‘परडी’ या कवितासंग्रहात एकूण 23 फुले म्हणजेच कविता आहेत. आणि त्या फुलांसारख्याच रंगीबेरंगी आहेत. हे रंग खरोखरच्या फुलांचे आहेत, नुसत्या शब्दांचे नाहीत हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि गंमत म्हणजे हे रंग बोलणारे, हालणारे, डुलणारे आणि चक्क उडणारेही आहेत. म्हणजे ‘फुलपाखरे’ या कवितेची सुरुवात पहा-
उधळलेल्या रंगांसारखे
फुलपाखरांचे थवे
पाहताच मला ते
वाटतात हवे हवे
रंगीबेरंगी पंखांवर
इंद्रधनुषी छटा
भासतात मला
रंगांच्या लाटा
ही कविता वाचताना आपल्या नजरेसमोर फुलपाखरे आणि त्यांचे नानाविध रंग तरळू लागतात. पण फुलं जशी मुलांना आवडतात तशी ती रंगीबेरंगी परीलाही आवडतात. परी आणि फुलं यांचं नातं एका कवितेत सांगितलंय, ते असं-
फुलासारखी एक परी
खूप फुलं तिच्या घरी
परी गोड होती भारी
जशी बाग फुललेली सारी
‘परी’ या कवितेतल्या या ओळी वाचताना बागेतली फुलं आठवायला लागतात. पण ही काही दोनच उदाहरणं नाहीत. या कवितासंग्रहातल्या बहुतेक कवितांमध्ये अशी बागच फुललेली आहे. या बागेची सुरुवात कधी तुमच्या दारासमोरून होते, कधी अंगणा समोरून होते तर कधी शाळेच्या वर्गासमोरूनही होते. आता ही कविताच पहा ना-
काय सांगू आई
आज किती मज्जा झाली!
गणिताच्या तासाला
खारूताई आली!
झाडावरून तिने
खाली आणले दाणे
गणितबिणित विसरून
आम्ही सुरू केले खाणे!
एक कविता तर चक्क कावळ्यावर आहे. कावळा काळा दिसत असला तरी त्याच्याही काही आवडीनिवडी असतात. त्याबाबतीत तो अगदी चोखंदळ आहे. पहा कसा तो
तुझा काळा रंग
कधी दिसतो निळा
पाण्याच्या वाटीत आंघोळ
हा रे कसला चाळा?
आहे की नाही गंमत?
पण प्रत्येक वेळी काही बागच येत नाही कवितेत. कधी कधी तुमच्यासारखी मुलंही बागेत जातात. मिनीही त्यातलीच. पहा-
छोटी मिनी
गाढ झोपी गेली
पाखरांच्या बागेत
तिची स्वप्ने गेली..
पण तेवडय़ात गडबड झाली. अन मग-
पावसाची स्वारी
बागेत आली
फुलपाखरांच्या पुरात
मिनी न्हाऊन गेली..
शिवाय या सर्व कविता रंगांनी सजलेल्या आहेत. त्यामुळे त्या वाचताना मजा येते. साधी-सोपी भाषा आणि साध्या-सोप्या शब्दांच्या गमतीजमती यामुळे ब-याच कवितांची चांगली भट्टी जमली आहे. यातल्या शब्दांना नाद आहे आणि लयही. म्हणजे ते वाचताना आपण रंगून जातो, त्यातल्या रंगांनी आणि गंधांनीही. सोबत यातल्या दोन कविता दिल्या आहेत. त्यावरून तुम्हाला कल्पना येईलच. तुम्ही हे पुस्तक वाचायला तर लागा म्हणजे तुम्ही पोहचायला लागाल इतर पुस्तकांच्याही दुनियेत.
No comments:
Post a Comment