅडव्हेंचर मिनी स्लॅम बुकही आहे. त्यात  प्रत्येक कादंबरी वाचल्यावर तुम्ही स्वत: अनुभवलेले आगळेवेगळे आणि साहसी अनुभव  लिहू शकता. मित्रांनो, या कादंब-या कोलकाता, राजस्थान, दिल्ली, सिमला, मुंबई या शहरात घडतात. कारण फेलूदा हा गुप्तहेर असतो. कधी वेगवेगळ्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी तर कधी सुटी घालवण्यासाठी तो या शहरांमध्ये जातो. त्यामुळे रहस्य, साहस आणि पर्यटन अशा तिन्हींची ओळख या कादंब-यांमधून होते. फेलूदा हा अतिशय बुद्धीमान आणि हुशार गुप्तहेर आहे. प्रत्येक प्रकरणाचा तो अतिशय काळजीपूर्वक आणि व्यवस्थित तपास करतो. प्रत्येक घटनेमागची सर्व सूत्रं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यातून अनेक थरारक प्रसंग आणि रोमांचकारी अनुभवांना तोंड देण्याची त्याच्यावर पाळी येते. पण फेलूदा न डगमगता त्यांचा सामना करतो.
शिवाय तो गुप्तहेर असल्याने त्याच्याकडे अनेकविध प्रकारच्या घटनांचा तपास करण्यासाठी येतात. त्यात खुनाचा तपास, चोरीचा तपास, गुंडांशी सामना, बर्फाळ सिमल्यात गुंडांशी केलेली लढाई, अतिशय गूढ जागा इत्यादी घटनांनी या कादंबऱ्या खचाखच भरल्या आहेत. रॉयल बेंगॉलचे रहस्यया कादंबरीत फेलूदाला चक्क घनदाट जंगलात एका नरभक्षक वाघाशी दोन हात करावे लागतात. तर बादशहाची अंगठीया कादंबरीत फेलूदा आणि त्याचा साथीदार तोपशे सुटी घालवण्यासाठी लखनऊला गेलेले असतात. पण ते तिथे असतानाच मोगलकालीन अमूल्य अंगठी चोरीला जाते. त्याचा तपास करताना फेलूदाची गाठ एका दुष्ट गुन्हेगाराशी पडते. पुढे त्याला खडखडय़ा सापाशीही लढावं लागतं. मुंबईचे डाकूया कादंबरीत लालमोहनबाबूंच्या एक पुस्तकावर चित्रपट होणार असतो, म्हणून त्याचं शूटिंग पाहायला फेलूदा आणि तोपशे मुंबईला येतात. चित्रपटाचा निर्माता तस्कर असतो, त्याच्या बिल्डींगच्या लिफ्टमध्ये एके दिवशी एका माणसाचा खून होतो आणि शूटिंग पाहायला आलेल्या फेलूदाला त्याचा तपास करावा लागतो.
कादंब-यांची भाषा अतिशय साधी, सोपी आणि चित्रमय आहे. म्हणजे प्रत्येक कादंबरी वाचताना त्यातली पात्रं आणि घटना आपल्या नजरेसमोर उभ्या राहतात. सत्यजित रे हे प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक असल्याने त्यांनी ही कादंबरी मालिका अशी लिहिली आहे की, एखादा चित्रपट आपण पाहतो आहोत (इथं वाचतो आहोत) असं वाटतं
 प्रत्येक कादंबरीचा नायक फेलूदाच आहे. पण कादंबरीचा विषय मात्र वेगवेगळा आहे. त्या विषयाची तपशीलवार माहिती आणि ती रंजकपणे मांडण्याचं काम सत्यजित रे यांनी केलं आहे. त्यामुळे प्रत्येक कादंबरी वाचाविशी वाटते. पहिली संपली की, दुसरी, दुसरी संपली की तिसरी असं आपण वाचत राहतो.  फेलूदाच्या या कादंबरी मालिकेचा बंगालीतून इंग्रजी अनुवाद गोपा मुजुमदार यांनी केला आहे. आणि आता इंग्रजीतून  मराठी अनुवाद कलंदर पत्रकार अशोक जैन यांनी केला आहे. तो अतिशय चांगला झाला आहे.

No comments:

Post a Comment